मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

अनुक्रमणिका

सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव नारायण परांजपे यांना लहान वयापासूनच विज्ञान शाखेत शिकण्याची आवड असूनही त्यांनी काकांच्या व्यवसायाचे उत्तरदायित्व सांभाळले. देवावरील श्रद्धेमुळे ते व्यवसाय सांभाळतांना आलेल्या अनंत अडचणींना सहजतेने सामोरे गेले. पू. परांजपेआजोबांनी घेतलेले परिश्रम आणि देवाची कृपा यांमुळे त्यांची व्यवसायात भरभराट झाली. विवाहानंतर त्यांची पत्नी पू. (सौ.) शैलजा यांनीही त्यांना संसारात उत्तम साथ दिली. त्यांची मोठी कन्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळे त्यांना साधनेची ओळख होऊन त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केला. पुढे साधनेची आवड निर्माण झाल्यावर त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा निर्माण झाली. त्यांची साधनेची तळमळ आणि गुरूंची अपार कृपा यांमुळे ऑगस्ट २०१३ मध्ये त्यांची ६१ टक्के पातळी घोषित झाली. गुरूंचे आज्ञापालन करून १३.५.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणार्‍या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

 

१. जन्म

‘माझे नाव श्री. सदाशिव नारायण परांजपे, वय ७९ वर्षे आहे. माझा जन्म १६.१२.१९४२ या दिवशी सांगली येथे पेठ भागातील देवल वाड्यामधे झाला.

 

२. कुटुंबीय

‘माझे वडील श्री. नारायण पांडुरंग परांजपे आणि आई सौ. आनंदीबाई अन् आम्ही पाच भाऊ-बहीण’, असे आमचे परांजपे कुटुंब होते. माझे थोरले भाऊ (कै. विठ्ठल नारायण परांजपे) नंतर थोरली बहीण निर्मलाताई (कै. (सौ.) निर्मला चिपळूणकर) नंतर सिंधुताई (कै. (श्रीमती) शरयू सहस्रबुद्धे) आणि माझ्यापेक्षा मोठी इंदूताई (कै. (सौ.) सुलभा पाटणकर) अन् शेवटी मी सदाशिव (टोपण नाव नंदा) !

 

३. बालपण आणि शिक्षण

३ अ. सांगलीमध्ये गावभागात असलेल्या आमच्या घराजवळ कृष्णा नदी होती. त्यामुळे मी जवळजवळ ५ वर्षे नदीत अंघोळ केली आणि वयाच्या १० ते १८ व्या वर्षापर्यंत नदीत पोहायलाही जात असे.

३ आ. आई-वडिलांनी केलेले धार्मिक संस्कार

माझे आई-वडील धार्मिक होते. आमच्या घरी सर्व सणवार व्यवस्थित होत असत, तसेच श्राद्ध आणि पक्ष इत्यादी विधी गुरुजींना बोलावून केले जात असत. माझे वडील प्रतिदिन सायकलने सांगलीपासून ४ कि.मी. असलेल्या बागेतल्या गणपतीच्या दर्शनाला जायचे. मी संध्याकाळी रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणणे अन् इतर वेळी सर्वांना साहाय्य करत असे.

३ इ. ‘वडिलांनी संस्काराच्या माध्यमातून
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न करून घेतले’, असे वाटणे

माझे वडील स्वभावाने पुष्कळ रागीट होते, तसेच ते शिस्तप्रिय होते. त्यांच्या स्वभावामुळे साहजिकच आम्हा सर्वांना शिस्तीने वागण्याची सवय झाली. (साधनेत आल्यावर शिस्तीने वागण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.) त्या वेळी ‘वडिलांनी संस्कारांच्या माध्यमातून आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यासाठी प्रयत्न करून घेतले’, असे मला वाटते.

३ ई. अधिकोषाचे कर्ज न फिटल्याने आणि
त्यातच वडिलांची दोन शस्त्रकर्मे झाल्यामुळे घर विकावे लागणे

माझ्या वडिलांचा ‘सायकल आणि स्टोव्ह, गॅस-बत्ती (गॅसवर चालणारे दिवे. पूर्वी वरातीत डोक्यावर हे दिवे घेऊन जात असत.) यांची दुरुस्ती अन् त्यांची विक्री करणे’, हा व्यवसाय होता. आमचा व्यवसाय व्यवस्थित चालू होता; परंतु घरासाठी काढलेले अधिकोषाचे (बँकेचे) कर्ज फिटत नव्हते. त्यातच वडिलांची दोन शस्त्रकर्मे (ऑपरेशन्स) झाली. त्यामुळे आम्हाला घर विकावे लागले.

३ उ. व्यायामामुळे प्रकृती उत्तम असणे

आम्ही सांगली येथील गावभागात अंदाजे ५ – ६ वर्षे राहिलो. मी वयाच्या १० व्या वर्षापासून १८ व्या वर्षापर्यंत व्यायाम करण्यासाठी जात असे. मला ती आवड असल्यामुळे मी तालमीत जाऊन सूर्यनमस्कार, जोर, बैठका, तसेच मधे मधे ‘डबल बार’वर, प्रेस जोर, दसरंग, तबकफाड (मलखांबाचे प्रकार) अशा प्रकारचे व्यायाम करायचो. त्यामुळे माझी प्रकृती उत्तम होती. कदाचित् या व्यायामामुळेच मी व्यवसायात भरपूर कष्ट करू शकलो.

३ ऊ. घरात सर्वांत लहान असल्याने सर्वांनी
सांगितलेली कामे करावी लागणे अन् अहं अल्प होण्यास साहाय्य होणे

‘मी घरात सर्वांत लहान असल्यामुळे आपोआप माझ्यावर दळण आणणे आणि नातेवाइकांकडे निरोप देणे’, अशी लहान-मोठी कामे असायची. ‘मी सर्व भावंडांमध्ये लहान असल्याने सर्वांचे ऐकून कामे केल्याने माझा अहं अल्प होण्यास साहाय्य होत होते’, हे आता मला समजले. माझे वडील रागीट होते. त्यामुळे त्यांनी मला सांगितलेले काम त्याच वेळी करणे क्रमप्राप्त असायचे.

३ ए. ‘विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याची इच्छा असणे
आणि शीतपेये विक्रीचा व्यवसाय करावा’, अशी देवाची इच्छा असणे

माझे शिक्षण दहावी (मॅट्रिक) पर्यंत झाले. मी फार हुशार नव्हतो; पण मला ५० ते ५५ टक्यांपर्यंत गुण मिळायचे. माझी पुढचे शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याची इच्छा होती; पण ‘मी शीतपेये (कोल्डड्रिंक्स) विक्रीचा व्यवसाय करावा’, अशी देवाची इच्छा होती.’

 

४. लहान वयात व्यवसायाचे उत्तरदायित्व येणे

४ अ १. काका वयस्कर असल्याने शाळेला सुट्टी असतांना त्यांना
दुकानात साहाय्य करणे आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची माहिती होणे

माझ्या काकांचे (कै. दत्तात्रेय पांडुरंग परांजपे) सांगली येथे मारुति मार्गावर (रस्त्यावर) शीतपेयाचे दुकान (कोल्ड्रिंग हाऊस) होते. काका वयस्कर होते आणि त्यांना मूल-बाळ नव्हते. उन्हाळ्याच्या दिवसांत दुकान चांगले चालत असल्यामुळे आणि माझ्या शाळेला सुट्टी असल्याने मी माझ्या आईच्या सांगण्यावरून त्यांच्या साहाय्याला जायचो. त्यामुळे मला त्या व्यवसायाची माहिती झाली होती.

४ अ २. देवाच्या कृपेने व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळणे

मी अकरावीत असतांना माझ्या काकांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने, म्हणजे माझ्या काकूने (कै. (श्रीमती) लक्ष्मीबाई दत्तात्रय परांजपे यांनी) मला दुकानाचे दायित्व पहाण्यास सांगितले. त्यामुळे माझे शिक्षण बंद झाले. या धंद्यामध्ये कष्ट आणि धोका दोन्ही होते. सोडा बनवायच्या काचेच्या बाटल्या फुटून शरिरावर जखमा व्हायच्या. बारा वर्षांत माझ्या शरिरावर १२ टाके पडले, तरीही देवाच्या कृपेने ४० वर्षे मी तो व्यवसाय उत्तम प्रकारे केला. देवाच्या कृपेविना आपण काहीही करू शकत नाही, हेच खरे !

 

५. वैवाहिक जीवन

५ अ. पत्नीने संसार उत्तमरित्या सांभाळणे आणि संसारात अडचणी येऊनही देवाच्या कृपेने आनंद मिळणे

वर्ष १९६८ मध्ये माझा विवाह झाला. माझ्या पत्नीचे नाव सौ. शैलजा (पूर्वाश्रमीची कु. नलिनी कानिटकर) आहे. तिने संसाराचा भार उत्तम सांभाळला. ती आमच्या सर्व कुटुंबातील, तसेच इतर नातेवाइकांशी आपुलकीने वागायची. तिला अध्यात्माची आवड होती. संसार म्हटल्यावर अडचणी असणारच. त्यातूनही देवाने आम्हाला आनंद दिला आणि कष्टाचा पूर्ण लाभ दिला. वर्ष १९७० मध्ये आम्हाला कन्यारत्न (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) झाले. खरोखरच सर्व साधकांच्या दृष्टीने ते रत्नच आहे. पुढे ३ वर्षांनी कल्पना (आताची सौ. मधुरा सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि नंतर सुवर्णा (आताची सौ. शीतल गोगटे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) हिचा जन्म झाला.

५ आ. व्यवसायाची भरभराट होणे आणि देवाने सर्व इच्छा पूर्ण करणे

मी व्यवसायामध्ये भरपूर कष्ट केले. सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मी दुकानात काम करत असे. जेवणाचा डबाही घरून घेऊन येत असे. त्या वेळी मला इतका वेळ काम करण्याची शक्ती देवाने दिली आणि त्याचा लाभही दिला. आम्ही भाड्याच्या घरातून सदनिकेत (फ्लॅटमध्ये) रहायला आलो. नंतर आमचे स्वतःचे घर झाले. आमच्या दारात दुचाकी आणि चारचाकी वाहने आली. घराभोवती बाग आणि नारळाची झाडे लावली. प्रतिदिन देवांना ताट भरून फुले येऊ लागली. देवाने आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या.

५ इ. मुलींचे विवाह होऊन तिन्ही जावई चांगले मिळणे

आमची मोठी मुलगी अंजली (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) ही लहानपणापासूनच अत्यंत हुशार होती. तिचा मित्र-मैत्रिणींचा परिवार मोठा होता. तिचे शिक्षण ‘एम्.एस्.सी.’पर्यंत झाले. नंतर तिचा विवाह मुंबईत असणार्‍या गाडगीळ कुटुंबातील डॉ. मुकुल (सध्याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) यांच्याशी झाला. त्यांचे शिक्षण ‘पी.एच्.डी.’पर्यंत झाले आहे. कु. कल्पना हिचा विवाह यथावकाश सोलापूर मधील श्री. मनोज सहस्रबुद्धे (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांच्याशी झाला, तसेच कु. सुवर्णा हिचा विवाह मिरजेतील व्यावसायिक श्री. अभय गोगटे यांच्याशी झाला. अशा प्रकारे आम्हाला तिन्ही जावई चांगले मिळाले.

६. संस्थेशी परिचय

६ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळे साधनेची
ओळख होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना अन् सेवा होणे

खरे सांगायचे, तर ‘साधना म्हणजे काय ?’, याची आम्हाला ओळख नव्हती. प्रथम श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आमचा सनातन संस्थेशी परिचय करून दिला.

 

७. सेवेला प्रारंभ होणे

७ अ. सेवेच्या माध्यमातून साधनेची आवड निर्माण होणे
आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव अन् श्रद्धा निर्माण होणे

आरंभी मला दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा मिळाली. आम्ही उभयतांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ परगावी पाठवण्यासाठी त्यावर पत्ते आणि तिकिटे चिकटवून त्यांचे गठ्ठे करून देण्याची सेवा केली. त्यानंतर सनातनची सर्व उत्पादने घरी ठेवून त्यांची घरीच विक्री करायला प्रारंभ केला. हळूहळू सेवेच्या माध्यमातून आम्हाला साधनेची आवड निर्माण झाली. आमच्यात गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रती भाव आणि श्रद्धा निर्माण झाली.

७ आ. रामनाथी आश्रमात राहिल्यामुळे पुष्कळ शिकायला
मिळणे आणि उभयतांनी संगणक शिकून टंकलेखनही करणे

आम्ही दोघे (मी आणि माझी पत्नी सौ. शैलजा) पाच-सहा वेळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून आल्यामुळे आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. पत्नीने ६० व्या वर्षी संगणक शिकून घेतला आणि ती टंकलेखनाची सेवा करू लागली. माझ्यासाठी हे विश्व वेगळे होते; पण गुरुकृपेमुळे मलाही संगणक शिकण्याची इच्छा निर्माण झाली. वयाच्या ७० व्या वर्षी मी पत्नीकडूनच संगणक शिकून टंकलेखन चालू केले. माझी नित्यनियमाने सेवा होऊ लागली आणि मला त्यातील आनंद मिळू लागला.

७ इ. आध्यात्मिक प्रगती होऊन संतपद घोषित होणे

काही दिवसांनी आमच्या दोघांची (मी आणि माझी पत्नी पू. शैलजा) ऑगस्ट २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. त्यामुळे सेवेचा उत्साह अधिकच वाढला. अनेक साधक सेवेनिमित्त घरी येऊ लागले, तसेच संत येण्याने वास्तू आनंदी आणि समाधानी झाली. पुढे आम्ही रामनाथी आश्रमात आलो असतांना उभयतांना १३.५.२०१९ या दिवशी संत घोषित करण्यात आले.

७ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने बाहेरगावी साधकांसाठी
नामजपादी उपाय करण्याची सेवा मिळणे आणि या सेवेतून आनंद अन् उत्साह मिळणे

त्यानंतर प.पू. गुरुमाऊलीने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) एकदा मला सांगितले, ‘‘तुम्ही चारचाकी चालवता, तर बाहेरगावी साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास जाऊ शकता आणि तुमच्या पत्नी सांगली, मिरज आणि जयसिंगपूर या शहरी जातील. अनुमाने एक वर्ष मी आठवड्यातून तीन दिवस बाहेरगावी, म्हणजे ईश्वरपूर, विटा, पलूस, तासगांव, जत, कवठेमहांकाळ या गावी साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास जात होतो. या सेवेमध्ये मला आनंद मिळत होता. ‘प.पू. गुरुमाऊलींच्याच कृपेने आम्ही हे सर्व करू शकलो आणि तेच सर्व करतात’, याची निश्चिती झाली.

 

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मायेतून बाहेर पडण्याची मनाची सिद्धता होणे

८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून घर, तसेच व्यवसाय विकून
गुरुगृही येण्यास सांगणे आणि तसे करण्याची मनाची सिद्धता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच करून घेणे

नुकतेच आम्ही घरादाराची माया सोडून गोवा येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी सेवेसाठी आलो आहोत. ‘साधना करणे’, हीच आता आमची सेवा आहे. मायेतून बाहेर पडण्याची शक्ती आणि आमच्या मनाची सिद्धता परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या माध्यमातून करून घेतली. हेच आमचे मोठे भाग्य आहे. त्यांच्याच कृपाप्रसादाने आम्ही उर्वरित आयुष्य साधनेत घालवणार आहोत. ‘त्यांनी आम्हाला असेच आध्यात्मिक बळ द्यावे’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.

८ आ. जावयांनीही पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे

आमच्याप्रमाणे माझे मधले जावई श्री. मनोज सहस्रबुद्धे (ते गेली वीस वर्षे माझा व्यवसाय सांभाळत होते.) यांनीही पूर्णवेळ साधना करण्यासाठी गोवा येथे रहाण्याचा निर्णय घेतला. आमची दोन्ही कुटुंबे गोव्यात ढवळी येथे शेजारी शेजारी सदनिका घेऊन रहात आहेत.

शेवटी प.पू. गुरुदेव यांच्याकडे एवढीच प्रार्थना आहे, ‘आमचे उर्वरित आयुष्य साधना करण्यात व्यतीत होऊन आम्हाला त्याचे समाधान आणि आनंद मिळू दे. हे सर्व मला गुरुदेवांनी सुचवले आणि त्यांनीच ते लिहून घेतले. ते त्यांच्या चरणी सविनय अर्पण करतो.’

– (पू.) सदाशिव नारायण परांजपे, ढवळी, फोंडा, गोवा. (३.८.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

Leave a Comment