उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रे’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ अंतर्गत उपक्रम

उज्जैन (मध्यप्रदेश) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत महाकालनगरी उज्जैन येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. या शोभायात्रेत ३ चित्ररथ स्थानिकांचे लक्ष वेधून घेत होते. त्या माध्यमातून हिंदु राष्ट्र, क्रांतीकारकांचा गौरवशाली इतिहास आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठीचे उपाय याविषयीचा संदेश देण्यात आला.

उज्जैन येथील एका मार्गावरून जात असतांना शोभायात्रा

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता भानू प्रतापसिंह पवार यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत् पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या जयघोषामध्ये टॉवर चौक येथे शोभायात्रेचे जागृती सभेमध्ये रूपांतर झाले. याप्रसंगी भारत रक्षा मंचचे मध्य भारत संघटन मंत्री श्री. शैलेंद्र सेठ, दबंग हिंदु सेनेचे सहसंस्थापक श्री. ललित परमार, भारत रक्षा मंचचे प्रांतीय अध्यक्ष श्री. अरविंद जैन, राष्ट्रसेविका समितीच्या महिला विभागाच्या समन्वयक सौ. राजश्री जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी शोभायात्रा सांगतेच्या वेळी संबोधित केले.

सहभागी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर

या शोभायात्रेत दबंग हिंदु सेनेचे संस्थापक श्री. लोकेश शर्मा, श्री. मनीष चौहान, भारत रक्षा मंचचे युवा संघटक श्री. कपिल गौर, जिल्हा मंत्री श्री. विजय जोशी, महाराष्ट्र समाजाचे श्री. पंकज चांदोरकर, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम काणे आदी अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

शोभायात्रेच्या सांगतेच्या वेळी उद्बोधन करतांना राष्ट्रसेविका समितीच्या महिला विभागाच्या समन्वयक सौ. राजश्री जोशी

मान्यवरांनी केलेले उद्बोधन

१. श्री. अरविंद जैन, प्रांतीय अध्यक्ष, भारत रक्षा मंच

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१२ मध्ये ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे सांगितले होते. आज त्यांची वाणी खरी होतांना दिसत आहे.

२. सौ. राजश्री जोशी, महिला विभाग समन्वयक, राष्ट्रसेविका समिती

भारत हे नैसर्गिकरित्या हिंदु राष्ट्र आहे; पण आता ते घटनात्मकदृष्ट्या घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

३. श्री. आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

उज्जैनसारख्या प्राचीन शहरात होणारी ही हिंदू एकता मिरवणूक, म्हणजे एक प्रकारे देशाच्या आध्यात्मिक नगरीतून हिंदु राष्ट्राचा जयघोषच आहे.

शोभायात्रेत सहभागी झालेले धर्मप्रेमी

क्षणचित्रे

१. देवीचा एक भक्त ढोल वाजवत रस्त्याने जात होता. त्याने या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो शोभायात्रा संपेपर्यंत ढोल वाजवत होता.

२. या शोभायात्रेमध्ये भगव्या रंगाच्या ध्वजासह लव्ह जिहाद, देवतांचा अवमान, देशविरोधी हलाल प्रमाणपत्र, गोहत्या, मंदिर सरकारीकरण आदी विविध समस्यांविषयी जनजागृती करणारे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

३. तरुण-तरुणींचा गट मोठ्या उत्साहात घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Leave a Comment