सध्या बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक आदी व्यक्ती हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता आणि महापुरुष यांवर टीका करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात. अशा टीकांचा योग्य तो प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते, तसेच धर्महानीही होते. ‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे. भगवान श्रीकृष्णावरील टीका पुढे ‘आक्षेप’ या मथळ्याखाली आणि त्यानंतर त्या अयोग्य विचारांचा प्रतिवाद ‘आक्षेपाचे खंडन’ या मथळ्याखाली दिला आहे.
लेखक : श्री. दुर्गेश ज. परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
आक्षेप क्र. १
‘दया तिचे नाव भूतांचे पाळण ।’ असे संतवचन असतांना श्रीकृष्णाने मात्र दुर्याेधनादी कौरवांना दया दाखवली नाही !
श्रीकृष्ण स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणवून घेतो. अशा अवताराने शांतता प्रस्थापित करण्याऐवजी अर्जुनाला भडकावले. अर्जुनाला युद्ध करायचे नव्हते, तरीही श्रीकृष्णाने त्याचा बुद्धीभेद करून त्याला आप्तस्वकियांच्या विरुद्ध लढायला लावले. या युद्धात लाखो सैनिक प्राणांस मुकले. त्यांच्या स्त्रिया विधवा झाल्या. हे सारे करून हा नामानिराळा राहिला ! अहिंसा हा परम धर्म असलेल्या या देशाची थोर परंपरा या लबाड आणि कावेबाज श्रीकृष्णाने धुळीला मिळवली. भारतियांच्या अहिंसा धर्माला खरी बाधा यानेच आणली. अहिंसा म्हणजे दया दाखवणे ! श्रीकृष्णाने दुर्याेधनादी कौरवांना दया दाखवायला हवी होती. ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण ।’, असे संतवचनच आहे.
आक्षेपाचे खंडन
अ. दयेत दुष्टांचे निर्दालनही सामावलेले आहे !
भगवान श्रीकृष्णावर आक्षेप घेणार्यांनी संतवचनाचा दाखला देऊन आमचे काम सोपे केले आहे; मात्र त्यांनी संतवचनाचा अर्धाच भाग सांगितला आहे. ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण ।’ या वचनाचे पुढचे चरण आहे, ‘आणिक निर्दाळण कंटकांचे ।।’, म्हणजे ‘केवळ प्राणिमात्रांवर प्रेम करणे, म्हणजे दया नसून ‘दुष्टांचे निर्दालन’ हीसुद्धा दयाच आहे.’ ‘दया’ म्हणजे भूतांचे (प्राणीमात्रांचे) पालन करणे; तथापि दयेचा सूक्ष्म विचार केल्यास असे लक्षात येते की, दयेत दुष्टांचे निर्दालनही सामावले आहे ! खरे विचारवंत स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर विचार करतात; कारण धर्माची तत्त्वे सूक्ष्म आहेत. त्यामुळे एखाद्या गहन विषयाचा सूक्ष्म विचार केल्याविना मतप्रदर्शन करणे, म्हणजे मनाने वाईट असलेल्या आणि रूपाने बरा दिसणार्या माणसाची स्तुती केल्यासारखे आहे !
आ. कौरव ५ गावेही पांडवांना देण्यास सिद्ध नसल्याने श्रीकृष्णाने युद्धाचा निर्णय दिला !
‘भारतीय दंड विधाना’च्या कलम ३०० मध्ये खुनाच्या व्याख्येत ‘दुसर्याला ठार मारणे, म्हणजे खून करणे’ एवढाच स्थूल विचार केलेला नाही, तर ‘आत्मरक्षणासाठी जर एखाद्याने दुसर्याला ठार मारले, तर तो खून होत नाही’, हा सूक्ष्म विचारही केला आहे. अशा सूक्ष्म दृष्टीने विचार केल्यास समजून येईल की, ‘श्रीकृष्णाने युद्धाचा निर्णय देणे’, हे अहिंसेच्या विरुद्ध नव्हते.
कौरवांनी पांडवांवर कमालीचा अन्याय केला होता. कपटाने खेळलेल्या द्युतात पांडवांचे राज्य हरण करण्यात आले. त्यांना १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. या १३ वर्षांनंतर त्यांचे राज्य परत करण्याचे कौरवांनी मान्य केले होते; पण पांडवांचे राज्य परत करण्यास त्यांनी नकार दिला. आपापसांत तडजोड व्हावी; म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाई केली. शिष्टाईच्या वेळी श्रीकृष्णाने ‘कौरव जर पांडवांना त्यांचे संपूर्ण राज्य देण्यास सिद्ध नसतील, तर त्यांनी ५ गावे तरी द्यावीत’, असा प्रस्ताव मांडला. यामागे त्याचा युद्ध टाळण्याचा प्रयत्न होता. कौरवांनी हा प्रस्तावही लाथाडला आणि ‘युद्ध केल्याविना आम्ही पांडवांना ५ गावेच काय सुईच्या अग्रावर जेवढी माती राहील, तेवढीही भूमी देणार नाही’, असे सांगितले. अशा परिस्थितीत न्याय प्रस्थापित करण्यासाठी युद्धावाचून अन्य पर्याय उरला नाही; म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याचा निर्णय दिला.
आक्षेप क्र. २
कृष्णाने अर्जुनाकरवी अन्यायाने आणि अनैतिकतेने ‘महात्मा’ कर्णाचा वध केला !
श्रीकृष्ण अत्यंत कपटी होता. न्याय, नीती आणि धर्म यांची त्याला चाड नव्हती. त्याच्या मनात कर्णाविषयी द्वेष होता. युद्धाच्या वेळी कर्णाचा रथ भूमीत रुतला होता. कर्ण रथाचे चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, तरीही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, ‘अर्जुना, तू कर्णावर शरसंधान कर. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.’ कर्णाच्या रथाचे चाक रणभूमीत रुतले असतांना त्याच्यावर बाणांचा वर्षाव करायला लावून कर्णाच्या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी असणारा कृष्ण ‘धर्मसंस्थापनेसाठी झालेला अवतार आहे !’, यावर विश्वास तरी कसा ठेवायचा ? अधर्मी कृष्णाने महात्मा कर्णाचा कपटाने घात केला !
आक्षेपाचे खंडन
अ. द्रौपदीला भर सभेत आणून विवस्त्र करण्याची कल्पना केवळ कर्णाची होती !
आजकाल कर्णाला ‘महात्मा’ बनवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. खलनायकाला नायक बनवण्याची एक टूमच निघाली आहे. ‘सर्व सद्गुणांचा रस काढून तो रस एका मुशीत ओतला आणि त्यातून जी सद्गुणांची मूर्ती साकार झाली, ती मूर्ती म्हणजेच कर्ण !’, असे सांगणारी काही पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. कर्णाचे उदात्तीकरण करणार्यांनी त्याची वकिली चांगली केली आहे; पण ‘त्यांचा महाभारताचा अभ्यास चांगला आहे’, असे म्हणता येणार नाही.
द्युताच्या वेळी धर्मराजाने द्रौपदीला पणाला लावले. त्यात तो हरला. द्रौपदीला पणाला लावताच भीष्म, द्रोण, कृप आणि विदुर यांच्यासारखे सर्व सज्जन हळहळले. महाभारतात व्यासांनी याविषयी म्हटले आहे, ‘धिग्धिगित्येव वृद्धानां सभ्यानां नि:सृता गिर: ।’ (महाभारत, पर्व २, अध्याय ५८, श्लोक ३८), म्हणजे ‘धिक्कार असो ! धिक्कार असो !, अशी वाणी वृद्ध सभासदांच्या तोंडून बाहेर पडली.’ कर्ण मात्र आनंदित झाला. द्रौपदीला भर सभेत आणून विवस्त्र करण्याची कल्पना ना दुर्याेधनाची होती ना दु:शासनाची होती ! ‘द्रौपदी एकवस्त्रा असो वा विवस्त्र, तिला सभेत आणले पाहिजे !’, ही कल्पना कर्णाची होती. दु:शासन रजस्वला आणि एकवस्त्रा असलेल्या द्रौपदीला राजसभेत घेऊन आला. तेव्हा कर्ण मोठ्याने ओरडून म्हणाला, ‘‘पांडवानां च वासांसि द्रौपद्याश्चाप्युपाहर ।’ (महाभारत, पर्व २, अध्याय ६१, श्लोक ३८), म्हणजे ‘पांडव आणि द्रौपदी या दोघांचीही वस्त्रे हिसकावून घे.’’ द्रौपदीला भर सभेत विवस्त्र करू पहाणारा कर्ण ‘महात्मा’ कसा ?
आ. कर्णाने त्याच्यासाठी सिद्ध ठेवलेल्या दुसर्या रथाचा उपयोग करण्याऐवजी मुद्दामहून त्याच्या रथाचे चाक भूमीतून काढण्याचा वेळकाढूपणा केला !
कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले होते. तेव्हा कर्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘थोडा वेळ थांब. मी माझ्या रथाचे चाक काढतो.’’ त्या वेळी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘अर्जुना, युद्ध थांबवू नकोस. ते चालूच ठेव.’’ युद्धापूर्वी कर्णाने दुर्याेधनाला सांगितले होते, ‘‘दुर्याेधना, ‘ऐन युद्धाच्या वेळी माझ्या रथाचे चाक भूमीत रुतेल’, असा मला शाप देण्यात आला आहे. त्यामुळे तसा प्रसंग आलाच, तर उत्तम घोडे जोडलेले उत्कृष्ट रथ माझ्या रथाच्या मागे सतत असावेत.’’
कर्णाची ही विनंती मान्य करून दुर्याेधनाने त्याच्यासाठी तसे रथ सिद्ध ठेवले होते. कर्णाने त्याच्या रथाचे चाक भूमीतून काढण्याऐवजी त्याच्यासाठी सिद्ध ठेवलेल्या अन्य रथांपैकी एका रथाचा उपयोग का केला नाही ? त्या वेळच्या युद्धाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर युद्ध थांबत असे. कर्णाच्या रथाचे चाक रुतले, तेव्हा सूर्यास्ताची वेळ समीप आली होती. ते जाणून मुद्दाम वेळ काढण्यासाठी कर्णाने अन्य रथाचा उपयोग केला नाही. तो रथाचे चाक काढण्याचा प्रयत्न करू लागला. ‘चालू असलेले युद्ध या निमित्ताने थांबवायचे आणि दुसर्या दिवशी ताजेतवाने होऊन युद्ध करायचे’, हा त्याचा हेतू होता. कर्णाची ही लबाडी श्रीकृष्णाने ओळखली; म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘कर्णाशी युद्ध कर’, असा निर्णय दिला. कर्ण पांडवांशी न्यायाने आणि नीतीने वागला नव्हता. अन्यायाने आणि अनैतिकतेने वागणार्याशी न्यायाने अन् नैतिकतेने वागून चालत नाही. ‘ठकाशी महाठक’ या न्यायाने श्रीकृष्ण वागला आणि त्याने अर्जुनासही तसेच वागायला सांगितले !
आक्षेप क्र. ३
श्रीकृष्णाने गीतेतून जातीचे स्तोम माजवले !
श्रीकृष्ण हा जगातला पहिला माणूस आहे की, ज्याने जातीव्यवस्था निर्माण करून समाजात अराजकता पसरवली. गीतेत श्रीकृष्ण सांगतो, ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १३), म्हणजे ‘मी चार वर्णांचा (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचा) समूह निर्माण केला.’ श्रीकृष्णाच्या या सांगण्यातूनच ‘अस्पृश्यतेचा जन्म झाला आहे’, हे विसरता येणार नाही. जातीचे स्तोम माजवणारी गीता आणि ती सांगणारा कृष्ण या दोघांनाही नाकारले पाहिजे. माणसामाणसांत फूट पाडणार्या श्रीकृष्णाला पूजनीय म्हणता येणार नाही.
आक्षेपाचे खंडन
अ. श्रीकृष्ण दोषी नाही, तर चातुर्वर्ण्याचा विपरीत अर्थ लावणारे दोषी आहेत !
समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचे महान कार्य केलेल्या समाजसुधारक स्वा. सावरकर यांनी ‘केसरी’मध्ये २.१२.१९३० या दिवशी ‘सनातन धर्म म्हणजे जातीभेद नव्हे !’ या शीर्षकाखाली एक लेख लिहिला होता. या लेखात ते म्हणतात, ‘चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्ण, हे गुणकर्मविभागश: असल्याचे गीतेत स्पष्ट केले आहे, म्हणजे ते जन्मजात नाहीत. त्यात गुणकर्मांचा उल्लेख आहे. वंशपरंपरेचा त्यात मागमूससुद्धा नाही. अस्पृश्यतेने समाजाची धारणा होत नाही. ‘जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते ।’ (स्कन्दपुराण, नागरखण्ड, अध्याय २३९, श्लोक ३१), म्हणजे ‘कोणताही मनुष्य हा जन्मतः शूद्र असतो. त्याच्यावर उपनयनादी संस्कार झाल्यावर त्याला ‘द्विज’ असे म्हणतात.’
‘चातुर्वर्ण्याने अस्पृश्यता निर्माण झाली’, असे म्हणणे वास्तवतेला धरून नाही. जर चारच वर्ण अस्तित्वात होते, तर पाचवा ‘अस्पृश्य’ हा वर्ण कसा निर्माण होणार ? एक पुरातन वचन आहे –
ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णा द्विजातयः ।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पञ्चमः ॥ – मनुस्मृति, अध्याय १०, श्लोक ४
अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीन वर्ण ‘द्विज’ म्हणजे ‘दोन जन्म असलेले’ (उपनयनादी संस्कार हा ‘दुसरा जन्म’ मानला जातो) आहेत; चौथा शूद्रवर्ण हा एक जन्म असलेला होय. याव्यतिरिक्त पाचवा वर्ण नाही.
दुसरे वचन आहे, ‘कर्मक्रियाविभेदेन चातुर्वर्ण्यं प्रतिष्ठितम् ।’, म्हणजे ‘कर्मक्रियेच्या भेदाने चार वर्ण प्रतिष्ठित झाले.’ ‘माणूस कोणत्या जातीत जन्माला आला ?’, याला महत्त्व नसून ‘त्याचे गुण काय आहेत ?’, याला महत्त्व आहे. चातुर्वर्ण्याचा विपरीत अर्थ लावून ज्यांनी समाजात स्पृश्य-अस्पृश्यतेचा वाद निर्माण केला, दोष त्यांचा आहे. श्रीकृष्णाने जे सांगितले, त्यात दोष नाही !
आ. ‘गीता धर्म’ हा ‘विश्व धर्म’ असल्याने गीता आणि श्रीकृष्ण यांना दोष देणे योग्य नाही !
यासंदर्भात भूतपूर्व न्यायमूर्ती राम केशव रानडे म्हणतात, ‘श्रीकृष्णाने सांगितलेला ‘गीता धर्म’ हा ‘विश्व धर्म’ आहे. तो मानव धर्म आहे. या शुद्ध सात्त्विक धर्मात अस्पृश्यतेचे घाण पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ‘श्रीकृष्णाच्या धर्मगंगेला नावे ठेवणे’, हा आत्मघातकीपणा आहे. त्यापेक्षा ‘ते घाण पाणी सोडणे बंद करणे’, हाच खरा धर्म आहे.’
एखाद्याला दूध पचत नसेल, तर तो दोष दुधाचा नसून त्याच्या कमकुवत पचनशक्तीचा आहे. त्याचप्रमाणे आक्षेप घेणार्यांनी श्रीकृष्णाच्या विचारांना दोष देण्यापेक्षा आपली आकलनक्षमता आणि विवेकशक्ती परिपक्व करावी !
आक्षेप क्र. ४
श्रीकृष्णाने धर्माचा सूक्ष्म विचार आणि धर्माचे रहस्य यांचा हवा तसा अर्थ लावून प्रत्येक वेळी पांडवांच्या बाजूने कौल दिला !
याचे एक उदाहरण देता येईल. कौरव-पांडव युद्धात कर्णाने युधिष्ठिराचा पराभव केला. युधिष्ठिर रणभूमी सोडून शिबिरात परतला. काही वेळाने अर्जुन त्याला भेटायला आला. कर्णाने केलेल्या पराभवामुळे अपमानित झालेला युधिष्ठिर अर्जुनाला रागाने म्हणाला, ‘‘काय करायचंय तुझे गांडीव धनुष्य ? देऊन टाक ते दुसर्याला !’’ अर्जुनाने पूर्वीच एक प्रतिज्ञा केली होती की, जो कोणी त्याचे गांडीव धनुष्य ‘दुसर्याला देऊन टाक’, असे म्हणेल, त्याचा तो वध करील. प्रतिज्ञेनुसार अर्जुन युधिष्ठिराचा वध करण्यास पुढे सरसावला. श्रीकृष्णाने त्याला थांबवले.
‘अर्जुना, अयोग्य वागणार्या कौरवांशी युद्ध कर’, असे म्हणणारा श्रीकृष्ण अर्जुनाला मात्र अयोग्य वागणार्या युधिष्ठिराचा वध करण्यापासून परावृत्त करतो. मग कोणता कृष्ण सत्य?
आक्षेपाचे खंडन
अ. दुर्याेधनादी कौरवांसारखा गंभीर अपराध युधिष्ठिराकडून घडला नव्हता !
धर्माची तत्त्वे सूक्ष्म आहेत. आता अशी कल्पना करू की, आपण सारे जण गप्पा मारत बसलो आहोत. तेवढ्यात एक घाबरलेला माणूस धावत येऊन आपल्याला सांगतो, ‘काही गुंड माझ्यामागे लागले आहेत. मी त्यांना खून करतांना प्रत्यक्ष पाहिले; म्हणून ते माझाही खून करू पहात आहेत. कृपया आपण मला आश्रय द्या.’ आपण त्याला लपायला जागा देतो. तेवढ्यात ते गुंड त्या माणसाला शोधत तिथे येतात. अशा परिस्थितीत त्या निरपराध माणसाला त्या गुंडांच्या हवाली करायचे कि असत्य बोलून त्याचा जीव वाचवायचा ? अशा वेळी धर्माचा सूक्ष्म विचार करून असत्य बोलणेच श्रेयस्कर असते; कारण ‘ज्यात प्राणीमात्रांचे आत्यंतिक हित आहे, ते सत्य !’, अशी सत्याची एक व्याख्या आहे. त्यामुळे ‘गुंडांशी असत्य बोलणे’, हे लौकिक अर्थाने असत्य असले, तरीही धर्माच्या सूक्ष्म दृष्टीने ते असत्य नाही !
भगवान श्रीकृष्णांना धर्मपर सूक्ष्म दृष्टी लाभलेली होती; म्हणूनच त्यांनी अर्जुनाला सख्खा आणि चुलत अशा दोन भावांच्या संदर्भात परस्परविरोधी निर्णय दिले. यावरून ‘श्रीकृष्ण नितांत सत्याची बाजू घेणारे आहेत’, असे दिसेल. दुर्याेधनाने अनैतिकतेच्या आणि अन्यायाच्या मार्गाने पांडवांच्या राज्यावर स्वतःचा अधिकार प्रस्थापित केला होता. तसा गंभीर अपराध युधिष्ठिराकडून घडला नव्हता, हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामुळे दुर्याेधन आणि युधिष्ठिर यांच्या कृत्याला एकाच पारड्यात तोलता येणार नाही.
आ. धर्माचा बारकावा जाणणार्या श्रीकृष्णाने अर्जुनाला युधिष्ठिराची निर्भत्सना करायला सांगून एक प्रकारे युधिष्ठिराचा वधच करविला !
गांडीव धनुष्याविषयी युधिष्ठिराने काढलेल्या उद्गारांमुळे संतापलेल्या अर्जुनाने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे सत्याचे पालन केले असते, तर फार मोठा अनर्थ घडला असता. तो अनर्थ टाळण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्माचा बारकावा सांगितला. ‘आपल्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठ्या असलेल्या व्यक्तीची निर्भत्सना करणे, म्हणजे त्या व्यक्तीचा वध करण्यासारखे आहे’, असे त्याने अर्जुनाला सांगितले. अर्जुनाने त्यानुसार युधिष्ठिराची निर्भत्सना केली आणि एक प्रकारे त्याचा वधच केला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाकडून प्रतिज्ञेचे पालन करवून घेतले.
इ. ‘युधिष्ठिराची अवहेलना करणार्याचा मी वध करीन’, अशी प्रतिज्ञा केलेल्या अर्जुनालाही श्रीकृष्णाने आत्मस्तुती करायला सांगून एक प्रकारे अर्जुनाचा वधच करविला !
अर्जुनाने युधिष्ठिराची निर्भत्सना करण्याच्या घटनेतून अजून एक प्रसंग निर्माण झाला. ‘जो कोणी युधिष्ठिराची निर्भत्सना करील, त्याचा मी वध करीन’, अशी अर्जुनाची आणखी एक प्रतिज्ञा होती. अर्जुन सज्जन आहे. प्राण गेला, तरी चालेल; पण आपले वचन आणि आपली प्रतिज्ञा यांपासून सज्जन पळ काढत नाहीत. युधिष्ठिराची निर्भत्सना केल्यामुळे अर्जुनाने (आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या हेतूने) स्वतःवरच खड्ग उपसले. आत्महत्या करण्यास सिद्ध झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने धर्माचे रहस्य उलगडून सांगितले. श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘सज्जन माणसाने स्वतःची प्रशंसा करणे, म्हणजे स्वतःचा वध करणे होय. तू सज्जन आहेस; म्हणून तू स्वतःची प्रशंसा कर, म्हणजे आपोआप तुझा वध झाल्यासारखे होईल.’’ अर्जुनाने त्यानुसार स्वतःचे गुणगान गायले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाकडून प्रतिज्ञेचे पालन करवून घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून थांबवले.
‘कोणत्याही कृत्यामागील हेतू काय आहे ?’, हे पाहून नीतीमत्ता ठरवली पाहिजे. खोटे बोलण्याने एखाद्याचे कल्याण होत असेल, तर त्या वेळी ‘खोटे बोलणे’, हेच कर्तव्य ठरते. ‘शाब्दिक सत्य’ आणि ‘धार्मिक सत्य’ यांत भेद आहे. लौकिक अर्थाने कृष्ण काही वेळा खोटे बोलला असला, तरी धर्माच्या सूक्ष्म दृष्टीने ते खोटे नाही !
आक्षेप क्र. ५
श्रीकृष्णाने युद्धासाठी दुर्योधन आणि अर्जुन या दोघांनाही साहाय्य देऊन भीतीपोटी दुटप्पी वर्तन केले !
युद्धाचा प्रसंग येताच श्रीकृष्णाने कौरवांना आपले सैन्य दिले आणि पांडवांच्या बाजूने आपण एकटा उभा राहिला. पांडवांवर जर त्याचे प्रेम होते, तर त्याने पांडवांना ससैन्य साहाय्य का केले नाही ? कि त्याला कौरवांची भीती वाटली ? ‘न जाणो युद्धात कौरवांचा जय झाला, तर आपलं काही खरं नाही. यापेक्षा सैन्य दिलेले परवडले’, असे त्याला वाटले ? श्रीकृष्णाने कौरव आणि पांडव या दोघांनाही साहाय्य करून दुटप्पी वर्तन केले.
आक्षेपाचे खंडन
अ. दुर्याेधनाला ‘हाती शस्त्र न घेणार्या श्रीकृष्णा’पेक्षा ‘श्रीकृष्णाचे सैन्य’च हवे होते !
महाभारताच्या काळी युद्धासंबंधी एक प्रथा होती. युद्धात आपल्या बाजूने लढण्यासाठी साहाय्य मागणार्यांमध्ये ज्याचे बोलावणे प्रथम येईल, त्याच्याकडे जायचे. दुर्याेधन श्रीकृष्णाकडे साहाय्य मागण्यासाठी गेला. त्या वेळी श्रीकृष्ण झोपला होता. दुर्याेधन श्रीकृष्णाच्या शयनमहालात पोचला आणि त्याच्या उशाशी बसला. नंतर पोचलेला अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाजवळ बसला. श्रीकृष्णाने उठल्यावर प्रथम अर्जुनाला पाहिले. अर्जुन दुर्याेधनापेक्षा लहान होता. श्रुति (वेदवाक्य) सांगते, ‘लहानाची इच्छा प्रथम पूर्ण करावी.’ श्रीकृष्णाने तो करणार असलेल्या साहाय्याचे दोन भाग केले, एकीकडे त्याचे ‘नारायणी’ नावाचे सैन्य आणि दुसरीकडे ‘शस्त्र धारण न करणारा श्रीकृष्ण (तो स्वतः)’. त्याने ‘या दोहोंपैकी काय हवे ?’, असे अर्जुनाला विचारले. अर्जुनाने श्रीकृष्णाची निवड केली. दुर्याेधनाने सैन्य मागितले. (हा कथाभाग ‘१ ग १०. विलक्षण बुद्धीमान आणि चतुर’ या सूत्रात दिला आहे.)
आ. श्रीकृष्णाला कौरवांची भीती वाटत असती, तर तो शिष्टाईसाठी त्यांच्या राजसभेत गेलाच नसता !
‘दुर्याेधन आणि अन्य कौरव कपटी आणि नीच आहेत’, हे श्रीकृष्ण जाणून होता; म्हणून तो सावधही होता. दुर्याेधनादी कौरवांकडून शिष्टाईसाठी गेलेल्या श्रीकृष्णाला बंदी करण्याचा कट रचण्यात आला. या कटाची वार्ता कळल्यावर श्रीकृष्णाबरोबर गेलेल्या सात्यकी आणि कृतवर्मा यांनी श्रीकृष्णाच्या साहाय्यासाठी सारी ‘नारायणी’ सेना कौरवांच्या विरोधात उभी केली. यादवांचे ते अडीच लाख सैन्य पाहून श्रीकृष्णाला बंदी करण्याचा दुर्याेधनाचा बेत धुळीस मिळाला.
आक्षेप क्र. ६
श्रीकृष्ण सोळा सहस्र एकशे आठ (१६,१०८) स्त्रियांचा पती होता !
नरकासुराने बंदीवान केलेल्या सर्व स्त्रियांची श्रीकृष्णाने मुक्तता केली आणि नंतर त्या सर्वांशी विवाह केला.
आक्षेपाचे खंडन
अ. पारमार्थिक उत्तर !
अथर्ववेदात असे म्हटले आहे की, वेद आणि उपनिषदे यांमध्ये जे मंत्र आहेत, ते परमात्म्याच्या स्त्रिया आहेत. ऋग्वेदात १०,५८०, इतर वेदांमध्ये ४,३४८ आणि उपनिषदांमध्ये १,१८० मंत्र असून या सर्वांची बेरीज १६,१०८ होते. याच श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्त्रिया होत. हे पारमार्थिक उत्तर आहे.
आ. श्रीकृष्णाने त्या स्त्रियांच्या पित्याची जागा घेतली, पतीची नाही !
महाभारतात श्रीकृष्णाचा ‘सोळा सहस्र एकशे आठ स्त्रियांचा पती’, असा उल्लेख केलेला आढळतो. ‘पती’ या शब्दाचे संस्कृतमध्ये दोन अर्थ आहेत. एक अर्थ ‘नवरा’ असा आहे, तर दुसरा अर्थ ‘पालनकर्ता’ असा आहे. श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासात असलेल्या स्त्रियांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांचा स्वीकार केला नाही. त्यामुळे त्या अनाथ झाल्या. मुलींच्या रक्षणाचे दायित्व त्यांच्या पालकांचे असते. आता ते दायित्व श्रीकृष्णाने घेतले. त्यामुळे तो त्या स्त्रियांचा पालक झाला. त्याने त्यांच्या पित्याची जागा घेतली, पतीची नाही ! आजही आपण ‘सभापती’, ‘राष्ट्रपती’ असे म्हणतो, तेव्हा ती व्यक्ती सभेचा किंवा राष्ट्राचा पती नसते, तर पालक असते.
आक्षेप क्र. ७
श्रीकृष्णाचे गोकुळातल्या गोपींशी अनैतिक संबंध होते !
आक्षेपाचे खंडन
श्रीकृष्णाचे गोपींशी असलेले संबंध ‘मुलगा’ आणि ‘आई’ अशा नात्याचे होते !
हसू येण्यासारखा हा आक्षेप आहे. श्रीकृष्ण गोकुळामध्ये त्याच्या वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत वास्तव्यास होता. त्या वेळी गोकुळातल्या सर्व गोपी माता यशोदेच्या वयाच्या होत्या. श्रीकृष्णावर गोपींनी आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केले. भक्तीमार्गात नारदांनी त्याला ‘वात्सल्यभक्ती’ असे म्हटले आहे. वात्सल्यभाव अनैतिकतेत येत नाही. त्यामुळे गोपींशी श्रीकृष्णाचे असलेले संबंध ‘आई’ आणि ‘मुलगा’ अशा पवित्र नात्याचे होते. कंसवधासाठी गोकुळातून बाहेर पडल्यानंतर निजधामाला जाईपर्यंत श्रीकृष्ण कधीही गोकुळात गेलेला नाही !
आक्षेप क्र. ८
श्रीकृष्णाने गोमंत पर्वतावर मद्यप्राशन केले होते !
‘हरिवंशा’त असे म्हटले आहे, ‘जरासंधाच्या मथुरेवरील एका स्वारीच्या वेळी श्रीकृष्ण आणि बलराम मथुरा सोडून गोमंत पर्वतावर गेले. तेथे श्रीकृष्णाने मद्यप्राशन केले.’
आक्षेपाचे खंडन
श्रीकृष्णाने नव्हे, तर बलरामाने प्यायलेली ‘वारुणी’ हे मद्य नसून ती ‘अमृताची जननी’ आहे !
‘हरिवंशा’च्या विष्णुपर्वातील अध्याय १४० मध्ये असे म्हटले आहे, ‘गोमंत पर्वताच्या रमणीय शिखरावर एकटाच फेरफटका मारायला गेलेला बलराम कदंब वृक्षाच्या छायेत बसला होता. पावसाळ्यामुळे कदंब वृक्षाला फुलांचा बहर येतो. त्या वृक्षाची काही फुले त्याच झाडाच्या ढोलीत (वृक्षाच्या फांद्यांतील किंवा बुंध्यातील खोलगट भागात) पडतात. त्या फुलांवर पावसाचे पाणी पडल्यावर त्याच्या संयोगाने जे पेय बनते, त्याला ‘वारुणी’ म्हणतात. ही वारुणी बलरामाने प्राशन केली.’
वारुणीला ‘अमृताची जननी’ म्हणून गौरवले जाते. वारुणी शक्तीवर्धक आहे. ही वारुणी श्रीकृष्णाने नव्हे, तर बलरामाने प्राशन केली. वारुणी प्राशन केलेल्या बलरामाच्या अंगात प्रचंड बळ निर्माण झाले. नंतर त्याने जरासंध आणि त्याच्या सैन्याला चांगलेच पाणी पाजले. मद्य प्यायल्यानंतर माणसाला स्वतःचा तोलही सावरता येत नाही. येथे तर बलारामाने पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे वारुणीची तुलना मद्याशी करणे, म्हणजे ‘आपल्या बुद्धीचे दिवाळे वाजले आहे’, हे सिद्ध करण्यासारखे आहे !
आक्षेप क्र. ९
श्रीकृष्ण ‘रणछोडदास (पळपुटा)’ आहे !
श्रीकृष्ण शूर नाही. तो भित्रा आणि पळपुटा आहे. मथुरेवर जरासंधाने स्वारी केली, तेव्हा तो पळून गेला. कालयवन मारण्यासाठी आला, तेव्हाही तो पळून गेला. कृष्णभक्तही त्याला ‘रणछोडदास’ म्हणतात. त्यामुळे ‘कृष्ण पळपुटा होता’, हे सिद्ध होते.
आक्षेपांचे खंडन
अ. कृष्णभक्त भगवान श्रीकृष्णाला ‘रणछोडदास’ असे कौतुकाने, भक्तीने आणि प्रेमाने म्हणतात !
भगवान श्रीकृष्णाचे चरित्र म्हणजे सर्व धर्मांचे माहेर, कर्तव्याचे सासर, संतांचे जिव्हार (अंतःकरण) आणि पंतांचे (संस्कृत पंडितांसाठी) रत्नभांडार आहे ! द्वारकेला द्वारकाधिशाचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीकृष्णाचे भजन करतांना सारे भक्त ‘रणछोडदास की जय ।’ असा जयजयकार भक्तीभावाने करतात.
आ. रणांगण सोडून पळण्यामागे श्रीकृष्णाचा कालयवनाला युक्तीने ठार मारण्याचा हेतू होता !
जरासंधाने मथुरेवर १७ वेळा स्वार्या केल्या. प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्याचा पराभव केला. १८ व्या वेळेला जरासंधाने कालयवनाला घेऊन मथुरेवर स्वारी केली. कालयवनाला पाहून श्रीकृष्ण पळू लागला. कालयवन त्याचा पाठलाग करू लागला. श्रीकृष्ण एका गुहेत गेला. तिथे मुचकुंद राजा झोपला होता. इंद्रदेवाने ‘मुचकुंद राजाच्या निद्रेत व्यत्यय आणणारी व्यक्ती मुचकुंद राजाची दृष्टी पडताच जळून जाईल’, असे वरदान दिले होते. श्रीकृष्णाने निजलेल्या मुचकुंद राजाच्या अंगावर आपला शेला टाकला. श्रीकृष्णाचा पाठलाग करत गुहेत शिरलेल्या कालयवनाने श्रीकृष्ण समजून झोपलेल्या मुचकुंद राजाला लाथ मारली. त्यामुळे झोपमोड झालेला मुचकुंद राजा उठून बसला. त्याची दृष्टी कालयवनावर पडली आणि तात्काळ कालयवनाची राख झाली. (हा कथाभाग ‘१ ए ३. जरासंधाच्या साहाय्यार्थ आलेल्या कालयवनाचा श्रीकृष्णाने नाश करणे’ या सूत्रात विस्ताराने दिला आहे.) अशा प्रकारे विशिष्ट हेतू ठेवून आपल्या शत्रूला इच्छित स्थळी नेण्यात आणि त्याचा नाश करण्यात श्रीकृष्ण यशस्वी झाला. कालयवनाला मारण्यासाठी श्रीकृष्णाने स्वतःची शक्ती वाया घालवली नाही. रणांगण सोडून पळण्यामागे श्रीकृष्णाचा दूरदर्शीपणा आणि कौशल्य प्रकट होते; म्हणूनच ‘रणछोडदास’ ही उपाधी त्याला शोभून दिसते !
इ. जरासंधाकडून मथुरेवर वारंवार होणार्या स्वार्यांमुळे प्रजेचे हाल होऊ नयेत; म्हणून श्रीकृष्णाने मथुरेहून द्वारकेला स्थलांतर केले !
जरासंधाच्या मथुरेवर वारंवार होणार्या स्वार्यांमुळे तिथल्या प्रजेलाही सतत युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. सततच्या युद्धांमुळे प्रजेचे हाल होऊ नयेत; म्हणून श्रीकृष्णाने मथुरेहून द्वारकेला स्थलांतर केले. त्याने द्वारका वसवली. त्या द्वारकेच्या प्रमुखाचा मान त्याने आपला पिता वसुदेव याला दिला. मोठा भाऊ बलराम याला युवराजपद दिले. शूर मित्र सात्यकी याला सेनापती केले. गुरु सांदिपनी ऋषींना राजपुरोहित करून सन्मानित केले. सत्ता हातात न ठेवता (‘किंगमेकर’ न बनता) तो सर्वांचा दास झाला. असा सर्वांचा दास झालेला श्रीकृष्ण भक्तांच्या लेखी त्यांचा आवडता ‘रणछोडदास’ आहे !