हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवतांना साकडे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’

सिंधुदुर्ग – हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी देवतांच्या चरणी साकडे घालण्यात आले, तसेच काही ठिकाणी मंदिर स्वच्छता करून साकडे घालण्यात आले. यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमी अन् सनातनचे साधक सहभागी झाले होते.

 

बिबवणे येथे देवतांना गार्‍हाणे आणि कालेली येथे श्री देवी भवानी मंदिरात साकडे

‘हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’, यासाठी कुडाळ तालुक्यातील बिबवणे गावातील श्री देव गिरोबाच्या चरणी श्री. भालचंद्र राऊळ (गावकर) यांनी गार्‍हाणे घातले. या वेळी अनेक ग्रामस्थ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यातील कालेली येथील सावंत कुटुंबियांनी त्यांच्या वार्षिक धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्यानंतर श्री देवी भवानी मंदिरात साकडे घातले. या वेळी सावंत कुटुंबियांसह ५० जण उपस्थित होते.

कालेली येथील श्री भवानी मंदिरात साकडे घालतांना सावंत कुटुंबीय

 

बिबवणे येथील धर्मप्रेमींनी संघटितपणे केलेली कृती !

कुडाळ येथे २९ जानेवारीला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला कुडाळ तालुक्यातील बिबवणे गावातील धर्मप्रेमी उपस्थित होते. हिंदूंनी संघटित होण्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी संघिटत होण्याचा निश्चय केला आणि ग्रामदेवता श्री देव गिरोबा मंदिरात प्रत्येक सोमवारी सामूहिक आरती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून प्रतिदिन आबालवृद्ध ग्रामस्थ ही आरती करत आहेत. धर्मप्रेमी श्री. सतीश डिंगे-सामंत, श्री. प्रकाश कुबल सर, श्री. आत्माराम (भाऊ) मार्गी यांच्यासह अनेकांनी सर्व ग्रामस्थांपर्यंत आरतीचा विषय तळमळीने पोचवला. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’, यासाठी श्री देव गिरोबाच्या चरणी श्री. भालचंद्र राऊळ (गावकर) यांनी गार्‍हाणे घातले.

 

कणकवली आणि देवगड तालुक्यांतील मंदिरांमध्ये देवतांना साकडे !

कणकवली येथे मोरेश्वरनगर, गावडेवाडी (कलमठ) येथील श्री हनुमान मंदिरात मंदिरातील सेवेकरी श्री. विठ्ठल तानाजी हडकर यांनी श्रीफळ ठेवून गार्‍हाणे घातले. तसेच सर्व उपस्थितांनी सामूहिक प्रार्थना केली. खवळे, भाटलेवाडी, घोणसरी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात साकडे घालण्यात आले. कणकवली तालुक्यात एकूण ४ ठिकाणी देवतांना साकडे घालण्यात आले. देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर मंदिरात श्री. अनंत परूळेकर आणि श्री. भास्कर खाडीलकर यांनी श्री देव कुणकेश्वराच्या चरणी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’, यासाठी अभिषेक केला. यासह गिर्ये येथील श्री चौंडेश्वरीदेवी आणि श्री रवळनाथदेव, जामसंडे येथील श्री दिर्बादेवी, दहिबांव येथील श्री  महादेश्वर मंदिर आदी ११ ठिकाणी देवतांच्या चरणी साकडे घालण्यात आले.

 

देवडोंगरावरील पुजार्‍यांनी उपस्थितांना प्रार्थनेत सहभागी व्हायला सांगणे

देवडोंगरावरील मच्छिंद्रनाथ तपोभूमी येथे साकडे घालतांना राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक

आंबडपाल येथील देवडोंगरावरील श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ तपोभूमी येथे साकडे घालण्यात आले. साधक आणि धर्मप्रेमी यांनी दुपारी १२ वाजता देवडोंगरावर जाऊन आरतीत सहभाग घेतला. येथे आरतीच्या वेळी उपस्थित असलेल्यांकडे १ मिनिट आरती देऊन श्री सद्गुरु मच्छिद्रनाथांना आरती दाखवण्यास सांगितले जाते. त्याप्रमाणे माझ्याकडे (सौ. संपदा चिऊलकर यांच्याकडे) आरती दिल्यावर ‘मी गुरुमाऊलीलाच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच) औक्षण करत आहे आणि साक्षात् ते आसंदीत विराजमान झाले आहेत’, असे जाणवले. माझा भावजागृत होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली.

येथे असलेल्या पुजार्‍यांनीही उपस्थित भाविकांना विनंती केली, ‘‘सनातन संस्थेचा कार्यक्रम आहे. थोडा वेळ त्यामध्ये सहभागी होऊया आणि नंतरच महाप्रसाद घेऊया.’’ त्यानंतर ते साधकांना म्हणाले, ‘‘सनातनचा कोणताही कार्यक्रम असला, तरी येथे कधीही घेऊ शकता. आमची पूर्ण सहमती असेल. सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ उल्लेखनीय आणि हिंदु धर्मासाठी आवश्यक आहे.’’

पूजार्‍यांनी केलेल्या आवाहनानंतर तेथे उपस्थित भाविकही हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रार्थना ऐकून पुष्कळ सकारात्मक बोलू लागले. या वेळी त्या ठिकाणी गुरुमाऊलीचे अस्तित्व आणि चैतन्य जाणवत होते. या सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला आणि भावजागृती झाली. यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !

– सौ. संपदा चिऊलकर, पिंगुळी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

Leave a Comment