पू. (कु.) दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास आणि संत-सन्‍मान सोहळा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्टी सेवा करणार्‍या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

अनुक्रमणिका

सद्गुरु स्वाती खाडये यांनी मुलाखतीद्वारे उलगडलेला पू. दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास !

‘भाव तिथे देव’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या पू. दीपाली मतकर ! पू. दीपालीताईंचा साधनाप्रवास पहाता ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणार्‍या पू. दीपालीताई यांची आरंभी व्यष्टी प्रकृती होती. त्यांच्यात गोपीभाव होता. त्यांची समाजात, म्हणजे समष्टीत मिसळणे, साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेमाने चुका सांगून त्या सुधारून घेणे, सेवांचे योग्य नियोजन करणे इत्यादींसाठी आवश्यक असलेली समष्टी प्रकृती नव्हती; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘तुला कृष्ण हवा असेल, तर समष्टी सेवा करायला हवी !’, असे सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून आणि सतत त्यांच्या अनुसंधानात राहून पू. दीपालीताईंनी समष्टी सेवा करायला आरंभ केला. अल्पावधीतच त्यांनी स्वतःच्या व्यष्टी प्रकृतीचे रूपांतर समष्टी प्रकृतीमध्ये केले. त्यांनी समष्टी साधना होण्यासाठी अव्याहत धडपड केली. त्यामुळे २८.१०.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने गोपीभाव असलेल्या साधिका कु. दीपालीताई समष्टी संतपदी विराजमान झाल्या.

सद्गुरु स्वाती खाडये यांनी कु. दीपाली मतकर यांना संत घोषित करण्याच्या वेळी त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा साधनाप्रवास अगदी अलगदपणे उलगडत नेला. श्रावण कृष्ण द्वितीया (१.९.२०२३) या दिवशी पू. दीपाली मतकर यांचा ३५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. दीपाली मतकर यांची घेतलेली ही मुलाखत पुढे दिली आहे.

पू. दीपाली मतकर

१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी कु. दीपाली मतकर यांना त्यांच्यातील गोपीभावामुळे ओळखणे

सद्गुरु स्वाती खाडये : लहान वयात तुम्ही पूर्णवेळ साधना करू लागलात ना ? मला आठवते, ‘तुम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याच्या आधी मी रामनाथी आश्रमात आले होते. रामनाथी आश्रमात आपली प्रत्यक्ष भेट झाली नसली, तरी तेव्हा मी तुम्हाला ‘गोपीभाव (टीप) असलेली साधिका’ म्हणून ओळखत होते. लहान वयापासूनच तुमच्यात ‘गोपीभाव’ आहे; म्हणूनच तुम्ही एवढ्या जलद गतीने प्रगती करू शकलात.

टीप – गोपीभाव : गोपींचा श्रीकृष्णाप्रती जो भाव होता, त्याला ‘गोपीभाव’, असे म्हणतात.
पू. दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास जाणून घेतांना सद्गुरु स्वाती खाडये

२. कु. दीपाली मतकर यांनी स्वयंपाकघरात केलेली सेवा !

२ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री अन्नपूर्णादेवी यांनीच संत अन् साधिका यांच्या माध्यमातून स्वयंपाक करायला शिकवला’, असे कु. दीपाली यांना जाणवणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुम्हाला घरी १ – २ जणांचा स्वयंपाक करावा लागत असेल ना ? रामनाथी आश्रमात तुम्ही ४०० ते ५०० साधकांचा स्वयंपाक करायला कशा शिकलात ? त्या वेळी तुम्ही कसा भाव ठेवलात ?

कु. दीपाली मतकर : वर्ष २००३ मध्ये माझ्या आईचे निधन झाले. त्यामुळे मला घरी ४ – ५ जणांचा स्वयंपाक करावा लागायचा; पण तोही करायला आणि शिकवायला कुणी नव्हते. मी गुरुदेवांना प्रार्थना करायचे, ‘आता तुम्हीच मला स्वयंपाक करायला शिकवा.’ तेच सूक्ष्मातून मला स्वयंपाक करायला शिकवायचे. रामनाथी आश्रमात गेल्यावरही स्वयंपाक करतांना मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री अन्नपूर्णामाता यांना प्रार्थना करत असे. तेव्हा ‘स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या साधिका श्री अन्नपूर्णादेवीचे रूप असून देवीच माझ्या अवतीभोवती फिरून मला स्वयंपाकाची सेवा शिकवत आहे’, असे मला जाणवत असे. गुरुदेव आणि श्री अन्नपूर्णादेवी यांनीच मला स्वयंपाक (महाप्रसाद) करायला शिकवला आणि माझ्याकडून करूनही घेतला.

स्वयंपाकघरात सेवा करतांना मला पू. रेखाताई (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर, वय ४५ वर्षे) आणि सौ. सुप्रियाताई (सौ. सुप्रिया माथूर, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) स्वयंपाकातील बारकावे शिकवायच्या, उदा. ४० साधकांचा स्वयंपाक असेल, तर त्यासाठी लागणार्‍या पदार्थांचे प्रमाण किती असायला हवे किंवा १०० जणांचा स्वयंपाक असेल, तर त्यासाठी लागणार्‍या पदार्थांचे प्रमाण किती असायला हवे ? पदार्थात तिखट-मीठ, पाणी इत्यादी किती घालायचे ?

२ आ. कु. दीपाली यांच्यातील भावामुळे देवाने पोषक वातावरण निर्माण करून त्यांना स्वयंपाक करायला शिकवणे

सद्गुरु स्वाती खाडये : लहानपणापासूनच तुमच्यात भाव असल्यामुळे आश्रमात गेल्यानंतर तुम्हाला एवढ्या जणांचा स्वयंपाक करायला शिकता आला. स्वयंपाकाची सेवा करणार्‍या साधिकांनी तुम्हाला आईप्रमाणे प्रेम दिले. त्यांनी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींतूनही शिकवले, उदा. ‘तांदुळ किती घ्यायचे ? त्यात पाणी किती घालायचे ? गॅस कधी बंद करायचा ?’ त्यांनी तुम्हाला आईची उणीव भासू दिली नाही. तुमच्या मनात भाव असल्यामुळे देवाने तुमच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले.

२ इ. कु. दीपाली यांच्यातील भावामुळे त्यांना स्वयंपाकघरात सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

कु. दीपाली मतकर : महाप्रसाद ठेवण्याची भांडी फार मोठी असायची. ती भांडी एकटीने उचलणे मला शक्य व्हायचे नाही; पण मला ती भांडी हलकी वाटायची.

साधक जेवायला आल्यावर ‘प्रत्येक साधकाच्या मुखातून माझा कृष्णच जेवत आहे’, असे मला जाणवायचे. ‘माता यशोदेला एकाच कृष्णाला भरवायला मिळाले; पण मला एवढ्या सगळ्या कृष्णांना भरवता येत आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद व्हायचा.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची केलेली सेवा आणि त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

३ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करायला मिळावी’, असे वाटणे आणि त्यानंतर त्यांची सेवा करायला मिळाल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुमच्यातील भावामुळे तुम्ही अगदी लहान वयात गुरुदेवांचे मन जिंकले. तुम्हाला प्रत्यक्ष प.पू. गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मिळाली का ?

कु. दीपाली मतकर : सनातनच्या गोपीभाव असलेल्या साधिका कु. तृप्ती गावडे (आताच्या सौ. तृप्ती शिंदे) पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करायला जायच्या आणि त्यांच्याकडून आल्यावर त्यांच्याविषयी पुष्कळ आनंदाने सांगायच्या. तेव्हा मलाही ‘त्यांची सेवा करायला मिळेल का ?’, असे वाटायचे. ‘भक्ताच्या हातून भगवंत जेवतो’, अशा गोष्टी मी लहानपणी ऐकल्या होत्या. त्यामुळे मला वाटायचे, ‘मला प्रत्यक्ष अशी संधी कधी मिळेल का ? माझ्या हातचे भगवंत जेवेल का ? मला त्याची सेवा करता येईल का ? मलाही देवाची सेवा करायची संधी मिळावी.’ त्यानंतर काही दिवसांनी मला गुरुदेवांच्या सेवेची संधी मिळाली. मला ‘त्यांच्या खोलीची स्वच्छता करणे, त्यांचे कपडे धुऊन इस्त्री करणे आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे’, अशा सेवा मिळाल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३ आ. तरुण वयातही मायेतील गोष्टींची आसक्ती नसणे

सद्गुरु स्वाती खाडये : आपण समाजातील मुलांचे पहातो, ‘तरुण वयातील मुलांच्या मनात ‘आपण आधुनिक वैद्य, अभियंता किंवा कुणीतरी मोठा अधिकारी व्हायला पाहिजे, आपले घर असले पाहिजे, गाडी असली पाहिजे’, अशा प्रकारच्या मायेतील इच्छा असतात’; मात्र तुम्हाला घर, पैसा, नोकरी इत्यादी मायेतील गोष्टींची आसक्ती नव्हती.

३ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करायला मिळावी’, हा कु. दीपाली यांच्या मनातील विचार ही ‘ईश्वरेच्छा’ होती’, असे सद्गुरु खाडये यांनी सांगणे

‘मला भगवंत मिळाला पाहिजे’, अशी तुमची सात्त्विक इच्छा होती. मला वाटते, ‘ते ईश्वराचेच विचार होते. तुमच्यात ‘गोपीभाव’ आहे. त्यामुळे ‘गोपीभाव असलेल्या साधिकेच्या हातचे जेवण मला जेवायला मिळावे’, अशी भगवंताचीच इच्छा होती.’ भगवंतालाच ‘गोपीभाव असलेली ही साधिका (कु. दीपाली) माझ्याकडे सेवेसाठी कधी येईल ?’, अशी ओढ लागली होती. यातून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळत आहे आणि माझा कृतज्ञताभाव दाटून येत आहे.

३ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी छोट्या छोट्या प्रसंगांतून शिकवून घडवणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही गुरुदेवांची सेवा करत असतांना गुरुदेवांनी तुम्हाला अनेक गोष्टींतून शिकवले असेल ना ? त्यांतील काही प्रसंग आम्हाला सांगा.

३ ई १. शरणागतीच देवाकडे नेते !

कु. दीपाली मतकर : गुरुदेव प्रत्येक क्षणीच शिकवायचे. प्रत्येक वेळी त्यांच्या खोलीमध्ये सेवेसाठी जातांना ‘आज गुरुदेव काय शिकवणार ?’ किंवा ‘भगवंताची आज काय लीला असेल ?’, असे मला वाटायचे. प्रत्येक दिवशी ते काही ना काही शिकवायचे. प्रतिदिन ते मला एखादा प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचे उत्तर लिहून द्यायला सांगायचे. एक दिवस त्यांनी मला एक प्रश्न विचारला. मी त्याचे उत्तर दिल्यावर ते म्हणाले, ‘‘हे उत्तर नाही.’’ मी दुसरे उत्तर दिल्यावरही ते म्हणाले, ‘‘हे उत्तर नाही.’’ मला वाटले, ‘आज असे का होत आहे ?’ गुरुदेव मला म्हणाले, ‘‘मी १० मिनिटांनी येतो. मी आल्यावर मला याचे उत्तर सांगा.’’ शेवटी मी देवाला शरण गेले आणि मनातच गुरुदेवांना म्हणाले, ‘मी हरले परम पूज्य ! ‘तुम्हाला काय अपेक्षित आहे ?’, ते मला कळत नाही.’

सद्गुरु स्वाती खाडये : देवाला शरण गेल्याविना काहीच मिळत नाही, ना व्यावहारिक, ना आध्यात्मिक ! शरणागतीच देवाकडे घेऊन जाते. तुम्ही शरणागती पत्करली. किती छान ! हे पुष्कळच शिकण्यासारखे आहे. पुढे काय झाले ?

३ ई २. सकारात्मक राहिल्यास आनंद मिळतो !

कु. दीपाली मतकर : काही वेळाने गुरुदेव आले. तेव्हा आमच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता मीच उत्तर देतो.

(त्यांनी मला उत्तर सांगितले.)

कु. दीपाली मतकर : परम पूज्य, तुम्हाला प्रश्नाचे उत्तर ठाऊक असूनही तुम्ही मला का विचारले ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तू कशी शिकणार ? ‘तुला शिकता यावे आणि तू घडावेस’, यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. (समोरच असलेल्या मोरपिसाकडे पाहून) बघ, हे मोरपीस आज किती आनंदी दिसत आहे ! इतर दिवसांच्या तुलनेत आज हे पुष्कळ आनंदी दिसत आहे.

कु. दीपाली मतकर : मला हे नेहमीसारखेच दिसत आहे. ‘यात काही पालट झाला आहे’, असे मला वाटत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नाही. नीट पहा. आज ते वेगळे वाटत आहे.

कु. दीपाली मतकर : नाही, परम पूज्य. मला काही कळत नाही. मला ते नेहमीसारखेच दिसत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नाही. प्रतिदिनपेक्षा आज ते आनंदी दिसत आहे. ‘ते आनंदी का दिसत आहे ?’, हे ठाऊक आहे का ? कारण आज मी जिंकलो आणि तू हरली आहेस. तू हरल्यामुळे तुझे मन आनंदी नाही. मी जिंकलो आहे. त्यामुळे मला आनंद वाटत आहे.

कु. दीपाली मतकर : याचा भावार्थ असा, ‘तुम्ही सकारात्मक राहिलात, तर तुम्हाला आनंद मिळेल. आपले मन सकारात्मक असेल, तर सर्व सकारात्मक दिसते आणि आपले मन आनंदी असले, तर सर्वत्र आनंद दिसतो.’ अशा प्रकारे ते छोट्या छोट्या गोष्टींतूनही शिकवायचे.

सद्गुरु स्वाती खाडये : आपल्या सर्वांना सुख आणि दुःख ठाऊक आहे; पण आनंद कुठे ठाऊक आहे ?

प.पू. गुरुदेवांनीच आपल्याला ‘सुख-दुःखाच्या पलीकडे आनंद आहे’, हे शिकवले आणि गुरुदेवांनी तो आनंद देऊन तुम्हाला घडवले. परम पूज्य तुमची परीक्षा घ्यायचे, त्यात तुम्हाला उत्तीर्ण ही करायचे आणि ‘पुढे पुढे कसे जायचे ?’, हेही शिकवून घडवायचे. किती छान ना ! असे आपल्याला बाहेर कुठेच शिकायला मिळणार नाही. दीपालीताई, तुमच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.’ (२१.४.२०२३)

४. ‘गोपीभावा’तून, म्हणजे व्यष्टी भावातून समष्टी भावाकडे वळणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुमच्यात गोपीभाव असतांना तुम्ही समष्टी सेवेकडे कशा काय वळलात ? तुम्हाला हे कसे काय जमले ? कारण गोपीभावातून, म्हणजे व्यष्टी भावातून समष्टी भावात जाणे कठीण असते.

कु. दीपाली मतकर : आधी मला ‘माझ्यामध्ये ‘गोपीभाव’ आहे’, हे कळत नसे; पण मी नेहमी भगवंताशी बोलत असे. त्याच्याशी बोलतच मी सगळ्या सेवा करत असे. गुरुदेवांनी ‘हा गोपीभाव आहे’, असे सांगितल्यावर ‘माझ्यात ‘गोपीभाव’ आहे’, हे मला कळले. मला ‘मी काही करत आहे’, असे कधी जाणवायचेच नाही, तर ‘देवच सर्व करत आहे’, असेच वाटायचे.

४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अध्यात्मप्रसाराच्या सेवेतूनच कृष्ण भेटेल’, असे सांगितल्यावर प्रसाराच्या सेवेला जाण्यासाठी मनाची सिद्धता होणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही समष्टी सेवा करायला कधीपासून आरंभ केला ?

कु. दीपाली मतकर : मी पूर्वी गुरुदेवांची सेवा करत होते. तेव्हा ते मला सांगायचे, ‘‘हा तुझा ‘व्यष्टी भाव’ झाला. आता तू ‘समष्टी भावा’कडेे जायला हवे. त्यासाठी तू समष्टी सेवा, म्हणजे अध्यात्मप्रसाराची सेवा करायला हवी.’’ तेव्हा मी म्हणायचे, ‘‘तुम्हाला सोडून मी कुठे जाणार नाही.’’ तेव्हा परम पूज्य मला म्हणायचे, ‘‘आता इथली (आश्रमातील) सेवा तू शिकली आहेस. आता तुला प्रसारात जायचे आहे.’’ त्या वेळी माझ्या मनाची सिद्धता नसायची. पुष्कळ वेळा गुरुदेवांनी मला ‘तुला समष्टी सेवेसाठी जायला हवे’, असे सांगितले; पण आश्रम सोडून जायची माझ्या मनाची सिद्धताच होत नव्हती. मग एकदा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुला कृष्ण हवा आहे ना ?’’ मी म्हणाले, ‘‘हो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘कृष्ण हवा आहे, तर तुला प्रसाराची सेवा करावी लागेल.’’

सद्गुरु स्वाती खाडये : गुरुदेवांना तुम्हाला एकाच सेवेत ठेवायचे नव्हते. ‘त्यांना तुम्हाला परिपूर्ण करायचे होते’, हे यातून शिकायला मिळाले. गुरुदेवांचे किती लक्ष असते आपल्या भक्ताकडे !

कु. दीपाली मतकर : गुरुदेवांंनी मला सांगितले, ‘‘श्रीकृष्ण प्रत्येकाच्या रूपात आहे आणि त्याला तुला अनुभवायचे असेल, तर तुला प्रसाराची सेवा करावी लागेल. प्रसाराच्या सेवेतूनच तुला भगवंत भेटेल.’’ त्यानंतर ‘गुरुदेवांनी सांगितले आहे, तर प्रसाराची सेवा शिकून घ्यायला हवी’, अशी माझ्या मनाची सिद्धता झाली आणि प्रसाराच्या सेवेला आरंभ झाला.

४ आ. सेवा शिकण्यासाठी सनातनच्या विविध आश्रमांत जाणे आणि त्यानंतर अध्यात्मप्रसाराची सेवा करण्याची संधी मिळणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही रामनाथी आश्रमात किती वर्षे राहिलात आणि अध्यात्मप्रसारासाठी तिथून कधी बाहेर पडलात ? तुम्ही कोणत्या सेवा केल्या ?

कु. दीपाली मतकर : मी वर्ष २००९ ते वर्ष २०१२ या कालावधीत रामनाथी आश्रमात होते. रामनाथी आश्रमात असतांना मी काही दिवस स्वयंपाकघरात सेवा केली. नंतर काही दिवस गुरुदेवांची सेवा आणि त्यानंतर काही दिवस ग्रंथांशी संबंधित सेवा केली. रामनाथी आश्रमात असतांना मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडूनही शिकण्याची संधी मिळाली. वर्ष २०१२ मध्ये मी सेवेसाठी मिरज आश्रमात गेले. त्यानंतर काही दिवस मी कुडाळ सेवाकेंद्रात सेवा केली. नंतर मला रत्नागिरी सेवाकेंद्रात सेवेला जायची संधी मिळाली. तिथे गुरुपौर्णिमेच्या सेवा होत्या. त्यानंतर मला रत्नागिरी जिल्ह्यातील अध्यात्मप्रसाराची सेवा शिकण्याची संधी मिळाली. तेव्हा मला ‘अध्यात्मप्रसार म्हणजे काय करायचे ?’, हे ठाऊक नव्हते; पण ‘आपण ते शिकूया’, असे मला वाटायचे.

४ इ. सद्गुरु स्वाती खाडये आणि साधक यांच्याकडून अध्यात्मप्रसाराची सेवा शिकणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही अध्यात्मप्रसाराची सेवा शिकण्याचे प्रयत्न कसे केले ?

कु. दीपाली मतकर : मला अध्यात्मप्रसाराच्या सेवेचा काहीच अनुभव नव्हता. सद्गुरु स्वातीताई, तुम्ही जिल्ह्यात यायचा, तेव्हा ‘तुम्ही साधकांशी कशा बोलता ? सेवेचे नियोजन कसे करता ? साधकांना आधार कसा देता किंवा कसे साहाय्य करता ?’, हे शिकण्याचा प्रयत्न मी केला. ‘अध्यात्मप्रसाराची सेवा म्हणजे काय ? सत्संग कसे घ्यायचे ? हिंदु राष्ट्र जागृती सभा कशी असते ?’, हे सर्व मला तुमच्याकडून शिकता आले. माझी तशी प्रकृती नाही. केवळ ‘मी आणि माझी सेवा किंवा देवाशी बोलणे’, एवढेच माझे होते; पण तुम्ही ‘सगळ्यांना आनंद कसा मिळेल ? सगळ्यांना आधार कसा वाटेल ?’, असे वागायचात. ते मला तुमच्याकडून शिकता आले.

मी जिल्ह्यातील काही साधकांच्या समवेत सेवेला जायचे. तेव्हा ‘गुरुपौर्णिमा किंवा इतर सेवा यांचे नियोजन कसे केले जाते ?’, हे मला त्या साधकांकडून शिकता आले.

सद्गुरु स्वाती खाडये : हे छान आहे. तुमच्यात शिकण्याची वृत्ती होती; म्हणून देवाने तुम्हाला प्रसाराची सेवा करायला लवकर पाठवले आणि सगळ्या सेवा लवकर शिकवल्या. प.पू. गुरुदेवांनी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुम्हाला घडवले.

४ ई. ‘शिकण्याची वृत्ती आणि अल्प अहं यांमुळे कु. दीपाली अध्यात्मप्रसाराची सेवा लवकर शिकल्या’, असे सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुमची शिकण्याची वृत्ती असल्यामुळे तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा ताण आला नाही.  आता प्रसाराच्या सेवेत एखाद्या साधकाला एखादी सेवा सांगितल्यावर तो पटकन ‘नाही’ म्हणतो. ‘सेवा कशी पूर्ण करणार ? माझ्याकडून ही सेवा होईल का ? मला जमेल का ?’, असे ताणाचे विचार त्याच्या मनात असतात; पण तुम्ही लहान असूनही हे सगळे लीलया जमवले. खरेतर साधनेमध्ये ‘मला काही येत नाही’, असाच विचार हवा. ‘मला काही येत नाही; पण देव मला घडवणार’, असा तुमचा भाव होता आणि ‘मला भगवंत पाहिजे’, हा एकच ध्यास होता. ‘मला कसे जमेल ?’ किंवा ‘मला जमणार नाही’, असे विचारच तुमच्या मनात नव्हते; कारण तुमच्यात तो अहंकारच नव्हता आणि अहंकार नसल्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी पटापट शिकत गेला. ‘शिकण्याची वृत्ती कशी असायला पाहिजे ?’, हे आपल्याला दीपालीताईंकडून शिकता येते.

५. कु. दीपाली यांना परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

सद्गुरु स्वाती खाडये : सेवा करतांना तुम्हाला कधी देवाचे दर्शन झाले का ? कधी तुमचा अष्टसात्त्विक भाव जागृत झाला का ? ‘कुणाला देवाचे दर्शन होते, कुणाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येतात किंवा कुणाला नाद ऐकू येतो ?’, असे कधी काही झाले का ?

कु. दीपाली मतकर : मला देवाचे दर्शन कधी झाले नाही; पण जेव्हा मी गुरुदेवांना प्रथम पाहिले, तेव्हा मला ‘भगवंत असाच असणार’, असे जाणवले. त्यांच्याकडे पहातांना ‘त्यांच्या देहातून सूर्यासारखा प्रकाश बाहेर पडत असून त्यांच्या वाणीतून चैतन्य पसरत आहे’, असे मला नेहमी जाणवायचे. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहातांना बर्‍याच वेळा ‘श्रीकृष्ण मला काहीतरी सांगत आहे’, असा नाद ऐकू यायचा.

६. आध्यात्मिक मैत्रीणींशी मनमोकळेपणाने बोलणे आणि ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेवच साहाय्य करतात’, अशी अनुभूती येणे

सद्गुरु स्वाती खाडये : दीपालीताई, तुम्हाला कुणी ‘आध्यात्मिक मैत्रीण’ आहे का ? आपल्याला एक आध्यात्मिक मैत्रीण असली पाहिजे. तिच्या समोर आपण साधना किंवा सेवा यांविषयी आपल्या मनात जे असेल, ते मनमोकळेपणाने बोलू शकतो. ती एखादी साधिका असेल किंवा संतही असतील कि तुम्ही कृष्णालाच आध्यात्मिक मित्र मानता ?

कु. दीपाली मतकर : रामनाथी आश्रमात असतांना माझे गोपीभाव असलेल्या तृप्तीताईंशी (कु. तृप्ती गावडे यांच्याशी) बोलणे व्हायचे; पण मी प्रसाराच्या सेवेसाठी आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आमचे बोलणे होत नसे. नंतर मी प्रसारातील साधकांशी बोलायचेे आणि मनातून परम पूज्यांशी बोलायचे. मी तुमच्याशी (सद्गुरु स्वाती खाडये यांच्याशी) मनमोकळेपणाने बोलत होते. माझ्याकडून एखादी सेवा करायची राहिली, तर त्याविषयी मी तुम्हालाच सांगत असे. कधी कधी मी मनीषाताईंशीही (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्याशीही) बोलत असे. जठारकाकू (सौ. उल्का जठार (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)) या माझी आध्यात्मिक मैत्रीण ! जठारकाकूंशी मी मनमोकळेपणे बोलते. देवाने त्यांच्या रूपात मला आईच दिली आहे. त्या आणि साखरेकाकू (श्रीमती वीणा साखरे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), या दोघींशी मी मनमोकळेपणे बोलते. त्यांच्या माध्यमातून गुरुदेव मला दिशा देतात आणि साहाय्यही करतात.

७. प्रसाराची सेवा करतांना होणारे त्रास नामजपादी उपाय आणि भाववृद्धीचे प्रयत्न केल्यावर नाहीसे होणे

सद्गुरु स्वाती खाडये : प्रसाराची सेवा करतांना तुम्हाला कधी अनिष्ट शक्तींचा त्रास झाला का ?

कु. दीपाली मतकर : प्रसाराच्या कालावधीत मला ‘थकवा येणे किंवा न सुचणे’, असे त्रास व्हायचे; पण नामजपादी उपाय किंवा भाववृद्धीचे प्रयत्न केल्यावर ते त्रास नाहीसे व्हायचे.’ (२१.४.२०२३)

८. अल्‍प अहं आणि देवाशी असलेले अखंड अनुसंधान यांमुळे ‘देवच सर्व करून घेत आहे’, हे लक्षात येऊन सतत कृतज्ञता वाटणे

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : सोलापूर सेवाकेंद्र आणि सोलापूर जिल्‍हा येथील सेवा करतांना तुम्‍हाला कधी ‘अहं वाढेल’, अशी भीती वाटली का ? तुमचा अहं कधी वाढला का ?

कु. दीपाली मतकर : ‘अहं वाढला, तर आपण श्री गुरूंपासून दूर जातो’, हे ठाऊक असल्‍यामुळे अहंचा विचार मनात आल्‍यावर माझे मन अस्‍वस्‍थ व्‍हायचे. ‘अहंमुळे मी श्री गुरूंपासून दूर गेले’, असे व्‍हायला नको’, असे मला वाटायचे.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : मनात अहंचे विचार येतात ना ! काही वेळा त्‍यांची भीतीही वाटते; पण त्‍या विचारांवर तुम्‍ही मात कशी केली ?

कु. दीपाली मतकर : कुठलीही सेवा पूर्ण झाल्‍यावर माझ्‍या लक्षात यायचे, ‘मी ही सेवा करू शकेन’, एवढी माझी क्षमता नाही आणि त्‍यासाठी आवश्‍यक असणारे गुणही माझ्‍यामध्‍ये नाहीत, म्‍हणजे ती सेवा देवच करत आहे.’ त्‍यामुळे माझे त्‍या विचारांमध्‍ये अडकणे होत नाही. माझ्‍या मनात नेहमी ‘मला काही जमत नाही आणि माझी तेवढी क्षमता नाही; पण देवच सर्व करून घेत आहे’, असे विचार असतात. त्‍यामुळे मला सतत कृतज्ञताच वाटते.

सद्गुरु स्वाती खाडये

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : तुमच्‍या मनात उपजतच ‘मला काही जमत नाही. देवाने मला सेवा दिली आहे आणि देव माझ्‍याकडून ती करून घेत आहे’, असा भाव आहे. तुमच्‍या मनात ‘देव माझ्‍याकडून सेवा करून घेणारच आहे’, अशी अढळ श्रद्धा आहे. तुमचे देवाशी सतत अनुसंधान असल्‍यामुळे देवाचेे चैतन्‍य तुमच्‍या आत जायचे. देव तुम्‍हाला सगळे शिकवत होता आणि तुम्‍ही ते सगळे शिकत होता. असे देवाशी सतत अनुसंधान ठेवायला पाहिजे. बर्‍याच जणांना सेवा करतांना अनुसंधान ठेवणे कठीण वाटते; पण तुम्‍ही ते सहजच ठेवत होता. ‘तुम्‍हाला ते कसे जमायचे ?’, ते सांगा.

कु. दीपाली मतकर : अनुसंधान, म्‍हणजे माझ्‍या मनात जे विचार चालू आहेत, ते मी सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉक्‍टर किंवा भगवान श्रीकृष्‍ण यांना सांगत असे. मी म्‍हणत असे, ‘आता मी जी सेवा करत आहे, ‘ती कशी करायची ?’, हे मला ठाऊक नाही. तुम्‍हीच या आणि माझ्‍याकडून ही सेवा करून घ्‍या.’ मी प्रत्‍येक कृती करण्‍यापूर्वी त्‍यांना सांगते आणि ‘तेच ती सेवा करून घेत आहेत’, यासाठी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : देवच तुम्‍हाला सगळे आतून सुचवायचा. ‘संत मीराबाई, संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्‍वर हे सतत विठ्ठलनामात दंग असायचे. गोरा कुंभार मातीची भांडी बनवतांनाही सारखा विठ्ठलनामाचा गजर करायचा. तुमच्‍याकडूनही असेच होत आहे. तुम्‍ही ईश्‍वराशी सतत बोलता आणि ईश्‍वर तुम्‍हाला सेवेविषयीची सूत्रे सुचवून तुमच्‍याकडून सेवा परिपूर्ण करून घेतो. त्‍यामुळे साधनेतला हा सगळ्‍यांत मोठा टप्‍पा तुम्‍ही अगदी लहान वयात (वयाच्‍या ३३ व्‍या वर्षी) गाठला आहे. फारच छान !

९. पू. (कु.) दीपाली मतकर यांच्‍या समवेत सेवा करणार्‍या काही साधकांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : अनेक साधक पू. दीपालीताईंच्‍या समवेत सेवा करतात. आता त्‍यांतील काही साधक पू. दीपालीताईंविषयी लक्षात आलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे सांगतील.

९ अ १. सौ. विद्या कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ५३ वर्षे), सोलापूर

‘किती सांगू मी, सांगू कुणाला । आज आनंदीआनंद झाला ॥
रास खेळू चला, रंग उधळू चला । आज आनंदीआनंद झाला ॥

पू. दीपालीताईंविषयी काय सांगू ? त्‍या गुणांची खाणच आहेत. ‘गुरुमाऊलींनी सोलापूर जिल्‍ह्यातील सर्व साधकांना पू. दीपालीताईंसारखे संतरत्न दिले’, याबद्दल मी मनापासून पुष्‍कळ कृतज्ञ आहे !

९ अ १ अ. ‘पू. (कु.) दीपाली मतकर यांचे भावपूर्ण बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटणे : पू. दीपालीताईंचे एक वैशिष्‍ट्य, म्‍हणजे पहाटे ५.३० वाजल्‍यापासून रात्री ३ वाजेपर्यंत कुठल्‍याही सत्‍संगातील किंवा भ्रमणभाषवरील बोलणे असू दे, त्‍यांच्‍या आवाजामध्‍ये किंचितही पालट नसतो. तो भावपूर्ण आवाज ऐकूनच माझे हृदय भरून येते. तो मंजुळ आवाज ऐकण्‍यासाठी माझे कान आतुरलेले असतात आणि ‘त्‍यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटते.

९ अ १ आ. सत्‍संगातील पू. दीपालीताईंचा गोड आवाज ऐकून साधिकेच्‍या साधना करत नसलेल्‍या सुनेने त्‍यांना भेटण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करणे : गेल्‍या दोन मासांपासून माझी सून आणि बाळ घरी आले आहेत. ‘गुरुकीर्तन’ सत्‍संगामध्‍ये पू. दीपालीताई भावार्चना घेतात. तेव्‍हा बाळ शांतपणे ती भावार्चना ऐकते. सून म्‍हणते, ‘‘आई, या ताईंचा आवाज किती गोड आहे हो ! देवाने यांना कसे निर्माण केलेे आहे ! त्‍यांचे बोलणे ऐकतांना माझे मन भरून येते आणि ‘ही भावार्चना ऐकतच रहावी’, असे वाटते. या कोण आहेत ?’’ सुनेने मला असे २ – ३ वेळा विचारलेे. तेव्‍हा मी तिला पू. दीपालीताईंविषयी सांगितले. त्‍यावर ती मला म्‍हणाली, ‘‘एकदा आपण सेवाकेंद्रामध्‍ये जाऊन त्‍यांना भेटूया.’’ खरेतर माझ्‍या सुनेला साधना ठाऊकही नाही, तरीही ती पू. दीपालीताईंच्‍या भावार्चनेने अशी भारावून जाते.

‘गुरुमाऊलींनी असे गोड संतरत्न आम्‍हा साधकांना देऊन आमच्‍यावर पुष्‍कळ कृपा केली आहे’,  याबद्दल गुरुमाऊलींच्‍या चरणी पुष्‍कळ कृतज्ञता !’

९ अ २. वर्षा कुलकर्णी, सोलापूर

९ अ २ अ. ‘पू. दीपालीताईंचे सेवाकेंद्रातील साधकांच्‍या समवेतच जिल्‍ह्यातील प्रत्‍येक साधकाकडे तितकेच बारकाईने लक्ष असते. ‘प्रत्‍येक साधकाची साधना व्‍हायला हवी’, अशी तीव्र तळमळ त्‍यांच्‍यामध्‍ये आहे.

९ अ २ आ. सकारात्‍मकता : त्‍यांच्‍यामध्‍ये गुरुसेवेचा ध्‍यास आणि सकारात्‍मकता आहे. नकारात्‍मक विचार त्‍यांच्‍या आजूबाजूलाही फिरकत नाहीत. आम्‍ही सतत हेच अनुभवले आहे. ‘एखादी गोष्‍ट होणार नाही’, असे त्‍यांच्‍या बोलण्‍यात कधीच नसते किंवा तसा विचार त्‍यांच्‍या मनाला शिवतही नाही.

९ अ २ इ. साधकांना ‘देवाप्रती उत्‍कट भाव कसा असायला हवा ?’, हे शिकवणे : पू. दीपालीताई आमच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. तेव्‍हा त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द आमच्‍या अंतर्मनापर्यंत जातो. त्‍यामुळे त्‍यानुसार आमचे प्रयत्न आपोआपच होतात आणि त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे आम्‍हाला अनुभवताही येते. पू. दीपालीताई प्रतिदिन व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात ‘देवाप्रती उत्‍कट भाव कसा असायला हवा ?’, हे आम्‍हाला शिकवतात. आमच्‍या मनात देवाप्रती भाव निर्माण होण्‍यासाठी आम्‍हाला या आढाव्‍यांचा पुष्‍कळ लाभ झाला.

९ अ २ ई. ‘पू. (कु.) दीपाली मतकर जे बोलतात, ते सत्‍यच होते’, असे आम्‍ही आतापर्यंत अनुभवले आहे.

‘मला पू. दीपालीताईंचा सहवास लाभला’, याबद्दल मी परात्‍पर गुरु डॉक्‍टर, सद़्‍गुरु स्‍वातीताई आणि पू. दीपालीताई यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

९ अ ३. सौ. सोनल कोठावळे, बार्शी, जिल्‍हा सोलापूर.

९ अ ३ अ. पू. दीपालीताईंचा संत सन्‍मान सोहळा पहाण्‍यासाठी मन आतुर होणे : ‘आजचा दिवस पहाण्‍यासाठी माझे डोळे आणि ही आनंदवार्ता ऐकण्‍यासाठी माझे कान पुष्‍कळ आतुर झाले होते. ‘पू. दीपालीताई’ हा शब्‍द कधी कानावर पडतो ?’, असे मला झाले होते.

९ अ ३ आ. आईप्रमाणे सर्व साधकांवर प्रेम करणार्‍या आणि त्‍यांना आधार देणार्‍या पू. दीपालीताई ! : पू. दीपालीताईंविषयी एकाच वाक्‍यात सांगायचे, तर ‘पू. दीपालीताई आम्‍हा सर्वांच्‍या आई आहेत.’ सोलापूर जिल्‍ह्यातील सर्व साधकांची आध्‍यात्मिक प्रगती झाली, ती केवळ पू. दीपालीताईंच्‍या प्रयत्नांमुळेच ! आम्‍हा सर्व साधकांना त्‍या एवढा आधार देतात की, कुणाची आईही एवढा आधार देणार नाही.

(सर्व सूत्रांचा दिनांक : २१.४.२०२३)

९ अ ४. श्री. राजन बुणगे (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ६६ वर्षे), सोलापूर

९ अ ४ अ. पू. दीपालीताई कोणत्‍याही समस्‍येवर उपाय सांगत असल्‍याने मन शांत होऊन त्‍यांचा आधार वाटणे : ‘मागील ६ वर्षांपासून मी पू. दीपालीताईंच्‍या संपर्कात आहे. मध्‍यंतरी मी १० – ११ मास घरी होतो. तेव्‍हा ‘मला त्‍यांचा किती आधार वाटतो !’, हे माझ्‍या लक्षात आले आणि मला त्‍यांना भेटण्‍याची ओढ लागली. मी पू. दीपालीताईंकडे कधी कुठलीही समस्‍या घेऊन गेलो, तरी मला त्‍यावर उपाय मिळतो. त्‍यामुळे माझे मन शांत होऊन मला त्‍यांचा आधार वाटतो.

९ अ ४ आ. साधकांमध्‍ये संघभाव वाढवण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : मध्‍यंतरी उत्तरदायी साधकांनी ‘सोलापूर जिल्‍ह्यातील साधकांनी संघभाव वाढवायला हवा’, असे सांगितले होते. पू. दीपालीताईंनाच त्‍याची तळमळ लागली होती. साधक एकमेकांना भेटत राहिले, तर त्‍यांची मने जुळतील; म्‍हणून त्‍या आम्‍हा साधकांना एकत्र बोलावून आमच्‍यातील संघभाव वाढवण्‍यासाठी प्रयत्न करत होत्‍या. त्‍यांच्‍या या प्रयत्नांमुळेच देवाची कृपा झाली आणि आमची मने जुळायला आरंभ झाला.

९ अ ४ इ. साधकांना चुका सांगतांना त्‍यांवरील उपाययोजनाही तळमळीने सांगणे : साधकांकडून साधना करतांना चुका झाल्‍या, तरी ‘साधकांना सांभाळून कसे घ्‍यायचे ?’, हे मला पू. दीपालीताईंकडूनच अनुभवता आणि शिकता आले. एका शुद्धीसत्‍संगात मी माझी एक चूक सांगितली होती. तेव्‍हा त्‍यांनी ‘माझ्‍याकडून तशी चूक पुन्‍हा होऊ नये’, यासाठी मला एवढ्या तळमळीने उपाय सांगितला की, त्‍यांचे ते शब्‍द अजूनही माझ्‍या कानांमध्‍ये घुमतात आणि चूक होण्‍यापूर्वीच ते शब्‍द आठवून माझ्‍याकडून योग्‍य कृती केली जाते.

९ अ ४ ई. साधकाचे स्‍वभावदोष हेरून ते दूर करण्‍यासाठी योग्‍य दृष्‍टीकोन देणे : पू. दीपालीताईंनी माझे स्‍वभावदोष आणि अहं यांचे पैलू अचूक हेरले आहेत. जेव्‍हा त्‍या मला त्‍याविषयी सांगतात, तेव्‍हा मला ‘त्‍यांच्‍या माध्‍यमातून प.पू. गुरुदेवांचे तत्त्व कसे कार्य करते ?’, हे नेहमीच अनुभवता येतेे. त्‍या माझे स्‍वभावदोष आणि चुका सांगत असूनही ‘मला योग्‍य दिशा मिळणार आहे’, याची निश्‍चिती वाटत असल्‍यामुळे मला त्‍यांच्‍याशी बोलतांना आनंद वाटतो.

‘गुरुमाऊलींनी आम्‍हाला असे संतरत्न दिले आणि त्‍यांचा सहवास देऊन पुष्‍कळ शिकवले’, हे आम्‍हा सर्वच साधकांचे पुष्‍कळ मोठे भाग्‍य आहे’, त्‍याबद्दल मला गुरुचरणी पुष्‍कळ कृतज्ञता वाटते.’

९ अ ५. अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के)

९ अ ५ अ. ‘कु. दीपाली मतकर संतपदी विराजमान झाल्‍या’, ही आनंदवार्ता ऐकून गुरुमाऊलींच्‍या कृपेने सुचलेले काव्‍य :

आमची दीपालीताई संतपदी विराजमान झाली ।
गोपीभावाने तृप्‍त केले दीपालीताईने कृष्‍णरूपी गुरुरायांना ।
त्‍यामुळे संत सन्‍मान सोहळ्‍याचा क्षण तो अवतरित झाला ॥ १ ॥सद़्‍गुरुमाऊली (टीप १) आली साधकांच्‍या उद्धाराला ।

दीपालीताईला संतपदी विराजमान करून आनंदी केले सर्वांना ॥ २ ॥

आमची दीपालीताई संतपदी विराजमान झाली ।
तिने शिकवली आम्‍हा करण्‍या सेवा आणि भक्‍ती ॥ ३ ॥

प्रार्थना करतांनाचे तिचे छायाचित्र पाहूनी ।
भावाश्रू येती नेत्री, भाव दाटून येई अंतःकरणी ॥ ४ ॥

पू. दीपालीताईचे बोलणे मधुर, हसणे मधुर ।
जणू श्रीकृष्‍णाच्‍या बासरीचाच तो नाद मधुर ॥ ५ ॥

भगवंताच्‍या कृपेने लाभला सत्‍संग संत (टीप २) आणि सद़्‍गुरुमाऊली यांचा ।
त्‍यासाठी गुरुमाऊलींच्‍या (टीप ३) चरणी अर्पितो कृतज्ञता ॥ ६ ॥

सद़्‍गुरु आणि संत यांची करता येवो मज नित्‍य चरणसेवा ।
चरणसेवेचा लाभ अविरत घडो या जिवाला ॥ ७ ॥

टीप १ – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये

टीप २ – पू. (कु.) दीपाली मतकर

टीप ३ – परात्‍पर गुरु डॉ. आठवले

९ अ ५ आ. ‘श्रीकृष्‍णाची मीरा पू. (कु.) दीपाली मतकर यांच्‍या रूपाने आली असून ती कृष्‍णाच्‍या मुकुटातील मोरपीस आहे’, असे वाटणे : पू. दीपालीताईंमधील ‘गोपीभाव’ संत मीराबाईंप्रमाणे आहे. ‘भगवान श्रीकृष्‍णाची मीरा आज पू. दीपालीताईंच्‍या रूपाने आम्‍हाला लाभली आहे’, असे मला वाटले. त्‍या वेळी ‘भगवान श्रीकृष्‍णाच्‍या बासरीचा नाद संपूर्ण पृथ्‍वीवर घुमू लागला’, असे मला जाणवले. कित्‍येक वेळा मला ‘पू. दीपालीताई भगवान श्रीकृष्‍णाच्‍या मुकुटामधील मोरपीस आहेत’, असे वाटते. आज देवाने ते मोरपीसच आम्‍हाला संतरूपाने दिले आहे.’

९ अ ६. श्रीमती वीणा साखरे (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ५६ वर्षे), सोलापूर

९ अ ६ अ. कुठलीही सेवा स्‍वतः करून साधकांना कृतीतून शिकवणे : ‘सेवाकेंद्राची स्‍वच्‍छता किंवा सेवाकेंद्रात बाहेरून येणार्‍या साधकांचे नियोजन, अशी कुठलीही सेवा असू दे, ती करायला पू. दीपालीताई स्‍वतः आरंभ करतात. त्‍यांनी त्‍यांच्‍या कृतीतूनच आम्‍हाला सर्व शिकवलेे आहे; मात्र आम्‍हीच त्‍यांच्‍याकडून शिकायला न्‍यून पडत आहोत.

९ अ ६ आ. प्रीती : पू. दीपालीताईंची केवळ साधकांवरच नाही, तर साधकांच्‍या कुटुंबातील सर्वांवरच पुष्‍कळ प्रीती आहे. आम्‍ही त्‍यांची प्रीती विसरूच शकत नाही.’

९ अ ७. सौ. उल्‍का जठार (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के)

९ अ ७ अ. ‘सर्व साधकांची साधना होऊन साधक गुरुचरणी लीन व्‍हावेत’, असा ध्‍यास घेऊन त्‍या दृष्‍टीने सतत प्रयत्नरत असलेल्‍या पू. दीपालीताई ! : ‘पू. दीपालीताईंची ‘सर्व साधकांची सेवा आणि साधना व्‍हावी’, अशी पुष्‍कळ तळमळ आहे. ‘सर्व साधकांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी लीन करायचे आहे’, हाच विचार सातत्‍याने त्‍यांच्‍या मनात असतो. त्‍यांना त्‍याचा ध्‍यासच लागला आहे. त्‍यासाठी त्‍यांचे साधकांच्‍या साधनेकडे बारकाईने लक्ष असते. त्‍यांना रुग्‍णाईत, वयस्‍कर किंवा बालसाधक यांच्‍याही साधनेचे नियोजन करायची तळमळ असते. ‘सर्वांचा उद्धार व्‍हायला पाहिजे’, असे वाटत असल्‍यामुळे त्‍या मला सतत म्‍हणतात, ‘‘काकू, आपले सगळे साधक परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कधी जातील ? आपण प्रयत्न आणखीन कसे करूया ?’’

९ अ ७ आ. रुग्‍णाईत किंवा त्रास होत असलेल्‍या साधकांची विचारपूस करून त्‍यांना त्‍वरित नामजपादी उपाय सांगणे : माझी प्रकृती बरी नसतांना किंवा कुणी साधक रुग्‍णाईत असतांना पू. दीपालीताई त्‍यांना लगेच नामजपादी उपाय सांगतात. माझे त्‍यांच्‍याशी कधी भ्रमणभाषवर बोलणे होते. तेव्‍हा त्‍या मला विचारतात, ‘‘काकू, तुमचे नामजपादी उपाय झाले का ? त्रास न्‍यून झाला का ? तुम्‍ही उपाय वाढवा.’’ त्‍यामुळे माझ्‍या मनात काही नकारात्‍मकता असेल, तर ती निघून जाऊन ‘नामजपादी उपाय करायला हवेत’, असे मला वाटू लागते. जिल्‍ह्यात कुणी साधक रुग्‍णाईत असल्‍याचे समजल्‍यावर त्‍या लगेच ‘काकू, त्‍यांना होणारे त्रास लिहून पाठवायला सांगता का ?’, असे विचारतात. साधकांना नामजपादी उपाय पाठवल्‍यावर ‘साधक ते उपाय करतात ना ?’, याचाही त्‍या आढावा घेतात.

९ अ ७ इ. पू. दीपालीताई ‘गुरुकीर्तन’ सत्‍संग घेत असतांना जाणवलेली सूत्रे !

९ अ ७ इ १. ‘सत्‍संगात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची सूक्ष्मातून भेट होते’, असे साधकांना अनुभवता येणे : जिल्‍ह्यात प्रतिदिन सकाळी १० वाजता ‘गुरुकीर्तन’ सत्‍संग होता.  त्‍या सत्‍संगात अनेक साधक सहभागी होतात. प्रतिदिन सकाळी ‘सत्‍संग कधी चालू होईल ?’, याची सर्व साधकांना उत्‍सुकता लागलेली असते. ‘त्‍या सत्‍संगात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची भेट होते’, असे सर्वांनाच वाटते.

९ अ ७ इ २. सत्‍संगामुळे साधकांना साधना आणि सेवा करण्‍याची प्रेरणा मिळणे : त्‍या सत्‍संगातून पू. दीपालीताई सर्वांना साधनेसाठी चांगली दिशा देतात. त्‍यामुळे मलाही साधना करण्‍याची प्रेरणा मिळते. या सत्‍संगामुळे सर्व साधक उत्‍साही होतात आणि त्‍यांच्‍या सेवेचा कालावधी वाढतो.’

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी पू. (कु.) दीपाली मतकर यांचे सांगितलेले वैशिष्‍ट्यपूर्ण गुण !

१. कोणतीही सेवा करण्‍याची सिद्धता असणे : ‘पू. दीपालीताई गुणांची खाण आहेत. ‘पू. दीपालीताईंना कधीही कुठलीही सेवा सांगितली, तरी ती पूर्ण होणार’, याची मला पूर्ण निश्‍चिती असते. त्‍यांनी कुठलीही सेवा करायला कधीही ‘नाही’ म्‍हटले नाही. त्‍यांच्‍याविषयी सांगायला शब्‍द अपुरे आहेत.

२. पू. दीपालीताईंना ‘साधकांची साधना व्‍हायला पाहिजे आणि त्‍यांची प्रगती व्‍हायला पाहिजे’, हा ध्‍यास आहे. त्‍या ‘साधकांची साधना व्‍हावी’, यासाठी अखंड प्रयत्नरत असतात.

आज पू. दीपालीताईंच्‍या माध्‍यमातून परम पूज्‍यांनी आपल्‍याला जे ‘संतरत्न’ दिले आहे, त्‍याचा आपण सर्वांनीच लाभ करून घेऊया. त्‍या सांगतील त्‍याप्रमाणे प्रयत्न करून आपली साधना लवकरात लवकर होऊन आपण सगळ्‍यांनी साधनेत पुढ जाण्‍याचा प्रयत्न करूया.’

 

साधकांना घडवण्‍यासाठी सतत धडपड करणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर !

पू. दीपालीताई यांनी आम्‍हा सर्व साधकांना घडवले. कधी कधी पू. दीपालीताई पहाटे ३ वाजता झोपायच्‍या आणि दोन-अडीच घंट्यांनी, म्‍हणजे पहाटे ५.३० वाजता होणार्‍या ‘ऑनलाईन’ व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍याला उपस्‍थित असायच्‍या. तेव्‍हा मला वाटायचे, ‘मलाही असे घडायला पाहिजे. पू. दीपालीताई आम्‍हाला घडवत आहेत; पण आम्‍ही घडायला न्‍यून पडत आहोत.’ त्‍यांची ‘जिल्‍ह्यातील साधकांनी सेवाकेंद्रात येऊन रहावे आणि त्‍यांना चैतन्‍य मिळावे’, यासाठी पुष्‍कळ धडपड असते.’

– सौ. सोनल कोठावळे (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), बार्शी, जिल्‍हा सोलापूर.

 

झोपेच्‍या संदर्भात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हरवणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर !

‘सनातन संस्‍थेच्‍या सहस्रो साधकांतच काय; पण सर्वत्रच्‍या लाखो साधकांत इतकी अल्‍प झोप घेऊन सेवा करणारा दुसरा कोणीच नाही ! एवढेच काय, तर मलाही इतकी अल्‍प झोप घेऊन काही करण्‍याचा विचारही करता येत नाही. ‘शिष्‍यात् इच्‍छेत् पराजयम् ।’, हे संस्‍कृतमधील सुवचन आहे. त्‍याचा अर्थ ‘गुरूंनी शिष्‍याकडून पराभव व्‍हावा’, अशी इच्‍छा ठेवावी’, असा आहे. आज ती इच्‍छा एका अंगाने पूर्ण केल्‍याबद्दल मी दीपालीप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करतो !’

–  सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२९.८.२०२३)

१०. पू. (कु.) दीपाली मतकर यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

१० अ. सर्वांनी झोकून देऊन आणि संघभावाने साधनेचे प्रयत्न करूया !

सद़्‍गुरु स्‍वातीताई (सद़्‍गुरु स्‍वाती खाडये), आम्‍हाला तुमचा आनंददायी सत्‍संग मिळतोे आणि त्‍यातूनच सर्व सेवा करण्‍याचे बळही मिळते. (साधकांना उद्देशून) आपण झोकून देऊन साधनेचे प्रयत्न करूया. आपल्‍याला अशक्‍य असे काहीच नाही; कारण गुरुदेव आपल्‍या पाठीशी आहेत. सद़्‍गुरु स्‍वातीताई, ‘सगळ्‍यांनी झोकून देऊन आणि संघभावाने प्रयत्न करूया’, एवढेच मला वाटते.

 

Leave a Comment