सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित हिंदू एकता दिंडी
२० संघटनांचे १ सहस्राहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी !

मुंबई, २१ मे (वार्ता.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने २१ मे या दिवशी दादर येथे काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीमध्ये २० संघटनांचे १ सहस्राहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. आपत्कालाच्या दृष्टीने स्वरक्षण, प्रथमोपचार पथक, युवकांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण करणार्या राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेतील युवकांचा सहभाग, महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा जपणार्या वारकर्यांचा ‘विठ्ठल’नामाचा जयघोष, विविध प्रांतांतील वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक अशा विविध अंगांनी दिंडीमध्ये हिंदु संस्कृतीचे, तर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् संप्रदाय यांच्या सहभागामुळे हिंदूंच्या संघटित शक्तीचे दर्शन घडले. संतांची वंदनीय उपस्थिती आणि हिंदु राष्ट्राचा जयघोष यांमुळे एकाचवेळी भावपूर्ण अन् उत्साहपूर्ण वातावरणाचा लाभ दिंडीतून घेता आला.

या दिंडीवर मुंबईकरांनी पुष्पवर्षाव केला. ग्रामदेवता मुंबादेवी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या दिंडीमधील पालख्यांतील प्रतिमांचे सुवासिनींनी औक्षण केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव निमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. दादर येथील कबूतरखाना येथून सायंकाळी ६ वाजता या दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीमध्ये आरंभी शंखनाद आणि त्यानंतर जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि श्री मुंबादेवी यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. विघ्नहर्ता श्री गणेशाच्या श्लोकाचे पठण करण्यात आले. धर्मध्वजाचे पूजन मेढे वसई येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला यांनी केले. पुरोहित चैतन्य दीक्षित यांनी या वेळी पूजा सांगितली. दादर येथील राज मरुधर जैन संघाचे सचिव श्री. महावीर लोढा यांनी धर्मध्वजासमोर श्रीफळ वाढवले. शिवाजी पार्क येथे दिंडीचे सभेत रूपांतर झाले. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पालखीचे पूजन
फुलांनी सजवलेल्या पालखीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन सनातन प्रभातचे वाचक श्री. नवनीत बाणे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमिता बाणे यांनी केले. दुसर्या पालखीतील श्री मुंबादेवीच्या प्रतिमेचे पूजन हिंदी भाषिक जनता परिषदेचे उपाध्यक्ष आणि दावडी डोंबिवली पूर्व येथील श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री. हरिशंकर पांडेय यांनी केले. यानंतर स्फूर्तीप्रद घोषणांनी दिंडीला प्रारंभ झाला.
मुंबई येथील दिंडीत झाला हिंदुत्वाचा जागर !

वंदनीय उपस्थिती
भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला, सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव
मुंबई – हिंदु एकता दिंडीत हिंदुत्वनिष्ठ आणि विविध सांप्रदाय यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हिंदु राष्ट्राचा विचार संपूर्ण भारतभरात पोचवा ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांच्या हातामध्ये भारताची सत्ता गेली, त्यांना हिंदु संस्कृतीविषयी आस्था नव्हती. आज प्रत्येकाने हिंदु राष्ट्रासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आज हिंदु राष्ट्रासाठी आवाज उठवला नाही, तर पुढची पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. हिंदु राष्ट्रासाठी आज एकत्र आलो नाही, तर पुन्हा पाकिस्तान प्रमाणे देशाचा दुसरा तुकडा पडेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातूनच हिंदु राष्ट्रासाठी आवाज उठवला होता. त्याच प्रमाणे त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातून हिंदु राष्ट्राचा विचार संपूर्ण भारतभरात पोचवा.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य दैवी ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९७ मध्ये प्रथम हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार मांडला. भारतातील सहस्रावधी हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांनी प्रेरित केले. ३५० हून अधिक ग्रंथांचे लिखाण करून त्यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करून त्यांनी हिंदूंना धर्मावरील आघातांविषयी जागरूक केले. एकाच वेळी विविध स्तरांवरील त्यांचे कार्य दैवी आहे.
‘द केरल स्टोरी’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती
जेव्हा मुसलमान अल्पसंख्य असतात, तेव्हा ‘द केरल स्टोरी’ घडते आणि बहुसंख्य असतात, तेव्हा ‘द कश्मीर फाईल्स’ होते, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे. भारतात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांचे धर्मांतर होते. हिंदु युवती लव्ह जिहादला बळी पडते. हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव हेच याचे कारण आहे. ‘द केरल स्टोरी’ची पुनरावृती टाळण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घ्यावे !
दिंडीची वैशिष्ट्यपूर्ण रचना !
दिंडीच्या अग्रस्थानी भगवा धर्मध्वज होता. ग्रामदेवता श्री मुंबादेवी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पालख्या खांद्यावर घेतल्या होत्या. मंगलमय वाद्यांचा गजर आणि त्यामागे वीरश्री निर्माण करणारी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यांचे सादरीकरण झाले. धर्मकार्यात कायदेशीर साहाय्य पुरवणारे अधिवक्त्यांचे पथक आणि आपत्काळात संजीवनी ठरणारे प्रथमोपचार पथक, विठुमाऊलीच्या नामात तल्लीन झालेले वारकरी, पारंपरिक वेशातील स्त्रियांची नृत्ये, राष्ट्रपुरुषांच्या वेशातील बालपथक आदी लक्षवेधी ठरले. लयबद्ध नृत्य करणारे लेझीम पथक, श्रीकृष्णभक्तीत तल्लीन गोपिकांचे पथक, रामराज्याचे स्मरण करून देणारी चारचाकीवरील श्रीरामाची भव्य प्रतिमा, सनातनच्या अनमोल ग्रंथसंपदेचे प्रदर्शन, लाठीकाठी धारण केलेले हिंदु जनजागृती समितीचे स्वरक्षण पथक अशी दिंडीची रचना होती.
दिंडीच्या वृत्तसंकलनासाठी आलेल्या वृत्तवाहिन्या
सुदर्शन न्यूज, भारत २४, इंडिया टी.व्ही., टी.व्ही. ९ मराठी, ए.बी.पी. न्यूज, टाईम्स नाऊ, नवभारत
सहभागी संघटना !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान; श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी; बजरंग दल; विश्व हिंदु परिषद; रा. स्व. संघ; परशुराम तपोवन आश्रम, वसई; हिंदी भाषिक जनता परिषद, इस्कॉन मंदिर; राष्ट्रीय वारकरी परिषद; वारकरी संप्रदाय; श्री योग वेदांत सेवा समिती; व्यापारी संघ, दादर; धर्मजागरण मंच; वज्रदल; हिंदु गोवंश रक्षा समिती; स्वधर्म फाऊंडेशन; हरि ओम् नेपाळी समाज; नेपाळी विश्वकर्मा समाज; नेपाळी जन कल्याण इत्यादी संघटना आणि संप्रदाय यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते तसेच भाजपचे कार्यकर्ते.
क्षणचित्रे
१. दिंडीमार्गात रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबून दिंडी पहात होते. दिंडीतील पालख्यांना भावपूर्ण नमस्कार करत होते.
२. अनेक नागरिक भ्रमणभाष संचातून दिंडीचे चित्रीकरण करत होते. अनेकांनी दिंडीसोबत ‘सेल्फी’ घेतले.
३. श्री स्वामी समर्थ मठ दादर यांच्या वतीने दिंडीतील दोन्ही पालख्यांचे पूजन करण्यात आले.
४. दादर येथील बालाजी सोसायटीमधील महिला दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.