अनुक्रमणिका
आपण वेलवर्गीय भाज्या (उदा. दुधी, काकडी) किंवा फुले (उदा. जाई, जुई) लावतो, तेव्हा त्या वेलींना वर चढण्यासाठी आधार देण्याची आवश्यकता असते. हा आधार मांडवाद्वारे कशा प्रकारे आणि घरातील कोणते साहित्य घेऊन द्यायचा ? म्हणजे वेलवर्गीय भाज्यांची लागवड आणि त्या मिळवणे सोपे होईल अन् त्यासाठी ‘सुटसुटीत मांडव स्वतःच कसा बनवायचा’, हे या लेखाद्वारे पाहू.
१. मांडवासाठीचे साहित्य
१० फूट लांबी, ६ फूट रुंदी आणि ७ फूट उंची असलेल्या मांडवासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे.
१ अ. अर्धा इंच किंवा १ इंच व्यासाचे ‘पीव्हीसी पाईप’ – ६ (खांबांसाठी ४ ऐवजी ६ पाईप वापरून भक्कम मांडव बनवायचा असल्यास ८ पाईप घ्यावेत. (सूत्र ‘७’ पहा.))
१ आ. पाईपच्या व्यासाचे ‘थ्री वे कनेक्टर्स’ – खांबांच्या संख्येनुसार ४ किंवा ६
१ इ. पाईपच्या व्यासाचे ‘कपलर्स’ – खांबांच्या संख्येच्या अर्ध्या प्रमाणात २ किंवा ३
१ ई. पाईपच्या व्यासाचे ‘टी कनेक्टर्स’ – ४ (४ खांबांचा मांडव करायचा झाल्यास यांची आवश्यकता नाही.)
१ उ. पत्र्याचे डबे, प्लास्टिकच्या कुंड्या किंवा रंगाच्या बालद्या – खांबांच्या संख्येनुसार ४ किंवा ६
१ ऊ. सिमेंट – ४ ते ६ किलो
१ ए. वाळू किंवा विटांचा चुरा – ४ ते ६ घमेली
१ ऐ. पाईप कापण्यासाठी करवत किंवा करवतीप्रमाणे दाते असलेली सुरी – १
१ ओ. जाळी बांधण्यासाठी नायलॉन दोरी – १ बंडल
२. साहित्याविषयी काही सूचना
२ अ. हे पाईप, त्याला लागणारे ‘कपलर्स’, तसेच ‘कनेक्टर्स’ इत्यादी ‘हार्डवेअर’च्या दुकानात मिळतात.
२ आ. दुकानदार विकतांना हे पाईप जरी १० फूट असल्याचे सांगत असले, तरी ते बर्याच वेळा ३ – ४ इंच अल्पच असतात. त्यामुळे प्रत्यक्ष साहित्य पाहूनच मापे घ्यावीत.
२ इ. उरलेले सामान परत आणून देण्याच्या बोलीवर आणल्यास सोयीचे जाते.
२ ई. अर्धा इंच व्यासाचे पाईप दोर्या बांधतांना दिल्या गेलेल्या ताणामुळे वाकतात किंवा नंतर दुधी, भोपळा इत्यादींच्या वजनानेही वाकतात. त्यामुळे एक इंच व्यासाचे पाईप घेतले, तरी चालतील.
३. मांडवाचा आकार
स्टूल किंवा शिडीचा वापर न करताही भाज्या सहजासहजी काढता याव्यात, यासाठी मांडवाची उंची ७ फुटांची असावी. यासाठी १० फुटांचे ४ पाईप ७ फुटांवर कापून घ्यावेत. जे ४ लहान तुकडे मिळतात, ते ‘एका कपलरच्या साहाय्याने २ तुकडे’ याप्रमाणे जोडून घ्यावेत. हे जोडून घेतलेले तुकडे मांडवाच्या रुंदीसाठी वापरावेत. ही रुंदी साधारण ६.२५ फूट होते. १० फुटी २ पाईप लांबीसाठी वापरावेत. त्यामुळे मांडवाचा आकार १० फूट लांब, ६.२५ फूट रुंद आणि ७ फूट उंच होतो.
४. मांडवासाठी पाया
यासाठी पत्र्याचे १५ लिटर तेलाचे ४ डबे घ्यावेत. त्यांना खालच्या बाजूला, तसेच चारही बाजूंना तळापासून साधारण १ इंच वर लोखंडी टोच्याच्या साहाय्याने छिद्रे पाडून घ्यावीत. पाण्याचा निचरा होण्यासाठीची ही छिद्रे प्रत्येक बाजूला ३ – ४ या प्रमाणात असावीत. नंतर त्यात पाईप मध्यभागी उभा धरून बाजूने डबा अर्धा भरेल एवढा विटांचा चुरा घालावा. (मला शहरात वाळू मिळणे कठीण गेले. त्यामुळे मी विटांचा चुरा वापरला. विटांच्या चुर्याऐवजी वाळू किंवा खडी यांचा वापरही करता येतो.) हातोडीच्या साहाय्याने विटांचा चुरा व्यवस्थित दाबून घ्यावा आणि ‘त्यात पाईप विनाआधार उभा राहील’, असे पहावे. त्यावर पाणी मारून तो चुरा ओलसर करून घ्यावा आणि त्यावर १ किलो सिमेंट पिठल्यासारखे ओलसर कालवून ओतावे. डबा व्यवस्थित हालवल्यावर ते सिमेंट सरळ पातळीला येते. असे चारही डबे करून त्यात पाईप उभे करावेत. सिमेंट वाळल्यावर रात्रभर डब्यात वर १ – १.५ इंच राहील एवढे पाणी भरून ठेवावे.
४ अ. पायासाठी वापरलेल्या पत्र्याच्या डब्यातही लागवड करणे शक्य असणे
सकाळी सिमेंट घट्ट बसलेले दिसेल. पाईप हालवून पाहिला, तर तो व्यवस्थित उभा असेल. आता लोखंडी टोचाच्या साहाय्याने डब्यातील सिमेंटच्या पातळीवर येतील, अशी चारही बाजूंनी प्रत्येकी ३ – ४ छिद्रे करून घ्यावीत. येथे अर्धा डबा विटांच्या चुर्याने भरण्याचे कारण पुढीलप्रमाणे आहे. डब्याच्या वरच्या उरलेल्या अर्ध्या भागात माती घालून काही रोपे लावता येतात. परागीभवनात साहाय्य करणार्या किटकांना (पोलिनेटर्सना) आकर्षित करून घेणारी फुलझाडे किंवा चिनी गुलाबासारखी मुळांची वाढ अल्प असणारी रोपे या डब्यांत लावावीत.
५. मांडवाचा सांगाडा
यानंतर या डब्यातील पाईपच्या टोकाला ‘थ्री वे कनेक्टर’ बसवावा. डबे योग्य त्या अंतरावर आणि हवे तिथे ठेवल्यावर वरचे लांबी अन् रुंदी यांचे पाईप जोडून घ्यावेत. हा झाला मांडवाचा सांगाडा. हे कनेक्टर्स जोडतांना ते वारंवार निघू नयेत, म्हणून ‘सोल्यूशन’ही हार्डवेअरच्या दुकानात मिळते; पण ते लावल्यावर पाईप पुन्हा सोडवता येत नाहीत; म्हणून मी सोल्यूशन वापरले नाही. मांडव नेहमीसाठी ठेवायचा असल्यास सोल्यूशन वापरल्यास चालते.
६. वेली चढवण्यासाठी मांडवाला दोर्या बांधणे
नंतर यावर उभ्या-आडव्या अशा नायलॉनच्या दोर्या बांधाव्यात. आता मांडव सिद्ध झाला. नायलॉनच्या दोर्यांऐवजी तुम्ही काथ्याही (सुंभही) वापरू शकता; पण ऊन-पाऊस यांमुळे काथ्या लवकर खराब होतो आणि हे काम प्रतीवर्षी करावे लागते; नायलॉनची दोरी वापरली, तर ती न्यूनतम ५ वर्षे तरी नक्कीच टिकेल. या मांडवाचे आयुष्य न्यूनतम ८ ते १० वर्षे धरून चालायला आडकाठी नाही. दोर्या बांधतांना घट्ट बांधल्यास वरच्या चौकटीचा आकार पालटून समोरासमोरच्या दोन्ही बाजू आत वळून आयताचा आकार जातो. त्यामुळे दोर्या बांधतांना थोड्या सैलसर बांधाव्यात.
७. मांडव भक्कम करण्यासाठी उपाययोजना
फळे लागल्यावर मांडवाचे छत खाली झुकेल. हे टाळण्यासाठी थोडा व्यय (खर्च) अधिक करून भक्कम मांडव बनवता येतो. सूत्र ‘३’मध्ये दिल्याप्रमाणे १० फुटांचे २ पाईप कापून २ अधिकचे खांब बनवावेत. तेही पत्र्याच्या डब्यात वर दिल्याप्रमाणे विटांचा चुरा इत्यादी घालून उभे करावेत. हे दोन्ही खांब ‘टी कनेक्टर’च्या साहाय्याने मांडवाच्या मध्यभागी जोडावेत. खांब कापतांना राहिलेले लहान तुकडे ‘कपलर’च्या साहाय्याने जोडून ‘टी कनेक्टर’च्या साहाय्याने मांडवाच्या साधारण मध्यावर येतील, याप्रमाणे जोडून घ्यावेत.
८. मांडवावर वेली चढवणे, तसेच वेली नसतील तेव्हा मांडवाचा सावलीसाठी वापर करणे
मांडव सिद्ध झाल्यावर त्यावर तुम्ही वेली चढवू शकता. (लेखात दिलेले छायाचित्र पहा.) उन्हाळ्यात जेव्हा वेलवर्गीय भाज्या नसतील, तेव्हा याच मांडवावर पातळसर कापड, जुन्या साड्या किंवा ओढण्या घालून सावलीची जाळी (शेडनेट) करून नाजूक रोपांचे तीव्र उन्हापासून संरक्षण करू शकता, तसेच आधाराची आवश्यकता असणारी टोमॅटो, वांगी यांसारखी रोपे मांडवाखाली ठेवून वरून दोर्या सोडून त्या रोपांना बांधू शकता. चवळीसारख्या वेलीही आपण यावर चढवू शकता. केवळ मांडवावर अधिक दाटी होऊ नये आणि मुख्य म्हणजे परपरागीभवन (क्रॉस पॉलिनेशन) होऊ नये, यासाठी मोजक्याच वेली यावर चढवाव्यात.’
– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, जिल्हा ठाणे.