गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात पुत्र किंवा कन्या यांच्याकडून सम्यक (सात्त्विक) कृती व्हावी; म्हणून आई, वडील आणि आचार्य वैदिक पद्धतीने जे विधी करवून घेतात, त्यांना ‘संस्कार’ असे म्हणतात. प्रस्तुत लेखात आपण सोळा संस्कार यांचे महत्त्व, नैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण यांतील फरक तसेच प्रमुख सोळा संस्कार कोणते, यांविषयी जाणून घेऊया.
१. सोळा संस्कार म्हणजे जीवनात घडणार्या
प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी करायचे संस्कार
मनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठी आहे, अशी धर्माची शिकवण असल्याने जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी आवश्यक अशी उपासना कशी करावी, याचे मार्गदर्शन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. जन्मापासून विवाहापर्यंत जीवनाचे एक चक्र पूर्ण होते. तसेच चक्र पुत्राच्या / कन्येच्या जन्मापासून त्याच्या / तिच्या विवाहापर्यंत असते. असे पिढ्यान्पिढ्या चालू असते. गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या काळात जीवनात घडणार्या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी कोणते संस्कार करायचे, त्याचे विवेचन या लेखमालिकेत करण्यात येणार आहे. या संस्कारांमुळे पुढे उपासना चांगली व्हावयास साहाय्य होते. तसेच काही जण मृत्योत्तर संस्कारांनाही सोळा संस्कारांत धरतात. त्या संस्कारांविषयीचे काही विवेचन संकेतस्थळावरील ‘मृत्यू आणि मृत्यूनंतर’ या भागात दिली आहे. यासाठी येथे क्लिक करा!
२. व्युत्पत्ती आणि अर्थ
गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात आई, वडील आणि आचार्य यांच्याकडून पुत्र किंवा कन्या यांच्यावर, त्यांच्याकडून सम्यक (सात्त्विक) कृती व्हावी; म्हणून वैदिक पद्धतीने जे विधी केले जातात, त्यांना ‘संस्कार’ असे म्हणतात. ‘संस्कार ही एक मूल्यवर्धक प्रक्रिया आहे. संस्कार शब्दाची व्युत्पत्ती अशी – सम् + कृ + घञ् · संस्कार. म्हणजे ‘कृ’ धातूच्या मागे ‘सम्’ हा सम्यक्त्वदर्शक असा उपसर्ग आणि पुढे ‘घञ्’ हा प्रत्यय लागून संस्कार शब्द बनला आहे. त्याचा अर्थ ‘चांगले करणे, शुद्ध करणे, वस्तूतील वैगुण्य दूर करून तिला नवे आकर्षक स्वरूप देणे’, असा बहुविध आहे. अर्थात ज्या क्रियेच्या योगाने मनुष्याच्या ठिकाणी सद्गुणांचे विकसन आणि संवर्धन होते अन् दोषांचे निराकरण होते, त्या क्रियेला ‘संस्कार’, असे म्हणावे. संस्कारकल्पनेचा विस्तार आणि त्यांची संख्या, यांविषयी गृह्यसूत्रांत बराच ऊहापोह केला आहे. संस्कार हा गृह्यसूत्रांचा महत्त्वाचा (खास) विषय आहे.
३. शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींची
शुद्धी करणारे सोळा संस्कार
`पूर्वीच्या ऋषींनी व्यक्तीला संस्कारित करून त्याद्वारे व्यक्तीचे आणि तदनुषंगाने संपूर्ण समाजाचे जीवन उन्नत अन् सुदृढ करण्यासाठी आणि ही प्रक्रिया समाजात सतत चालू रहाण्यासाठी, जन्म ते मृत्यूपर्यंतच्या त्या त्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार १६ विधीयुक्त संस्कारांची योजना केली. या संस्कारांद्वारे जिवाच्या विचारांत परिवर्तन करता येते. त्यामुळे त्याचे शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींची शुद्धी होते. ज्या जिवावर असे संस्कार होत नाहीत, तो अतिरेकी, भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी होतो. त्यामुळे तो स्वतःचे आणि इतरांचेही जीवन दुःखी बनवतो.’
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
ते विधीयुक्त १६ संस्कार पुढीलप्रमाणे आहेत १. गर्भाधान (ऋतूशांती), २. पुंसवन, ३. सीमंतोन्नयन, ४. जातकर्म (जन्मविधी, पुत्रावण), ५. नामकरण, ६. निष्क्रमण (घराबाहेर नेणे), ७. अन्नप्राशन, ८. चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे), ९. उपनयन (व्रतबंध, मुंज), १०. मेधाजनन (पळसोल्याचा विधी), ११. महानाम्नीव्रत, १२. महाव्रत, १३. उपनिषद्व्रत, १४. गोदानव्रत (केशान्तसंस्कार), १५. समावर्तन (सोडमुंज) आणि १६. विवाह
४. नैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण
अ. नैमित्तिक कर्म
ज्या कारणासाठी कर्म करावयाचे असते, ते कारण, ती वेळ किंवा त्या दिवशी करावयाचे ते नैमित्तिक कर्म होय, उदा. ‘मुलगा जन्मला’, हे कारण झाले. यामुळे जन्म झाल्यावर किंवा पुढच्या वर्षीच्या त्याच दिवशी मुलाच्या जन्मानिमित्त नैमित्तिक कर्म करावयाचे असते.
आ. संस्कार
मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यावर त्याच दिवशी करावयाच्या कर्माला ‘संस्कार’, असे म्हणतात.
इ. उत्सव किंवा सण
ज्या एखाद्या धार्मिक समारंभात तो करणार्या आणि त्यात भाग घेणार्या लोकांना आनंद आणि मनःप्रसाद यांचा अनुभव घडतो, त्याला ‘उत्सव’ म्हणतात. सण म्हणजे उत्सवप्रसंग, उत्सवदिवस म्हणजेच आनंदाचा दिवस.
अमुल्य अप्रतिम अत्यावश्यक माहीती