जिवंतपणा जाणवणारे आणि चैतन्याची अनुभूती देणारे नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान !

Article also available in :

अनुक्रमणिका

रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून वाहनाने २ घंट्यांच्या (साधारण १०० कि.मी.) अंतरावर शिवकालीन ऐतिहासिक महत्त्व असलेले ‘नागोठणे’ नावाचे गाव आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्म आजपासून ८१ वर्षांपूर्वी वैशाख कृष्ण सप्तमी या दिवशी येथील वर्तक वाड्यात झाला. त्यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन नागोठणे ग्रामपंचायतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानासमोरील मार्गाचे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’, असे नामकरण केले आहे. त्या निमित्ताने या स्थानाचे अलौकिक महत्त्व कथन करतांना पुष्कळ आनंद होत आहे !

नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्यमय जन्मस्थान आणि त्यासमोरील मार्ग

नागोठणे शहराचे ऐतिहासिक महत्त्व !

सौ. रुपाली वर्तक

नागोठणे या गावापासून काही अंतरावर छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड आहे. पूर्वी या गावात छत्रपती शिवरायांची टांकसाळ (नाणी निर्माण करण्याचा कारखाना) होती. या गावात अनेक तळी आहेत. त्यामुळे येथे छत्रपतींच्या सैन्यातील घोड्यांचे तबेले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाच्या जवळच ऐतिहासिक श्रृंगार तळे आहे. ‘येथे त्या काळात हत्तींचा श्रृंगार केला जात असे’, असे सांगितले जाते. जन्मस्थानाच्या शेजारी ‘आंगर आळी’ नावाची आळी आहे. ‘कान्होजी आंग्रे पूर्वी येथे येत असत’, असे म्हटले जाते. ‘आंग्रे’ नावाचा अपभ्रंश होऊन या आळीचे नाव आता ‘आंगर आळी’ असे पडले आहे.

श्रृंगार तळे

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नागोठणे येथील जन्मस्थानी भेट दिल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी व्यक्त केलेला भाव !

नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाला भावपूर्ण वंदन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी २.२.२०२३ या दिवशी त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चरणकमल लागले आणि त्या वास्तूतील चैतन्य अधिकच वाढले !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाविषयीचा भाव

जन्मस्थानाच्या वास्तूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अत्यंत भावपूर्ण वंदन केले. संपूर्ण वास्तू आणि वास्तूच्या आजूबाजूचा परिसर पहातांना त्याविषयी त्या अतिशय जिज्ञासेने अन् बारकाईने जाणून घेत होत्या. वास्तूचे दर्शन घेतांना त्या म्हणाल्या, ‘‘येथे सगळीकडे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व भरभरून जाणवत आहे. सगळीकडे त्यांची स्पंदने आहेत. येथील माती, पाणी, हवा सारेच निराळे आहे. पुष्कळ सात्त्विक आहे. त्या सर्वांना एक वेगळाच गंध आहे. या सर्वांचे सूक्ष्म परीक्षण करूया.’’ यापुढे या वास्तूच्या रूपाने संपूर्ण विश्वाला ‘अवताराचे जन्मस्थान’ म्हणून एक अनमोल ठेवा मिळणार आहे.

 

२. वास्तूची गेली अनेक वर्षे देखरेख करणारे कै. विजय वर्तक यांच्याविषयी कृतज्ञताभाव !

कै. विजय (नाना) वर्तक

जन्मस्थानाच्या वास्तूमध्ये पूर्वी आलेले संत, तसेच या वास्तूचा सांभाळ करणारे कै. विजय (नाना) वर्तक (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मामेभाऊ. मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६५ टक्के होती.) यांच्याविषयी ऐकत असतांना त्यांच्या मुखकमलावर अतिशय कृतज्ञतेचे भाव उमटत होते. या वास्तूची चांगल्या प्रकारे देखरेख करणे महत्त्वाचे होते. ही वास्तू आणि त्या भोवतालचा परिसर मोठा असल्याने तो सांभाळणे सोपे नाही. या संदर्भात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘नाना असल्यामुळे या वास्तूचा सांभाळ करण्यासाठी आपल्याला आतापर्यंत काहीच करावे लागले नाही. ना तुम्हाला (मुलगा श्री. अभय आणि सून सौ. रूपाली वर्तक यांना) ना सनातन संस्थेला ! त्यांनी सर्व एकट्याने सांभाळले. त्या माध्यमातून त्यांची साधना झाली.’’

– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड.(१०.५.२०२३)

 

३. नागोठणे गाव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान येथे साधक अन् समाजातील व्यक्ती यांना आलेल्या अनुभूती

२५ वर्षांपूर्वी नागोठणे स्थानकावर उतरल्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात सात्त्विकतेची स्पंदने जाणवत असत. आता लोकवस्ती वाढल्याने ती तेवढ्या अधिक प्रमाणात जाणवत नाहीत, तरीही अन्य गावांच्या तुलनेत नागोठणे येथे आल्यावर चांगले वाटते.

१. सनातनचे ६१ वे संत पू. अनंत पाटील (तात्या) हे जन्मस्थानाच्या वास्तूत अनेक वर्षे नियमित येऊन नामजप करत. ‘पू. पाटीलतात्या यांनी या वास्तूचा लाभ करून घेतला’, असे उद्गार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. तात्या संत झाल्यावर काढले होते.

२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी येतांना नागोठणे गाव जवळ आल्यावर माझा नामजप चालू झाला’, असे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. तुकाराम (बापू) लोंढे यांनी सांगितले.

३. फोंडा, गोवा येथील साधिका कु. वैदेही शिंदे तिच्या नातेवाइकांसमवेत नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी आली असता तिचा भाव पुष्कळ प्रमाणात जागृत झाला.

४. ‘मला कितीही त्रास झाला, तरी येथे आल्यावर माझा सगळा त्रास निघून जातो आणि मला पुष्कळ चांगले वाटते. येथे माझी कष्टाची कामे असूनही माझा सगळा थकवा येथे आल्यावर जातो’, असे आमच्याकडे केर काढणे, लादी पुसणे आदी सेवा करणार्‍या श्रीमती शोभाताई नेहमी सांगतात.

 

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा जाणवलेला उच्च भाव !

श्री. अभय विजय वर्तक

‘१. आम्ही सर्व साधक देवद आश्रमातून नागोठणे येथे जाण्यास निघालो, तेव्हापासूनच श्रीसत्‌शक्ति बिंदाताई यांच्या मुखावर गुरुदेवांच्या जन्मस्थानी जाण्याविषयी अत्युच्च भाव जाणवत होता. ‘त्यांचे डोळे अधिकाधिक पाणीदार होत आहेत’, असे जाणवत होते.

२. नागोठणे येथे जन्मस्थानी पोचल्यावर श्रीसत्‌शक्ति बिंदाताई त्या वास्तूला हळूवार आणि भावपूर्ण स्पर्श करत होत्या. जणू ‘ती वास्तू म्हणजे गुरुदेवांचे सगुण रूप आहे’, अशा प्रकारे त्या स्पर्श करत आहेत’, असे जाणवत होते.

३. माझे वडील कै. नाना वर्तक यांच्याकडे अनेक कामगार येत असत. त्यांच्याशीही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी संवाद साधला. नानांच्या संपर्कातील श्री. राजा सोष्टे हे सनातनशी विशेष जोडलेले नाहीत. तरीही ते नियमित या वास्तूच्या दर्शनासाठी येतात. त्यांचीही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याशी भेट झाली. ‘श्री. राजा सोष्टे यांच्याकडे पाहून पुष्कळ चांगले वाटते’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या.

‘गुरुदेवांच्या जन्मस्थानाची वास्तू काळाच्या ओघामध्ये जीर्ण झाल्यामुळे ती उत्तम पद्धतीने संवर्धन करण्यासाठी काय करायचे’, याचाही त्या अभ्यास करत होत्या. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी या भेटीच्या माध्यमातून आम्हाला पुष्कळ आनंद दिला.’

– श्री. अभय विजय वर्तक, सनातन संस्था. (१०.५.२०२३)

 

५. नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी झालेले बुद्धीअगम्य पालट

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाच्या खोलीतील लाद्यांचा (फरशांचा) पिवळा रंग न्यून होत जाऊन पांढरा रंग पुष्कळ अधिक प्रमाणात वाढला आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाच्या वास्तूतील आणि देवघरातील देवतांच्या चित्रांचे रंगही फिकट झाले आहेत. ‘ती चित्रे निर्गुण स्तरावर गेली आहेत’, असे जाणवते.

– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झाला, त्या खोलीत रामनाथी आश्रमाएवढे चैतन्य आहे ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झाला, ती चैतन्यमय खोली

काही वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अन्य एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही नागोठणे येथे आल्या होत्या. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झाला, त्या खोलीत सनातनच्या ‘रामनाथी आश्रमाएवढे चैतन्य आहे’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी म्हटले होते. ‘ही वास्तू श्री. नाना वर्तक यांनी सांभाळल्यामुळे त्यांच्याविषयी सतत कृतज्ञता वाटली पाहिजे’, असेही त्या म्हणाल्या होत्या. – सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)

 

७. सौ. रूपाली अभय वर्तक यांना आलेल्या अनुभूती

अ. नागोठणे येथील घरी जाण्याविषयी ओढ वाटणे

सौ. रुपाली वर्तक

नागोठणे येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म झालेल्या घरात सून म्हणून जाण्याचे महत् भाग्य मला लाभले. विवाहानंतर पहिली दहा वर्षे तिथे अधिक वेळा जाण्याचा योग आला नाही; पण जेव्हा जेव्हा जाण्याचा प्रसंग येई, तेव्हा ‘तिथे जाण्याची एक ओढ वाटत असे’ असे आता लक्षात येते. ‘ती ओढ तेथील सात्त्विक वातावरणामुळे होती’, असे वाटते. प्रत्यक्षात येथे शहरातील घराप्रमाणे आधुनिक सुविधा नसूनही ‘नागोठणे येथे यायला नको’, असे कधी वाटले नाही. यामागेही या वास्तूतील चैतन्यच कारणीभूत आहे !

आ. कितीही कष्ट केले, तरी शारीरिक त्रास न होणे

वर्ष २०१४ नंतर वर्षातून ३-४ वेळा ३-४ दिवसांकरता या पवित्र वास्तूत रहाण्याचे आणि तिला अनुभवण्याचे भाग्य लाभले. गेल्या २ वर्षांत वेगवेगळ्या कारणांनी अनेक दिवस येथे वास्तव्य करता आले. ‘येथे दिवसभर कितीही कष्ट केले, तरी शारीरिक त्रास होत नाही’, हे मी नेहमी अनुभवते. येथे ‘कधी आजारी पडले’, तरी अतिशय अल्प कालावधीत प्रकृती सुधारते.

इ. वास्तूतील जिवंतपणा आणि चैतन्याची अनुभूती !

या वास्तूत एक प्रकारचा जिवंतपणा आहे. ‘येथील कणाकणात पुष्कळ चैतन्य ठासून भरले आहे’, असे अनुभवता येते. येथे काही वेळा आनंदाची स्पंदनेही जाणवतात आणि त्यामुळे प्रसन्न वाटते.

ई. फुलांनीही जाणले जन्मस्थानाचे चैतन्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानाच्या खोलीतील छायाचित्राला वाहिलेले फूल दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत ताजे दिसते. ‘जणू काही आताच वाहिले आहे’, एवढे ते ताजे असते ! ही अनुभूतीही मी अनेक वर्षे घेत आले आहे.

उ. वास्तूतील चैतन्यामुळे स्वयंपाकाला येते अवीट गोडी !

‘या वास्तूत केलेल्या स्वयंपाकालाही अवीट गोडी आहे’, असे बर्‍याचदा जाणवते. अनेकदा साधक, नातेवाईक पदार्थ पुष्कळ चांगला झाल्याचे सांगतात. ‘याचेही कारण येथील चैतन्यातच दडलेले आहे’, हे प्रकर्षाने लक्षात येते.

हे भगवंता, ‘या वास्तूचा आध्यात्मिक लाभ करून घेण्यासाठी मी नेहमी अल्प पडते. येथील चैतन्यात डुंबता येण्यासाठी तूच माझ्याकडून भावाच्या स्तरावरील प्रयत्न सातत्याने करून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)

 

८. जन्मस्थानाच्या परसबागेची वैशिष्ट्ये !

या वास्तूच्या परिसरातील बाग म्हणजे चैतन्याची खाणच आहे. या वास्तूच्या भोवताली असलेल्या परिसरात माझे सासरे श्री. विजय (नाना) वर्तक (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मामेभाऊ) यांनी बरीच झाडे लावली होती आणि त्यांपैकी काही झाडे आताही आहेत. अन्य ठिकाणची झाडे आणि जन्मस्थानाच्या परसबागेतील झाडे यांच्यामधील भेद उघड्या डोळ्यांनीही लगेच लक्षात येतो. नाना अतिशय प्रेमाने या झाडांचा सांभाळ करत. ते दिवसभर या बागेमध्ये नामजप करत सेवा करत.

१. बाहेरच्या काही झाडांची फुले, पाने छोट्या आकाराची, कृश किंवा फिकट रंगाची असतात. ‘जन्मस्थानीच्या परसबागेत त्याच जातीच्या झाडांची फुले, पाने अतिशय टवटवीत, अधिक सुंदर, अधिक तेजस्वी आणि अधिक मोठ्या आकाराची असतात’, हे मी अनेक वर्षे सातत्याने अनुभवत आले आहे.

२. येथील शोभेच्या झाडांकडे पाहूनही चांगले वाटते. इतर ठिकाणच्या तुलनेत जन्मस्थानाच्या परसबागेत नवीन झाडे उगवणे आणि ती टिकून रहाणे, याचे प्रमाणही अधिक आहे.

३. येथील सर्वच झाडे बाहेरच्या तुलनेत अधिक सशक्त वाटतात.’

– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)

 

९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मस्थळाच्या वास्तूविषयी समाजातील व्यक्तींना वाटणारी आपुलकी !

श्री. राजा सोष्टे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आल्या असतांना पूर्वी नानांकडे नियमित येणारे आणि त्यांची आपुलकीने काळजी घेणारे गावातील काही जणही आले होते. (नानांकडे गावातील लोकांचा नियमित राबता असल्याने आम्हीही (मी आणि माझे पती) निर्धास्त असायचो.) त्यांपैकी एक श्री. राजा सोष्टे यांच्याकडे काही बांधकाम व्यावसायिक नेहमी जन्मस्थळाच्या जागेविषयी चौकशी करत; परंतु हा विषय नानांपर्यंत अधिक येऊ न देता ते परस्पर व्यावसायिकांना सांगत, ‘‘ही वास्तू बांधकाम व्यावसायिकांना द्यायची नाही. येथे पुढे आश्रम होणार आहे.’’

हा प्रसंग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘या सर्वांनी नानांना सांभाळले आणि नानांनी वास्तूला सांभाळले !’’ नानांचे निधन होऊन ५ मास झाले, तरी अजूनही श्री. सोष्टे हे प्रतिदिन संध्याकाळी वास्तूचे दर्शन घेण्यासाठी येतात.’

– सौ. रूपाली अभय वर्तक, नागोठणे, जिल्हा रायगड. (१०.५.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment