शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हणजे आध्यात्मिक जीवनाला गती देणारी पर्वणी !

Article also available in :

‘शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हटली की सामान्यतः आपल्याला भीती वाटते. ‘माझा वाईट काळ चालू होणार, संकटांची मालिका चालू होणार’, इत्यादी विचार मनात येतात; परंतु साडेसाती सर्वथा अनिष्ट नसते. या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात’, याविषयी जाणून घेऊया.

 

१. साडेसाती म्हणजे काय ?

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. ३ राशींतून भ्रमण करण्यास शनि ग्रहाला सुमारे साडेसात वर्षे लागतात. ‘व्यक्तीची जन्मरास, जन्मराशीच्या मागील रास आणि जन्मराशीच्या पुढील रास’ अशा ३ राशींतून शनि ग्रहाचे भ्रमण होत असतांना व्यक्तीला साडेसाती असते. अशा प्रकारची राशीपरत्वे गणना ही स्थूल रूपाने प्रचलित आहे. याविषयी सूक्ष्म पद्धत अशी की, व्यक्तीच्या जन्मराशीत चंद्र ज्या अंशावर असतो, त्याच्या मागे ४५ अंशावर शनि ग्रह आल्यावर साडेसातीला आरंभ होतो आणि त्याच्या पुढे ४५ अंशावर शनि ग्रह गेल्यावर साडेसाती संपते. शनि ग्रह पूर्ण राशीचक्र सुमारे ३० वर्षांत भ्रमण करतो. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात एकदा साडेसाती आल्यानंतर ती पुन्हा सुमारे ३० वर्षांनी येते.

श्री. राज कर्वे

 

२. साडेसाती असतांना कोणत्या प्रकारचे त्रास होतात ?

शनि ग्रह वायुतत्त्वाशी संबंधित ग्रह आहे. विकार, वियोग, विलंब, व्यय इत्यादी वायुतत्त्वाचे अनिष्ट परिणाम आहेत. त्यामुळे शनि ग्रह सांसारिक जीवनाला बाधक ठरतो. साडेसाती असतांना सामान्यतः शारीरिक व्याधी, आर्थिक हानी आणि कौटुंबिक कलह हे दुष्परिणाम वाट्यास येतात. साडेसातीचा सर्वाधिक परिणाम मनावर होतो. ‘इच्छापूर्ती न होणे आणि इच्छेविरुद्ध गोष्टी घडणे’ हे परिणाम अनुभवास येतात.

 

३. साडेसाती नेहमी अशुभ फळ देते का ?

प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थितीनुसार साडेसातीच्या परिणामाचे स्वरूप निरनिराळे असते. काही व्यक्तींना साडेसातीत विशेष कष्ट होत नाहीत, तर काहींना साडेसातीचा काळ चांगला जातो. वर्तमानातील शनि ग्रह मूळ जन्मकुंडलीतील अशुभ स्थानांवरून किंवा अशुभ ग्रहांवरून भ्रमण असल्यास त्रास अधिक होतो,. याउलट शनि ग्रह शुभ स्थानांवरून आणि इतर ग्रहांच्या शुभ योगांतून जात असल्यास त्रास अल्प होतो. त्यामुळे साडेसाती ही सर्वथा वाईट आणि हानीकारक नसते.

 

४. साडेसाती असतांना व्यक्तीला होणारे लाभ

शनि ग्रह सांसारिक जीवनाला बाधक असला, तरी आध्यात्मिक जीवनाला गती देणारा आहे. चिंतनशील स्वभाव, संयम, समाधान, विवेक, वैराग्य आदी शनि ग्रहाचे शुभ गुण आहेत. साडेसातीच्या काळात व्यक्तीला हे गुण वाढवण्यास वाव मिळतो. मानवी मनाची धाव सतत मायेकडे असते. मनाच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढतच असतात. सांसारिक जीवन समृद्ध करण्याच्या धावपळीत ‘आध्यात्मिक जीवनही समृद्ध करणे आवश्यक आहे’, याचा आपल्याला विसर पडतो. साडेसाती हा याचेच स्मरण करून देणारा काळ आहे. संकटकाळी केवळ ईश्वरच साहाय्याला येतो. साडेसाती ही व्यक्तीला अंतर्मुख करते. मायेचा अशाश्वतपणा व्यक्तीच्या ध्यानी येऊन तिच्या जीवनात अध्यात्माला स्थान मिळते. त्यामुळे साडेसातीकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे आवश्यक आहे.

 

५. साडेसातीचा त्रास कुणाला होत नाही ?

आध्यात्मिक उन्नती साध्य केलेल्या साधकाला साडेसातीचा मानसिक त्रास होत नाही. अशा साधकाचा ‘मनोलय’ झालेला असतो, म्हणजे मन साधनेत स्थिर झालेले असते. त्यामुळे साडेसातीच्या काळात, तसेच एरव्हीसुद्धा घडणार्‍या सुख-दुःखाच्या प्रसंगांकडे साधक तटस्थपणे पहातो. प्रारब्धात जे लिहिले आहे, ते टाळणे आपल्या हातात नाही; पण प्रारब्धामुळे होणारा मानसिक त्रास टाळणे आपल्या हातात आहे.

 

६. साडेसातीच्या कालावधीत घ्यावयाची काळजी

६.अ. कुटुंबियांकडून अपेक्षा न करता कुटुंबियांना स्वतःहून साहाय्य करण्याचा प्रयत्न करावा. अपेक्षा केल्यामुळे तणाव निर्माण होतो, तर साहाय्य केल्यामुळे सुसंवाद साधला जातो.

६.आ. आर्थिक निर्णय भावनिक किंवा उतावीळ होऊन न घेता विचारपूर्वक घ्यावेत. अनावश्यक व्यय (खर्च) टाळावा.

६.इ. शरीर निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ : ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’)

६.ई. प्रारब्ध सुसह्य होण्यासाठी ‘कुलदेवी’ आणि ‘दत्त’ या देवतांचा नामजप प्रतिदिन करावा.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ : ‘नामजप कोणता करावा ?’)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा.

Leave a Comment