अनुक्रमणिका
‘भारतात प्राचीन काळापासून महत्त्वाचे कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मुहूर्तांचा संबंध वेळोवेळी येतो. मुहूर्त या विषयाची प्राथमिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.
१. मुहूर्त म्हणजे काय ?
मुहूर्त शब्दाचा ज्योतिषशास्त्रीय अर्थ ‘४८ मिनिटांचा कालावधी’ असा आहे; परंतु सध्या प्रचलित असणारा अर्थ ‘शुभ किंवा अशुभ कालावधी’ असा आहे. भारतात वैदिक काळापासून महत्त्वाची कार्ये शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. श्रौत, गृह्य आणि धर्मसूत्रांमध्ये (धर्मशास्त्र सांगणारे प्राचीन ग्रंथ) धार्मिक विधी आणि संस्कार कोणत्या मुहूर्तांवर करावेत, हे सांगितलेले आहे. मुहूर्तांविषयी स्वतंत्र माहिती देणारे अनेक ग्रंथ असून त्यांमध्ये अनेक महत्त्वाची कामे कोणत्या मुहूर्तांवर करावीत, ते सविस्तर दिले आहे. ज्योतिष हे कालमापनाचे आणि कालवर्णनाचे शास्त्र असल्याने ‘मुहूर्त काढणे’ हे केवळ ज्योतिषशास्त्राद्वारे शक्य आहे. ज्योतिषशास्त्र ६ वेदांगांपैकी एक आहे, कारण काळाचे ज्ञान झाल्यावरच वेदांमध्ये सांगितलेली कर्मे करता येतात.
२. मुहूर्त पाहून कार्य आरंभ करण्यामागील उद्देश
विश्वात घडणारी प्रत्येक घटना विशिष्ट स्थळी आणि विशिष्ट काळी घडते; म्हणजेच प्रत्येक घटनेला स्थळ-काळाचे बंधन असते. कोणत्याही कार्यात यश मिळण्यासाठी स्थळ आणि काळ यांची अनुकूलता आवश्यक असते. यासंदर्भात महाभारतातील पुढील श्लोक मार्गदर्शक आहे.
‘नादेशकाले किञ्चित्स्यात् देशकालौ प्रतीक्षताम् ।’ – (महाभारत, वनपर्व, अध्याय २८, श्लोक ३२)
अर्थ : देशकाल (स्थळ-काळ) अनुकूल नसल्यास काही साध्य होणार नाही. अतः देशकालाकडे लक्ष द्यावे.
अतः ‘कार्य यशस्वी होण्यासाठी काळ अनुकूल असणे’ हा मुहूर्त पाहून कार्य आरंभ करण्यामागील उद्देश आहे.
हिंदु धर्माने केवळ महत्त्वाची कार्येच अनुकूल काळ पाहून करण्यास सांगितले आहे, असे नाही, तर ‘मनुष्याने कोणत्या युगात कोणती साधना करावी ?, जीवनातील कोणत्या कालखंडात कोणता पुरुषार्थ साध्य करावा ?, दैनंदिन नित्यकर्मे कोणत्या वेळी करावीत ?’, इत्यादींविषयी सविस्तर सांगितले आहे. थोडक्यात, हिंदु धर्म काळानुसार जीवन आचरण्याची शिकवण देतो.
३. मुहूर्तासाठी विचारात घेतले जाणारे घटक
मुहूर्तासाठी तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण या ५ अंगांचा विचार मुख्यतः होतो. आवश्यकतेनुसार मास, अयन (उत्तरायण आणि दक्षिणायन) आणि वर्ष यांचा विचार होतो. मुहूर्त ठरवतांना कार्याच्या स्वरूपाला पूरक असे गुणधर्म असलेली तिथी, नक्षत्रे इत्यादी घटक निवडले जातात. उदा. प्रवासाला आरंभ करण्यासाठी अश्विनी, मृग, पुनर्वसु, चित्रा इत्यादी वायुूतत्त्वाची (गती दर्शवणारी) नक्षत्रे उपयुक्त आहेत; विवाह संस्कारासाठी अमावास्या आणि ‘रिक्ता’ तिथी वर्ज्य आहेत (चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या रिक्ता तिथी आहेत. रिक्ता म्हणजे न्यूनता); विद्या प्राप्त करण्यासाठी अश्विनी, पुष्य, हस्त, रेवती इत्यादी ‘देवगणी’ नक्षत्रे (सत्त्वगुणी नक्षत्रे) योग्य आहेत; देवतांची प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्तरायणाचा काळ प्रशस्त आहे इत्यादी.
४. शुभ मुहूर्तावर कार्य करणे शक्य नसल्यास काय करावे ?
काही वेळा मुहूर्तावर कार्य आरंभ करणे व्यक्तीच्या हातात नसते, उदा. परीक्षा असल्यास, सार्वजनिक वाहनांतून लांबचे प्रवास करायचे असल्यास इत्यादी. अशा वेळी उपास्य देवतेला कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करावी.
५. संतांनी सांगितलेल्या वेळेमागे त्यांची संकल्पशक्ती असल्यामुळे तोच मुहूर्त असणे
संतांनी एखाद्या कार्यासाठी विशिष्ट वेळ सांगितली असेल, तर वेगळा मुहूर्त पहाण्याची आवश्यकता नसते. संत हे ईश्वरस्वरूप असतात. ईश्वर स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे असतो. त्यामुळे संतांनी एखाद्या कार्यासाठी सांगितलेल्या वेळेमागे त्यांची संकल्पशक्ती असल्यामुळे तोच मुहूर्त असतो.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (१०.१२.२०२२)