रामनाथी (गोवा) – सर्व साधकांवर श्री महालक्ष्मी देवीची कृपा रहावी, अलक्ष्मीचा (निर्धनतेचा) परिहार व्हावा आणि धर्मकार्यासाठी समृद्धता यावी, यासाठी सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने २४.१०.२०२२ (दीपावली आणि लक्ष्मीपूजन) या दिवशी प्रदोषकाळात रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले.
मांगल्यवृद्धी व्हावी, यासाठी महर्षींच्या आज्ञेने लक्ष्मीपूजनाला प्रारंभ करण्यापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते २१ पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.
पूजनाच्या वेळी लक्ष्मीदेवीच्या मूर्तीसमवेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कंठात असलेल्या श्रीवत्स पदकाचेही पूजन करण्यात आले, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कंठातील ‘श्री’बीजमंत्रयुक्त सुवर्णपदकाचेही पूजन करण्यात आले. (महर्षींच्या आज्ञेने ११ मे २०१९ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ७७ व्या जन्मोत्सवाच्या वेळी श्रीवत्स पदक आणि १९.२.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘श्री’बीजमंत्रयुक्त सुवर्णपदक धारण केले होते.)