संस्कृत गाण्यावर ‘भरतनाट्यम्’ सादर केलेली आणि कक्षाविषयी प्रबोधन करणारी सनातनची बालसाधिका कु. ईश्वरी कुलकर्णी
अमेरिका – येथील ‘आईस-लँड-लेक’ या शाळेत ३ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘इंटरनॅशनल नाईट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमात ‘हॉलिडे अँड सेलिब्रेशन’ या विषयावर विविध देशांमधील गोष्टींचे सादरीकरण करायचे होते. याच शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणारी सनातनची बालसाधिका कु. ईश्वरी कुलकर्णी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिने या उपक्रमात ‘भरतनाट्यम्’वर आधारित ‘नमो नमो भारताम्बे’ या भारतमातेच्या संस्कृत गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.
भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगणार्या कक्षावर उभे असलेले सनातनचे साधक दांपत्य श्री. अभिजीत अन् सौ. गौरी कुलकर्णी
१. कु. ईश्वरी कुलकर्णी ही मूळची पुणे येथील असून सध्या मिनीयापोलीस, अमेरिका येथे वास्तव्यास आहे. ‘हॉलिडे अँड सेलिब्रेशन’ या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाविषयी माहिती देणे, कक्ष लावणे, त्या संदर्भातील वस्तू, फलक, उपक्रम करणे, तसेच त्या संदर्भातील सादरीकरण करण्यास अनुमती होती. या उपक्रमात शाळेतील १६ देशांचे विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते.
२. कु. ईश्वरी कुलकर्णी हिचे पालक आणि सनातनचे साधक दांपत्य श्री. अभिजीत अन् सौ. गौरी कुलकर्णी यांनी तेथे भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगणारा कक्ष लावला होता. या कक्षावर ते भारतीय पोषाख घालून सहभागी झाले होते. कक्षावर ‘भारतातील दीपावली’ या विषयाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते, तसेच दिवे, रांगोळी, कुंकू यांचे महत्त्व सांगणारा फलक आणि कुंकू लावण्यासाठी ठेवले होते. मागील बाजूस झेंडूच्या माळा, कमळ, पणतीच्या आकृती लावून सजावट-सुशोभीकरण केले होते. या संदर्भातील माहिती देणारी एक ध्वनीचित्रफीत दाखवण्यात येत होती.
३. येथे लावण्यात आलेल्या कक्षावर अनेक विदेशी नागरिकांनी स्वत:हून येऊन कुंकू लावण्याविषयी विचारणा केली. काही जणांनी ‘आम्हाला भारत पहायचा आहे’, असे सांगितले.
४. ‘एकूणच या उपक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीचे महत्त्व विदेशी लोकांपर्यंत पोचवण्यात आम्ही श्रीगुरुकृपेने यशस्वी झालो’, असे श्री. अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले.