कौल मिळणे, याला असत्य
ठरवून देवाचा अपमान करणारे नास्तिक !

कौल मिळण्याची सत्यासत्यता अवलंबून असणारे घटक
लक्षात न घेता त्याला थोतांड म्हणणारे नास्तिक !

‘कौल देणारी जागृत देवी एका प्राध्यापिकेची’ या लेखाच्या लेखकाने कौलाचे अनेक प्रकार पाहिले. तुळजापूरचा कौल देणारा दगड, ज्वारीच्या राशीवर गिरकी घेणारा पाण्याने भरलेला तांब्या, नागपूरमधील पळसाच्या काडीभोवती गुंडाळलेल्या रेशमी वस्त्राचे पडणे, कोकणातील तेलकट भिंतीवर कौलासाठी चिकटवलेले नाणे इत्यादी. त्यावरून ते म्हणतात,

टीका

‘कौल घेणे’ या प्रकारात जर काही तथ्य खरोखरच असते, तर कितीही वेळा कौल लावला, तरी ‘हो’ किंवा ‘नाही’ असं एकच उत्तर यायला हवे होते. प्रत्येक वेळी कौलात एकवाक्यता नव्हती. पिढ्यान्-पिढ्या या रूढी डोळे झाकून अगदी उच्च शिक्षितही पुढे रेटतच आहेत.’ (दैनिक ‘गोमन्तक’, ६.१०.२००२)

खंडण

कौल घेतांना देवतेकडून येणारे उत्तर हे त्या देवस्थानाचे भाविकांनी टिकवलेले पावित्र्य, कौल लावणार्‍या पुजार्‍याची सात्त्विकता, प्रश्न विचारणार्‍या भाविकाचा भक्तीभाव इत्यादींवर अवलंबून असते. हे सर्व कार्य चैतन्याने होते. चैतन्याविना कार्य केल्यास त्यात अर्थ रहात नाही; म्हणून ज्यांची श्रद्धा नाही, त्यांना ते प्रत्ययास येणार नाही. यामुळेच लेखकाला कौलात एकवाक्यता दिसली नाही.

कौल लावण्यात तथ्य आहे, म्हणूनच आजही अनेक भाविक डोळे मिटून कौल लावतात आणि देवाकडून उत्तरे मिळवतात. त्यामध्ये कोणीही अश्रद्धेने विज्ञान शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणूनच ही अंधश्रद्धा नव्हे. उलट लेखकासारखे नास्तिकच त्याकडे अश्रद्धेने बघतात. अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राप्रमाणे इथेही प्रयोगाची यशस्विता त्याच्यातील प्रत्येक घटकाच्या प्रमाणावर, म्हणजे पावित्र्य, सात्त्विकता, भक्तीभाव इत्यादींवर अवलंबून असते. केवळ आपले तेच खरे मानून स्वतःचे घोडे पुढे दामटणार्‍यांना काय म्हणायचे ?

(म्हणे) ‘भीतीमुळे आयुष्यातले अनेक महत्त्वाचे निर्णय
घेण्याकरता कौल लावण्यासाठी देवाकडे धाव घेतली जाते !’

टीका

‘भविष्यातील संकटे किंवा संभाव्य वाईट परिणाम यांच्या भीतीमुळे आयुष्यातले अनेक महत्त्वाचे निर्णय स्वबुद्धीने घेण्याचे धाडस तो करू शकत नाही आणि मग तो कौल लावण्यासाठी देवाकडे धाव घेतो.’ (दैनिक ‘गोमन्तक’, ६.१०.२००२);

खंडण

वरील वक्तव्य करून लेखक केवळ कौल लावणार्‍या भाविकांचाच नव्हे, तर समस्त श्रद्धाळूंच्या ईश्वराविषयीच्या श्रद्धेचा आणि ईश्वराचाही अवमान करत आहे. भविष्यातील संकटे किंवा संभाव्य वाईट परिणाम यांच्यावर मात करण्यासाठीच ईश्वरावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. भगवंताला साक्षी ठेवून तो जो निर्णय देईल, तो मान्य करणे, हा भक्तीभावाचा भाग आहे. त्यामध्ये त्याग आहे, ईश्वरेच्छेने वागणे आहे, हे अश्रद्धाळूंना कळणे अशक्य आहे.

Leave a Comment