व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावर ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता

Article also available in :

‘ज्योतिषशास्त्र हे कालज्ञानाचे शास्त्र आहे. ‘कालमापन’ आणि ‘कालवर्णन’ ही त्याची २ अंगे आहेत. कालमापनाच्या अंतर्गत काळ मोजण्यासाठी आवश्यक घटक आणि गणित यांची माहिती असते. कालवर्णनाच्या अंतर्गत काळाचे स्वरूप जाणण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती असते. कालवर्णनाच्या दृष्टकोनातून ज्योतिषशास्त्राची व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावरील उपयुक्तता या लेखाद्वारे समजून घेऊ.

श्री. राज कर्वे

 

१. व्यक्तीगत स्तर

१ अ. व्यक्तीला जन्मतः लाभलेली अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती कळणे

प्रत्येक व्यक्ती तिचे प्रारब्ध सोबत घेऊन जन्माला येते. जगातील प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा निराळी आहे, ती तिच्या प्रारब्धामुळेच. काही व्यक्तींचे जीवन बालपणापासून सुखात जाते; त्यांना सर्व साधन-सुविधांचा लाभ होतो, तर काहींचे जीवन कष्टमय आणि दुःखमय असते. सुखी व्यक्तीकडे सर्वच सुखे असतात, असेही नाही. काहींना विवाहसुख लाभते; पण संततीसुख नसते. काहींना संततीसुख लाभते; पण आर्थिक परिस्थिती बेताची असते. काहींची आर्थिक परिस्थिती चांगली असते; पण आरोग्य चांगले रहात नाही, इत्यादी. जन्मकुंडलीद्वारे ‘व्यक्तीच्या जीवनात कोणत्या गोष्टी अनुकूल अन् कोणत्या गोष्टी प्रतिकूल रहातील’, हे कळते. त्यामुळे जीवनात ज्या गोष्टींची अनुकूलता नाही, त्याविषयी त्रागा करून न घेता ज्या गोष्टींची अनुकूलता आहे, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचा सदुपयोग करून घेण्याची सकारात्मक दृष्टी ज्योतिषशास्त्रामुळे मिळते.

१ आ. व्यक्तीच्या प्रकृतीला अनुकूल अशा कार्यक्षेत्राच्या संदर्भात दिशादर्शन करता येणे

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती निराळी आहे. स्थूलमानाने व्यक्तीमत्त्वाचे ३ प्रकार पडतात.

१ आ १. चर स्वभाव

काही व्यक्ती जन्मतः गतीशील, कार्यतत्पर, महत्त्वाकांक्षी, धाडसी, पुढाकार घेणार्‍या आणि शारीरिक बळ असणार्‍या असतात. याला ज्योतिषशास्त्रात ‘चर स्वभाव’ म्हणतात.

१ आ २. स्थिर स्वभाव

काही व्यक्ती एका जागी स्थिर रहाणार्‍या, उच्चपद प्राप्त करण्यासाठी धडपडणार्‍या, अधिकारीवृत्ती असणार्‍या, व्यवहारबुद्धी लाभलेल्या आणि सुखवस्तू असतात. याला ‘स्थिर स्वभाव’ म्हणतात.

१ आ ३. द्विस्वभाव

काही व्यक्ती कधी गतीमान तर कधी स्थिर, तर्कशक्ती लाभलेल्या, विषयाच्या खोलात जाणार्‍या, ज्ञान मिळवण्यासाठी धडपडणार्‍या, बौद्धिक बळ असणार्‍या आणि विरक्त असतात. याला ‘द्विस्वभाव’ म्हणतात.

व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिच्या प्रकृतीची कल्पना चांगल्याप्रकारे येते. व्यक्तीच्या प्रकृतीचा तिच्या शिक्षणक्षेत्राशी आणि कार्यक्षेत्राशी संबंध असतो. चर स्वभावाच्या व्यक्ती वैद्यक, अभियांत्रिकी, सुरक्षायंत्रणा, उत्पादन, राजकारण, प्रसारमाध्यमे, क्रीडा इत्यादी क्षेत्रांत अग्रणी असतात. स्थिर स्वभावाच्या व्यक्ती प्रशासन, व्यवस्थापन, व्यापार, वित्त, लेखापाल, वाणिज्य, कला इत्यादी क्षेत्रांत पुढे असतात. द्विस्वभावाच्या व्यक्ती संशाेधन, तत्त्वज्ञान, विद्या, शिक्षणसंस्था, न्यायप्रणाली, समुपदेशन, समन्वय इत्यादी क्षेत्रांत प्रवीण असतात. जन्मकुंडलीद्वारे व्यक्तीला तिच्या प्रकृतीला अनुकूल असलेले शिक्षण आणि कार्यक्षेत्र यांच्यासंदर्भात दिशादर्शन करता येते.

१ इ. व्यक्तीच्या जीवनातील अनुकूल आणि प्रतिकूल काळ कळणे

काळ परिवर्तनशील आहे; त्यामुळे परिस्थितीही परिवर्तनशील आहे. कोणतीही चांगली किंवा वाईट परिस्थिती कायमस्वरूपी टिकत नाही. त्याचप्रमाणे जन्मकुंडलीत असणार्‍या शुभ किंवा अशुभ ग्रहयोगांचे फळ जीवनभर एकसारखे मिळत नाही. ते फळ विशिष्ट कालावधीत प्रकर्षाने मिळते. ज्योतिषशास्त्रात कालनिर्णयाच्या विविध पद्धती आहेत. या पद्धतींद्वारे आपल्या जीवनातील विशिष्ट काळ कोणत्या गोष्टींसाठी अनुकूल किंवा प्रतिकूल राहील, याचा बोध होतो.

१ ई. जन्मकुंडलीद्वारे व्यक्तीच्या समस्येमागील आध्यात्मिक कारण कळणे

जीवनातील कोणत्याही समस्येमागे शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक कारणे असतात. समस्यांमागील शारीरिक आणि मानसिक कारणे बुद्धीला कळतात आणि त्यावरील उपाययोजना व्यवहारात उपलब्ध असतात. समस्यांमागील आध्यात्मिक कारणे मात्र बुद्धीला कळत नाहीत, उदा. अतृप्त पूर्वजांचा त्रास, सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास, प्रारब्ध आदींमुळे उद्भवलेल्या विविध समस्या. अशा समस्यांवर शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील उपाययोजना अवलंबण्यास मर्यादा येते. अशा समस्यांवर देवतांचा नामजप करणे, धार्मिक विधी करणे, तीर्थक्षेत्री जाणे, संतसेवा करणे, प्रायश्चित्त घेणे इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील उपाय लागू पडतात. जन्मकुंडलीद्वारे व्यक्तीच्या समस्येमागील आध्यात्मिक कारण लक्षात येते आणि त्या अनुषंगाने आध्यात्मिक उपायांचा अवलंब करण्याविषयी दिशादर्शन करता येते.

१ उ. समस्यांच्या निवारणासाठी नवग्रहांची उपासना सांगणे

‘दैवी उपासना’ हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. उपासेनच्या माध्यमातून व्यक्तीला आवश्यक असलेली सूक्ष्म-ऊर्जा प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रात ग्रहदेवतांच्या उपासेनला महत्त्व आहे. ज्या ग्रहाशी संबंधित सूक्ष्म-ऊर्जा व्यक्तीत अल्प आहे, त्या ग्रहाशी संबंधित उपासना करण्यास सांगितले जाते. ग्रहाशी संबंधित रत्न धारण करणे, मंत्रजप करणे, यज्ञ करणे, नामजप करणे इत्यादी ग्रह-उपासनेचे प्रकार आहेत. जीवनातील अधिकतर समस्यांमागे आध्यात्मिक कारणे असतात; त्यामुळे व्यावहारिक प्रयत्नांना दैवी उपासनेची जोड देणे आवश्यक ठरते.

 

२. सामाजिक स्तर

२ अ. शुभाशुभ दिवसांचे ज्ञान होणे

‘काळाचा प्रभाव ओळखणे’ या उद्देशाच्या पूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली. ज्योतिषशास्त्रामुळे शुभाशुभ दिवसांचे ज्ञान होते. भारतात वैदिक काळापासून महत्त्वाची कार्ये आणि धार्मिक संस्कार शुभ मुहूर्तांवर करण्याची परंपरा आहे. ‘काळानुरूप केलेल्या कार्यात यश मिळते’, हा त्यामागील दृष्टीकोन आहे.

२ आ. काळाच्या स्वरूपाचे ज्ञान होणे

सृष्टीतील सर्व क्रिया काळाच्या आश्रयाने घडतात. काळ स्वतः कर्म करत नाही; परंतु तो सृष्टीचा आश्रय असल्याने त्याला सत्त्व, रज आणि तम या गुणांची उपाधी लावली जाते. काळ सात्त्विक असतांना उत्पत्ती, नवनिर्मिती, विधायक कार्य, ज्ञानवृद्धी आणि धर्मसंस्थापना होऊन समाजाचा लौकिक आणि आध्यात्मिक उत्कर्ष होतो. काळ तामसिक असतांना विनाश, अज्ञान, षड्रिपू, भोगवाद आणि आसुरीवृत्ती प्रबळ होते. भारतीय ज्योतिषशास्त्रातील युगपद्धतीवरून काळाच्या स्वरूपाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होते.

२ इ. समाजाचे प्रारब्ध कळणे

एका शरिरात एक आत्मा निवास करतो, तर एका राष्ट्रात अनेक व्यक्ती म्हणजे अनेक आत्मे निवास करतात. एका व्यक्तीने केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे त्या व्यक्तीला भोगावी लागतात; याला आपण ‘व्यष्टी प्रारब्ध’ म्हणतो. त्याप्रमाणे एका राष्ट्रातील लोकांच्या एकत्रित कर्मांची फळे त्या राष्ट्राला भोगावी लागतात. याला ‘समष्टी प्रारब्ध’ म्हणतात. व्यक्तीप्रमाणे राष्ट्राचीही कुंडली असते. ज्योतिषशास्त्राच्या ‘मेदिनीय’ या शाखेत ग्रहांच्या स्थितीचा राष्ट्रावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. गुरु, शनि, हर्षल इत्यादी मोठ्या ग्रहांमध्ये महत्त्वाचे योग झाल्यावर मोठी स्थित्यंतरे पहायला मिळतात. मेदिनीय ज्योतिषशास्त्राद्वारे राष्ट्र आणि विश्व यांच्यासंदर्भात आगामी काळाचे स्वरूप कसे असेल, याचा वेध घेता येतो.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (१३.२.२०२३)

Leave a Comment