ईश्वरप्राप्तीच्या विविध साधनामार्गांतील ज्ञानयोग हा एक मार्ग आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास आणि आचरण करून ईश्वरप्राप्ती करणे, ही ज्ञानयोग्याची साधना आहे. या योगमार्गाविषयी माहिती जाणून घेऊ.
१. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास म्हणजे ज्ञानयोग
हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या ऋषिमुनींनी हिंदु धर्माची महती, वैशिष्ट्ये आणि आचारधर्माचे नियम यांचे विस्तृत विवेचन केले आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने, स्मृति, ऋचा, रामायण, श्रीमद्भगवतगीता, दासबोध हे आपले प्रमुख धर्मग्रंथ आहेत. या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून ईश्वरप्राप्ती करणे, म्हणजे ज्ञानयोग या योगाची साधना आहे.
२. धर्माविषयीचे लिखाण ब्रह्माविषयी
असल्याने आपले धर्मग्रंथ काळावर मात करणारे असणे
धर्माविषयीचे लिखाण ब्रह्मासंबंधी असल्याने आणि ब्रह्म अनादि-अनंत असल्याने ते लिखाणही अनंत काळ टिकते. म्हणूनच आपले धर्मग्रंथ काळावर मात करणारे ठरले आहेत.
३. सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच
असल्याने त्याला ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य असणे
ज्ञानयोग हा ज्ञानशक्तीतील सगुणता, म्हणजेच शब्दबद्धतेच्या किंवा आकलनात्मक मायेच्या माध्यमातून ज्ञानशक्तीतील निर्गुणतेला प्रगट करतो. (शब्द ज्ञानाशी संबंधित आहेत. त्यांची स्वत:ची एक शक्ती असते. शब्दांना पहाणे सगुणाशी संबंधित, तर त्यांचे आकलन होणे हे निर्गुणाशी संबंधित आहे.) सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच असल्यामुळे त्याला निर्गुणतेकडे, म्हणजेच ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य झाले.
४. ‘ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या’, या उक्तीप्रमाणे
‘मायेतील सत्य बोलणे’, ही देखील कलियुगात साधना असणे
‘ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या’, या आद्य शंकराचार्यांच्या मार्गदर्शक उक्तीप्रमाणे केवळ ब्रह्मच सत्य आहे आणि शेष सर्व माया आहे. मायेवर आधारित जीवन जगतांना ज्ञानयोगानुसार कलियुगातील जीव सातत्याने असत्याचा आधार घेऊन सुख-प्राप्तीसाठी धडपडत असतात. अशा परिस्थितीत जगाचा विरोध पत्करून मायेतील सत्य घटनेचे अथवा विचारांचे कथन करण्यासाठी मोठे धारिष्ट्य लागते. जो मायेतील सत्य बोलण्यास कचरत नाही, तोच पुढे अध्यात्मातील परमसत्याचा प्रसार जगभर करण्यास पात्र ठरतो. यानुसार ज्ञानयोगाप्रमाणे कलियुगात ‘मायेतील सत्य बोलणे’ ही देखील साधनाच आहे.
५. ज्ञानयोग : अध्यात्माचे मर्म
‘अध्यात्म’ हे ज्ञानयोगाचे मर्म आहे.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’
६. ज्ञानयोग : सुखदुःखाची कारणे
ज्ञानयोगात सुख-दुःख असे काही नाही, सर्व ब्रह्मच आहे.
७. ज्ञानयोग यामध्ये सात्त्विक बुद्धी आवश्यक
असल्याने कलियुगात या मार्गाने साधना करणे कठीण असणे
या मार्गाने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मानवाची बुद्धी अतिशय सात्त्विक असावी लागते. अशी सात्त्विक बुद्धी सत्ययुगातील मानवाची होती; कारण सर्वजण ‘सोहं’ भावात असत. कलियुगातील मानवाची सात्त्विकता अल्प (कमी) असल्याने या मार्गाने साधना करणे कठीण आहे.