१. रामायण – उत्पत्ति आणि अर्थ
अ. रामायण हा शब्द रं + अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. रम्-रमयते म्हणजे रममाण होणे. `साधनेत रममाण होणे’ याच्याशी संबंधित आनंद आहे. अयन म्हणजे सप्तलोक. आपण साधनेत रममाण राहून, म्हणजे आनंदाची अनुभूती घेत सप्तलोकांना ओलांडून मोक्षाला कसे जायचे, हे ज्यात सांगितले आहे ते रामायण होय.
आ. ‘समस्य अयनं रामायणम् ।’ अयन म्हणजे जाणे, गति, रस्ता. जे परब्रह्म परमात्मरूप श्रीरामाकडे घेऊन जाते, तिकडे जाण्यासाठी चालना देते किंवा उत्साहित करते, जीवनाचा खराखुरा मार्ग दाखवते, तेच रामायण होय. अधर्मरूप रावणावर धर्मरूप रामाने चाल करून त्याचा नायनाट केल्याची कथा प्रामुख्याने ज्यात आहे तेच रामायण, असाही त्याचा अर्थ होतो. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.
२. विविध रामायणे
अ. पूर्वरामायण आणि उत्तररामायण
`रं’ या बीजमंत्राच्या साधनेने अयनातून, म्हणजे सप्तलोकातून, प्रवास कसा करावा हे पूर्वरामायणात सांगितले आहे, तर अशी साधना केलेल्या रामाचे वर्णन उत्तररामायणात आहे.
आ. अध्यात्मरामायण
उमा आणि महेश्वर यांचा संवाद, असे याचे स्वरूप आहे. उमा शंकराला प्रार्थना करते की, `परमेश्वराच्या प्राप्तीचा भक्तियोग हा एक श्रेष्ठ मार्ग आहे; पण अनेकांनी निरनिराळी मते मांडल्यामुळे परमेश्वराच्या स्वरूपाचा निश्चय होत नाही. तरी आपण माझ्यावर कृपा करून परमेश्वराचे खरे स्वरूप मला सांगावे.’ या प्रश्नाचे उत्तर म्हणून शंकराने तिला अध्यात्मरामायण सांगितले.
३. रामायणातील काही प्रसंगांचा भावार्थ
अ. भूमिकन्या सीता
प्रसंग : जमीन नांगरतांना सीता सापडणे
भावार्थ : पृथ्वीच्या गर्भातून येणार्या हिरण्यगर्भलहरींचे बालसीता हे साकार रूप होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ति हे जसे एकत्र असतात आणि त्यातील एक घटक आला की जसे इतर सर्व येतात, उदा. नाम म्हटले की रूप, गंध इत्यादि येतात, तसे विशिष्ट शक्तीचे, हिरण्यगर्भ शक्तीचे, बालसीता हे रूप होते, तर रामपत्नी सीता हे रामाच्या शक्तीचे रूप होते.
आ. कैकेयीचे वर मागणे
प्रसंग : कैकेयीने एका वराने रामास चौदा वर्षे वनवास आणि दुसर्या वराने भरतासाठी राज्य मागून घेतले.
भावार्थ : श्रावणकुमाराचे आजोबा धौम्यऋषि होते आणि त्याच्या आईवडिलांचे नाव रत्नावली अन् रत्नऋषि असे होते. रत्नऋषि नंदिग्रामी अश्वपति राजाचे आस्थान पंडित (राजपुरोहित) होते. अश्वपति राजाच्या कन्येचे नाव होते कैकेयी. रत्नऋषींनी कैकेयीला सर्व शास्त्रे शिकविली होती आणि असेही सांगितले की, दशरथाला मुले झाल्यास ती राज्यावर बसू शकणार नाहीत किंवा दशरथानंतर चौदा वर्षे राजसिंहासनावर कोणी बसल्यास रघुवंश नष्ट होईल. तसे होऊ नये म्हणून पुढे वसिष्ठऋषींनी कैकेयीला दशरथाकडून जे वर मागून घ्यायला सांगितले त्यातील एका वराने तिने रामाला चौदा वर्षेच वनवासात पाठविले आणि दुसर्या वराने भरताला राज्य द्यायला सांगितले; कारण तिला हेही माहीत होते की राम असतांना भरत राजा होणार नाही, म्हणजे राजसिंहासनावर बसणार नाही. वसिष्ठऋषींनी सांगितल्यामुळेच भरताने रामाच्या प्रतिमेची सिंहासनावर स्थापना करण्याऐवजी त्याच्या पादुका आणल्या आणि त्यांची सिंहासनावर स्थापना केली. पादुकांऐवजी प्रतिमेची स्थापना केली असती, तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध एकत्र असतात या न्यायाने, राम गादीवर बसल्यावर जो परिणाम झाला असता, तसाच परिणाम झाला असता.
इ. भरताने रामाच्या पादुका मागणे
‘पादुका मागणे’ म्हणजे ‘चरणावर डोके ठेवणे’ किंवा ‘संपूर्ण शरणागति’. पादुका मागितल्यावर रामाने त्या भरताला दिल्या. त्या डोक्यावरून नेतांना त्याने अंगठा पुढे येईल अशा तर्हेने नेल्या आणि त्यांची सिंहासनावर स्थापना करून पूजा सुरू केली. तेव्हापासून पादुकांची पूजा करणे सुरू झाले.
ई. भरताचे नंदिग्रामी रहाणे
१. प्रसंग : रामाच्या पादुका मिळाल्यावर त्या घेऊन भरत नंदिग्रामी गेला आणि तेथे त्याने रामाच्या पादुका स्थापन केल्या. तो अयोध्येत राहिला नाही.
भावार्थ : नंदिग्रामी म्हणजे अंडकोषात, म्हणजेच ब्रह्मचारी राहिला. `रामाच्या पादुका स्थापन केल्या’ म्हणजे साधक म्हणून राहिला.
२. प्रसंग : पादुका घेतांना भरताने रामाला विनविले की, आपण सीतेसह येण्याच्या एक दिवस आधी मला आपल्या आगमनाची बातमी कळली पाहिजे, म्हणजे मला आपल्या आगमनाची तयारी करता येईल. त्यावर रामाने ‘तथास्तु’ म्हटले.
भावार्थ : सीतेसह म्हणजे शक्तीसह, म्हणजे कुंडलिनी जागृत झाल्यावर. `आपण येण्याच्या आधी’ म्हणजे आत्मारामाची अनुभूती होण्याआधी, म्हणजे निर्बीज अवस्थेत जाण्याआधी, मी त्या अवस्थेत जाणार हे मला कळले पाहिजे, असे म्हटले.
उ. लक्ष्मणाचे वनवासातील जीवन
प्रसंग : सीतेला वाटायचे की कंदमुळे आणतांना लक्ष्मण खाऊन आला असेल, तर रामाला वाटायचे की सीतेने त्याला जेवण दिले असेल; म्हणून ती दोघेही लक्ष्मणाच्या जेवणाची चौकशी करीत नसत.
भावार्थ : लक्ष्मण चौदा वर्षे वायुभक्षण करून राहिला. रामरक्षणासाठी तो झोपलाही नाही, सतत साधना करीत राहिला.
ऊ. सीताहरण
प्रसंग : रावणाने सीतेला पळवून नेऊन स्वत:कडे ठेवले.
भावार्थ : खरी सीता रावणाकडे गेलीच नाही. ती अग्नीत गेली आणि सीतेची छाया रावणाकडे गेली. येथेच खर्या अर्थाने रामलीलेला सुरुवात झाली. मग रावणाकडून परततांना अग्निशुद्धीच्या निमित्ताने ती छाया पुन्हा अग्नीत गेली आणि खरी सीता बाहेर पडली.
ए. रामाने वृक्षांना आलिंगन देणे
प्रसंग : सीताहरणानंतर `सीते, सीते’ असा आक्रोश करीत रामाने वृक्षांना आलिंगन दिले.
भावार्थ : रामाने वृक्षवेलींचे हृद्गत जाणून घेतले.
ऐ. वालीचा वध
प्रसंग : रामाने वालीला बाण मारला आणि त्यामुळे तो मेला.
भावार्थ : रामाने मारलेल्या बाणामुळे वालीची अनाहतचक्राशी अडकलेली आध्यात्मिक उन्नति पुढे सुरू झाली आणि तो मुक्त झाला.
ओ. रावणवध
प्रसंग : रावण महान शिवभक्त होता. तो सहस्रारचक्रात अडकलेला होता. रामाने रावणाचा वध केला नाही, तर त्याच्या सहस्राराचा वेध घेऊन त्याला मोक्ष दिला.
औ. रजकाचा सीतेवर आरोप
प्रसंग : रजक नावाचा धोबी म्हणाला की सीता अशुद्ध आहे; म्हणून रामाने सीतेचा त्याग केला.
भावार्थ १ : सीतेला दोष देणारा रजक, म्हणजे धोबी आहे. धोब्याचे काम आहे कपडा धुवून स्वच्छ करणे. रामावर कुठलाही डाग राहू नये म्हणून धोबी तसे म्हणाला.
भावार्थ २ : धोब्याचे नाव आहे रजक. रजक हा शब्द रज + क या दोन शब्दांपासून बनला आहे. क हे अक्षर एखाद्या गोष्टीचा छोटा अंश दाखविते; म्हणजेच ज्याच्यात `रजोगुणाचा अंश आहे’ असा तो धोबी होता आणि म्हणूनच सीतेची सात्त्विकता त्याला कळली नाही.
अं. शंबुकवध
प्रसंग : शंबुक नावाच्या मातंगाने तपश्चर्या केल्याबद्दल रामाने त्याला मारले.
भावार्थ : शंबुकाने चुकीचे तप केल्याने पृथ्वीवरील वातावरण इतके बिघडले की, त्यामुळे प्रजेला त्रास होऊ लागला आणि ऋषींच्या साधनेत व्यत्यय आला; म्हणून रामाने प्रजापालनार्थ आणि ऋषीमुनींच्या संरक्षणार्थ त्याचा शिरच्छेद केला.
क. श्रीरामाने शरयु नदीत देहत्याग करणे
प्रसंग : सीता धरणीमातेच्या पोटात गेल्यावर श्रीरामाने शरयु नदीत देहत्याग करणे.
भावार्थ : शरयु नदीत श्रीरामाने जीव दिला नाही, तर जलसमाधि घेतली. समाधीचे भूमिसमाधि, जलसमाधि, अग्निसमाधि इत्यादि अनेक प्रकार आहेत. संत ज्ञानेश्वरांनी भूमिसमाधि घेतली. संत एकनाथ आणि रामतीर्थ यांनी जलसमाधि घेतली. ज्याचा देहभाव झडून गेला आहे, त्यालाच हे जमते. श्रीरामाच्या पाठोपाठ तर सर्व अयोध्यावासीयांनी शरयु नदीत जलसमाधि घेतली; कारण श्रीरामाच्या देहत्यागानंतर आता आपल्या जीवनात काही राम (अर्थ) उरला नाही, असे सर्वांना वाटले.