न शिवलेले (अखंड) वस्त्र परिधान केल्याने चैतन्य मिळून आध्यात्मिक उपाय होतात अन् शिवलेल्या वस्त्रामुळे अल्प प्रमाणात चैतन्य मिळते. कपड्यांची शिवण क्लिष्ट नसावी, उदा. कपड्यांवर जास्त चुण्या नसाव्यात. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
१. पूर्वीच्या काळची गाठ मारलेले कपडे घालण्याची योग्य पद्धत
‘पूर्वीच्या काळी स्त्रिया किंवा पुरुष गाठ बांधण्यात येणारे वस्त्र वापरत असत. स्त्रिया नऊवारी साडी आणि अंगात गाठ मारलेली चोळी घालत असल्याने गाठीच्या माध्यमातून सात्त्विक लहरी त्या त्या ठिकाणी वस्त्रात बद्ध होऊन आवश्यकतेप्रमाणे त्या जिवासाठी कार्य करत असत. तसेच पुरुषही गाठ मारलेले धोतर नेसत किंवा बाराबंदी वापरत असत. बाराबंदी या अंगरख्याला गाठ नसली, तरी ठिकठिकाणी नाड्यांच्या रूपात गाठच मारलेली असल्याने ही गाठही सात्त्विक लहरी स्वतःत घनीभूत करून या लहरींचा त्या जिवाला आवश्यकतेप्रमाणे लाभ करून देत असे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
२. कपड्यांवर न्यूनतम (कमीतकमी) शिलाई का असावी ?
अ. शिलाईमुळे छिद्रे पडून त्यातून वातावरणातील किंवा
वायू-मंडलातील रज-तमात्मक लहरी कपड्यात शिरण्याची शक्यता जास्त असणे
‘कपडे शिवतांना कपड्याला दर वेळी छिद्र पाडून त्यातून दोरा ओवून टाके घातले जातात. छेद देणे, म्हणजेच वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना आकृष्ट करून घेणे. गाठ मारून वापरायच्या वस्त्रांना गुंड्या (बटणे) इत्यादी लावलेली नसल्याने वस्त्रांवर न्यूनतम शिलाई होऊन शिलाईतून छिद्रे पडून त्यातून रज-तमात्मक लहरी वस्त्रात घुसण्याची शक्यता अतिशय अल्प असे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
आ. शिवण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणार्या वाईट शक्तींच्या स्पंदनांमुळे बहुतेक सर्व शिंपी त्रस्त असणे
संकलक : कपडे शिवतांना कपड्याला प्रत्येक वेळी छिद्र पाडून त्यातून दोरा ओवून टाके घातले जातात. छेद देणे, म्हणजेच वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना आकृष्ट करून घेणे. असे आहे, तर सर्व शिंप्यांना त्याचा त्रास होत असेल ना ?
एक विद्वान : हो. बहुतेक सर्व शिंपी वाईट शक्तींच्या त्रासाने ग्रस्त असू शकतात. कपडे शिवण्यासाठी वापरल्या जाणार्या यंत्रातून उत्पन्न होणार्या त्रासदायक नादाकडे वायूमंडलातील वाईट शक्ती आणि त्रासदायक कंपने आकृष्ट होतात. कापड कापतांना कात्रीचा होणारा ‘करकर’ ध्वनीही त्रासदायक स्पंदनांना आमंत्रित करतो. कपडे शिवण्याच्या प्रक्रियेत सुईचा कपड्यावर होणारा रज- तमात्मक आघातयुक्त नाद, तसेच या नादाने भारित सुईच्या स्पर्शाने कपड्यावर उमटणारे छिद्र हेही साहजिकच रज-तमयुक्त लहरींनी युक्त असल्याने शिंप्यांच्या भोवतीचे वायूमंडल, तसेच देहसुद्धा या स्पंदनांनी भारित होऊ शकतो. या प्रक्रियेमुळे कालांतराने शिंप्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधींना अल्प काळातच तोंड द्यावे लागू शकते. – एक विद्वान(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५११० (३.३.२००८, सायं. ५.५३)
इ. न शिवलेले (अखंड) वस्त्र परिधान केल्याने
चैतन्य मिळून आध्यात्मिक उपाय होणे अन् शिवलेल्या वस्त्रामुळे
अल्प प्रमाणात चैतन्य मिळणे आणि अल्प प्रमाणात आध्यात्मिक उपाय होणे
‘अखंड वस्त्रातील प्रत्येक धागा अखंड राहिल्यामुळे त्यातून वहाणार्या चैतन्यलहरींचे तो संपूर्ण वस्त्रभर वहन करू शकतो. त्यामुळे अखंड वस्त्र परिधान केल्यामुळे जिवाच्या देहात चैतन्य पसरून त्याच्यावर आध्यात्मिक उपायहोतात, उदा. साडी नेसल्यावर जास्त प्रमाणात आध्यात्मिक उपायहोतात. जेव्हा वस्त्र कापले जाते, तेव्हा त्याच्यातील धाग्यांचे अखंडत्व नष्ट होते. त्यामुळे त्यातून वहाणार्या चैतन्यलहरींच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन धाग्यातील चैतन्य संपूर्ण वस्त्रात पसरू शकत नाही. त्यामुळे शिवलेले वस्त्र परिधान केल्यावर चैतन्याचा लाभ अल्प प्रमाणात होतो आणि आध्यात्मिक उपायही अल्प प्रमाणात होतात, उदा. सलवार-कुडता.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, सायं. ७.१०) कपड्यांची शिवण क्लिष्ट नसावी, उदा. कपड्यांवर जास्त चुण्या नसाव्यात.
३. कपडे अंगावर घातलेले असतांना ते का शिवू नयेत ?
‘सलग वस्त्र सात्त्विक असते, तर अनेक छिद्रे असणारे वस्त्र त्रासदायक स्पंदनांनी युक्त असते. कपडे शिवणे ही क्रिया फाटलेल्या छिद्राला सलगता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असली, तरी फाटलेल्या छिद्राला शिवतांना केली जाणारी प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात फाटक्या वस्त्रातील त्या त्या भागातील रज-तमात्मक लहरींच्या ऊत्सर्जनात्मक प्रक्रियेला पोषक ठरते. कपडा शिवत असतांना मोठ्या प्रमाणात रज-तमात्मक लहरींचे कारंज्याच्या रूपात वायूमंडलात ऊत्सर्जन होत असल्याने या प्रक्रियेचा देहाला स्पर्श होणे, टाळणेच इष्ट ठरते. अन्यथा या रज-तमात्मक प्रक्रियेचा देहाला त्रास होण्याचीच शक्यता जास्त असल्याने शक्यतो देहावर, म्हणजेच देहाच्या निकट कपडे शिवणे टाळावे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण एकादशी, (३.३.२००८, सकाळी ११.४०)
४. यंत्राचा वापर करून कपडे शिवल्याने
किंवा बनवल्याने होणारा तोटा आणि त्यावरील उपाय
अ. शिलाईयंत्राने शिवलेल्या कपड्यांपेक्षा
हातशिलाईच्या कपड्यांत काळी स्थाने अल्प प्रमाणात निर्माण होणे
‘पूर्वी हाताने कपड्यांवर शिलाई केली जात असल्याने वस्त्रावर स्पर्शाच्या माध्यमातून न्यूनतम आघात होत असे. त्यामुळे त्या भोकांत रज-तमात्मक लहरी घनीभूत होण्याचे प्रमाणही अल्प असे; परंतु आता सर्वत्र शिलाईयंत्र आलेले असल्याने त्याच्या त्रासदायक नाद उत्पन्न करणार्या प्रक्रियेतून त्या तालावर सुईच्या वस्त्रावर भोके पाडण्याच्या आघातक्रियेमुळे वस्त्रावर पडलेल्या सूक्ष्म-भोकांत रज-तमात्मक लहरींचे संक्रमण होऊन ती भोके पूर्णतः बंद होऊन ती भोके कपड्यांमध्येही वाईट शक्तींची घनीभूत काळी स्थाने बनवण्यास पोषक ठरतात. थोडक्यात कपड्यांवर शिलाईयंत्राने केलेल्या आघातदायी शिलाईचे प्रमाण जेवढे जास्त, तेवढे कपड्यांतून त्रासदायक स्पंदने बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते.
आ. पूर्वीच्या काळी चरख्यावर सूत कातत असतांना नामजप केल्यामुळे कपडे सात्त्विक बनणे
पूर्वीच्या काळी चरख्यावर हाताने सूत कातत असत. हे सूत नामधारकाने कातले असता त्या सुतावरही नामाचा संस्कार होत असे. नामजपाचा संस्कार झाल्यामुळे कपडे सात्त्विक बनायला साहाय्य होत असे.
इ. आधुनिक यंत्रांमुळे मनुष्यदेहातील रज-तमात्मक स्थानांची जागृती होणे
सांप्रतच्या युगात आलेली बहुतेक यंत्रे विजेवर चालणारी असतात. ही यंत्रे मोठ्या प्रमाणात मनुष्यदेहातील रज-तमात्मकरूपी स्थानांना जागृती देऊन वायूमंडलाला दूषित बनवण्यात मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहेत.
ई. कलियुगातील विज्ञानामुळे झालेल्या
यांत्रिक पद्धतीच्या जीवनाचे धोके टाळण्यासाठी नामजप अत्यावश्यक
आता कलियुगात सर्वच गोष्टी यांत्रिक पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून चालू असल्याने मानवाला महाभयंकर अशा वाईट शक्तींच्या रज-तमात्मक प्रकोपाला बळी पडावे लागत आहे. हे सर्व सुधारून परत पूर्वीचा सात्त्विक आचार समाजात रुजवणे फार अवघड आहे; म्हणूनच कलियुगात या सर्वांतून तरून जाण्यासाठी नामसाधना सांगितली आहे. यामुळे यांत्रिक पद्धतीने पार पडत असलेल्या कर्मातूनही अकर्म साधले जाऊन त्यातून उत्पन्न झालेल्या पापकारी रज-तमात्मक लहरींचे विघटन होऊन पुण्यप्राप्ती होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
(सूत्र ‘२’ यात सांगितल्याप्रमाणे हाताने सूत कातत असतांना नामजप केल्यामुळे कपडे सात्त्विक बनण्यास साहाय्य होते. येथे मर्यादित प्रमाणात यंत्राचा वापर केला गेल्यामुळे मुळातच काळी शक्ती निर्माण होण्याचे प्रमाण अल्प असते. आजकालच्या विजेवर चालणार्या यंत्रसामग्रीमुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार्या काळ्या शक्तीचा परिणाम नष्ट करण्यासाठी साहजिकच नामजपही मोठ्या प्रमाणावर आणि एकाग्रतेने करण्याची आवश्यकता असते.)