राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) 2 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान गोव्यात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी आज (दि.02) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) गोव्यात दाखल झाले आहेत. या अधिवेशनात भागवत संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. दरम्यान, सरसंघचालक थांबणार असलेल्या नागेशी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोंडा तालुक्यातील नागेशी येथे 2 ते 7 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. संघाशी संबंधित विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका नागेशीत होतील. 05 आणि 06 जानेवारीला संघ परिवाराच्या राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक होईल. 07 जानेवारी रोजी सरसंघचालक डॉ. भागवत संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
दरम्यान, सरसंघसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या होणाऱ्या बैठकीला सहकार्य दत्तात्रेय होसबाळे, विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, भारतीय मजदूर संघाचे बी सुरेंद्रन, भारतीय जनता पार्टीचे बी. एल. संतोष याशिवाय विद्याभारती, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकींना उपस्थित राहणार आहेत.
संदर्भ : गोमन्तक
(सनातन संस्थेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांचे गोव्यात सस्नेह स्वागत !)