ज्योतिषशास्त्र : काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता सांगणारे शास्त्र !

Article also available in :

श्री. राज कर्वे

‘ज्योतिषशास्त्र म्हणजे ‘भविष्य वर्तवण्याचे शास्त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्यामुळे ज्योतिषीने आपले विस्तृत भविष्य सांगावे, असे अनेकांना वाटते. ज्योतिष हे भविष्य सांगण्याचे शास्त्र आहे का, हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ. त्या अगोदर ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन समजून घेऊया.

 

१. ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन

१ अ. ‘काळाचा प्रभाव ओळखणे’ हे ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन असणे

सृष्टीतील प्रत्येक पदार्थ काळाच्या अधीन आहे. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त कोणत्याही पदार्थावर काळाचा प्रभाव आहे; केवळ त्रिगुणातीत परमेश्वरच कालातीत आहे. कोणत्याही पदार्थात होणारे परिवर्तन काळामुळेच प्रत्ययास (दिसून) येते. त्यामुळे ‘काळाचा प्रभाव ओळखणे’ हे ज्योतिषशास्त्राचे मुख्य प्रयोजन आहे. काळाचा प्रभाव ओळखण्यासाठी प्रथम तो मोजणे आवश्यक असते. त्यामुळे ‘कालमापन करणे’ हा ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक टप्पा असून ‘कालवर्णन करणे’ हा अंतिम टप्पा आहे.

१ आ. काळाचे ‘व्यावहारिक’ आणि ‘आध्यात्मिक’ स्वरूप

व्यावहारिक दृष्टीने काळाचा अर्थ ‘अवधी’ असा असून अध्यात्माच्या दृष्टीने काळाचा अर्थ ‘दैव’ (प्रारब्ध) असा आहे. युग, वर्ष, ऋतू, मास, दिवस, प्रहर, घंटा इत्यादी व्यावहारिक काळाचे एकक आहेत. यांमुळे दैनंदिन व्यवहार करणे शक्य होते. व्यावहारिक काळ सर्व लोकांसाठी समान आहे; परंतु अध्यात्माला अभिप्रेत असलेला काळ प्रत्येक व्यक्तीसाठी निराळा आहे (व्यक्तीसापेक्ष आहे). यालाच आपण ‘प्रारब्ध’ म्हणतो. ज्योतिष हे जिवाचे प्रारब्ध जाणून घेण्याचे शास्त्र आहे.

 

२. ज्योतिषशास्त्राचे प्राचीन स्वरूप

मूळ ज्योतिषशास्त्राचे ‘सिद्धांत’, ‘संहिता’ आणि ‘होरा’ असे ३ स्कंध आहेत. ‘सिद्धांत’ स्कंधात युगगणना, कालविभाग, ग्रहांची गती, ग्रहणे इत्यादींचे गणित असते. ‘संहिता’ स्कंधात निरनिराळ्या नक्षत्रांमध्ये ग्रह गेल्यावर पृथ्वीवर होणारे परिणाम, पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती, मुहूर्त आदींची माहिती असते. ‘होरा’ स्कंधात मनुष्याच्या जन्मकालीन ग्रहस्थितीवरून त्याच्या जीवनातील सुखदुःखांचा विचार करण्यासंबंधी विवेचन असते. आधुनिक खगोलशास्त्राच्या आगमनानंतर ज्योतिषशास्त्रातील ‘सिद्धांत’ स्कंध मागे पडून ‘होरा’ स्कंधालाच ‘ज्योतिषशास्त्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

 

३. ज्योतिषशास्त्राद्वारे भविष्याची दिशा ओळखता येणे

‘तंतोतंत भविष्य वर्तवणे’ हा ज्योतिषशास्त्राचा उद्देश नसून ‘भविष्याचा वेध घेणे (भविष्याची दिशा ओळखणे)’ हा उद्देश आहे. ‘व्यक्तीच्या भाग्यात कोणत्या गोष्टींसंबंधी अनुकूलता आणि प्रतिकूलता आहे’, हे ज्योतिषशास्त्र सांगते. मानवी जीवनातील कोणतीही घटना प्रारब्धकर्म आणि क्रियमाणकर्म यांच्या संयोगाने घडते. ज्योतिषशास्त्र प्रारब्धाविषयी सांगू शकते; पण व्यक्तीच्या क्रियमाणाविषयी सांगू शकत नाही, तसेच प्रारब्धातील गोष्टींचा सारांश सांगू शकते; पण तपशील सांगण्यास शास्त्राला मर्यादा आहेत, उदा. व्यक्तीचे आरोग्य, संभाव्य व्याधी आणि आरोग्यासाठी प्रतिकूल काळ यांविषयी सांगू शकते; परंतु नेमकी व्याधी कोणत्या कारणामुळे कधी होईल, हे सांगणे शास्त्राच्या मर्यादेच्या पलीकडील आहे. असे असले, तरी त्यामुळे शास्त्राची उपयुक्तता अल्प होत नाही; कारण व्यक्तीला स्वतःच्या प्रारब्धाविषयी बुद्धीने फारसे लक्षात येऊ शकत नाही. त्यासाठी ज्योतिषशास्त्र हे साधन आहे.

जन्मकुंडलीद्वारे व्यक्तीचे आरोग्य, व्यक्तीमत्त्व, विद्या, कुटुंब, विवाह, कार्यक्षेत्र, अध्यात्म इत्यादींच्या संदर्भात प्रारब्धात असलेल्या स्थितीविषयी दिग्दर्शन करता येते.

 

४. ज्योतिषशास्त्र व्यक्तीला दैववादी बनवते का ?

‘दैववाद’ म्हणजे भाग्यावर विसंबून राहून प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणे. प्रारब्ध हा जीवनाचा अविभाज्य घटक असला, तरी सर्व भारतीय शास्त्रांनी प्रयत्नांनाच महत्त्व दिले आहे. प्रयत्नांनाच ‘पुरुषार्थ’ म्हटले आहे; परंतु प्रयत्नांची दिशा योग्य असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी व्यक्तीला तिच्या प्रारब्धातील परिस्थितीची कल्पना हवी. प्रारब्धानुसार प्राप्त झालेली शारीरिक प्रकृती, बौद्धिक क्षमता, मनोवृत्ती, कला-कौशल्य, घराणे, सामाजिक परिस्थिती इत्यादी पालटत नाही. ज्योतिषशास्त्रामुळे व्यक्तीला तिच्या प्रारब्धातील अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टींचे ज्ञान होते, तसेच वर्तमान काळ कोणत्या प्रयत्नांसाठी अनुकूल आहे, ते कळते. त्यामुळे व्यक्तीच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. ज्योतिषशास्त्र जर तंतोतंत भविष्य वर्तवण्याचे शास्त्र असते, तर ते निश्चित ‘दैववादी’ ठरले असते; परंतु ते भविष्याची दिशा दाखवून देत असल्याने प्रयत्नांसाठी पूरक आहे.

अतः ज्योतिषशास्त्राकडे ‘भविष्य कथनाचे शास्त्र’ म्हणून न पहाता ‘कालविधान शास्त्र’ (काळाची म्हणजे प्रारब्धाची अनुकूलता-प्रतिकूलता सांगणारे शास्त्र) या दृष्टीने पहाणे आवश्यक आहे !’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (३०.१.२०२३)

Leave a Comment