देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात हरिनाम दिंडीचे स्वागत !
पनवेल – कोणत्याही विकाराची बाधकता मानवाला जाचक असते. त्यामुळे विकार नष्ट व्हायला हवेत. विकार गेल्यास मानव देव बनतो. सनातनच्या आश्रमात नामचिंतन केले जात असल्याने ही भूमी पवित्र झाली आहे. गायीच्या शेणाने भूमी सारवल्यासही ती पवित्र होते. दुसर्याकडे असणारे सद्गुण आपण आत्मसात् करावेत. धर्माची वृद्धी आणि धर्माचे संरक्षण करणे, हे सनातनचे कार्य चांगले आहे, असे मार्गदर्शन येथील ह.भ.प. गणेश महाराज यांनी केले.
२८ नोव्हेंबर या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने काढण्यात येणार्या हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. नाथा महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार हेही उपस्थित होते. या दिंडीच्या माध्यमातून षड्रिपू निर्मूलन आणि व्यसन निर्मूलन यांच्या संदर्भात कार्य केले जाते.
आश्रमात दिंडीचे स्वागत करण्यात आले. विणेकरींचे औक्षण सनातनचे साधक श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी केले. तुळशी वृंदावन, ज्ञानेश्वरी आणि कलश मस्तकावर वाहून आणलेल्या वारकरी महिलांचे औक्षण सनातनच्या साधिका सौ. प्रज्ञा जोशी अन् सौ. साक्षी चोपदार यांनी केले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत देवद गावातील अनेक वारकरी अभंग गात दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी आश्रमाच्या वतीने वारकरी बांधवांना प्रसादवाटप करण्यात आले.
दिंडी आश्रमातून परततांना ज्ञानेश्वरी, तुळशी वृंदावन आणि कलश मस्तकावर घेऊन सनातनच्या साधिका काही अंतरापर्यंत दिंडीत सहभागी झाल्या.
वैशिष्ट्यपूर्ण
दिंडीत आलेले एक वारकरी चप्पल न काढता आश्रमातील परिसरात जात होते. तेव्हा सनातनच्या आश्रमातील एका साधकाने त्यांच्या पायातील चप्पल काढून घेऊन ती स्वतः पादत्राणांच्या स्टँडमध्ये ठेवली. साधकाच्या या कृतीचे ह.भ.प. गणेश महाराज यांनी आवर्जून कौतुक केले. दिंडी येणार असलेल्या ठिकाणची आश्रमातील भूमी गायीच्या शेणाने सारवली होती. ते पाहून ‘हे उत्तम आहे’, असेही महाराज या वेळी म्हणाले. |