हठयोग

समाजात बरेचजण प्राणायाम, आसने इत्यादी मार्गांनी साधना करत असल्याचे आपण पहातो. आध्यात्मिकदृष्ट्या हे सर्व हठयोगात मोडते. हठयोग म्हणजे नेमके काय, आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने या साधनामार्गाच्या मर्यादा, यांविषयीची माहिती प्रस्तुत लेखातून आपण जाणून घेऊया.

१. हठयोग म्हणजे काय ?

अ. हठयोग म्हणजे शरिराला विविध पद्धतींनी ताप (त्रास) देऊन शारीरिक क्षमता वाढवत ते ब्रह्मस्थितीपर्यंत नेणे

‘हठ’ म्हणजे हट्ट किंवा निग्रह. ‘हठयोग’ म्हणजे शरिराला हट्टाने निरनिराळ्या पद्धतीने ताप देऊन तो सहन करण्याची शारीरिक क्षमता हळूहळू वाढवणे, म्हणजेच पर्यायाने मनाची सहनशीलता वाढवणे. मार्कंडेय ऋषी या योगाचे जनक आहेत. ब्रह्मस्थिती साध्य होईपर्यंत प्रत्येक प्रकारची साधना हा एक प्रकारचा हठयोगच असतो. मनाने किंवा बुद्धीने साधना करू न शकणार्‍यांना हठयोगापासून साधनेला आरंभ करणे सुलभ जाते. आसने, बंध आणि मुद्रा, त्राटक अन् प्राणायाम हेही हठयोगात येतात.

आ. सूर्य-चंद्र या नावांनी प्रसिद्ध असलेल्या कष्टसाध्य प्राणापानांचे ऐक्य घडवून आणणे म्हणजे हठयोग

‘हठयोगाचा एक वेगळा आध्यात्मिक अर्थ गोरक्षनाथांच्या ‘सिद्धसिद्धांत-पद्धती’ या ग्रंथात सांगितला आहे, तो असा –

हकारः कीर्तितः सूर्यष्ठकारश्चन्द्र उच्यते ।
सूर्यचन्द्रमसोर्योगाद्धठयोगो निगद्यते ।।

अर्थ : ‘ह’ म्हणजे उजव्या नाकपुडीतून होणारा आणि ‘ठ’ म्हणजे डाव्या नाकपुडीतून होणारा श्वासोच्छ्वास होय. यांना अनुक्रमे सूर्य अन् चंद्र असे म्हणतात. सूर्य-चंद्र या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या प्राणापानांचे ऐक्य घडवून आणायचे असते आणि ते कष्टसाध्य असते; म्हणूनच त्याला ‘हठयोग’ म्हणतात.’

इ. तन आणि मन यांना शिक्षा करून ईश्वराकडे वळवण्याची प्रक्रिया म्हणजे हठ

‘योग’ हा शब्द ईश्वरी नियोजनाशी संबंधित आहे. योगाविना, म्हणजेच ईश्वरी नियोजनाविना जीवनात कोणतीच गोष्ट घडत नाही. ज्या वेळी एखादा जीव आध्यात्मिक उन्नतीचे प्रयत्न करण्यासाठी आपले तन, तसेच मन यांना शिक्षा करून त्यांना ईश्वराच्या मूर्तस्वरूपाकडे वळवायचा प्रयत्न करतो, त्या वेळी या प्रक्रियेला ‘हठ’ असे म्हणतात.

ई. महत्त्वाकांक्षा

हठयोगातील योग्याची ‘अध्यात्म’ ही महत्त्वाकांक्षा आहे.

 

२. हठयोगाच्या मर्यादा

हठयोगाने केवळ शरीर, तसेच मन यांतून होणार्‍या कृतीच्या, तसेच विचारांच्या प्रसारणाला अवरोध केला जातो; परंतु हठयोगाला मर्यादा आहेत. हठयोगात वृत्तीचे निराकरण न झाल्याने मनोलय, तसेच बुद्धीलय होत नाही आणि मन अन् बुद्धी यांचा लय झाल्याविना जिवाला पारदर्शकता न आल्याने ईश्वरप्राप्तीचे ध्येय साध्य होत नाही.

हठयोग हा `प्राणायाम, आसन, बंध, तसेच एखाद्या गोष्टीवर आलंबन करून ध्येय निश्चित करणे’ या गोष्टींचा पुरस्कर्ता आहे. हठयोगाने जास्तीतजास्त ५० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत जाता येते; कारण हठयोगातील प्रक्रियेत सहजतेचा अभाव असल्याने मन आणि बुद्धी या ‘स्व’च्या धारणेतूनच कार्य करू लागल्याने जिवाच्या प्रत्येक कृतीत चैतन्याच्या ठिकाणी कृत्रिमताच अधिक प्रमाणात येते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी हठयोग’

Leave a Comment