अनुक्रमणिका
- १. महालक्ष्मी, मुंबई
- २. शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे
- ३. प्रतापगडची भवानीमाता, जिल्हा सातारा
- ४. श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव
- ५. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी
- ६. वणीची सप्तशृंगी, जिल्हा नाशिक
- ७. श्री साळवणदेवी, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
- ८. श्री कालरात्रीदेवी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड.
- ९. आणव्याची आजूबाई, जिल्हा संभाजीनगर
नवरात्रात ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते. दुर्गेचे स्तवन आणि पूजा करतांना अभिषेक प्रसंगी तिची नामावली म्हणतात. त्या नामावलीवरून स्त्रीच्या ठिकाणी कोणते गुण असावेत, याचा निर्देश झाल्याविना रहात नाही.
१. महालक्ष्मी, मुंबई
नवरात्रीमध्ये मुंबई शहरात जर कुठल्या देवीच्या दर्शनाला सर्वाधिक लोक जात असतील, तर ते महालक्ष्मीला होय. मुंबईत मुंबादेवी, गांवदेवी, प्रभादेवी, काळबादेवी इत्यादी प्राचीन प्रसिद्ध देवींची मंदिरे आहेत. या महालक्ष्मीचा वरदहस्त जणू मुंबईला लाभलेला आहे आणि मुंबईची समृद्धी अन् भरभराट सारखी वृद्धींगतच होत आहे. मुंबई शहरातील पश्चिमेकडील वाळकेश्वराच्या अलीकडच्या काही भागाला ‘महालक्ष्मी’ म्हणतात. याच ठिकाणी समुद्र किनार्यावर एका लहानशा टेकडीवर महालक्ष्मीचे ठिकाण आहे. या मंदिराची उभारणी सुद्धा सागरातूनच झाल्याची माहिती मिळते.
या मंदिराचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. मुंबई जेव्हा ७ स्वतंत्र टेकड्यांची होती, तेव्हा वरळी बेटावर वर्ष १७२० पर्यंत या महालक्ष्मीचे छोटेसे मंदिर होते; परंतु परकीय मुसलमानांच्या धार्मिक अत्याचाराच्या भीतीने तिच्या भक्तांनी देवीचे जवळच समुद्रात विसर्जन केले. मधल्या काळात मुंबईचे हस्तांतर पोर्तुगिजांकडून इंग्रजांना झाले. इंग्रजांच्या दूरदृष्टीने मुंबईचे महत्त्व जाणले होते; म्हणून मुंबई ही एकसंघ करण्यासाठी हळूहळू ही ७ बेटे जुळवण्याचे त्यांनी योजले आणि वरळीचा बांध घालण्यास आरंभ केला; पण त्या वेळी समुद्र हटवण्याचे कार्य काही केल्या पुरे होईना. बांधासाठी टाकण्यात आलेली दगड आणि माती सागराच्या लाटा आपल्या उदरात गडप करू लागल्या. त्यामुळे इंग्रज भांबावले. त्यांच्या मनात काम सोडण्याचे विचार डोकावू लागले. त्या वेळचे इंग्रजांचे इंजिनीयर रामजी शिवजी प्रभु यांना देवीने दृष्टांत दिला आणि ‘क्षीरसागरातून मला बाहेर काढून स्थापन करा’, असे सांगितले. प्रभु यांनी हा दृष्टांत तत्कालीन इंग्रज अधिकार्यांना सांगितला आणि समुद्रात जाळे टाकले. ते जाळे समुद्रात टाकताच त्यातून ३ काळ्या पाषाणांच्या देवीच्या मूर्ती बाहेर आल्या. त्या ३ मूर्ती म्हणजे आता मंदिरात स्थापन केलेल्या श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांच्या आहेत.
२. शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे
पुण्यापासून ९४ किलोमीटरवर असलेल्या जुन्नर गावापासून ४ किलोमीटरवर शिवनेरी गडावर जाण्याचा मार्ग आहे. किल्ला चढून पहिल्या दरवाज्यातून वर जाताच शिवाईदेवीचे लहानसे मंदिर आहे. शिवाईदेवीची मूर्ती अडीच फूट उंचीची असून ती शेंदूर चर्चित आणि महिषासुरमर्दन स्वरूपाची आहे. हे स्थान देवी तुळजाभवानीचे असल्याचे मानण्यात येते. राजमाता जिजाबाईंनी याच देवीची उपासना केली आणि तिच्याच कृपाप्रसादाने झालेला पुत्र म्हणून त्याचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले. अक्षय्य तृतीया आणि नवरात्रीत येथे यात्रा भरते.
३. प्रतापगडची भवानीमाता, जिल्हा सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला. यानंतर त्यांनी कृतज्ञतापूर्वक श्री भवानीमातेचे दर्शन घेतले. ज्या भवानीदेवीने विजय मिळवून दिला, तिची त्यांनी प्रतापगडावर प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील त्रिसूळ गंडकी, श्वेतगंडक आणि सरस्वती या नद्यांच्या संगम स्थानाची शिळा आणली अन् नेपाळमधील शिल्प कारागिरांकडून मूर्ती घडवून घेतली. या कामासाठी महाराजांनी मंबाजी नाईक-पानसरे यांची खास नेमणूक केली होती. देवीची प्रतापगडी विधीपूर्वक वर्ष १६६१ मध्ये स्थापना केली. मूर्ती काळ्या पाषाणाची आणि अष्टभुजा आहे. घाटमाथ्यावरून दरीत उतरल्यावर मुख्य मंदिर आढळते.
४. श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव
महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे हे पीठ आहे. ही देवी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी होती. कर्दभऋषींच्या भार्या अनुभूती ही तपश्चर्या करत असतांना कुकुट नामक दैत्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. त्या वेळी अनुभूतीने आदिशक्ती पार्वतीचा धावा केला, तेव्हा पार्वती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिने कुकुटाचा वध केला. ती त्वरित धावून आली; म्हणून ‘तुळजा-तुळजा’ नावाने ओळखली जाऊ लागली. ही देवी सिंहासनी आणि अष्टभुजा आहे. तिच्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, धनुष्य इत्यादी आयुधे आहेत. मुकुटावर मोती आणि लिंग यांच्या आकृत्या आहेत. नवरात्रीत तिचा उत्सव चालू होतो.
५. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी
महाराष्ट्रातील मुख्य अशा साडेतीन शक्तीपिठांपैकी कोल्हापूर हे एक पूर्ण पीठ आहे. ब्रह्मदेवाचा मानस पुत्र करवीर याचा या ठिकाणी देवीने वध केला. त्या असुराने इच्छा प्रदर्शित केल्यावरून या शहराला ‘कोल्हापूर’ आणि ‘करवीर’ ही नावे प्राप्त झाली.
भृगुकुळात जन्म झालेल्या गरुडाचल नावाच्या एका ब्राह्मणाला माधवी नावाची एक कन्या होती. ती पित्यासह वैकुंठाला गेली असता बाल स्वभावानुसार भगवान विष्णूच्या शेजारी त्याच्या पलंगावर जाऊन बसली. तेव्हा लक्ष्मीने तिला ‘अश्वमुख तुला प्राप्त होईल’, असा शाप दिला. पुढे ब्रह्मदेवाच्या वरामुळे ती शापमुक्त होऊन ‘महालक्ष्मी’ या नावाने प्रसिद्ध झाली.
कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी ४ प्रवेशद्वारे असून पश्चिम दरवाजाला ‘महाद्वार’ म्हणतात. विस्तृत आवारात महालक्ष्मीच्या प्रमुख मूर्तीसह महाकाली, महासरस्वती, कात्यायनी, शाकंभरी इत्यादी देवींच्या मूर्ती आहेत.
महालक्ष्मी चतुर्भूज असून तिच्या हातात मातुलिंग, गदा, ढाल आणि पानपत्र आहेत. डोक्यावर नागफणा आहे. मुकुटावर लिंग आणि योनी अशा आकृत्या आहेत. मूर्तीची उंची सुमारे ३ फूट असून ती काळ्या पाषाणाची आहे. वर्षातून ठराविक ३ दिवस मूर्तीवर सूर्यकिरणे येतात, त्या वेळी रत्नजडित अलंकार देवीला घातलेले असतात.
६. वणीची सप्तशृंगी, जिल्हा नाशिक
आदिशक्ती पीठातील हे प्रमुख पीठ नाशिकपासून ७७ किलोमीटर अंतरावर वणीजवळ आहे. देवी असलेला डोंगर अनुमाने सव्वापाच सहस्र फूट उंच आहे. वर जाण्यास दगडी पायर्या बांधलेल्या आहेत. या पायर्या अठराव्या शतकात बांधल्या गेल्या. मार्कंडेय ऋषींच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्यांना दर्शन दिले. देवीच्या आज्ञेवरून मार्कंडेयांनी या ठिकाणी स्वयंभू देवीची स्थापना केली. तिला ते नित्य पुराण सांगत असत. देवीला १८ हात आहेत. तिने हातात बाण, तलवार, वज्रपाश, शक्ती, चक्र, गदा इत्यादी आयुधे तिने धारण केलेली आहेत. मूर्तीची उंची १० फूट आहे. मूर्तीला शेंदराचा लेप दिला आहे. चैत्र नवरात्रात येथे वार्षिक यात्रा भरते.
मंदिराच्या पायर्या चढतांना प्रथम गरुड, शीतलातीर्थ, कूर्मतीर्थ आणि गणेश यांच्या भव्य मूर्तींचे दर्शन घडते. शिवतीर्थावर हिरवट पाणी, तर भगवती तीर्थावर तांबूस पाणी दिसते. सप्तशृंगीदेवीचा गाभारा बांधलेला नाही; कारण मूर्तीच्या वरच्या भागात तेवढी जागाच नाही. ही मूर्ती शेंदूरचर्चित रक्तवर्णी आहे.
७. श्री साळवणदेवी, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
श्रीगोंदा रेल्वेस्थानकापासून १८ किलोमीटर अंतरावर साळवणदेवीचे मंदिर आहे. नवरात्रात येथे होमहवन करण्यात येते, तसेच सप्तशतीचा पाठ करण्यात येतो. मंदिराच्या गाभार्यात एक भव्य असा शेंदरी तांदळा आहे. हा तांदळा म्हणजेच श्री साळवणदेवी. ही देवी अत्यंत जागृत आहे. साळवणदेवी ही माहूरच्या रेणुकादेवीचे स्थान आहे, असेही मानले जाते.
‘श्रीगोंदाच्या एकनाथ पाठक नावाच्या भक्तास वृद्धत्वामुळे माहूरला जाणे अशक्य वाटू लागले. तशाही स्थितीत ते तिकडे गेलेच आणि त्यांनी ‘आपणास यापुढे प्रतिवर्षी माहूरला येता येणार नाही. या कठीण प्रसंगात तू मार्ग दाखव’, अशी देवीला प्रार्थना केली. त्या वेळी देवीने ‘आपण मी तुझ्याच बरोबर गावी येईन; पण घरी पोचेपर्यंत मला पाहू नकोस’, अशी त्यांना आज्ञा दिली. ‘श्रीगोंदा नजीक आल्यावर मात्र खरोखरच देवी आपल्या पाठोपाठ आली आहे का ?’, हे पहाण्याची त्यांना इच्छा झाली; म्हणून त्यांनी मागे पाहिले, तो देवी तेथेच अदृश्य झाली’, अशी कथा आहे. श्री साळवणदेवी या भागातील अनेक घराण्यांची कुलदेवता आहे.
८. श्री कालरात्रीदेवी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड.
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथे वैजनाथच्या परिसरात श्री कालरात्रीदेवीचे स्थान आहे. हे स्वयंभू स्थान असून प्राणिमात्रांचा मोह, संभ्रम अशा अवस्थांचा नाश करणारी ही देवता मानली जाते. वेदांमध्ये हीचे एक शक्तीसूत्र आहे. महाकोशल देशाचा राजा विश्वपती याच्या मुलास भ्रम झाला. त्याने या ठिकाणी लक्षावधी अनुष्ठाने केल्याने त्याचा भ्रमविकार नाहीसा झाल्याची कथा आहे.
दसर्याच्या दिवशी श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग प्रभूंची पालखी मिरवणुकीने श्री कालरात्रीदेवीच्या मंदिरात येते आणि तेथून दोन्ही पालख्या ‘सदानंदीचा उदे उदे, वैजनाथ प्रभु की जय !’ या जयघोषात सीमोल्लंघनास जातात. परळीच्या आसमंतातच नारायण पर्वताच्या आग्नेय दिशेला ४ किलोमीटरवर गोधुधाम पर्वतावर अंबाआरोग्य भवानीदेवीचे स्थान आहे. जगातील वैद्यांचा नाथ याच क्षेत्री असल्याने त्याच्या औषधी आणि वनस्पती यांची साठवण येथे आरोग्य भवानीने केली आहे. दुर्मिळ वनस्पती प्राप्तीसाठी दूरदूरचे वैद्य येथे येतात.
श्रीधनमांना (ढोमणा) देवी क्षेत्र आणि दक्षिणेच्या वाटेवर पर्वताच्या उत्तरेस ढोमणादेवीचे स्थान आहे. हिच्या खाली अगणित द्रव्य आहे, अशी आख्यायिका आहे. एका राजाला या द्रव्याची इच्छा झाली. त्याला असे कळले की, मुंज झालेल्या (बटू) पहिल्या मुलाचा जो कुणी बळी देईल, त्याला ते द्रव्य प्राप्त होईल. राजाने एका ब्राह्मण जोडप्याला त्यासाठी सिद्ध केले. बलीदानाच्या दिवशी बटूच्या हा प्रकार लक्षात आला, तेव्हा त्याने या देवीचीच करुणा भाकली. देवीने मुलाचे आईबाप आणि राजा यांचा वध केला अन् बटूचे रक्षण केले. देवीला मूळस्थानावरून उचलून नव्या घाटाच्या पायथ्यापाशी आणून ठेवले आहे. या स्थानांतरालाही द्रव्याच्या आख्यायिकेचीच प्रेरणा कारणीभूत असल्याचे समजते.
९. आणव्याची आजूबाई, जिल्हा संभाजीनगर
मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याकडे जातांना संभाजीनगर-अजिंठा मार्गावरील गोळेगाव बसस्थानकापासून अनुमाने १२ किलोमीटरवर आणवा हे गाव आहे.
याच गावी भवानी आजूबाईचे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. आजूबाईची एक गावात आणि दुसरे गावाबाहेर अशी २ मंदिरे आहेत. गावातील आजूबाईचे मंदिर, म्हणजे देवीचे निवासस्थान होय. याच ठिकाणी देवीचा जन्म झाला होता. आज या ठिकाणी भव्य असा शेंदरी तांदळा आहे. गावाबाहेर अनुमाने एक किलोमीटर अंतरावर भवानी आजूबाईची स्वयंभू मूर्ती आहे. आज हीच आजूबाईची स्वयंभू मूर्ती मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे. देवीच्या मंदिरासमोर भव्य कुंड असून त्याला ‘कल्लोळी तीर्थ’ असे म्हणतात. या ठिकाणी स्नान केल्यास खरुज आणि त्वचेचे रोग बरे होतात; म्हणून असंख्य भाविक लोक स्नानासाठी येथे येतात.
मराठवाड्यात काही काळ निजामाची राजवट होती. त्या वेळी रझाकारांच्या कारवायांमुळे हिंदूंचा छळ आणि मंदिरांची नासधूस होत असे. अशाच एका प्रसंगात काही उपद्रवी लोकांनी देवी आजूबाईची मूर्ती नष्ट करण्याचा विचार केला. आक्रमणकर्ते मंदिराच्या गाभार्यापर्यंत येताच त्यांची त्या वेळी दृष्टीच गेली. प्रतिवर्षी येथे नवरात्रात चैत्र आणि आश्विन मासात देवीचा मोठा उत्सव होतो. नवरात्रात होमहवन इत्यादी कार्यक्रम होतात, तसेच ९ दिवस मोठी यात्रा भरते. चैत्र मासातील नवरात्रात देवीच्या जन्मपत्रिकेचे वाचन होते. अष्टमीला रात्री देवीची स्वारी निघते. त्या वेळी नवस करणारे लोक देवीभोवती मशाली पेटवून खेळतात. यालाच ‘देवीची पोत खेळणी’ म्हणतात. प्रतिवर्षी पोत खेळणार्यांची संख्या १ सहस्र ते १ सहस्र २०० असते. ‘आजूबाई जागृत देवस्थान असल्याने आई भवानी नवसाला पावते’, अशी अपार श्रद्धा भाविकांच्या अंतःकरणात आहे. येथे इतर धर्मांचे लोकही देवीला नवस करतात.’