प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल ! – न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स

न्यूयॉर्क – यंदा व्हाईट हाऊसमध्ये जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आतापर्यंतची सर्वांत मोठी दिवाळी साजरी केली, तिथे देशाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क येथेही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्यात आली. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी त्यांच्या सरकारी निवासामध्ये दिवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते म्हणाले की, आपण प्रभु श्रीराम आणि सीता यांच्यानुसार जीवन जगले पाहिजे. दिवाळीच्या वेळी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा आपण सर्वांनी निश्‍चय करायला हवा. प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल. त्यांनी माता सीतेविषयी म्हटले की, सीता एक सक्षम महिला होत्या. त्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता दृढ आणि स्वत:च्या कर्तव्यांप्रती कटीबद्ध होत्या.

१. अ‍ॅडम्स पुढे म्हणाले की, सध्या जगात सर्वत्र पुष्कळ अंधार आहे. आपल्या सर्वांना प्रकाशाचे किरण बनण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आम्ही केवळ त्यावरच लक्ष केंद्रीत करतो, ज्यांविषयी आमच्या मनात मतभेद आहेत. आपण दिवाळीच्या शिकवणीला कृतीत आणणे आवश्यक आहे.

२. या कार्यक्रमाला भारताच्या महावाणिज्य दूत रणधीर जायसवाल आणि न्यूयॉर्क विधानसभेच्या सदस्या जेनिफर राजकुमार याही उपस्थित होत्या. जेनिफर राजकुमार म्हणाल्या की, जर आपण केवळ एकच दिवस अंध:काराला दूर ठेवण्याचा सण साजरा करत असू, तर आपण दिवाळीच्या सिद्धांतांशी विश्‍वासघात करत आहोत. आपल्याला प्रत्येक दिवशी त्याच दृष्टीकोनातून आणि आदर्शांवर रहाण्याची आवश्यकता आहे.

(प्रभु श्रीरामाचे महत्त्व समजणारे पाश्‍चात्त्य अमेरिकेतील प्रतिष्ठित राजकारणी कुठे आणि ‘श्रीराम अस्तित्वातच नव्हता’ असे म्हणणारे भारतीय राजकारणी आणि बुद्धीवादी कुठे ? – संपादक)

Leave a Comment