कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवत आहे. वर्ष 2017 पासून या अभियानांतर्गत हिंदू समाजात हिंदु राष्ट्र आणि आदर्श राष्ट्र उभारणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदू, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रयत्नांना ईश्वराच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी संपूर्ण भारतभर साकडे घालण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील समविचारी हिंदूंनी एकत्र येऊन साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे घातले.
या वेळी श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी ‘भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच विश्वकल्याण व्हावे’, यांसाठी प्रार्थना करण्यात आली. हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार वारंवार रुजवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आध्यात्मिक बळ देणारे संत-महंत यांनाही उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठीही प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, सौ. मनीषा बीडकर, उद्योजक श्री. आनंद पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, श्री. कैलास जाधव, मराठा तितुका मेळवावा’चे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर, ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हरि विष्णु कुंभार, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, सौ. मेघा जोशी, सौ. सुरेखा काकडे यांसह अन्य उपस्थित होते.
याच समवेत कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, निगवे, भुयेवाडी, हुपरी यांसह अन्य गावांमध्येही ५० हून अधिक देवालयांमध्ये साकडे घालण्यात आले. जन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध भागातील मंदिराची स्वच्छताही करण्यात येत आहे. आतापर्यंत ३३ हून अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. हिंदु धर्मात ‘मंदिरे’ हीच धर्माचे प्राण आहेत. या प्राणाला अर्थात मंदिरांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकच हिंदूचे प्रथम कर्तव्य आहे. मंदिरे ही सात्त्विकतेची स्रोतच आहेत. हाच हेतू ठेवून विविध मंदिराचा परिसर आणि इतर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे.