प्रस्तुत लेखात आपण गुरुदीक्षा आणि तिचे प्रकार यांबरोबरच गुरुवाक्य, अनुग्रह आणि गुरुकिल्ली यांविषयी माहिती पाहूया.
गुरुदीक्षा
‘दीयते सम्यक् ईक्षणं यस्यां सा ।’ म्हणजे सम्यक (यथार्थ) दृष्टी ज्याच्यामुळे दिली जाते ती दीक्षा होय. थोडक्यात गुरुदीक्षा म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना. दीक्षेच्या वेळी बहुधा गुरुमंत्र दिला जातो.
१. प्रकार
अ. शब्ददीक्षा
गुरूंच्या शब्दासमवेत शक्ती संक्रमित होऊन शिष्याच्या ठिकाणी ‘आपण ब्रह्म आहोत’, असा भाव जेव्हा निर्माण होतो, तेव्हा शब्ददीक्षा घडून येते. या पद्धतीत गुरु शिष्याला जवळ बोलावून त्याच्या कानात एखादा मंत्र सांगतात.
आ. दर्शनदीक्षा
गुरूंचे दर्शन झाल्याक्षणी दीक्षा मिळते. आमचे (सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांचे) गुरु प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांचे प्रथमदर्शन झाल्याक्षणी ते भावावस्थेत गेले.
इ. दृक्दीक्षा
या दीक्षापद्धतीत गुरु कृपादृष्टीने आपली अंतर्शक्ती शिष्यात संक्रमित करतात. यालाच ‘मयूरदीक्षा’ असेही म्हणतात. (मयूर आपल्या प्रेयसीला स्पर्श न करता केवळ आपल्या दृष्टीक्षेपानेच तिला गर्भ प्रदान करतो, असे म्हटले जाते.) दृक्दीक्षा देणारा स्वतः ‘ऊर्ध्वदृष्टी’ असला पाहिजे. अधोदृष्टी असलेला माणूस दृक्दीक्षा देऊच शकत नाही. दृष्टी दोन प्रकारची असते. एक अंतर्दृष्टी किंवा ऊर्ध्वदृष्टी आणि दुसरी बहिर्दृष्टी किंवा अधोदृष्टी. नित्यानंदबाबा किंवा साईबाबा यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यास त्यांची दृष्टी कुठेतरी वर ऊर्ध्वदिशेकडे लागलेली दिसून येते. दृष्टीक्षेपाने दीक्षा द्यावयाची असेल, तेव्हा भगवान (रमण महर्षी) भक्ताकडे निश्चल दृष्टीने काही वेळ पहात असत. त्यामुळे भक्ताच्या मनातील वासना आणि प्रापंचिक खळबळ नाहीशी होई. कुण्या भक्ताला ‘आपल्या शरिरातून एखादा विजेचा प्रवाहच जात आहे’, असा भास होत असे, तर दुसर्या कोणाला शरिरात प्रकाशमय शांती प्रविष्ट झाली, असा अनुभव येई.
एका भक्ताने भगवानांच्या दृष्टीक्षेपाचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे : ‘भगवानांनी अचानक माझ्याकडे आपले अत्यंत तेजःपुंज डोळे वळवले. यापूर्वी मला त्यांच्या डोळ्यांकडे फार वेळ बघवत नसे; या खेपेला मात्र भगवानांच्या अत्यंत प्रभावशाली आणि तेजःपुंज डोळ्यांकडे मी किती वेळ पहात राहिलो, हे सांगता येत नाही. त्या वेळी त्यांच्या दृष्टीच्या ओघाने, माझ्या शरिरात ऐकू येतील अशी कंपने चालू राहिली.’
अशा निरनिराळ्या अनुभूतींनंतर, त्या त्या भक्ताच्या मनात निश्चयरूपाने एक श्रद्धा उत्पन्न होई आणि ती ही की, भगवानांनी आपला स्वीकार केला आहे अन् ते आपला सर्व प्रकारे सांभाळ करून मार्गदर्शन करत आहेत. जरी या प्रकारची दीक्षा इतरांच्या ध्यानात येत नसे, तरी ‘दीक्षा केव्हा झाली’, हे दीक्षा मिळणार्याला तात्काळ समजून येई. वेदमंत्र चालू असता कुणा तरी एखाद्यावर, दुसर्यांना नकळत, भगवानांची अशी दीक्षारूपी कृपा होऊन जाई. मौनाने दिलेली दीक्षाही तितकीच समर्थ असे. भगवानांकडे तर सर्व मन लागलेले; पण तिरुवन्नमलाईला तर जाता येत नाही, अशा भक्तांसाठी मौनदीक्षेचा उपयोग होई अथवा नटेश मुदलियाराप्रमाणे स्वप्नात दीक्षा दिली जाई.
उ. तीर्थदीक्षा
शिष्याला तीर्थ प्यायला देऊन त्यातून दीक्षा दिली जाते.
ऊ. पत्रदीक्षा
गुरूंनी लिहिलेले पत्र पाहिल्यावर किंवा वाचल्यावर शिष्याला दीक्षा मिळते.
ए. संकल्पदीक्षा (अनुग्रह, कृपा दीक्षा)
ही दीक्षा केवळ गुरूंच्या संकल्पानेच शिष्याला प्राप्त होते.
यथा कूर्मः स्वतनयान् ध्यानमात्रेण पोषयेत् ।
वेधदीक्षोपदेशश्च मानसः स्यात् तथाविधः ।। – कुलार्णवतन्त्र, उल्लास १४, श्लोक ३७
अर्थ : ज्याप्रमाणे कासवी केवळ मनाने चिंतन करून भूमीच्या खाली ठेवलेली अंडी उबवते, पिल्लांना वाढवते आणि त्यांचे पोषण करते, त्याचप्रमाणे गुरु केवळ संकल्पाने शिष्याची शक्ती जागृत करतात अन् त्याच्यात शक्तीसंचार करतात.
ऐ. स्वप्नदृष्टान्ताद्वारे दीक्षा
याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य यांच्याकडून ‘राम कृष्ण हरि’ हा गुरुमंत्र स्वप्नदृष्टान्ताद्वारे मिळाला होता. गुरूंनी गुरुमंत्र दिला, तेव्हा ते देहधारी नव्हते. स्वप्नावाटे मिळालेला मंत्र मानसिक स्वरूपाचा, म्हणजे ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या न्यायाने आहे कि आध्यात्मिक स्वरूपाचा, खरोखर स्वप्नदृष्टान्त आहे, हे समजण्यासाठी पुढील सूत्रे मार्गदर्शक ठरतात.
१. एखादा मंत्र सलग तीन रात्री स्वप्नात मिळाला, तर तो स्वप्नदृष्टान्त असतो.
२. उन्नतांना त्याविषयी विचारले, तर मिळालेला मंत्र हा स्वप्न कि स्वप्नदृष्टान्त होता, हे ते सांगतात.
दीक्षेचा प्रकार आणि त्याचे एकूण दीक्षांतील प्रमाण
दीक्षेचा प्रकार |
प्रमाण (टक्के) |
|
१. | शब्द | ६८ |
२. | स्पर्श | १० |
३. | दर्शन | ४ |
४. | दृक् (दृष्टीकटाक्ष) | ५ |
५. | तीर्थ | २ |
६. | पत्र | २ |
७. | संकल्प (टीप १) | २ |
८. | इतर | ७ |
एकूण | १०० |
अनुग्रह (आशीर्वाद, कृपा)
‘अनु (पश्चात्) गृह्णामि इति ।’ येथे ‘पश्चात् गृह्णामि ।’ म्हणजे गुरूंकडून नंतर घेणे. विद्या पूर्ण झाल्यावर ती विद्या फलद्रूप व्हावी म्हणून गुरूंकडून मिळालेला आशीर्वाद म्हणजेच अनुग्रह होय. श्री गुरूंच्या अनुग्रहशक्तीलाच ‘गुरुपद’ म्हणतात. ते उपेय आहे, म्हणजेच उपायांच्या सहयोगाने त्याची प्राप्ती होते; परंतु श्री गुरु हेच प्रत्यक्ष उपाय आहेत !
‘अभीष्टसम्पादनेच्छारूपः प्रसादः ।’ म्हणजे मनोवांच्छित वस्तूच्या संपादनाविषयी (भगवंताचा) इच्छारूप प्रसाद म्हणजे अनुग्रह होय. (न्यायकोश) गुरु म्हणजे भगवान आणि भगवान म्हणजेच गुरु होय. भगवंताची कृपा होणे म्हणजे अनुग्रहच होय. सगळ्या संप्रदायांत भगवंताच्या अनुग्रहरूपी कृपेला महत्त्व दिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायातील ५६ व्या श्लोकात श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ।’, म्हणजे ‘माझा भक्त माझ्या कृपेने शाश्वतपद प्राप्त करून घेतो’, या शब्दांत अनुग्रहाचे महत्त्व सांगितले आहे. अनन्यभक्तीने भगवंताची कृपा म्हणजे अनुग्रह प्राप्त केल्यास परमकल्याण साधता येते, असे सर्व भक्तीसंप्रदाय मानतात.
श्री वल्लभाचार्यांनुसार पुष्टिमार्ग म्हणजेच भक्तीमार्ग आणि यातील पुष्टीलाच त्यांनी अनुग्रह असे म्हटले आहे.
गुरुवाक्य
शिष्याची निष्ठा असली, तर विवेकाच्या (बुद्धीच्या) अपेक्षेवाचून आत्मज्ञान करून देणारा शब्दसमूह म्हणजे गुरुवाक्य होय.
गुरुकिल्ली
सर्वच द्वारे, म्हणजे अगदी काळाचे द्वारसुद्धा, उघडणारी शक्ती म्हणजे गुरुकिल्ली होय.
टीप १ – दीक्षेच्या सर्व प्रकारांत शब्द, स्पर्श इत्यादींसह संकल्प असतो. या प्रकारात केवळ संकल्पच असतो. (मूळ स्थानी)