हिंदु राष्ट्र स्थापनेत कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव मध्ये सनातन संस्थेचे मार्गदर्शन

डावीकडून श्री. कमलेश कटारिया, श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज, पू. रमानंद गौडा, अधिवक्ता आलोक तिवारी आणि सूत्रसंचालन करतांना श्री. कार्तिक साळुंखे
डावीकडून श्री. कमलेश कटारिया, श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज, पू. रमानंद गौडा, अधिवक्ता आलोक तिवारी आणि सूत्रसंचालन करतांना श्री. कार्तिक साळुंखे

रामनाथी (फोंडा), २२ जून (वार्ता.) – सर्व धर्माभिमानी हिंदु राष्ट्र स्थापनेचे  धर्मयुद्ध लढत आहेत. त्यामुळे या कार्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर विविध अडचणी येत असतात. तरीही भगवंताच्या कृपेने या अडचणींवर मात करून आम्ही सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करतच रहाणार आहोत, असे मत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या शेवटच्या दिवशी व्यक्त केले.

पू. रमानंद गौडा

ते पुढे म्हणाले,

१. हे धर्मयुद्ध लढत असतांना विविध अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी साधना केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक बळ मिळते, तसेच आपल्या कार्यामागे भगवंताचे अधिष्ठान प्राप्त होते. त्यामुळे आपण आपले कार्य अधिक चांगले करू शकतो आणि नेहमी पुढे जात रहातो.

२. साधनेने आपल्या भोवती सूक्ष्म संरक्षण कवच निर्माण होते. त्यामुळे अनिष्ट शक्तींपासून आपले रक्षण होते.

३. प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.

४. सनातनच्या साधकांची भगवंतावर श्रद्धा असल्याने त्यांच्या मुखावर तेज असते. त्यामुळे त्यांचे अनिष्ट शक्तींपासूनही रक्षण होते.

 

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे !- चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

डावीकडून अधिवक्त्या अमिता सचदेवा, श्रीमती तान्या मनचंदा, निधेश गोयल, चेतन राजहंस आणि उद्बोधन करतांना आनंद जाखोटिया
डावीकडून अधिवक्त्या अमिता सचदेवा, श्रीमती तान्या मनचंदा, निधेश गोयल, चेतन राजहंस आणि उद्बोधन करतांना आनंद जाखोटिया
चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

रामनाथी – हिंदु धर्म दुराचाराला अधर्म मानतो. विश्वकल्याणाच्या भावनेने काम करणे हा धर्म आहे. योग्य कृतीलाच धर्म म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अन्यांना पिडा देणे हा अधर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील मुख्य अडचण ही आहे की, अभिव्यक्ती स्वतंत्र्य कि स्वैराचार ? हे नेमके निश्चित कोण निश्चित करणार ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कोणते ? याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे. यामध्ये डाव्या शक्ती आघाडीवर आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनावश्यक प्रसार करण्यात आला आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य साम्यवादी, डावे, नक्षलवादी आदी राष्ट्रविरोधी शक्तींच्या बाजूने झुकलेले आहे. राज्यघटनेतील कलम १९ (१ ए) नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; मात्र १९ (२) नुसार भारताच्या अखंडत्वाच्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रतिबंधही घालण्यात आला आहे. सद्यःस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोयीनुसार वापरले जात आहे. शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सूत्र उपस्थित केले जाते; मात्र अन्य धर्मियांच्या विषयी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले मूग गिळून गप्प रहातात, असे उद्गार सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी उपस्थितांना संबोधित करत होते.

Leave a Comment