वसई येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
वसई – येथील हिंदु तरुणी श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदु तरुणी देशभरात लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. लव्ह जिहादचे नियोजनबद्ध षड्यंत्र पहाता आणखी हिंदु युवती याला बळी पडतील. ‘लव्ह जिहाद’सह विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वसई (प.) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. वसई येथे हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतराविषयीही त्यांनी या वेळी सांगितले.
सभेला पालघर जिल्ह्यातील मेधे (वसई) येथील परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला यांचेही अमूल्य मार्गदर्शन लाभले. या सभेस विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सदस्य, समाजातील विविध मान्यवर यांच्यासह शेकडो धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या सभेचा प्रारंभ शंखनादाने झाला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर देशभरात चालू असलेल्या समितीच्या व्यापक कार्याविषयीची माहिती समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांनी सांगितली.
भावी पिढीला मातृभाषेतून शिक्षण द्यावे ! – भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला
आपल्या येणार्या पिढीला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत केले पाहिजे. जे राष्ट्रविघातक कृती करतात, त्यांना विरोध करता येईल; मात्र आपण संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास पुढे यायला हवे.