८.११.२०२२ या दिवशी भारतात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित), ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

Article also available in :

 

१. चंद्रग्रहण दिसणारे देश

‘कार्तिक पौर्णिमा (८.११.२०२२, मंगळवार) या दिवशी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे ग्रहण दिसेल.

 

२. भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नसणे

हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल. त्यामुळे भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशात खग्रास अवस्था दिसू शकेल; मात्र महाराष्ट्र आणि इतर प्रदेशात हे ग्रहण खंडग्रास दिसेल.’ (संदर्भ : दाते पंचांग)

२ अ. चंद्रग्रहणाच्या वेळा (या वेळा मुंबई येथील आहेत.)

सौ. प्राजक्ता जोशी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.

२ अ १. स्पर्श (आरंभ)

८.११.२०२२ या दिवशी दुपारी २.३९ वाजता

२ अ २. मध्य

८.११.२०२२ या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता

२ अ ३. मोक्ष (ग्रहण समाप्ती किंवा शेवट)

८.११.२०२२ या दिवशी सायंकाळी ६.१९ वाजता

२ आ. ग्रहणपर्व

(टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी)

३ घंटे ४० मिनिटे (वरील वेळा संपूर्ण भारताकरता आहेत.)

टीप १ : पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहणस्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.

२ इ. पुण्यकाल

‘चंद्रोदयापासून (त्या त्या गावातील सूर्यास्तापासून) ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल आहे.’ (संदर्भ : दाते पंचांग)

 

३. ग्रहणाचे वेध लागणे

३ अ. अर्थ

चंद्रग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या छायेत येऊ लागतो. त्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ‘ग्रहणाचे वेध लागले’, असे म्हणतात.

३ आ. कालावधी

हे ग्रहण ग्रस्तोदित (सूत्र क्र. २ मध्ये अर्थ दिला आहे.) (खग्रास चंद्रग्रहण) असल्याने मंगळवारी ८.११.२०२२ या दिवशी सूर्याेदयापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ६.१९ पर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, रुग्णाईत व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत.

 

४. चंद्रग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम

वेध काळात भोजन करणे निषिद्ध आहे. स्नान, जप, देवपूजा आणि श्राद्ध ही कर्मे करता येतील. पाणी पिणे, झोपणे आणि मल-मूत्रोत्सर्ग ही कर्मे करता येतात. ग्रहण पर्वकाळात, (२ आ. सूत्र – टीप १ मध्ये अर्थ दिला आहे.) म्हणजे त्या त्या गावाच्या सूर्यास्तापासून सायंकाळी ६.१९ पर्यंत या काळात पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि झोपणे ही कर्मे निषिद्ध असल्याने करू नयेत.’ (संदर्भ : दाते पंचांग)

 

५. ग्रहणकालात कोणती कर्मे करावीत ?

१. ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. ग्रहणस्पर्श म्हणजे ग्रहणाला आरंभ होताच दुपारी २.३९ वाजता स्नान करावे.

२. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे.

३. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरःश्चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंत पटींनी मिळते.

४. ग्रहणमोक्ष (ग्रहण संपल्यानंतर) स्नान करावे.

एखाद्या व्यक्तीला अशौच असल्यास ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती तिला शुद्धी असते.

 

६. ग्रहणाचे राशीपरत्वे फल

६ अ. शुभ फल : मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ

६ आ. अशुभ फल : मेष, वृषभ, कन्या आणि मकर

६ इ. मिश्र फल : सिंह, तुला, धनु आणि मीन

ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या राशीच्या व्यक्ती आणि गर्भवती महिला यांनी हे चंद्रग्रहण पाहू नये.’

(संदर्भ : दाते पंचांग)

 

७. चंद्रग्रहण आणि तुळशी विवाह

कार्तिक शुक्ल द्वादशी, शनिवार ५.११.२०२२ या दिवशी तुळशी विवाह आरंभ असून पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार ८.११.२०२२ या दिवशी तुळशी विवाह समाप्ती आहे. मंगळवार ८.११.२०२२ या दिवशी चंद्रग्रहण असल्याने सायंकाळी ६.१९ वाजल्यानंतर, म्हणजे ग्रहणमोक्ष झाल्यावर स्नान करून नंतर तुळशी विवाह करता येईल; मात्र ५.११.२०२२ ते ७.११.२०२२ यांपैकी एका दिवशी तुळशी विवाह करणे योग्य होईल.’ (संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (१६.१०.२०२२)

Leave a Comment