आध्यात्मिक उपायांसाठी ‘दशप्रणवी गायत्री मंत्र’

Article also available in :

गायत्री मंत्राचे द्रष्टे ऋषी, देवता आणि छंद

गायत्र्या विश्वामित्र ऋषिः सविता देवता गायत्रीच्छन्द:

अर्थ : गायत्री मंत्राचे द्रष्टे ऋषी विश्वामित्र, देवता सविता (सूर्य), तर छंद गायत्री आहे.

 

मंत्र

ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ।

ॐ भूर्भुवः स्वः । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।

ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् ।

अर्थ : सात व्याहृतींचे (सप्तलोकांचे) ॐकारपूर्वक स्मरण करून आम्ही दैदीप्यमान भगवान सविता (सूर्य) देवतेच्या त्या तेजाचे ध्यान करतो. ते (तेज) आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो. आपतत्त्व हे ज्योती (ऊर्जा), रस, अमृत, ब्रह्म, भूलोक, भुवर्लोक, स्वर्गलोक आणि ॐकारस्वरूप आहे.

 

 

या गायत्री मंत्रामध्ये दहा वेळा ‘ॐ’चा (प्रणवाचा) उच्चार होत असल्याने याला ‘दशप्रणवी गायत्री मंत्र’ असे म्हणतात. दशप्रणवी गायत्री मंत्र वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो.

 

गायत्री मंत्राविषयी माहिती

१. मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य आणि स्वरांसहित असेल, तरच मंत्र म्हणण्याचा उद्देश साध्य होतो. मंत्र म्हणतांना चुकीचा म्हटल्यास त्यातून निर्माण झालेल्या त्रासदायक (अयोग्य) स्पंदनांमुळे संबंधित व्यक्तीला त्रास होतो; म्हणून वरील गायत्री मंत्र केवळ उपनयन झालेल्यांनी योग्य गुरूंच्या मार्गदर्शनानुसार म्हणावा. सकाळच्या वेळी स्नान झाल्यावर मंत्रपठण केल्यास या मंत्राचा जास्त लाभ होतो.

२. हा मंत्र एखाद्याला त्याच्या गुरूंनी उपासना म्हणून म्हणण्यास सांगितला असल्यास गुरूंच्या संकल्पामुळे त्या व्यक्तीला मंत्रातून निर्माण होणार्‍या शक्तीचा त्रास होत नाही.

३. मंत्रपठण करतांना आहार आणि आचार यांचे नियम पाळणे आवश्यक आहे, तरच त्या मंत्राचा योग्य प्रमाणात लाभ होतो. आहार आणि आचार यांचे नियम न पाळल्यास त्यातून निर्माण होणार्‍या दोषांचे निरसन करण्यासाठी मंत्रशक्ती वापरली जाते; त्यामुळे मंत्रपठण करणार्‍यांना अपेक्षित लाभ होत नाही.

 

गायत्री मंत्र कधी म्हणू नये ?

१. गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर म्हणू नये.

२. सुवेर आणि सूतक यांच्या कालावधीत मंत्रपठण करू नये.

३. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये; कारण मंत्रातील तेजतत्त्वामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.

 

मंत्रोपचाराचे लाभ

वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या व्यक्तींवर या मंत्रामुळे उपाय होतात. त्रासदायक आवरणामुळे जाणवणारा जडपणा न्यून होऊन हलकेपणा जाणवतो.

Leave a Comment