रामनाथ देवस्थान – राष्ट्ररचना ही शास्त्रीय संकल्पना आहे. ती सत्यावर आधारित आहे. यामध्ये असत्याला स्थान नाही. ‘राष्ट्रनिर्माण’ हे सत्तेची लालसा बाळगणार्यांचे काम नाही. राष्ट्र निर्माणासाठी त्याग आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रती निष्ठा यांची आवश्यकता आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘आध्यात्मिक राष्ट्ररचने’चा सिद्धान्त मांडला आहे. हिंदु राष्ट्र अर्थात् रामराज्याप्रमाणे सात्त्विक समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने साधना करायला हवी. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी म्हटले आहे, ‘‘अनेक संतांकडे आणि आध्यात्मिक संस्थांकडे लाखो विदेशी साधना शिकण्यासाठी येतात. साधना शिकून ती आचरणात आणतात. त्यामुळे समुद्रकिनारे, मसाज पार्लर, बार इत्यादींची विज्ञापने करून रज-तमप्रधान पर्यटकांना आकृष्ट करण्याऐवजी रामसेतू, द्वारका, अयोध्या इत्यादींसह भारताचे आध्यात्मिक महत्त्व जगाला सांगितले, तर जाहिरातींवर एक रुपयाही खर्च न करता पर्यटकांच्या अनेक पटींनी अधिक संख्येने अध्यात्मातील जिज्ञासू भारतात येतील.’’
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल. हिंदु राष्ट्र निर्माणाच्या या ईश्वरी कार्यात आपल्याला आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे, याची जाणीव ठेवून आज नाही तर, आत्तापासून साधनेला आरंभ करूया, असे उद्गार सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.