शूरांचे दैवत स्कंद म्हणजेच खंडोबा आणि चंपाषष्ठी

खंडोबा

१. खंडोबा : अनेकांचे कुलदैवत

खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील दैवत आहे, हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो.

 

२. ही आहे चंपाषष्ठीची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी मणिसुर आणि मल्लासुर नावाचे दोन राक्षस होते. या दोघं भावांनी मानव तसेच देव आणि ऋषींना खूप त्रास दिला. असुरांचा हा त्रास असहाय्य झाल्याने देव आणि ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यानंतर भगवान शंकराने भगवान खंडोबाचे रूप धारण केले. हे रूप सोन्यासारखे तेजस्वी होते. त्यानंतर मणिसुर आणि मल्लासुर यांच्या सोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले. हे युद्ध सलग सहा दिवस सुरु होते. या भीषण युद्धात मणिने भगवान शिवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. त्यानंतर भगवान शिवाने प्रसन्न होत मणिला वरदान मागायला सांगितले. मणिने भगवान शिवसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि शिवजींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून सर्व खंडोबाच्या मंदिरात मणिची मूर्ती ठेवण्यात येते. असुरांवरील विजयाचा आनंद म्हणून त्या काळापासून चंपाषष्ठी ही धार्मिक दृष्ट्या साजरी केली जाते. महादेवाचे अवतार खंडोबा यांनी ‘मणिसुर आणि मल्लासुर या दैत्यांचा पराभव केला होता. त्यामुळे आनंदी होत ऋषिमुनींनी मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला होता. त्याचेच प्रतीक म्हणजे ‘तळी भंडारा’. त्यानुसार, चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरली जाते.

 

३. खंडोबाची नवरात्र

षष्ठी’ ही तिथी ‘चंपाषष्ठी’ म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी ‘मल्हारी नवरात्री’ला प्रारंभ होतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत सहा दिवसांची नवरात्र असते. यालाच ‘खंडोबाची नवरात्र’ असे म्हणतात. चंपाषष्ठी या दिवशी सर्व शिवालयांतून देवीचा उत्सव चालू असतो. जेजुरी, पाली, मंगसुळी आदी खंडोबादेवाच्या स्थानाच्या ठिकाणी या दिवशी प्रेक्षणीय उत्सव होत असतो. खंडोबाची पत्नी ‘म्हाळसा’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामुळे शंकराला ‘मल्हारी म्हाळसाकांत’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा हे आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा विशेष प्रिय वाटतो. ‘जयाद्रि माहात्म्य’ यात या खंडोबादेवाचे महत्त्व वर्णन केले आहे. रामोशी, धनगर जातीचे लोक हेही खंडोबाची उपासना करतात. प्राणीवर्गांत कुत्र्याच्या रूपात खंडोबा वास करतो, अशी समज आहे.

शूरांचे दैवत स्कंद म्हणजेच खंडोबा !

‘स्कंद या संस्कृत शब्दाचे रूप खंड. त्याचे ममतादर्शक रूप खंडू म्हणजे महाराष्ट्रातील जेजुरी, पाली वगैरे ठिकाणचे खंडोबा मूळचे स्कंद होत. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. स्कंद ही शूर आणि योद्धे यांची देवता म्हणून पुष्कळ पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. शूर वीर लोक याची उपासना करतात’, अशी माहिती ज्ञानकोशात मिळते. कित्येक घराण्यांतून मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासूनच या देवतेचा उत्सव चालू होतो.

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी) तसेच अन्य संकेतस्थळ

Leave a Comment