अनुक्रमणिका
- १. पू. आईंचे बालपण
- २. दुसरा विवाह होणे आणि सासरी सवतीकडून पुष्कळ त्रास सहन करावा लागणे
- ३. सवतीने आणि सवतीच्या मुलीने खोटा आरोप करून पू. आईंना पुष्कळ मारणे
- ४. पू. आईंच्या सवतीने करणी करून पू. आईंची ३ मुले मारून टाकणे
- ५. कठीण परिस्थितीतही देवावर श्रद्धा असणे
- ६. कष्ट करून मुलींचा सांभाळ करणे
- ७. प्रामाणिकपणा
- ८. गहू देण्याचे निमित्त करून सवतीने पू. आईंना शेतात नेणे, तेथे त्यांना मारून ढकलून देणे आणि त्या वेळी दिराने त्यांना साहाय्य करणे
- ९. सवतीने शेतात पिकलेले धान्य न देणे आणि पू. आईंनी कुळथाच्या खाली पडलेल्या शेंगा वेचून आणून त्या मुलींना खाऊ घालणे
- १०. खडतर परिस्थिती स्वीकारणे
- ११. पू. आईंनी मुलींवर चांगले संस्कार केल्याने त्यांच्या मोठ्या मुलीने सासरी त्रासांमध्ये राहूनही सर्वांशी चांगले वागणे
- १२. मुलींच्या लग्नानंतर पायी पंढरपूरची वारी करणे
- १३. स्वतः कष्ट करून मुलींची बाळंतपणे करणे
- १४. पत्नी, आई आणि आजी, अशी सर्व नाती निभावणे
- १५. मुलीच्या घरी अडचण असतांना पू. आईंनी साहाय्याला जाणे आणि घर अन् शेत यांतील सर्व कामे करणे
- १६. नातवंडांवर चांगले संस्कार करणे
- १७. पू. आईंना जीवनात बर्याच दुःखांना सामोरे जावे लागणे
- १८. कोणतीही अपेक्षा न ठेवता मुलीला सर्वतोपरी साहाय्य करणे
- १९. सर्वांशी प्रेमाने वागणे
- २०. पू. आईंना आलेली अनुभूती
- २० अ. एकादशीच्या दिवशी भगवे वस्त्र परिधान केलेली एक व्यक्ती घरी येणे आणि तिने पू. आईंकडे खायला मागणे
- २० आ. वरीचा भात थोडासाच असूनही त्या व्यक्तीचे पोटभर खाऊन झाल्यावरच ताटातील भात संपणे
- २० इ. त्या अनोळखी व्यक्तीने पू. आईंच्या कुटुंबाविषयी सत्य माहिती सांगणे
- २० ई. निघतांना त्या व्यक्तीने पू. आईंना आशीर्वाद देणे, निरोप देतांना ती व्यक्ती जागेवरच अदृश्य होणे आणि त्या वेळी ‘साक्षात् दत्तात्रेयांनीच भेट दिली’, असे जाणवून पू. आईंची भावजागृती होणे
- २१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना
- २१ आ. परेच्छेने वागणे आणि निरपेक्षभावात रहाणे
- २२. संतपद
- २२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पू. आई साधनेत पुढे गेल्या आहेत’, असे सांगणे आणि त्यानंतर १५ दिवसांनी त्यांना संत म्हणून घोषित करण्यात येणे
- २२ आ. त्यांचे बोलणे देवापर्यंत पोेचते
- २२ इ. पू. आईंचा तुळशीप्रतीचा भाव !
- २२ ई. नामजप आणि भावपूर्ण प्रार्थना करणे
- २२ उ. पू. आईंची साधकांवरील प्रीती !
- २२ ऊ. संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. आईंना आलेल्या अनुभूती
- २३. अर्धांगवायूचा झटका आल्यावर पू. आईंच्या शरिराची डावी बाजू निकामी होणे आणि ‘सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले उपाय, पू. आईंचा देवाप्रतीचा भाव अन् नियमित तेलाने मर्दन’, हे सर्व केल्यावर पू. आई बर्या होणे
- २४. अनुभूती
पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचे जीवन बालपणापासूनच खडतर होते. त्यांनी अनेक त्रास सहन करून मुलींना वाढवले. हे खडतर जीवन जगत असतांना त्यांनी त्याविषयी एकदाही देवाकडे गार्हाणे केले नाही. त्यांनी आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारली. उतारवयात त्यांचा संपर्क सनातनच्या साधकांशी झाला आणि त्यांनी नामजपाला आरंभ केला. त्यानंतर त्यांचा नामजप अखंड होऊ लागला. नंतर त्या संतपदी विराजमान झाल्या. पू. आजींचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
१. पू. आईंचे बालपण
१ अ. सात्त्विक कुटुंब
‘पू. आईंचा जन्म नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावी झाला. त्यांना ५ बहिणी आणि १ भाऊ, अशी ६ भावंडे होती. पू. आईंचे आई-वडील प्रामाणिक आणि सात्त्विक वृत्तीचे होते. त्यांचे आई-वडील शेतकरी होते. त्यांची पुष्कळ मोठी भूमी होती. त्यांचे वडील शेती करायचे. पू. आईंचे आई-वडील धार्मिक होते. त्यांचे वडील ‘बहिरोबा’ या देवाचे भक्त होते. त्यांच्यावर बहिरोबाची कृपा असल्याने त्यांना इतरांना चावलेल्या सापाचे विष उतरवता येत असे. त्यामुळे अनेक गावांतून लोक त्यांच्याकडे येत असत.
१ आ. ७ – ८ मासांच्या असतांना बालविवाह होणे आणि वयाच्या चौथ्या वर्षी पतीचा मृत्यू होणे
पू. आईंचे पहिले लग्न त्या पाळण्यात असतांनाच पाळण्याला बाशिंग (टीप) बांधून झाले. तेव्हा त्या ७ – ८ मासांच्या असतील. नवरा मुलगा साधारण ८ – ९ वर्षांचा होता. दोघांनाही काही कळत नव्हते. पू. आईंना त्यांच्या आत्याच्या घरीच दिले होते.
टीप – विवाहाच्या वेळी काही जातींत वधू आणि वर यांच्या कपाळावर बांधले जाणारे आभूषण.
त्यांच्या पतीवर त्यांच्या भावकीतील लोकांनी करणी केली. त्यातच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्या वेळी पू. आई साधारण ४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या सासू-सासर्यांचासुद्धा करणीमुळेच मृत्यू झाला. पू. आई बालपणातच विधवा झाल्या. त्यांच्या सासरची सर्व भूमी त्यांच्या भावकीतील लोकांनी लुबाडून घेतली. त्या परत कधीच सासरी गेल्या नाहीत. त्या आई-वडिलांकडेच राहिल्या.
१ इ. भावंडांना सांभाळणे आणि शेतीची कामे करणे
त्यांच्यासह त्यांची भावंडे असायची. पू. आई त्यांना सांभाळायच्या आणि त्यांची काळजी घ्यायच्या. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना शेतीची कामे करण्यास वेळ मिळायचा. पू. आई शाळेत गेल्या नाहीत. त्या घरीच राहून शेतीची कामे करायच्या. त्या ‘ज्वारीच्या पिकांची राखण करणे, शेळ्यांना शेतात चरायला नेणे, शेणी (गोवर्या) करणे, चुलीत घालण्यासाठी शेतातून लाकडे आणणे’, अशी कामे करायच्या. त्या त्यांच्या वडिलांना शेतीच्या कामांत पुष्कळ साहाय्य करायच्या.
१ ई. साधनेची आवड
पू. आई बहिरोबाचे मंदिर आणि समोरचा परिसर झाडून स्वच्छ करायच्या. त्यांना त्याची आवड होती. त्या दिवसभर मंदिरातच खेळायच्या. नवरात्रीमध्ये गावातील लक्ष्मीदेवी आणि बहिरोबा यांच्या मंदिरात घटस्थापना असायची. पू. आई घटाला माळ घालण्यासाठी नियमित मंदिरात जायच्या.
२. दुसरा विवाह होणे आणि सासरी सवतीकडून पुष्कळ त्रास सहन करावा लागणे
पू. आई १२ – १३ वर्षांच्या झाल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा दुसरा विवाह करून दिला. पू. आईंचा ज्यांच्यासह विवाह झाला, त्यांचा आधीच एक विवाह झाला होता आणि त्यांची पहिली पत्नीसुद्धा हयात होती. ती सतत माहेरीच रहायची; म्हणून त्यांनी पू. आईंसह दुसरे लग्न केले. पू. आईंचे सासर मांडवगण (नगर) येथील होते. सासू-सासरे, चुलत सासरे, दीर-जाऊ, आतेसासू, असे त्यांचे मोठे कुटुंब होते. त्या लग्न होऊन घरी गेल्या आणि त्यांची सवत परत लगेचच नांदायला आली. पू. आईंच्या सासूबाई पू. आईंना पुष्कळ प्रेम द्यायच्या. पू. आईंच्या सवतीचे आणि सासूबाईंचे सतत भांडण व्हायचे. त्यांना आणि त्यांच्या सवतीला वेगवेगळ्या घरांत ठेवले; कारण त्यांची सवत त्यांच्याशी सतत भांडायची.
पू. आई सासू-सासर्यांच्या जवळ रहायच्या. त्यांची सवत एकटीच रहायची. पू. आईंच्या जाऊबाई सासूबाईंनी सांगितलेली सर्व कामे ऐकायच्या. त्यांच्यात आणि सासूबाईंच्यात कधीच भांडणे होत नसत.
३. सवतीने आणि सवतीच्या मुलीने खोटा आरोप करून पू. आईंना पुष्कळ मारणे
पू. आई एकदा दळण दळायचे जाते (धान्य दळण्यासाठी वापरायचे दगडी गोलाकार यंत्र) आणण्यासाठी सवतीच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या सवतीने आणि सवतीच्या मुलीने ‘आमचे कपडे चोरण्यासाठी आल्या आहात’, असा खोटा आरोप करून त्यांना पुष्कळ मारले. पू. आईंनी ते सर्व सहन केले. त्या वेळी पू. आईंच्या पुतण्याने मध्यस्थी केली.
४. पू. आईंच्या सवतीने करणी करून पू. आईंची ३ मुले मारून टाकणे
पू. आईंची सवत त्यांच्या पतीला पू. आईंकडे येऊ देत नव्हती. ती सतत भांडायची. त्यांच्या सवतीला मुलीच होत होत्या. मुलगा होत नव्हता. पू. आईंना ३ मुले झाली. त्यांच्या सवतीने करणी करून त्या तीनही मुलांना मारले. ते दुःख पू. आईंनी पचवले. त्यांच्या केवळ दोन मुली जगल्या.पू. आईंनी हे सर्व सहन करून सासरच्या सर्वांना प्रेमच दिले.
५. कठीण परिस्थितीतही देवावर श्रद्धा असणे
पू. आई आणि त्यांच्या जाऊबाई पहाटेच ४ वाजता उठून जात्यावर ज्वारी, बाजरी आणि गहू ही धान्ये दळायच्या अन् त्याच पिठाच्या तीन जण जेवतील, एवढ्या भाकर्या आणि पोळ्या बनवायच्या. सर्व स्वयंपाक करून त्या सकाळीच शेतात कामाला जायच्या. हे सर्व करत असतांना पू. आई वेगवेगळ्या मंदिरांतसुद्धा जायच्या. त्यांना देवदर्शनाची पुष्कळ आवड होती. त्यांच्या गावातच सिद्धेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते.
पू. आई प्रत्येक एकादशीला त्या मंदिरात जायच्या. त्या उपवास करायच्या. त्यांचा भोळा भाव होता.
६. कष्ट करून मुलींचा सांभाळ करणे
मुलींना सांभाळण्यासाठी पू. आईंना त्यांची सवत पतीला कधीच पैसे देऊ देत नसे. त्यामुळे त्यांना पती असूनसुद्धा मुलींना मोठे करण्यासाठी लोकांच्या घरी कामे करायला लागायची. त्या लोकांच्या घरी मिरची कुटून देण्यासाठी जायच्या, तसेच लोकांच्या घरची स्वच्छता आणि शेतात मजूरी करायच्या अन् मिळेल त्या पैशांतून मुलींचे पालनपोषण करायच्या.
७. प्रामाणिकपणा
अ. लोकांच्या घरी त्या पुष्कळ प्रामाणिकपणे कामे करायच्या.
एकदा एका व्यापार्याच्या घरी स्वच्छतेच्या वेळी गादी गुंडाळून ठेवतांना त्यांना गादीखाली पैशांचे बंडल दिसले. त्यांनी प्रामाणिकपणे ते पैसे त्या व्यापार्याच्या पत्नीला दिले. त्यांच्या या प्रामाणिकपणासाठी त्या व्यापार्याने आणि त्यांच्या पत्नीने त्यांना बक्षिस म्हणून ५० रुपये दिले. ‘तेसुद्धा घ्यायला नको’, असे त्यांना वाटायचे. त्यांनी बिकट परिस्थितीतसुद्धा कधीही कुणाकडून बिना कष्टाचे पैसे घेतले नाहीत.
आ. मोह नसणे
एकदा त्यांना सोन्याचे कानातले सापडले होते. तेसुद्धा त्यांनी ‘ते कुणाचे आहेत ?’, हे शोधून त्यांना परत केले. त्याविषयी त्यांना मोह झाला नाही.
८. गहू देण्याचे निमित्त करून सवतीने पू. आईंना शेतात नेणे, तेथे त्यांना मारून ढकलून देणे आणि त्या वेळी दिराने त्यांना साहाय्य करणे
गुढीपाडव्याच्या दिवशी घरात पोळ्यांसाठी गहू नसतांना पू. आईंनी यजमान आणि सवत यांच्याकडे गहू मागितले. सवतीने त्यांना ‘घरी गहू देते’, असे सांगितले. सवतीचे घर शेतात होते. तिने पू. आईंना २ कि.मी. चालत नेऊन रस्त्यात कुणी नसल्याचे पाहून मारून ढकलून दिले. पू. आईंच्या दिरांना हे कळल्यावर त्यांनी पू. आई आणि मुली यांच्यासाठी जावेला स्वयंपाक बनवायला सांगितला अन् पू. आईंना तो आणून दिला. त्यांचे दीर आणि जाऊ पुष्कळ चांगले होते. ते त्यांना पुष्कळ साहाय्य करायचे. त्यामुळे त्यांचा पू. आईंना पुष्कळ आधार वाटायचा. त्यांच्या नणंदा, दीर आणि जाऊ त्यांना पुष्कळ सांभाळायचे; कारण पू. आई सर्वांशी प्रेमाने वागायच्या.
९. सवतीने शेतात पिकलेले धान्य न देणे आणि पू. आईंनी कुळथाच्या खाली पडलेल्या शेंगा वेचून आणून त्या मुलींना खाऊ घालणे
पू. आईंचा आणि त्यांच्या सवतीचा शेतजमिनीवर समान अधिकार होता; पण त्यांना त्यांची सवत शेतात पिकलेले धान्य देत नव्हती. पू. आईंनी मागितले, तर सवत त्यांना मारायची. पू. आई लोकांच्या शेतात कामाला जायच्या. पू. आई लोकांनी कुळथाचे पीक काढून नेल्यावर कुळथाच्या खाली पडलेल्या शेंगा दिवसभर वेचून आणायच्या आणि त्यांची भाजी बनवून मुलींना खाऊ घालायच्या.
१०. खडतर परिस्थिती स्वीकारणे
पू. आईंचे जीवन पुष्कळ खडतर होते. या खडतर जीवनाविषयी त्यांनी देवाकडे कधी तक्रार केली नाही. देवाने दिलेली परिस्थिती स्वीकारून त्या जगत होत्या. त्या प्रत्येक मंगळवारी गावातल्या देवीला नैवेद्य घेऊन जायच्या.’
११. पू. आईंनी मुलींवर चांगले संस्कार केल्याने त्यांच्या मोठ्या मुलीने सासरी त्रासांमध्ये राहूनही सर्वांशी चांगले वागणे
‘पू. आईंनी पुष्कळ कष्ट करून मुलींना लहानाचे मोठे केले. त्यांना आम्ही दोन मुली आहोत. माझ्या मोठ्या बहिणीचे (श्रीमती चंद्रभागा बापुराव कापरे हिचे) लग्न आमच्या नात्यातच केले. तिला सासरी पुष्कळ सासुरवास होता; पण पू. आईंची गरिबी असल्यामुळे बहिणीने त्याविषयी आईकडे कधी तक्रार केली नाही. पू. आईंनी आमच्यावर चांगले संस्कार केल्यामुळे माझी मोठी बहीण घरातील सर्वांशी आदराने वागत होती.
१२. मुलींच्या लग्नानंतर पायी पंढरपूरची वारी करणे
माझ्या लग्नानंतर त्या एकट्याच रहायच्या. एकट्या असल्यामुळे त्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन यायच्या. पंढरपूरची वारी त्या पायी करायच्या, तसेच एकादशी करायच्या. देवावर त्यांची भोळी भक्ती होती.
१३. स्वतः कष्ट करून मुलींची बाळंतपणे करणे
त्यानंतर पू. आई स्वतःच कष्ट करून पैसे मिळवायच्या आणि रहायच्या. माझ्या बहिणीची ३ आणि माझी ५ बाळंतपणे करण्यासाठी लागणारे सर्व पैसे त्यांनी स्वतः इतरांची कामे करून मिळवले.
१४. पत्नी, आई आणि आजी, अशी सर्व नाती निभावणे
त्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीच्या आजारपणात पतीची पुष्कळ काळजी घेतली. त्या वेळी त्यांची सवत पतीकडे लक्ष देत नव्हती. पू. आई पतीला जे हवे ते करून खाऊ घालायच्या. त्या आजारपणात त्यांचे पती वारले.
पू. आईंनी दोन्ही मुलींच्या घरचे रितीरिवाज पूर्ण केले. मुलीच्या सासरी काही शेतीची कामे निघाली, तरी त्या त्यांच्याकडे कामाला जायच्या आणि नातवंडांनासुद्धा (मुलींच्या मुलांनासुद्धा) सांभाळायच्या, तसेच लागेल ते साहाय्य करायच्या.
१५. मुलीच्या घरी अडचण असतांना पू. आईंनी साहाय्याला जाणे आणि घर अन् शेत यांतील सर्व कामे करणे
माझ्या मुलीच्या लग्नात काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे; म्हणून मला आणि माझ्या यजमानांना ((कै.) श्रीधर भुकन यांना) ऊस तोडण्यासाठी पुण्याला जावे लागणार होते. त्या वेळी ‘माझी २ मुले आणि २ मुली सांभाळणे अन् शेती आणि गुरे सांभाळणे’, यांसाठी आम्ही पू. आजींना टाकळी (ता. आष्टी, जिल्हा बीड) येथे आणले. त्यासुद्धा मुलीला साहाय्य हवे; म्हणून सर्व सोडून माझ्याकडे आल्या. ४ मुलांना सांभाळणे, स्वयंपाक करणे, गायी आणि गुरे सांभाळणे, शेतीची कामे, म्हणजे खुरपणे, पाणी देणे, भाजीपाला काढणे इत्यादी सर्व कामे त्यांनाच करावी लागत. त्या सर्व कामे मन लावून करत असत. त्यांना कुठे जावे लागले, तर त्या पहाटेच उठून मुलांसाठी स्वयंपाक करून ठेवायच्या आणि गावी जाऊन त्याच दिवशी परत यायच्या.
१६. नातवंडांवर चांगले संस्कार करणे
अ. माझ्या मुलांना (श्री. रामेश्वर आणि श्री. वाल्मीक भुकन, सौ. मंगला खेतमाळस अन् सौ. सीमा अनारसे यांना) एकटे सोडून त्या कुठेही जात नसत. त्यांनी त्यांच्या नातवंडांवर चांगले संस्कार केले. ‘घरी आलेले वाटसरू आणि पाहुणे यांना चहा-पाणी देणे, जेवण करून देणे’, असे सर्व त्या न थकता करायच्या. हेच त्यांनी नातवंडांनाही शिकवले.
आ. गावातील देवळात कीर्तन आणि पोथीवाचन (भगवद़्गीता, रामायण या ग्रंथांचे वाचन) असायचे. त्या नातवंडांना घेऊन देवळात जायच्या. त्या मुलांना नियमितपणे शाळेत पाठवायच्या. त्यांनी कामासाठी कधी मुलांना घरी ठेवून घेतले नाही. त्यांनी स्वतः कष्टाची सर्व कामे केली.
१७. पू. आईंना जीवनात बर्याच दुःखांना सामोरे जावे लागणे
त्या १२ वर्षांच्या असतांना त्यांची आई बाळंतपणात वारली. माझे यजमान म्हणजे पू. आईंचे लहान जावई हृदयविकाराने वारले. त्यानंतर १ वर्षातच मोठे जावई विजेच्या धक्क्याने मृत्यू पावले. पू. आईंचे दोन्ही जावई एक वर्षात मृत्यू पावले. ही दोन्ही दुःखे पचवणे पुष्कळच कठीण होते. अशा स्थितीतही त्या स्थिर होत्या. पू. आईंना दोन्ही मुलींना आधार द्यावा लागला. त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीचीही मुले सांभाळली.
१८. कोणतीही अपेक्षा न ठेवता मुलीला सर्वतोपरी साहाय्य करणे
आता मुलगी आणि नातवंडे यांंना कुणी नाही; म्हणून त्या माझ्याकडेच राहिल्या, ते कायमच्याच ! त्यांनी मला मोठा आधार दिला. नातवंडांच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्याकडील सर्व पैसे दिले आणि मुलगी अन् नातवंडे यांसह हलाखीत दिवस काढले. पू. आईंमुळे मला मुले सांभाळणे आणि त्यांना मोठे करणे सोपे झाले. माझ्या दुःखाचा पुष्कळ मोठा वाटा त्यांनी उचलला. हे सर्व करतांना त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती.
१९. सर्वांशी प्रेमाने वागणे
पू. आई मला आधार देत आहेत; म्हणून माझ्या सासरचे त्यांना त्रास द्यायचे. ते कधी कधी त्यांच्याशी भांडायचे; पण त्या कधीच कुणाशी भांडल्या नाहीत. त्या सर्वांशी प्रेमाने वागल्या. पू. आई घरी असायच्या; म्हणून मला सर्व कामे करायला जमायचे. हे सर्व करतांनासुद्धा पू. आईंनी देवाकडे कधी तक्रार केली नाही.
२०. पू. आईंना आलेली अनुभूती
२० अ. एकादशीच्या दिवशी भगवे वस्त्र परिधान केलेली एक व्यक्ती घरी येणे आणि तिने पू. आईंकडे खायला मागणे
पू. आई आमच्याकडेच रहात होत्या. एकदा एकादशीला त्या एकट्याच घरी होत्या. मी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. उपवासाचा फराळ करून त्या बसल्या होत्या. त्या वेळी त्यांच्याकडे भगवे वस्त्र घातलेली एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने ‘घरात कुणी आहे का ?’, असे विचारले. तेव्हा पू. आईंनी त्यांना सांगितले, ‘‘माझी मुलगी बाजारात गेली आहे. मी एकटीच आहे.’’ तेव्हा तिने पू. आईंना विचारले, ‘‘मला भूक लागली आहे. तुमच्याकडे काही खायला आहे का ?’’ त्या वेळी केवळ उपवासासाठी केलेला वरीचा गोड भात होता; पण तोही अल्पाहाराचे दोन चमचेच शिल्लक राहिला होता.
२० आ. वरीचा भात थोडासाच असूनही त्या व्यक्तीचे पोटभर खाऊन झाल्यावरच ताटातील भात संपणे
पू. आईंनी त्या व्यक्तीला बसायला गोधडी दिली, पिण्यास पाणी दिले आणि २ चमचे वरीचा भात दिला. पू. आई त्या व्यक्तीला म्हणाल्या, ‘‘हा एवढाच भात तुम्हाला पुरणार नाही. मी आता दुसरा भात बनवते.’’ तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ‘‘मला एवढाच पुरे !’’ ती व्यक्ती पू. आईंसह बोलत बोलत भात खात होती, तरीही तो भात आहे तेवढाच रहात होता. हे सर्व पू. आई पहात होत्या. जेव्हा त्या व्यक्तीचे पोटभर खाऊन झाले, तेव्हाच तो भात संपला. ती व्यक्ती पू. आईंना म्हणाली, ‘‘माझे पोट भरले. मी तृप्त झालो.’’ हे पाहून पू. आईंना आश्चर्य वाटले.
२० इ. त्या अनोळखी व्यक्तीने पू. आईंच्या कुटुंबाविषयी सत्य माहिती सांगणे
त्यांनी पू. आईंना ‘कुटुंबात कोण कोण असते ?’, याविषयी सर्व सांगितले. तेव्हा ‘ते अनोळखी असतांनासुद्धा सर्व सत्य सांगत आहेत’, हे पू. आईंच्या लक्षात आले. घरात गंगेचे पाणी बाटलीत ठेवले होते. हेसुद्धा त्यांनी पू. आजींना सांगितले. ‘घरात कुणाचा स्पर्श होऊन ते अशुद्ध व्हायला नको; म्हणून पाण्याची बाटली बाहेर झाडाला टांगून ठेवण्यास सांगितले. ‘घरात गंगेचे पाणी आहे’, हे पू. आईंनासुद्धा ठाऊक नव्हते.
२० ई. निघतांना त्या व्यक्तीने पू. आईंना आशीर्वाद देणे, निरोप देतांना ती व्यक्ती जागेवरच अदृश्य होणे आणि त्या वेळी ‘साक्षात् दत्तात्रेयांनीच भेट दिली’, असे जाणवून पू. आईंची भावजागृती होणे
त्यांनी पक्ष्यांसाठी दारात झाडाला अडकवलेली ज्वारीची कणसे पाहिली आणि सांगितले, ‘‘ही कणसे या झाडाला न अडकवता दुसर्या झाडाला अडकवा आणि तिथे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी एक लोटके (मातीचे भांडे) अडकवा, म्हणजे पक्षी खाऊन अन् पाणी पिऊन तृप्त होतील.’’ हे सर्व सांगून ती व्यक्ती निघू लागली. तिने पू. आईंना आशीर्वाद दिला, ‘‘तुमचे आणि तुमच्या मुलींचे चांगले होईल.’’ त्यांना निरोप देण्यासाठी पू. आई घराचे दार लावून घेण्यास वळल्या आणि दार लावल्यावर पहातात, तर काय ? ती व्यक्ती त्यांना जागेवरच अदृश्य झाल्याचे दिसले. त्या वेळी त्यांची पुष्कळ भावजागृती झाली. ‘मला साक्षात् दत्तात्रेयांनीच भेट दिली’, असे पू. आईंना जाणवले.’
२१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना
२१ अ. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना समजल्यावर प्रथम नामजप करता न येणे; मात्र नंतर ५ – ६ घंटे आणि त्यानंतर सतत नामजप करणे
‘माझ्या मोठ्या मुलाला (श्री. रामेश्वर भुकन याला) एका साधकाच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना समजल्यावर त्याने पू. आईंना नामजप करण्यास सांगितले. पू. आईंना कुठलाही नामजप करता येत नव्हता; म्हणून त्यांना ‘तुम्ही केवळ ‘कृष्ण, कृष्ण’, असेच म्हणा’, असे सांगितले होते. आरंभी त्यांचे नामजपात लक्ष लागत नसे; परंतु रामेश्वर त्यांना परत परत जप करण्यास बसवायचा. मग त्या प्रतिदिनच जप करू लागल्या. त्या प्रारंभी २ – ३ घंटे नामजप करायच्या. नंतर त्या ५ – ६ घंटे नामजप करू लागल्या. त्या पुष्कळ तळमळीने नामजप करायच्या. त्यानंतर त्या सततच नामजप करू लागल्या.
२१ आ. परेच्छेने वागणे आणि निरपेक्षभावात रहाणे
त्यांनी सर्वांचे करूनही कशातच मन अडकवले नाही. त्या पुष्कळ निरपेक्ष राहिल्या. त्या घरातील सर्वांचे ऐकायच्या आणि त्याप्रमाणे करून सतत परेच्छेने वागायच्या. त्यांचा कधीच कशासाठी हट्ट नसायचा किंवा त्यांना कुठलीच अपेक्षा नसायची. त्यांनी त्यांच्या जवळील सर्व पैसे मुलींच्या संसारासाठी वापरले; परंतु त्यांना कधीच असे वाटले नाही की, मुलींनी आणि नातवंडांनी मला पैसे द्यावे किंवा दागिने करावे.
२१ इ. काही अडचणींमुळे रामनाथी आश्रमात जाता न आल्याने ‘स्वतःचा नामजप अल्प पडत असेल; म्हणून अनुमती मिळाली नाही’, असा विचार मनात येऊन खंत वाटणे
मी, माझा मोठा मुलगा (श्री. रामेश्वर भुकन), सून (सौ. उर्मिला भुकन) आणि माझी नात (कु. वेदश्री भुकन, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ९ वर्षे) हे पूर्णवेळ साधना करण्यासाठी काही दिवस रामनाथी आश्रमात राहिलो. तेव्हा पू. आई माझी मुलगी सौ. सीमा अनारसे हिच्याकडे रहात होत्या. तेथेसुद्धा त्या पहाटे उठून दिवसभर जप करायच्या आणि देवाशी बोलायच्या. त्यांच्या मनात सतत नामजपच असायचा. असे तीन मास गेले. आम्ही सर्व जण आश्रमातून आल्यावर त्या परत आमच्या समवेत रहात होत्या. त्यानंतर गावाकडील सर्व कामे करून आम्ही पुन्हा पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात येतांना त्यांना घेऊन येण्याचे ठरले; परंतु आश्रमात त्यांना आणण्याविषयी व्यवस्थित समन्वय न झाल्याने त्यांना रेल्वेस्थानकावरून नातीच्या समवेत परत माघारी जावे लागले. त्या वेळी त्यांना पुष्कळ वाईट वाटले की, माझा नामजप अल्प पडला; म्हणून देवाने मला आश्रमात यायला अनुमती दिली नाही.
२१ ई. तळमळीने नामजप वाढवल्यावर आश्रमात येण्याची संधी मिळणे आणि आश्रमातील काही साधकांना ‘पू. आई संत आहेत’, असे जाणवणे
त्यानंतर त्यांनी पुष्कळ नामजप करण्यास आरंभ केला. त्या तळमळीने जप करायच्या. त्यांच्या या तळमळीने त्यांना एकाच मासात आश्रमात येण्याची अनुमती मिळाली.
श्री. रामेश्वर गावी जाऊन त्यांना आश्रमात घेऊन आला. जानेवारी २०१७ मध्ये पू. आई प्रथम रामनाथी आश्रमात आल्या. त्या वेळी आश्रम पाहून त्यांचा भाव जागृत झाला. त्यांना पाहून आश्रमातील काही साधकांना ‘त्या संतच आहेत’, असे वाटायचे.
२२. संतपद
२२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पू. आई साधनेत पुढे गेल्या आहेत’, असे सांगणे आणि त्यानंतर १५ दिवसांनी त्यांना संत म्हणून घोषित करण्यात येणे
पू. आई आश्रमात आल्यावर १५ दिवसांनी त्यांना पाहून गुरुदेव (परात्पर गुरू डॉ. आठवले) म्हणाले, ‘‘या साधनेत पुढे गेल्या आहेत.’’ त्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी आश्रमात त्यांचा ‘संत’ म्हणून सन्मान-सोहळा झाला आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांना ‘संत’ म्हणून घोषित केले.
पू. आई आश्रमात आल्यावर त्या आश्रमजीवनाशी एकदम समरस झाल्या.
२२ आ. त्यांचे बोलणे देवापर्यंत पोेचते
त्या देवाशी पुष्कळ आर्ततेने बोलतात. त्यांचे देवाशी बोलणे ऐकून असे वाटते की, त्यांचे बोलणे देवापर्यंत पोेचते.
२२ इ. पू. आईंचा तुळशीप्रतीचा भाव !
पू. आई तरुण वयापासून नियमितपणे तुळशीला पाणी घालणे, उदबत्ती लावणे, हळदी-कुंकू लावणे, भावपूर्ण नमस्कार करणे, असे करायच्या. आता वयोमानानुसार त्यांना अधिक चालता येत नाही, तरीसुद्धा त्या इतरांकडून तुळशीला पाणी घालून घेतात.
२२ ई. नामजप आणि भावपूर्ण प्रार्थना करणे
पू. आई वयाच्या ९८ व्या वर्षी ४ – ५ घंटे बसून जप करतात. त्या समष्टीसाठी जप करतात आणि गुरुमाऊली, सद़्गुरु अन् संत यांना नियमित प्रार्थना करतात. त्या देवाला प्रार्थना करतात, ‘देवा, सर्व साधकांना बळ दे. सर्वांचे चांगले होऊ दे. सर्व साधक सुखी राहू देत’; तसेच ‘गुरुदेवांना आयुष्य मिळू दे, रामराज्य लवकर येऊ दे’, अशा प्रार्थना त्या अधूनमधून करतात.
२२ उ. पू. आईंची साधकांवरील प्रीती !
त्यांचे सर्व साधकांवर पुष्कळ प्रेम आहे. कुणी साधक त्यांना भेटायला आला, तर पू. आई त्या साधकाशी प्रेमाने बोलतात, तसेच त्याची विचारपूस करतात. पू. आई साधकाचा चेहरा, डोके आणि पाठ यांवरून प्रेमाने हात फिरवतात अन् त्याला प्रसाद देतात. साधकांना पाहून त्यांना पुष्कळ आनंद वाटतो.
२२ ऊ. संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. आईंना आलेल्या अनुभूती
२२ ऊ १. वेगवेगळ्या देवतांनी पू. आईंच्या समोर प्रगट होऊन त्यांना दर्शन देणे
अ. पू. आई नामजपाला बसल्यावर श्री गणपति, श्री दुर्गादेवी, महादेव या देवतांची रूपे त्यांच्या समोर प्रगट व्हायची. देवता लहान बालकाच्या रूपात प्रगट होऊन त्यांना दर्शन द्यायचे.
आ. वर्ष २०२१ मधील महाशिवरात्रीच्या दिवशी त्या नामजप करत असतांना त्यांना ‘हातात त्रिशूळ, गळ्यात नागदेवता आणि रुद्राक्षांच्या माळा, डोक्यावर जटा अन् हातात कमंडलू’, अशा रूपात प्रगट होऊन साक्षात् भगवान शिवाने दर्शन दिले. तेव्हा त्यांची पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी त्या वेगळ्याच आनंदात होत्या.
इ. पू. आईंच्या गावी (मांडवगण, महाराष्ट्र) येथे भगवान शिवाचे श्री सिद्धेश्वर नावाचे ग्रामदैवत आहे. पू. आईंची भगवान शिवावर पुष्कळ श्रद्धा असल्याने श्री सिद्धेश्वर त्यांना शिवाच्या रूपात दर्शन द्यायचा.
२२ ऊ २. स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन होणे
पू. आईंना स्वप्नात अनेक वेळा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन व्हायचे. गुरुदेव त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलायचे. त्यानंतर त्या पुष्कळच आनंदी दिसायच्या. ते चैतन्य आम्हालासुद्धा मिळायचे.
२३. अर्धांगवायूचा झटका आल्यावर पू. आईंच्या शरिराची डावी बाजू निकामी होणे आणि ‘सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले उपाय, पू. आईंचा देवाप्रतीचा भाव अन् नियमित तेलाने मर्दन’, हे सर्व केल्यावर पू. आई बर्या होणे
पू. आईंना वयाच्या ८६ व्या वर्षी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामध्ये त्यांच्या शरिराची डावी बाजू निकामी झाली होती. त्यांना बसतासुद्धा येत नव्हते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर ‘त्यांचे वय पुष्कळ आहे. आम्ही काही उपचार करू शकत नाही. तुम्ही त्यांना परत घरी घेऊन जा’, असे आधुनिक वैद्यांनी सांगून काहीच उपचार न करता त्यांना घरी पाठवून दिले. घरी आल्यावर सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय चालू केले. नियमितचा जप, पू. आईंचा देवाप्रतीचा भाव, श्रद्धा आणि नियमित तेलाने मर्दन असे सातत्याने ६ मास केल्यावर पू. आई या आजारपणातून बर्या झाल्या आणि चालू-फिरू लागल्या.
२४. अनुभूती
आजारपणात देवीने स्वप्नात येऊन पू. आईंच्या पायावरून हात फिरवणे आणि त्यानंतर त्यांच्या पायाची हालचाल चालू होऊन त्यांना चालता येणे
आजारपणात त्या देवाशी पुष्कळ बोलायच्या. त्या देवाला शरण जाऊन प्रार्थना करायच्या. एकदा त्यांच्या स्वप्नात देवी आली आणि देवीने त्यांच्या पायावरून हात फिरवला. त्यानंतर त्यांच्या पायाची हालचाल चालू झाली आणि नंतर त्यांना थोडे चालता येऊ लागले.
४ मास झोपून असलेल्या पू. आई उठून बसल्या. देवीनेच स्वप्नात येऊन त्यांना बरे केले.’