केडगाव (पुणे) येथे पू. शरद वैशंपायन यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘कलियुगके त्रिकालदर्शी ऋषि ! योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनजी’ या ग्रंथाचे प्रकाशन !

ग्रंथ प्रकाशन करतांना पू. शरद वैशंपायन

केडगाव (पुणे) – श्री सद्गुरु नारायण महाराज दत्तसंस्थान, बेट केडगाव, ता. दौंड, जिल्हा पुणे येथील प.पू. नारायण महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री दत्तमंदिरात दत्तजयंतीचे औचित्य साधून ७ डिसेंबर २०२२ या दिवशी सनातन-निर्मित ‘कलियुगके त्रिकालदर्शी ऋषि ! योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनजी’ (गुण-विशेषताएं, कार्य, सिद्धि एवं देहत्याग) या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरद वैशंपायन यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रंथ प्रकाशनाच्या पूर्वी दत्त मंदिरातील पुजार्‍यांनी ग्रंथाची एक प्रत दत्त महाराजांच्या चरणांवर अर्पण करून त्यावर गंध आणि फुले वाहिली. प्रकाशनाच्या वेळी योगतज्ञ दादाजी यांचे साधक श्री. शामराव बिच्चू, श्री. रवींद्र पुसाळकर, सौ. वृषाली पुसाळकर, श्री. दिलीप फलके सर, योगतज्ञ दादाजी यांच्या धाकट्या स्नुषा सौ. ललिता शरद वैशंपायन आणि सनातनचे साधक, तसेच या ग्रंथाचे एक संकलक सनातनचे साधक श्री. अतुल पवार हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनाच योगतज्ञ दादाजी यांचे सूक्ष्म रूपाने अस्तित्व जाणवत होते.

पू. शरदकाका यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी कौतुकोद्गार !

प्रकाशनप्रसंगी पू. शरदकाका म्हणाले, ‘‘योगतज्ञ दादाजी यांच्याविषयीचे लिखाण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी जतन करून ठेवले आहे आणि याविषयीचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. एवढे कुणी करते का ? मराठी भाषेनंतर आता हिंदी भाषेतही ग्रंथ आला, हे सर्व पाहून मला पुष्कळ आनंद झाला.’’

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वयाच्या १५ व्या वर्षी साधनेसाठी घरातून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी श्री क्षेत्र नारायण बेट येथील प.पू. नारायण महाराज यांची भेट घेतली होती. तेव्हा प.पू. नारायण महाराजानींच योगतज्ञ प.पू. दादाजी यांना हिमालयात साधना करण्यासाठी जाण्यास सांगितले होते. यापूर्वी श्री क्षेत्र नारायण बेट येथील श्री दत्त मंदिरात योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी २ वेळा १०८ सत्यदत्तपूजा केल्या होत्या.

Leave a Comment