बालकभावाची चित्रे काढणार्या चित्रकर्त्या सौ. उमा रविचंद्रन या स्वत: भावस्थिती अनुभवत असल्याने त्यांना श्रीकृष्णाचे अस्तित्व पदोपदी जाणवते. बालकभावाची ही चित्रे काढतांना उमाक्कांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तूत लेखात पाहू.
१. सौ. उमा रविचंद्रन् यांनी बालकभावाची चित्रे
काढण्याची प्रक्रिया अन् त्याविषयी त्यांना आलेल्या अनुभूती
१ अ. सौ. उमा रविचंद्रन् यांनी बालकभावाची चित्रे काढण्यास झालेला आरंभ
‘१७.७.२०१२ या दिवशी चेन्नई येथे सनातनच्या साधकांसाठी झालेल्या कार्यशाळेत ‘भाव’ या विषयावरील सत्रात मला मी अनुभवत असलेल्या भावाविषयीची सूत्रे मांडण्यास सांगितले होते. ज्या वेळी मी श्रीकृष्णाला प्रार्थना करून भावाविषयीची सूत्रे काढू लागले, तेव्हा प्रथम मला काही चित्रे स्फुरली. ती चित्रे पाहून माझीच भावजागृती झाली. साधारण दोन घंट्यांमध्ये ४ चित्रे पूर्ण झाली. ही चित्रे पाहून कार्यशाळेतील साधकांचाही भावजागृत झाला. ही सर्व चित्रे प.पू. डॉक्टरांनी पाहिल्यानंतर त्यांनाही ती आवडली.
मी अनुभवत असलेला ‘बालकभाव’ सर्वांना अनुभवता यावा, यासाठी या कार्यशाळेत उपस्थित साधकांकडून पुढील प्रयोग करून घेण्यात आला.
१ आ. प्रत्येक साधकाने ‘आपण ३ वर्षांची लहान मुलगी
असून आपले नाते केवळ श्रीकृष्णाशी आहे’, असा भाव ठेवणे
मी साधकांना सांगितले, ‘‘प्रथम आपण सर्वांनी डोळे मिटूया आणि असा भाव ठेवूया की, मी ३ वर्षांची लहान मुलगी असून आपले नाते केवळ श्रीकृष्णाशी आहे. मी परकर / घागरा आणि पोलका घातला असून पायात पैंजण, हातात बांगड्या अशी पारंपारिक वेशभूषा केली आहे. करूणाकर, भक्तवत्सल श्रीकृष्ण सतत आपल्यासमवेत असून तोच माझी माता अन् पिता बनून अत्यंत प्रेमाने आपली काळजी घेत आहे.
१. मला जेव्हा तहान-भूक लागते, झोप येते किंवा दुखापत होते, तेव्हाच मी त्याच्याकडे धावत जाते; परंतु तो मात्र कोठेही असला, तरी सातत्याने माझाच विचार करत असतो.
२. मी सकाळी उठल्यावर तो माझे तोंड धुवून स्वतःच्या पितांबराने ते पुसतो. तो मला अंंघोळ घालतो आणि मला कपडे घालतो.
३. श्रीकृष्ण माझे छोटे पाय त्याच्या मांडीवर घेऊन त्यांत पैंजण घालतो.
४. तो मला लोण्याप्रमाणे मऊ असा दही-भात भरवतो.
५. त्याच्या एका भक्ताने आणलेला तुळशीचा हार मी त्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते; परंतु माझे हात तेथेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे तो स्वतःच खाली वाकून त्या हाराचा स्वीकार करतो आणि गमतीने माझ्या गालांवर चापट मारतो. नंतर त्याच्या गळ्यातील तुळशीचा हार तो माझ्या छोट्या खांद्यावर घालतो. तो माझ्या पायांपर्यंत येतो.
६. श्रीकृष्ण संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी असल्यामुळे त्याच्या दर्शनासाठी पुष्कळ जीव येत आहेत. तो शांतपणे एका झाडाखाली बसला आहे. मी त्याच्या चरणांपाशी खेळत आहे आणि त्याच्या चरणांखालची माती गोळा करून त्यापासून घरे, किल्ले बनवण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी ती सगळी माती मी माझ्या सर्वांगावर माखून घेते. त्याच्या चरणांखाली असलेल्या मातीच्या सुगंधाने मी दरवळत आहे.
७. श्रीकृष्ण माझ्यासमवेत खेळतो आणि नाचतोही.
८. तो मला स्वतःच्या मांडीवर घेऊन एका हाताने डोक्यावर थोपटतो आणि दुसर्या हाताने माझे पाय चेपून मला झोपवतो.
अशा प्रकारे तो दिवसभर माझी काळजी घेत आहे. एखादी मुलगी ज्याप्रमाणे आपल्या पित्यावर पूर्णपणे विसंबून असते, त्याप्रमाणे श्रीकृष्णच माझी सर्वतोपरी काळजी घेणार असल्याने मी निर्धास्त आहे.’’
आम्हाला ही दिव्य अनुभूती दिल्याविषयी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.
२. भावजागृतीसाठी प्रयत्न करत असतांना
‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथात बालकभावाची रांगोळी पाहिल्यावर हळूहळू
बालकभाव निर्माण होणे आणि बालकभावाची प्रेरणा प.पू. डॉक्टरांनीच दिल्याची जाणीव होणे
मी ऑगस्ट-सप्टेंबर २०१२ या कालावधीत तामिळ सनातन पंचांगाच्या निर्मितीच्या सेवेसाठी सनातनच्या गोवा येथील आश्रमात आले होते. `तामिळ पंचांगांची सेवा पूर्ण करण्यासाठी विभागातील अन्य साधक दिवस-रात्र झटत आहेत आणि मीही त्याच सेवेसाठी येथे आले आहे. असे असतांना अकस्मात् ही चित्रे काढण्यास मी उद्युक्त का झाले ?’, असा विचार करत असतांना माझ्या लक्षात आले, ‘प.पू. डॉक्टरांच्या संकल्पामुळेच हे सर्व घडत आहे.’ आश्रमात आल्यावर त्याच दिवशी प.पू. डॉक्टरांनी मला माझ्या वहीमधील उरलेल्या पानांवर आणखी चित्रे काढण्यास सांगितले.
‘माझ्यामध्ये बालकभाव कसा निर्माण झाला’, असे आश्रमातील अनेक साधकांनी मला विचारले. त्याविषयी मी विचार केल्यानंतर लक्षात आले की, माझ्यात प.पू. डॉक्टरांनीच बालकभावाची ठिणगी निर्माण केली. मी वेगवेगळ्या प्रकारे भावजागृतीसाठी प्रयत्न करत असतांना ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या सात्त्विक रांगोळ्या’ या सनातनच्या ग्रंथामध्ये बालकभावाची रांगोळी पाहिली. त्यानंतर हळूहळू माझ्यामध्ये बालकभाव निर्माण झाला.
३. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच चित्रे काढू शकणे, ध्यानमंदिरात काढलेले
(श्री गणेशाची पूजा करतानाचे) चित्र हे आश्रमातील चैतन्याची फलश्रुती असून जसे श्रीकृष्णाचे
प्रत्येक अंग हे माधुर्याने भरलेले असते, तसा सनातनचा आश्रमही चैतन्याने ओतप्रोत भरलेला असणे
आरंभी मी बालकभावासंदर्भात जी चित्रे काढली, ती केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच काढली असल्याचे माझ्या लक्षात आले आणि मी ते अनुभवलेही. ‘श्रीकृष्ण श्री गणेशाची पूजा भावपूर्णरित्या कशी करायची, हे सांगतांनाचे चित्र’ मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ध्यानमंदिरात काढले आणि त्या वेळी ती आश्रमातील चैतन्याची फलश्रुती असल्याचे अनुभवले. ‘भगवान श्रीकृष्णाचे प्रत्येक अंग हे माधुर्याने भरलेले आहे’, असे ‘मधुराष्टकम्’मध्ये श्रीकृष्णाचे वर्णन केलेले आहे. तसाच रामनाथी आश्रम चैतन्याने ओतप्रोत भरलेला आहे.
४. प.पू. डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
४ अ. आश्रमातील सर्व साधकांच्या एकत्रित भावजागृतीच्या प्रेरणेने चित्र काढणे,
चित्र पाहून प.पू. डॉक्टरांनी गमतीने ‘लहान मुलीची असूया वाटेल’, असे म्हणणे आणि
सर्व चित्रे पाहूनही साधकांना असूया न वाटता त्यांची भावजागृती होऊन त्यांनी आनंद अनुभवणे
१४.९.२०१२ या दिवशी मी श्रीकृष्णाला मर्दन करत असतांनाचे चित्र काढले. आश्रमातील सर्व साधकांच्या एकत्रित भावजागृतीच्या प्रेरणेने मी हे चित्र काढले असल्याची जाणीव मला झाली. हे चित्र म्हणजे आश्रमातील साधकांच्या एकत्रित भावजागृतीचे रेखाटन आहे. हे चित्र पाहून प.पू. डॉक्टर गमतीने म्हणाले, ‘‘मला आणि आश्रमातील गोपींना तुम्ही रेखाटलेल्या या लहान मुलीविषयी असूया वाटेल.’’ ते असे का म्हणाले, याचा उलगडा मला नंतर झाला. याविषयी माझे चिंतन होऊन ‘त्यातून मी काहीतरी शिकावे’, हे त्यांना अपेक्षित आहे, हे माझ्या लक्षात आले.
सर्वसाधारणपणे एखाद्याविषयी थोडी असूया वाटणे, हे स्वाभाविक आहे; परंतु इथे मात्र उलट झाले असल्याचे माझ्या लक्षात आले. ही चित्रे पाहून असूया वाटण्यापेक्षा आश्रमातील प्रत्येकाची भावजागृती होऊन तो आनंदी व्हायचा आणि ‘सातत्याने भावावस्थेत कसे रहावे’, हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक व्हायचा. साधक त्यासंदर्भात अनेक प्रश्न मला विचारत होते; पण मला त्यांची उत्तरे ठाऊक नव्हती. साधकांच्या या एकत्रित भावातूनच मला हे चित्र काढण्याची प्रेरणा मिळाली. नंतर लक्षात आले, ‘आश्रमातील हे साधक सर्वसाधारण मानव नसून भगवान श्रीकृष्णाच्या अवतारासमवेत जन्माला आलेले देव, ऋषी आणि मुनी यांचे हे सैन्यच आहे.
४ आ. प.पू. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नामुळे अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त होणे
९.१०.२०१२ या दिवशी कु. प्रियांका लोटलीकर यांनी मला प.पू. डॉक्टरांनी ‘भगवान श्रीकृष्णाने मुरुगादेवाला (कार्तिकस्वामीला) दुग्धाभिषेक करणे’ हे चित्र पाहून विचारलेला पुढील प्रश्न सांगितला, ‘श्री मुरुगादेवाच्या अभिषेकाच्या चित्रातील रागिणी आणि इतर चित्रांमधील उमा एकसारख्याच कशा दिसत आहेत ? त्या जुळ्या आहेत का ?’
प.पू. डॉक्टरांनी विचारलेल्या या प्रश्नामुळे अंतर्मुख होऊन विचार करण्यास मला प्रवृत्त केले आणि मला काही सूत्रे शिकायलाही मिळाली. प.पू. डॉक्टरांच्या शिकवण्याच्या पद्धती आणि माध्यमे सारेच अद्वितीय अन् अद्भुत आहेत. मी रेखाटलेली चित्रे प.पू. डॉक्टरांना दाखवण्यापूर्वी आणि मी रामनाथी आश्रमात असतांना त्यांना दाखवल्यानंतर मला जाणवलेला भेद पुढे सारणी स्वरूपात देत आहे.
प.पू. डॉक्टरांनी चित्रातील मुलीचे नामकरण करणे
‘मी गोव्याला रामनाथी आश्रमात असतांना एकदा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुम्ही काढलेल्या बालकभावाच्या चित्रांतील त्या लहान मुलीला तुम्ही काय नाव दिले आहे ?’’ त्या वेळी मी शांतपणे उभी होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही उमाक्का आहात. त्यामुळे आपण चित्रांतील त्या लहान मुलीला ‘उमा’ असे संबोधू.’’ – सौ. उमा रविचंद्रन्
४ आ १. प.पू. डॉक्टरांना दाखवण्यापूर्वी आणि प.पू. डॉक्टरांना दाखवल्यानंतर चित्रांची वैशिष्ट्ये
चित्रांची वैशिष्ट्ये |
||
प.पू. डॉक्टरांना दाखवण्यापूर्वी |
प.पू. डॉक्टरांना दाखवल्यानंतर | |
१. चित्रांची योग्यता
|
ती केवळ सर्वसामान्य चित्रे असणे
|
सर्वसाधारण वाटणारी चित्रे भावचित्रांमध्ये रूपांतरित होऊन सर्व साधकांचा भाव जागृत होणे |
२. भावार्थ | चित्रांचा भावार्थ न समजणे | प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी पडताच सर्व चित्रांमध्ये पुष्कळ भावार्थ निर्माण होणे आणि सौ. अंजली गाडगीळ यांच्या लेखामुळे त्यांचे उत्तमपणे आकलन होणे |
३. भावजागृती होणे | चित्रे पाहून स्वतःतील भाव जागृत न होणे |
‘मी ती चित्रे प्रथमच पहात आहे’, असे वाटणे आणि भावजागृती होणे |
४. कर्तेपणा
|
अ. ‘ती चित्रे मी रेखाटली आहेत’, असा कर्तेपणा असणे
आ. ‘चित्रांमधील बालक मीच आहे’, असे स्वतःला वाटणे |
केवळ ‘प.पू. डॉक्टरांच्या संकल्पामुळेच ती चित्रे सगुण रूपात साकार झाली आहेत’, याची जाणीव होणे
श्रीकृष्णाप्रती बालकभाव असलेले कोणतेही बालक ‘ते बालक’ असू शकते, याची जाणीव होणे |
५. आसक्ती | चित्रातील बाळ स्वतःच असल्याची जाणीव असल्यामुळे सगुणात अडकणे |
प.पू. डॉक्टरांनी या आसक्तीतून हळूच बाहेर काढणे, प्रथम त्यांनी ‘सत्कारा’च्या चित्रात चेन्नईतील सर्व साधकांचे चित्र रेखाटून घेणे आणि त्यानंतर ‘श्री मुरुगादेवाच्या अभिषेका’च्या चित्रात स्वतःऐवजी रागिणीतार्इंचे चित्र रेखाटून घेणे |
६. इतरांना प्रेरणा | ती चित्रे वैयक्तिक असल्यामुळे इतरांना प्रेरणादायी नसणे | प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे ती चित्रे सार्वजनिक झाल्यामुळे रजनीतार्इंना सख्यभाव असलेली चित्रे काढण्याची प्रेरणा मिळणे |
प.पू. डॉक्टरांच्या कृपाशीर्वादामुळेच मला ही सूत्रे शिकायला मिळाली. त्याविषयी मी शरणागत भावाने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई