‘साधक प्रतिदिन नामजपादी उपाय करतात. साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता कधी अधिक, तर कधी मंद असते. असे लक्षात येते की, आध्यात्मिक त्रास वाढल्यास साधक त्याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देत नाहीत. स्वतःला होणार्या त्रासाच्या लक्षणांचा, उदा. न सुचणे, डोके जड होणे, अनावश्यक विचार करणे, याचा साधकांनी वेळोवेळी अभ्यास करायला हवा. यासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. आध्यात्मिक त्रास होत असतांनाही सेवा करत राहिल्यास आपण करत असलेल्या सेवेची गती मंदावते आणि आपल्या सेवेची फलनिष्पत्ती न्यून होते. त्यामुळे आपल्या सेवेचा अमूल्य वेळ वाया जातो, तसेच सेवेत चुका होऊ शकतात. परिणामी आपल्या साधनेचीही हानी होते. हे टाळण्यासाठी स्वतःला आध्यात्मिक त्रास होत असल्यास लगेच जागरूक होऊन उपाय करण्याला प्राधान्य द्यावे आणि तो त्रास दूर झाल्यावर लगेच सेवेला आरंभ करावा.
२. आपल्याला होत असलेल्या त्रासाची वारंवारता अभ्यासून प्रत्येक १५ दिवसांनी ‘नामजपादी उपाय किती घंटे करायला हवेत ?’, याविषयी उत्तरदायी साधकांना विचारा.
३. काही साधक वेळोवेळी नामजपादी उपाय शोधण्यास टाळाटाळ करतात. साधकांनी उपायांचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळोवेळी उपाय शोधले पाहिजेत. स्वतःला उपाय शोधता न आल्यास दायित्व असलेल्या साधकाला उपाय विचारले पाहिजेत.
४. बर्याच साधकांंना आध्यात्मिक त्रास नसतो; पण त्यांना काही काळ तत्कालीन त्रास न्यून होण्यासाठी उपाय करण्यास सांगितले जाते. उत्तरदायी साधकांनी अशा साधकांच्या त्रासाची लक्षणे वेळोवेळी अभ्यासावीत आणि त्यांच्या उपायांचे घंटे ठरवावेत.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२२)