अनुक्रमणिका
३. पूर्वपुण्याईने प्राप्त होणार्या गोष्टी
५. पुण्याचे प्रकार – शुद्ध पुण्य आणि अशुद्ध पुण्य
वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये अडकतो. यांपैकी पुण्य म्हणजे काय ? पुण्याचे प्रकार, पुण्य मिळण्याची कारणे, पूर्वपुण्याईने मिळणार्या गोष्टी कोणत्या ? यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.
प्रस्तुत लेख वाचून वाचकांना पाप-पुण्याकडे पहाण्याची एक नवी दृष्टी लाभावी आणि पाप-पुण्याच्या पलीकडे जाऊन आनंदप्राप्ती करून घेण्यासाठी सदैव साधना करण्याची प्रेरणा मिळावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !
१. व्याख्या
अ. ‘इष्टान्तरजनकम्’ म्हणजे वेगळे इष्ट फळ उत्पन्न करणारे, ते पुण्य होय.
आ. ‘विहितानुष्ठानजन्यं पुण्यम्’ म्हणजे विहित कर्माने जे उत्पन्न होते, ते पुण्य होय.
इ. धर्मशास्त्रकारांनी जे आचारविषयक नियम केले आहेत, त्या नियमांचे यथायोग्य पालन केल्याने जी एक विशेष शक्ती किंवा सामर्थ्य प्राप्त होते, त्याला ‘पुण्य’ असे म्हणतात.
ई. पुण्य म्हणजे परउपकार, दुसर्याचे हित करणे. हिताचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. पाशव हित
मुर्खांना किंवा वेड्यांना जबरदस्तीने जेऊ घालणे, हे ‘पाशव हित’ होय (अर्थात पुण्य मिळते). हे हित बळजबरीनेही करावे; परंतु त्यात त्यांना सुख होईल, इतके तारतम्य ठेवावे.
२. प्रापंचिक हित
धन, सल्ला, औषध इत्यादींनी मित्रादिकांचे कल्याण करणे, याला ‘प्रापंचिक हित’ म्हणतात. ज्याचे हित करावयाचे तो ‘नको’ म्हणत असेल, तर करू नये. अन्यथा ते हित करणार्याच्या गळ्यात लोभ आणि अपमान पडतात.
३. पारमार्थिक हित
‘परब्रह्मतत्त्वाचे ज्ञान करून देणे, हे ‘पारमार्थिक हित’ होय. अंगी दंड देण्याचे सामर्थ्य असेल, तर दुसरा ‘नको’ म्हणत असतांनाही हे हित करावे; परंतु स्वतःच्या सद्गुणांचे रक्षण करावयाचे असेल, तर (परमार्थ्याच्या) अधिकारावाचून हे हित करू नये; कारण त्यामुळे तपक्षय होतो. अंगी दंड देण्याचे सामर्थ्य नसेल, तर दुसर्या अधिकार्याशी भाषणच करू नये; कारण त्याने लोभाचा आरोप गळ्यात पडतो.’ – श्री गुलाबराव महाराज
२. पुण्य मिळण्याची कारणे
अ. धर्मशास्त्रनियमांचे पालन
धर्मशास्त्रनियमांचे पालन करणे (केल्याने पुण्य मिळते.)
आ. अश्वमेध
‘अश्वमेधासारखे पुण्य नाही.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
इ. विशिष्ट काळी विशिष्ट गोष्टींशी सान्निध्य किंवा साहचर्य करणे किंवा विशिष्ट कृती करणे
१. पर्वकाळी तीर्थस्नान आणि देवदर्शन करणे, उदा. मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थक्षेत्री स्नान केल्याने महापुण्य मिळणे
२. गायीला स्पर्श करणे (केल्याने पुण्य मिळते.)
३. गोमय आणि गोमूत्र लावून स्नान करणे
४. संत आणि देवता यांचा तीर्थ-प्रसाद सेवन करणे
५. क्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधणे, अन्नछत्रे घालणे, विद्यादान, भूमीदान इत्यादी दाने देणे, विविध व्रते आणि उपवास करणे (केल्याने पुण्य मिळते.), कोणते दान कोणाला दिले, म्हणजे काय पुण्य मिळते, याचे वर्णन बृहस्पतीस्मृतीमध्ये केले आहे.
ई. विधीतील संकल्पात असलेल्या सामर्थ्यामुळे कृतीपेक्षा संकल्पाने जास्त पुण्य मिळणे
कृती ही वैखरी वाणीप्रमाणे आहे; म्हणून तिने अल्प पुण्य मिळते, तर संकल्प हा परावाणीप्रमाणे असल्याने त्याने जास्त पुण्य मिळते. त्यामुळे दानाचा संकल्प केला, तरी पुरेसे असते; मात्र त्यात संकल्पाचे सामर्थ्य हवे. ती इच्छा नको.
उ. चांगले कर्म आणि साधना यांचे फळ
१. चांगले कर्म
चांगल्या कर्मामुळे पुण्य मिळते आणि त्यामुळे सुख मिळते.
२. साधना
साधना केल्याने आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजे पापपुण्य आणि सुख-दुःख यांच्या पलीकडील आनंद मिळतो आणि आनुषंगिक फळ म्हणून सुख मिळते.
ऊ. दुसर्याच्या साधनेसाठी त्याग
सासूला यात्रेला जाता यावे; म्हणून सुनेने कार्यालयातून सुटी घेऊन घर सांभाळले आणि त्यामुळे सासू यात्रेला जाऊ शकली. असे झाले, तर सुनेला सासूच्या तीर्थयात्रेचे अर्धे पुण्य मिळते. असे असले, तरी शक्यतो दुसर्याच्या साहाय्याने साधना करू नये.
ए. पतीचे अर्धे पुण्य पत्नीला
पती जसे दानधर्म इत्यादी करतो, तसे पत्नीला स्वतःची मिळकत नसल्याने करता येत नाही. तेव्हा दानाचे पुण्य पत्नीला मिळावे, यासाठी धर्माने पतीचे अर्धे पुण्य पत्नीला मिळण्याची सोय केली आहे.
ऐ. पुण्य दुसर्याला देणे
स्वतःचे पुण्य दुसर्याला दिल्याने ते वाढते; पण त्यामुळे देणारा जास्त काळ स्वर्गात अडकला जातो. ‘मी पुण्य देतो’, असे म्हणतो, तेव्हा त्यातही ‘मी’पण असतेच.
३. पूर्वपुण्याईने प्राप्त होणार्या गोष्टी
मानुष्यं वरवंशजन्म विभवः दीर्घायुरारोग्यता ।
सन्मित्रं सुसुतः सतीप्रियतमा भक्तिश्च नारायणे ।
विद्वत्त्वं सुजनत्वमिंद्रियजयः सत्पात्रदाने रतिः ।
ते पुण्येन विना त्रयोदश गुणाः संसारिणां दुर्लभाः ।। – प्रवृत्तीमार्ग (जेरेस्वामी शंकराचार्य)
अर्थ : मनुष्याचा जन्म आणि त्यातही श्रेष्ठ कुळात जन्म, वैभव, दीर्घायुष्य, निरोगी शरीर, चांगले मित्र, चांगला पुत्र, पतीव्रता आणि प्रिय अशी पत्नी, परमेश्वराची भक्ती, विद्वत्ता, सौजन्य, इंद्रियांवर म्हणजे विषयवासनांवर विजय आणि सत्पात्राला दान करण्याची आवड या तेरा गोष्टी पूर्वपुण्याईविना केवळ दुर्लभ आहेत. पूर्वपुण्याईने हे सर्व मिळाले, तर त्याचा लाभ घेऊन जो साधना करतो, त्याचीच आध्यात्मिक उन्नती होते.
४. पुण्य न मिळणे
कर्तव्यकर्म करणे, उदा. बायको-मुलांचे पालनपोषण करणे (केल्याने), दुसर्याच्या धनाने परोपकार करणे.
५. पुण्याचे प्रकार – शुद्ध पुण्य आणि अशुद्ध पुण्य
पुण्यरूपे पापे स्वर्गा जाईजे । पापरूपे पापे नरका जाईजे ।।
जेणे मजचि मिळीजे । ते शुद्ध पुण्य गा ।। – भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)
भावार्थ : ‘शास्त्रविहित यज्ञयागादिकांसारखे पुण्यसुद्धा पापच आहे’, असे माऊलीने (ज्ञानेश्वरांनी) सांगितले आहे.
तात्पर्य : पुण्यसुद्धा (पुण्य हे) पापाप्रमाणेच आहे; कारण पुण्याचरणामुळे स्वर्गात गेल्यावर पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मृत्युलोकात यावे लागते. पापाचरणाने नरकात गेल्यावर भोगसमाप्तीनंतर पुन्हा मृत्युलोकी जन्म येतो. एक सोन्याची बेडी, तर एक लोखंडी; परंतु दोन्ही बेड्याच (बंधनेच) म्हणून त्यावर उपाय हा की, जपतपयज्ञादी कर्मे हीसुद्धा ईश्वरप्रीत्यर्थ्य फलासक्ती न ठेवता कर्तव्य म्हणून करावीत, म्हणजे माझी (ईश्वराची) प्राप्ती होते. यालाच शुद्ध पुण्य असे म्हणतात.
६. खरा पुण्यवान
जन्तूनां नरजन्मदुर्लभमतः पुंस्वं ततो विप्रता ।
तस्मात् वैदिक धर्ममार्ग परता विद्वत्वं तस्मात् परम् ।
आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः ।
मुक्तिर्नो शतकोटिजन्म सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते । – भगवतपाद शंकराचार्य
अर्थ : आधी मनुष्यजन्म दुर्लभ, त्यातही पुरुषजन्म अधिक दुर्लभ. त्यातून ब्राह्मण कुळात जन्म अती दुर्लभ. वैदिक धर्ममार्ग श्रद्धापूर्वक आचरायचा आणि वेदविद्यांचा अभ्यास करायचा, हे त्याहूनही दुर्लभ. ‘आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक, आत्म्याचा साक्षात्कार, ‘ब्रह्म आणि आत्मा एकच’ या भावनेत प्रयत्नाने चित्त रहाणे आणि ‘प्रयत्नाविना चित्त नेहमी ब्रह्मस्वरूपात रहाणे’, हीच मुक्ती ! शतकोटी जन्मांत केलेल्या पुण्याविना या सर्व अनुकूल गोष्टी मानवाला प्राप्त होत नाहीत.
७. संतसहवास
पाप्याला संतसहवासही त्याच्या पुण्यानेच मिळतो.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पुण्य-पाप आणि पापाचे प्रायश्चित्त’
पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी साधना आवश्यक !
पुण्य यांविषयी आपण या लेखात जाणून घेतले.
येथे लक्षात घ्यावयाची गोष्ट ही की, जिवाला पाप-पुण्य लागण्याच्या मुळाशी जिवाचा ‘अहं’ हाच कारणीभूत असतो. विविध योगमार्गांनुसार अहं दूर करता येतो. उदाहरणादाखल
नामसंकीर्तनयोगात नामधारकाचा नामजप चालू असतांना त्याच्याकडून जे कर्म होते, त्यात हेतू नसल्याने ती केवळ क्रिया असते, म्हणजेच कर्म हे ‘अकर्म कर्म’ होते, म्हणजेच त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही. नामसंकीर्तनयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, गुरुकृपायोग अशा विविध योगमार्गांनुसार पाप-पुण्याच्या पलीकडे जाता येते.
गुरुकृपायोगानुसार पाप-पुण्याच्या पलीकडे जाण्याबरोबरच जलद आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी नेमकी कोणती साधना करावी हे जाणून घेण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ यावर क्लिक करा !
माझ्या कडून अनेक पापे घडले. मि अनेक अपराध केले .मि अनेकांना वाइट अपशब्द बोललो मोठ्यांचा मान राखला नाही.
अनेक वाइट व्या विचार केले .
पण मला आता अध्यात्म कळला मि श्री दत्त भक्ती मध्ये आलो आहे
पण माझ्या मनात एक प्रश्न घर करून आहे की दत्त माउली मला क्षमा करेल का मला जवळ करेल का कृपया मार्गदर्शन करा
नमस्कार,
सर्व धर्माचा त्याग करून जो माझ्याजवळ येईल किंवा मला शरण येईल त्याला मी सर्व पापातून मुक्त करीन, असे भगवान श्रीकृष्णाचे वाचन आहे.
नामस्मरण हे कलियुगात सर्व पापांचा नाश करते, असे प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गुरुदेवांनी सांगितले आहे.
त्यामुळे काळानुसार प्रतिदिन दत्त आणि कुलदेवी यांचा नामजप केल्याने पापांचा नाश होतो.