अनुक्रमणिका
ज्यांच्या सात्त्विक मुखमंडलामुळे त्यांना सर्वत्र ‘माताजी’, असे संबोधले जाते, ज्यांच्यातील देवीतत्त्वाची सर्वांनाही प्रचीती येते, ज्यांच्या सहज वावरण्यानेही त्यांच्यातील दिव्यत्व प्रकट होते, ज्यांच्या काही मिनिटांच्या सहवासानेही सर्वांनाच दिव्य अनुभूती येतात, त्या आहेत ‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! त्यांच्याविषयी कोणतीही माहिती न सांगता समोरच्या व्यक्तीला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दिव्यत्वाची प्रचीती येते. त्याचे कारण आहे त्यांच्या मुखावरील दिव्य तेज !! साधनेने तेजतत्त्व वृद्धींगत झाल्यामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मुखावरही एक वेगळ्या प्रकारचे तेज जाणवते. देहातील देवत्वाला जागृती आल्यामुळे त्यांच्या देहातून सातत्याने प्रकाशाचे प्रक्षेपण होते. त्यामुळे त्यांचा चेहरा नेहमीच अत्यंत प्रकाशमान आणि दिव्य दिसतो. देहातून दिव्य प्रकाश प्रक्षेपित होत असल्यामुळे त्या सर्वांत उठून दिसतात. त्यांच्यातील तेजतत्त्वाच्या संदर्भात नाडीपट्टीमध्ये सप्तर्षींनीही गौरवोद़्गार काढले आहेत. या लेखाद्वारे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाविषयीच्या बुद्धीअगम्य अनुभूती जाणून घेऊया.
१. नाथपंथीय संतांनी काढलेले गौरवोद़्गार !
१.अ. संभाजीनगरचे (औरंगाबादचे) पू. (कै.) अशोक नेवासकरकाका – गुरूंच्या तत्त्वाशी तादात्म्यता
येऊ लागली की, गुरूंच्या देहाप्रमाणे साधकाला स्वतःच्या देहातील तेज वाढत असल्याची अनुभूती येऊ लागते !
संभाजीनगरचे (औरंगाबादचे) नाथपंथीय संत पू. (कै.) अशोक नेवासकरकाकांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील तेजतत्त्वाविषयी सांगितले, ‘‘गुरूंच्या देहाशी तादात्म्यता येऊ लागली की, ‘आपादमस्तक तेज वाढले आहे’, अशी अनुभूती येऊ लागते. याचाच अर्थ हा आहे की, गुरूंनी त्यांचे कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने त्यांची सर्व चैतन्यशक्ती प्रदान केली आहे, म्हणजेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आध्यात्मिक उत्तराधिकारी बनवले आहे. गुरु आणि तुम्ही तत्त्वरूपाने एकरूप होत असल्याचेच हे निर्देशक आहे. पुढे तत्त्वरूपाने कार्य घडते आणि ते तेजावरच आधारित असते, याचीच ही अनुभूती आहे.’’
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना
स्वतःतील तेजतत्त्वाच्या संदर्भात येत असलेल्या अनुभूती !
२ अ. ‘सप्तर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे दैवी प्रवासांतर्गत एकदा मी एका मंदिरात देवाचे दर्शन घेत होते. तेव्हा ‘गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीच्या मागे आरास करतांना ज्याप्रमाणे चक्र लावलेले असते, तशी चक्राकार प्रभावळ माझ्या डोक्यामागे आहे’, असे मला स्पष्टपणे अनुभवता आले. ‘ती प्रभावळ हळू हळू वाढत जात आहे’, असेही मला जाणवत होते.
२ आ. ‘माझ्या संपूर्ण देहातून, रंध्रारंध्रातून प्रकाशाचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला सतत जाणवत असते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (मे २०२२)
३. तेजतत्त्वामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देहात झालेले पालट !
३.अ. देहात झालेले पालट
३.अ.१. चेहरा सतत प्रकाशमान आणि टवटवीत दिसणे : सामान्यतः दूरचा प्रवास केल्यानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर व्यक्तीचा चेहरा जरा मलूल किंवा थकलेला दिसतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या कितीही लांबचा प्रवास करून आल्या, तरी त्यांचा चेहरा प्रकाशमानच असतो. रात्री उशिरापर्यंत सेवा करतांना, सकाळी लवकर झोपेतून उठल्यावर, प्रवास करून आल्यानंतर असे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या चेहर्यावरील प्रकाश उणावत नाही. तो सतत टवटवीतच दिसतो.
३.अ.२. उन्हात प्रवास करूनही चेहरा काळवंडत नसणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या भारतभरात विविध ठिकाणी भ्रमण करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांचे आशीर्वाद घेण्याची सेवा करतात. असे असूनही पुष्कळ वेळ उन्हात किंवा बाहेरच्या वातावरणात राहिल्यानंतर सामान्य व्यक्तीचा तोंडवळा काळवंडतो, तसा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा चेहरा काळवंडलेला दिसत नाही.
विशेष म्हणजे त्यांच्या समवेत दैवी प्रवास करणार्या साधकांच्या तोंडवळ्यावरही प्रवासाचा जितक्या प्रमाणात परिणाम व्हायला हवा, तितक्या प्रमाणात होत नाही. पुष्कळ प्रवास करूनही दैवी प्रवासातील साधकांचेही चेहरे उन्हाने काळवंडलेले दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे दैवी प्रवासातील हे साधक श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत असल्याने त्यांच्या चैतन्याचा प्रभाव दैवी प्रवासातील साधकांवर पडून त्यांचे रक्षण होते.
३.आ. वस्तूंमध्ये जाणवणारे पालट
३.आ.१. देहाभोवतीच्या प्रकाशवलयामुळे देहाला आणि कपड्यांना धूळ न चिकटणे : सातत्याने प्रवासच करत असूनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कपड्यांना धूळ लागत नाही. त्यांच्या साड्या खराब होत नाहीत. दिवसभर वापरूनही त्यांच्या कपड्यांना दुर्गंधही येत नाही. यासंदर्भात शास्त्र सांगतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘साधनेमुळे देहाभोवती एक प्रकाशवलय किंवा प्रभावळ असल्यामुळे त्याला भेदून देहाच्या संपर्कात काही येऊ शकत नाही. त्यामुळेच एवढा प्रवास करूनही देहाला, कपड्यांना साधी धूळही कधी चिकटत नाही.’’
३.आ.२. साडी नेहमीच इस्त्री केल्याप्रमाणे दिसणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ वाहनातून सातत्याने प्रवास करत असूनही त्यांची साडी फारशी चुरगळत नाही. कधीही पाहिले, तरी त्यांनी नेसलेली साडी इस्त्री केल्यासारखीच दिसते. देहातून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वाचा साडीवर परिणाम झाल्यामुळे असे होते.
३ इ. प्रवासासाठी वापरत असलेले वाहन चैतन्यामुळे (तेजतत्त्व वाढल्यामुळे) अन्य गाड्यांमध्ये उठून दिसणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ वापरत असलेले वाहन अत्यंत आकर्षक दिसते. रस्त्यावरील अनेक वाहनांमध्ये ते उठून दिसते. ती ‘स्कॉर्पिओ’ गाडी असली, तरी एखादी किमती किंवा विदेशी गाडी आल्याप्रमाणे रस्त्यावरील लोक त्या गाडीकडे कुतुहलाने पहात असतात, इतके तिचे वेगळेपण जाणवते. वाहनातील तेजतत्त्व वाढल्यामुळे चैतन्य निर्माण होऊन ते असे देखणे दिसते.
४. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे आम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्व आणि वायुतत्त्व यांची अनुभूती घेता येत आहेत. साधनेमुळे जिवातील देवत्त्व जागृत झाल्यामुळे कशा प्रकारे बुद्धीअगम्य पालट घडून येतात, याची ही प्रत्यक्ष प्रचीती आहे. या दिव्य अनुभूतींसाठी श्रीगुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञता !
‘साधकांचे जीवनही गुरुकृपेच्या दिव्य प्रकाशाने उजळावे’, हीच सनातनच्या गुरुपरंपरेच्या चरणी प्रार्थना !’
– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |