सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून वर्ष २०२१ च्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सनातनने घरोघरी लागवड मोहीम चालू केली. या मोहिमेच्या अंतर्गत साधकांना घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रबोधन करण्यात आले. २०२२ च्या कार्तिकी एकादशीला या मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाला. त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील साधकांनी वर्षभरात केलेले प्रयत्न जाणून घेऊया.

१. ‘घरोघरी लागवड’ या विषयावर ‘ऑनलाईन’ शिबिराचे आयोजन

सौ. मनीषा पाठक

‘मार्च २०२२ मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य या भागातील साधकांचे ‘घरोघरी लागवड’ या विषयावर ऑनलाईन शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी झाल्याने साधना कशी होते ?’, या विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरात लागवडीसंदर्भात अभ्यास असणार्‍या साधकांनी घराच्या आजूबाजूला, अंगणात, तसेच सदनिका, आगाशी, खिडक्या इत्यादी ठिकाणी कोणती रोपे लावू शकतो ? याविषयी मार्गदर्शन केले.

 

२. शिबिरानंतर लागवडीसंबंधी सेवांचे साधकांनी केलेले नियोजन आणि कृती

अ. लागवडीची आवड असणार्‍या; परंतु अन्य सेवा अधिक असलेल्या साधकांनीसुद्धा त्यांच्या वेळेचे नियोजन करून समष्टी सेवेतून वेळ काढून लागवडीसाठी प्रयत्न केले.

आ. पुण्यासारख्या शहरात माती किंवा देशी गायीचे शेण इत्यादी सहज उपलब्ध होणे कठीण असते. या शिबिरानंतर साधकांना लागवडीसाठी माती, ‘जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांपासून बनवलेले एक नैसर्गिक खत)’, रोपे इत्यादी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले.

इ. साधकांना लागवडीसाठीचे सामान, उदा. माती, लहान प्लास्टिकचे डबे उपलब्ध करून देण्यासाठीचेही नियोजन करण्यात आले.

ई. लागवडीची आवड असलेल्या काही साधकांनी स्वतःच्या घरीच रोपे बनवून ती जवळपास रहाणार्‍या साधकांना वितरित केली.

उ. हिरव्या मिरच्या, ढोबळ्या मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, आले, दोडका, अळूची पाने, कांद्याची पात, पालक, दुधी भोपळा, वांगी इत्यादी भाज्या, ऊस, ओली हळद, कढीपत्ता, तसेच गुळवेल, ओवा, तुळस, पानफुटी, गवती चहा इत्यादी औषधी वनस्पतींची साधकांनी लागवड केली.

अशा प्रयत्नांमुळे साधकांमध्ये संघटितपणा निर्माण होण्यास साहाय्य झाले.

 

३. लागवडीसंदर्भातील उत्साह टिकून राहण्यासाठी केलेले प्रयत्न

अ. जिल्ह्यातील सत्संगांमध्ये ‘घरोघरी लागवड’ या विषयावर चर्चा केली जायची. साधक स्वतः केलेले प्रयत्न, तसेच लागवड करतांना आलेल्या अडचणी सांगत. लागवडीचा अनुभव असलेले साधक अडचणींवर उपाययोजना सुचवत. ही सेवा करतांना आलेल्या अनुभूतीही सत्संगात सांगितल्या जायच्या.

आ. काही जण स्वतःच्या लागवडीत उगवलेल्या रोपांची छायाचित्रे पाठवायचे. त्यामुळे साधकांना इतरांच्या आनंदात सहभागी होता आले.

इ. साधकांनी लागवडीसंबंधी सेवा करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती लिहून दैनिक ‘सनातन प्रभात’ला पाठवल्या. त्या अनुभूती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे अन्य साधकांनासुद्धा त्यातून प्रेरणा मिळाली.

ई. पेठेतून विकत आणलेल्या, हानीकारक रसायनांची फवारणी केलेल्या भाजीपाल्यापेक्षा घरी पिकवलेल्या विषमुक्त भाजीपाल्याची चव पुष्कळ चांगली असते, हे साधकांनी अनुभवल्यावर त्यांच्याकडून होणार्‍या लागवडीच्या प्रयत्नांत सातत्य आले.

 

४. साधकांनी भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न

अ. काही साधकांनी ‘रोप लावत असतांना, तसेच त्याची निगा राखत असतांना ‘ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला दिलेली अनमोल भेटच आहे आणि मी तिचा सांभाळ करत आहे’, असा भाव ठेवला.

आ. काही साधकांनी ‘लागवड केलेली रोपे, म्हणजे बालसाधक असून आपण त्यांचा सांभाळ करायला हवा’, असा भाव ठेवला. त्यामुळे झाडांना पाणी घातले नसेल आणि स्वतः महाप्रसाद घेत असू, तर ‘आधी झाडांना पाणी घालूया’, असा त्यांचा विचार होत असे.

इ. काहींनी लागवड करत असलेल्या रोपांविषयी कृतज्ञताभाव ठेवला. लागवडीतून मिळालेला भाजीपाला साधक कृतज्ञताभावाने जवळच्या सेवाकेंद्रातही पाठवायचे.

 

५. लागवडीसंबंधी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

साधकांनी रोपे लावत असतांना, तसेच त्यांना पाणी देत असतांना नामजप करणे, झाडांचे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होण्यासाठी झाडांवर विभूती फुंकरणे, गोमूत्र शिंपडणे असे उपाय केले. यांमुळे पुष्कळ साधकांना लागवडीसाठी जागा अल्प असूनही उत्पन्न अधिक प्रमाणात येत आहे, अशी अनुभूती आली.

‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आम्हा सर्व साधकांकडून सेवा करवून घेत आहेत, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

(१७.७.२०२२)

– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे

Leave a Comment