देवाला बघण्यासाठी आणि त्याचे कार्य जाणून घेण्यासाठी
‘अंनिस’च्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी साधना करावी !
अंनिस’चे डॉ. दाभोलकर म्हणतात,
`देवाला स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही' !
टीका
‘देवाला स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही !’ – ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’ ५.३.२०१२, पृष्ठ १)
खंडण
डॉ. दाभोलकर यांनी देवाला पाहिलेले नाही आणि जाणलेलेही नाही. त्यामुळे देवाच्या धोतर नेसण्याच्या क्षमतेविषयी त्यांना काहीही ठाऊक असणे शक्य नाही.
देव अशरीरी असतात. त्यांना वस्त्रे लागत नाहीत. जेव्हा एखाद्या मानवासमोर ते प्रकट होतात, तेव्हा मानवाला मर्यादापालन शिकवण्यासाठी ते वस्त्रासहित दिसतात.
डॉ. दाभोलकर यांना कदाचित् मूर्तीविषयी म्हणायचे असेल. तेव्हा आता यावर विचार करू.
एक अंकगणिताचे पुस्तक असते. त्या पुस्तकाला ‘२ ± २ · ४’ अशी साधी बेरीजही करता येत नाही, सांगता येत नाही किंवा लिहिता येत नाही; पण अशाच पुस्तकांमधून मनुष्य ज्ञान प्राप्त करून अगदी पहिल्या इयत्तेपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत जाऊन गणिततज्ञ होऊ शकतो. मूर्तींचेही तसेच आणि त्याहून अधिक महत्त्व असते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर तिच्यात ईश्वरी चैतन्याचा अंश वास करू लागतो. आपल्यातील भक्तीभावाने त्या मूर्तीच्या माध्यमातून चैतन्य प्राप्त करून अनेकांनी; स्वतःचा उद्धार करून घेतला आहे.
विज्ञान प्रतिदिन नवनवीन शोध लावते. त्यामुळे आधीच्या कल्पना अपूर्ण किंवा चुकीच्या ठरतात. ईश्वरी चैतन्य सूक्ष्मातीसूक्ष्म आहे. त्याला विज्ञानाच्या आधारावर अनुभवाच्या कक्षेत आणणे अजून जमलेले नाही; पण ‘म्हणजे ते नाहीच’, असे म्हणणे अयोग्य आहे. उदाहरणार्थ, सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध लागेपर्यंत सूक्ष्म जिवाणूंचे अस्तित्व ठाऊक नव्हते. दुधाचे दही सूक्ष्म जिवाणूंमुळे बनते, हेही ठाऊक नव्हते; पण आधी ठाऊक नव्हते म्हणून सूक्ष्म जिवाणू तेव्हा नव्हतेच, असे नाही.
विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी ते साध्या डोळ्यांनी सूक्ष्म जिवाणूंना दाखवू शकत नाही. सूक्ष्म जिवाणू बघण्यास जसे ‘सूक्ष्मदर्शक यंत्र’ हे साधन लागतेच लागते, तसे सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म अशा ईश्वरी चैतन्याचा अनुभव येण्यास, त्याचा साक्षात्कार होण्यास, काही साधने लागतातच. पूर्ण निर्दोष स्वभाव आणि आचरण, निरिच्छता, दृढ श्रद्धा, अचल भक्ती, संपूर्ण शरणागती, ईश्वरप्राप्तीची तळमळ इत्यादी साधनसंपत्तीमुळे प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवांना दिसत असे, त्यांच्याशी बोलत असे. अशी साधनसंपत्ती जेव्हा डॉ. दाभोलकर प्राप्त करतील, तेव्हा त्यांनाही देव स्वतःचे धोतर स्वतः नेसतांना दिसेल, म्हणजे देवाचे सूक्ष्मातील कार्य दिसेल !’