पूजा करतांना भाव कसा ठेवावा ?

पूजा करतांना देवता, संत किंवा गुरु तिथे प्रत्यक्ष आहेत, असा भाव ठेवून त्यांची पूजा करा !

प.पू. डॉ. जयंत आठवले H.H. Dr. Jayant Athavale

प.पू. डॉ. जयंत आठवले

 

१. पूजेच्या वेळी होणार्‍या अयोग्य कृती

पुढील अयोग्य कृती घडत असल्याचे घरोघरी आढळून येते.

अ. देवतेचे चित्र किंवा मूर्ती डोक्याकडून एका हाताने उचलली जाते आणि लोंबकळत धरली जाते.

आ. देवतेचे चित्र / मूर्ती किंवा संत / गुरु यांचे छायाचित्र कसेही पुसले जाते.

इ. गंध, कुंकू कसेही लावले जाते. ते देवतेच्या डोळ्यांत गेलेले असते किंवा कुंकवाने, गंधाने तिचा तोंडवळाच झाकून गेलेला असतो.

ई. फुले कशीही वाहिलेली असतात. ती चित्र किंवा मूर्ती यांना साजेशा आकाराची नसतात. त्यामुळे चित्र किंवा मूर्ती झाकून जाते.

उ. पूजा करतांना इतरत्र लक्ष असते किंवा इतरांशी अनावश्यक बोलले जाते.

ही सर्व उदाहरणे म्हणजे पूजा करायची म्हणून केल्याची आणि भावाचा अभाव असल्याची लक्षणे आहेत. त्यामुळे पूजा करायचा आध्यात्मिक लाभ तर होत नाहीच, उलट देवाची अवकृपा होते. यावरून लक्षात येते, हिंदूंना किती बारीक-सारीक गोष्टींचेही धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

 

२. पूजेच्या वेळी करावयाच्या योग्य कृती

पुढीलप्रमाणे पूजा केल्यास पुजेचा लाभ निश्चित होतो.

अ. देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांना दोन्ही हातांनी, अलगद आणि मध्यभागी धरून उचलावे.

आ. देवता, संत किंवा गुरु यांना पुसतांना ते तिथे प्रत्यक्ष आहेत, असा भाव ठेवून आणि आपण पुसत असल्याचे त्यांना सांगून त्यांचे वरून खालपर्यंत एकेक अंग हळूवार पुसावे. आई बाळाला कशी आंघोळ घालते ? त्याला सांगते, आता तुला आंघोळ घालते हं. तू डोळे मिट, म्हणजे डोळ्यांत पाणी जाणार नाही. अशा प्रकारे त्याच्याशी बोलत बोलत, त्याला कल्पना देत आणि त्याची काळजी घेत त्याला आंघोळ घालते. त्याचप्रमाणे आपणही देवतेचे चित्र / मूर्ती किंवा संत / गुरु यांचे छायाचित्र पुसायला हवे. ती कृती भावपूर्ण करायला हवी. चित्र किंवा छायाचित्र पुसतांना आधी त्यातील देवता, संत किंवा गुरु यांना पुसावे आणि मग त्यातील इतर भाग पुसावा.

इ. गंध, कुंकू देवतेला किंवा गुरूंना लावतांना ते बरोबर कपाळावर आणि डोळ्यांत जाणार नाही, अशा योग्य आकाराचे लावावे. मूर्तीवर कुंकू वाहायचे असल्यास ते चरणांवर वहावे.

ई. योग्य ती आणि योग्य त्या आकाराची फुले वहावीत. त्यांची रचना सात्त्विक करावी.

उ. पूजा करतांना इतरत्र लक्ष नसावे. तल्लीन होऊन मनोभावे पूजा करावी.

असे केल्यानेच ती देवता, संत किंवा गुरु यांचे तत्त्व जागृत होऊन आपल्याला त्याचा लाभ होईल.

– (प.पू.) डॉ. आठवले (२०.१.२०१४)

 

३. खरी क्षमायाचना !

पूजेच्या शेवटी क्षमायाचना करतांना पुढील श्लोक म्हणतात.

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्‍वर ॥

अर्थ : हे भगवंता, मी प्रतिदिन सहस्रावधी अपराध करत असतो. हे परमेश्‍वरा, मी तुझा दास आहे, असे समजून मला क्षमा कर !

मी भगवंताचा दास आहे, या उत्कट जाणिवेसह अपराधीभाव जागृत होऊन अहंभाव न्यून झाला, तरच खर्‍या अर्थाने क्षमा मागितली जाते आणि त्याच वेळी ईश्वरही क्षमा करतो. अन्यथा क्षमा मागणे, हा केवळ शाब्दिक सोपस्कार होतो.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०१४)

 

४. देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच
ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील !

भाव कसा ठेवावा ? याविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘अध्यात्मातील कृती करतांना भाव महत्त्वाचा असतो. प्रार्थना, नामजप यांच्यासह देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. देवतेला श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधीयुक्त केलेले उपचारसमर्पण म्हणजे देवपूजा होय. देवतेची प्रतिमा अथवा मूर्ती यांची शास्त्रोक्त पद्धतीने करावयाची पूजा देवतेला अपेक्षित अशी झाल्यास ती खऱ्या अर्थाने ‘पूजा’ होते. याप्रमाणे सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथील ध्यानमंदिरात किंवा घरी असलेल्या देवघरात पूजा करतांना ‘देवता, संत किंवा गुरु तिथे प्रत्यक्ष आहेत’, असा भाव ठेवून त्यांची पूजा करावी. भावपूर्ण पूजेतून चैतन्य प्रक्षेपित होऊन त्याचा पूजकाला आणि त्या वास्तूतील सर्वांना लाभ होतो. देवता आणि गुरु यांचे आशीर्वाद लाभतात, तसेच वातावरणातील सकारात्मक ऊर्जा अन् सात्त्विकता वाढते आणि आध्यात्मिक स्तरावरील अनुभूतीही येतात; मात्र पूजा भावपूर्ण न केल्यास देवाची अवकृपा होऊन त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही, तसेच वातावरणातील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तूतील चैतन्यही उणावते. त्यामुळे घरातील इतर कामांप्रमाणे पूजा हे एक काम किंवा केवळ एक नित्यकर्म म्हणून उरकू नये. सर्वांच्या पालनपोषणाची काळजी वहाणाऱ्या भगवंताची पूजा अशा प्रकारे ‘उरकणे’, याला देवपूजा म्हणता येईल का ? असे केल्यावर भगवंताने आपल्यावर कृपा तरी का करावी ? हे लक्षात घेऊन देवता आणि गुरु यांची यथासांग अन् भक्तीभावाने पूजा केली, तरच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (६.७.२०२१)

3 thoughts on “पूजा करतांना भाव कसा ठेवावा ?”

  1. देवाला फुल पुष्प समर्पित करत असताना, त्या फुलाचा देठ कोणत्या बजुला असवा, आणि फुलाच्या पाकळी कोणाच्या बाजुने असावे, कृपया या बद्दल मार्गदर्शन करावे

    Reply
    • नमस्कार,

      देवाला पुष्प समर्पित करत असतांना, फुलाचे देठ देवतेच्या दिशेने आणि फुलाच्या पाकळ्या वाहाणाऱ्याच्या दिशेला असाव्यात.

      Reply

Leave a Comment