सनातन संस्थेच्या वतीने पहाडजंग, देहली येथे तणावमुक्ती विषयावर प्रवचनाचे आयोजन
पहाडजंग, देहली – आज आपल्या जीवनात तणावाची विविध कारणे आहेत. तणावमुक्त रहाण्यासाठी प्रतिदिन काही वेळ आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आपल्या स्वत:च्या कृतींचे निरीक्षण करून आम्ही कुठे कुठे अयोग्य कृती किंवा चुकीचे आचरण केले, याचे निरीक्षण केले पाहिजे. यातून आपल्या व्यक्तीमत्त्वातील दोष सापडतील आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न होतील. त्यामुळे आपल्याकडून योग्य कृती होतील. योग्य कृती आणि सकारात्मक विचार राहिले, तर जीवन आनंदमय होईल, तसेच आपला व्यक्तीमत्त्व विकास होण्यास साहाय्य होईल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील नूतन मराठी सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षिकांसाठी ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुलशन नागपाल यांनी ‘अशा प्रकारचे कार्यक्रम पुढेही घ्यावेत’, अशी विनंती केली.