मागील लेखात आपण अलंकार या शब्दाची व्युत्पत्ती, अलंकारांची निर्मिती, स्थुलातील आणि सूक्ष्मातील अलंकार, आणि वैराग्यरूपी चार अलंकार यांविषयीचे विवेचन पाहिले. सत्ययुगापासून अलंकारांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. जशी युगे पालटत गेली, तसा अलंकार घालण्याच्या पद्धतीत आणि अलंकारांमध्ये पालट होत गेला. प्रत्येक युगात सत्त्वगुणाचे प्रमाण अल्प (कमी) होत जाऊन रज आणि तम गुणांचे प्राबल्य वाढत गेले तशी आसुरी अलंकारांची निर्मिती होऊ लागली. ती कशी, हे या लेखातून जाणून घेऊया.
१. युगांप्रमाणे अलंकार घालण्याच्या प्रमाणात झालेला पालट (बदल)
अ. सत्ययुगापासून अलंकारांच्या निर्मितीला आरंभ झाला.
आ. द्वापरयुगात रजोगुणाचे प्राबल्य असल्यामुळे आणि त्यात वाढ होत असल्यामुळे जिवातील त्रिगुणांचा समतोल राखण्यासाठी स्थुलातून अलंकार घालण्याचे प्रमाण जास्त होते.
इ. कलियुगातील जिवांच्या अधःपतनास आरंभ झाल्यामुळे त्यांना ईश्वरी गुण ग्रहण होण्यासाठी बाह्य अलंकाररूपी स्थूल आयुधे आणि यंत्रे यांची आवश्यकता पडली.’
– एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गडेकर यांच्या माध्यमातून, माघ शुक्ल पक्ष सप्तमी (१३.२.२००७), सकाळी ११.४० आणि फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२३.३.२००८), सकाळी ११)
२. युगांनुसार स्त्रियांच्या अलंकारधारणामागील पालटलेला (बदललेला) दृष्टीकोन
अ. आदीयुगात अलंकारांची अनावश्यकता
‘आदीयुगामध्ये स्त्री ही अलंकारविरहित अवस्थेत पातिव्रत्याचे आणि तद्नंतर येणार्या वैराग्यभावाचे तंतोतंत पालन करणारी असल्याने तिला अलंकारधारणेतून निर्माण होणार्या नैतिकतेस्वरूप संस्कारबंधनांची आवश्यकता भासली नाही.
आ. कलियुगात अलंकारांची आवश्यकता
आता काळ पालटला, तसे सृष्टीचे प्रकृतीस्वरूपी नियमांचे रूपही पालटले. स्त्रीला अलंकाररूपी संस्कारबंधनांची आवश्यकता भासू लागली. सृष्टीचे प्रकृतीस्वरूपी नियमांचे रूप पालटण्याचा एक भाग म्हणजे पतीच्या निधनानंतर स्त्रीमध्ये आचारयुक्त वैराग्यधारणेचे संवर्धन करणारी संकल्पना, म्हणजेच विधवांना अलंकार घालणे निषिद्ध असणे.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.१.२००८, दुपारी ५.०६)
(आदीयुगातील स्त्रियांची सात्त्विकता कलियुगातील स्त्रियांच्या सात्त्विकतेच्या तुलनेत फार जास्त होती. त्या काळी स्त्रिया सात्त्विकतेला धरूनच अलंकार घालत असत.‘नैतिकतेस्वरूप संस्कारबंधन’ हा अलंकारधारणेमागील उद्देश नव्हता. अशा अर्थाने वर आदीयुगात स्त्रियांना अलंकारांची आवश्यकता नव्हती, असे म्हटले आहे. – संकलक)
३. युगांनुसार दैवी आणि आसुरी अलंकार घालण्याचे प्रमाण पालटत जाणे
देवतांनी मानवी जिवांच्या रक्षणार्थ दिव्य अलंकारांची,
तर असुरांनी काळी शक्ती मिळवण्यासाठी आसुरी अलंकारांची रचना करणे
अ. ‘सत्ययुगात दैवी अलंकार घालण्याचे प्रमाण जास्त होते आणि आसुरी अलंकारांचे प्रमाण अल्प (कमी) होते.
आ. द्वापरयुगात असुरांनी आसुरी अलंकारांत वाढ केली. त्यांनी ‘अलंकार स्वतःच्या देहावर घालून त्यातून काळी शक्ती मिळवणे आणि ते जिवाच्या स्थूल आणि सूक्ष्म देहात सूक्ष्म-रूपात ठेवणे’, यांस आरंभ केला.
इ. कलियुगातील व्यक्तीच्या देहावर स्थुलातून दिसणार्या अलंकारांपेक्षा सूक्ष्मातील आसुरी अलंकारांचे प्रमाण जास्त असणे: कलियुगात जिवाचे अधःपतन झाल्यामुळे आणि त्याची ईश्वरी चैतन्याशी ओळख घटल्यामुळे (कमी झाल्यामुळे), तसेच तो काळ्या शक्तीच्या संपर्कात सतत आल्यामुळे त्याला आसुरी अलंकारांची आवड निर्माण झाली. त्यामुळे कलियुगातील जिवाच्या देहावर स्थुलातून दिसणार्या अलंकारांपेक्षा सूक्ष्मातील आसुरी अलंकारांचे प्रमाण जास्त असते.
ई. युग आणि दैवी अन् आसुरी अलंकार यांचे प्रमाण –
युग | दैवी अलंकारांचे प्रमाण | आसुरी अलंकारांचे प्रमाण |
१. सत्य | जास्त | अल्प (कमी) |
२. त्रेता | जास्त | अल्प (कमी) |
३. द्वापर | समान | समान |
४. कलि | अल्प (कमी) | जास्त |