विज्ञानाविषयीचे तात्त्विक, तसेच अन्य विवेचन या लेखाद्वारे समजून घेऊया.
१. ‘विज्ञान’ शब्दाचा अर्थ
‘विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत; पण सामान्यपणे जड पदार्थ आणि नैसर्गिक घटना यांचे निरीक्षण करून अन् प्रयोग करून आपल्या इंद्रियांच्या साहाय्याने जे ज्ञान प्राप्त होते, ते क्रमबद्ध आणि नियमबद्ध केले असता जे शास्त्र निर्माण होते, त्याला ‘विज्ञान’ म्हणतात.
२. विज्ञानाची कार्यपद्धत
यासंबंधी प्रा. के.वि. बेलसरे यांनी जे विवेचन केले आहे, ते असे – भौतिक वस्तूंचे गुणधर्म आणि परस्परसंबंध जाणून घेऊन, त्यांतील सामान्य नियम शोधून काढणे अन् त्या नियमांची तर्कशुद्ध प्रणाली बनवणे, हे विज्ञानाचे कार्य होय. सूक्ष्म-निरीक्षण, वर्गीकरण, नियम आणि त्यांच्या आधारे अनुमान करणे, या विज्ञानाच्या चार पायर्या आहेत. वस्तूंच्या वागण्याचे नियम समजले की, त्यांच्या वागण्यावर सत्ता चालवण्याचा प्रयत्न करता येतो. अशा रितीने वीज, उष्णता, प्रकाश, ध्वनी, पाणी, वायू (हवा) इत्यादी शक्तींना स्वाधीन करून घेऊन स्थल, काल, गती, रोग इत्यादींवर मनुष्य विजय मिळवू शकतो. या जगतातील वस्तूंच्या वागण्याचे जे विविध नियम आहेत, त्यांत कार्यकारणभाव हा नियम सर्वांत व्यापकपणे आढळतो; म्हणून विज्ञानाचा मुख्य भर वस्तूंमधील कार्यकारणसंबंध निश्चित करण्यावर असतो. विज्ञानाच्या दृष्टीने जगतातील सर्व घटना अत्यंत नियमबद्ध आहेत. निसर्गात गूढ, चमत्कारमय असे काही नाही. ज्या घटना गूढ वाटतात, त्यांचा कार्यकारणभाव कळल्यानंतर त्या गूढ वाटत नाहीत. कार्यकारणभावाच्या ज्ञानाचा उपयोग करून मनुष्याने आगगाडी, विमाने, विजेचे दिवे, आकाशवाणी, दूरभाष इत्यादी विलक्षण साधने निर्माण केल्यामुळे आपले नित्याचे जीवन पार पालटून गेले आहे.’
३. विज्ञान आणि भारतीय समाज
अ. भारतियांच्या अंतर्मुख वृत्तीमुळे त्यांचे
विज्ञानाकडे दुर्लक्ष झाल्याने देशाची व्यावहारिक उन्नती कुंठित होणे
‘प्राचीन भारतीय पंडितांनी समाजाला आंतरिक आणि बाह्य सुख सारखेच लाभावे, या दृष्टीने प्रयत्न केले; कारण आंतरिक सुखावाचून बाह्य सुख निरर्थक ठरते. ख्रिस्ताब्दच्या १० व्या शतकानंतर आम्ही केवळ आंतरिक साधनेलाच महत्त्व देऊ लागलो. भक्ती आणि धर्म या क्षेत्रांत विपुल विचारविमर्श चालू राहिला; पण विज्ञानाकडे आम्ही दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे, तर प्राचीन ऋषीमुनींनी संग्रहित केलेले ज्ञानही आम्ही विसरून गेलो. त्यामुळे देशाची व्यावहारिक अवनती झाली.’
आ. व्यावहारिक अवनतीचे पर्यवसान नैतिक मूल्यांच्या र्हासात होणे
देशातील जनता आळशी, दरिद्री, रोगांनी पीडित आणि दुर्बल बनली. देशात निरुद्योगीपणा (बेकारी) वाढला. भुकेलेली माणसे अध्यात्माचा विचारही करू शकत नाहीत. नीतीमूल्ये रसातळाला गेली. याचा परिणाम म्हणजे लोक भ्रष्टाचारी, लाचलुचपतखोर आणि गुंड बनले.
इ. पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाटून भारतियांनी विज्ञानाची कास धरणे
या पार्श्वभूमीवर भारतातील तरुण पिढीला पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. पाश्चात्त्य संस्कृती बहिर्मुख आहे. तिने विज्ञानाच्या साहाय्याने बाह्य जगाचा शोध घेतला. पाश्चात्त्यांप्रमाणे भारतियांनीही मग विज्ञानाची कास धरली.
ई. विज्ञान प्रदान करत असलेल्या सुखात गुरफटल्याने भारतियांना अध्यात्माचा विसर पडणे
विज्ञानामुळे भारतीय सुखी होऊ लागले. पुढे विज्ञानामुळे मिळणार्या सुखातच ते गुरफटून राहिल्याने अध्यात्माचा त्यांना विसर पडला आणि त्यामुळे त्यांची खर्या अर्थाने अवनती झाली.’