
पुणे, २५ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त भारतभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून पुणे येथे २८ मे या दिवशी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन केले आहे. या दिंडीच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी येथील गांजवे चौकातील पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
समष्टीच्या शुद्धीकरणासाठीच सनातन संस्थेचे कार्य चालू ! – विद्याधर नारगोलकर

या वेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री आणि पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे, प्रा. श्री. विठ्ठल जाधव आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. याचा संदेश सर्वत्र जावा, यासाठी दिंडीचा हा अभूतपूर्व कार्यक्रम असेल. हिंदूंनी भयावह परिस्थितीमध्ये काय करावे ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते. हे एक प्रकारे समष्टीचे शुद्धीकरणाचेच कार्य चालू आहे. हे कार्य आपले आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही’, हे लक्षात घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विद्याधर नारगोलकर यांनी या वेळी केले.
पुणे येथे २८ मे या दिवशी हिंदु एकता दिंडी !

दिंडीचा उद्देश स्पष्ट करतांना धर्माधििष्ठत हिंदु राष्ट्राची स्थापना का आवश्यक आहे ? हे सांगताना हिंदू हित साधण्यासाठी, हिंदु समाजाचे संघटन होण्यासाठी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. ही दिंडी म्हणजे हिंदुत्वाचा आविष्कार असून यामध्ये सामाजिक, आध्यात्मिक आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणार्या समविचारी संघटना सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अबला नाही, तर रणरागिणी व्हा ! – कु. क्रांती पेटकर
आज धर्मासाठी हिंदूंनी रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदुत्वाचे दर्शन होण्यासाठी, धर्माधिष्ठित राष्ट्रव्यवस्था निर्माण होण्यासाठी, सर्वांना संघटित करण्यासाठी आणि हिंदुत्वाचा आविष्कार दाखवण्यासाठी ही दिंडी असेल. हिंदूंना संघटित करून जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यामध्ये विविध पथकेही सहभागी होणार असून रणरागिणी शाखेचेही एक विशेष पथक असेल. त्यामुळे महिलांनी आता अबला नाही, तर रणरागिणी व्हा असा संदेश कु. क्रांती पेटकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला.