
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – आपल्या जीवनातील ८० टक्के दुःखांच्या मागे आध्यात्मिक कारण असते आणि त्यावर उपाय म्हणून साधना करणे आवश्यक आहे. जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आणि सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी सतत करायचे प्रयत्न आहेत, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. तालुक्यातील शारदा विद्यालय, मळगाव आणि ग्रामपंचायत सभागृह, आंबेगाव या परिसरातील धर्मप्रेमींसाठी ‘धर्माचरण आणि साधनेचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या वेळी सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘साधनेच्या आरंभीच्या टप्प्यात आध्यात्मिक उन्नतीसाठी कुलदेवतेचा नामजप करणे उपयुक्त असते. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व देवतांपैकी आपली कुलदेवता आपल्याला अधिक जवळची असते, तसेच ती आपली आध्यात्मिक उन्नती करणारी असते. सध्याच्या काळात पूर्वजांचा त्रास होऊ नये; म्हणून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप प्रतिदिन करावा. देवतेच्या तत्त्वाचा लाभ सातत्याने मिळवण्यासाठी देवतेची उपासनाही सातत्याने व्हावी लागते. कलियुगासाठी नामजप ही सोपी आणि सर्वाेत्तम उपासना असून सातत्याने होऊ शकेल, अशी ती एकच साधना आहे.’’ या वेळी उपस्थितांनी साधनेविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आणि गावात सत्संग चालू करण्याची मागणी करण्यात आली. सनातनच्या अध्यात्म आणि साधना विषयक ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष येथे लावण्यात आला होता.