केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !

Article also available in :

अनुक्रमणिका

१. शरीर निरोगी रहाण्यासाठी अवेळी खाणे टाळा

अ. रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण इत्यादी खात असाल, तर सावधान !

‘झोपण्या-उठण्याच्या वेळा निश्चित नाहीत, व्यायाम नाही, नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, भाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती तुमची पूर्वपुण्याईच म्हणावी लागेल; परंतु लक्षात घ्या ! ही पूर्वपुण्याई संपली की, आता चालू असलेल्या चुकीच्या सवयींचे परिणाम रोगाच्या रूपाने दिसू लागतील. मग ‘त्या वेळी चांगल्या सवयी लावल्या असत्या, तर बरे झाले असते’, असे म्हणायची पाळी येईल. आपण साधक आहोत. शरीर निरोगी राहिल्यास साधना चांगली होते. त्यामुळे आपल्याला साधनेसाठी निरोगी शरीर हवे. शरीर निरोगी रहाण्यासाठी केवळ दोनच गोष्टी करा ! २ वेळा पुरेसा आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा !’

आ. कोणताही आवडीचा पदार्थ अवेळी न खाता जेवणाच्या वेळीच खा !

‘आयुर्वेदाला चटपटीत आणि चवदार पदार्थांचे वावडे आहे का ? मुळीच नाही. उलट रुची घेऊन जेवल्याने समाधान मिळते. त्यामुळे पदार्थांच्या चवींमध्ये विविधता हवीच; परंतु एखादा पदार्थ कितीही आवडणारा असला, तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे. तसे केले नाही, तर त्याचा आज ना उद्या त्रास होणारच. ‘कोणताही आवडीचा पदार्थ पचत असेल, तर खाण्यास काहीच आडकाठी नाही; मात्र तो पदार्थ जेवणाच्या वेळेतच खावा. अवेळी खाऊ नये.’ हा नियम पाळल्यास शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होईल आणि साधनाही चांगली होईल.’

प्रश्न : मला शरीर निरोगी राखण्यासाठी दिवसभरात केवळ २ वेळाच आहार घ्यायचा आहे; परंतु सकाळी किंवा सायंकाळी अल्पाहार केला नाही, तर थरथरायला होते. काही वेळा पोटात आग पडते. असे असतांना मी केवळ २ वेळाच आहार घेणे, माझ्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का ?

उत्तर :

२. निरोगी जीवनासाठी केवळ २ वेळाच आहार घेण्याची चांगली सवय अंगी बाणवायला हवी !

आपण शरिराला जशी सवय लावू, तसे शरीर वागते. आपण चांगल्या सवयी लावल्या, तर आरोग्य लाभते. आपण चुकीच्या सवयी लावल्या, तर रोग होतात. आतापर्यंत आपल्याला ४ – ४ वेळा खाण्याची चुकीची सवय होती. आता आपण एकाएकी २ वेळा आहार घेण्याचे ठरवले आहे; परंतु पूर्वीच्या सवयीनुसार आहाराची वेळ झाली की, शरिरामध्ये पित्त स्रवणारच. काही जणांची शारीरिक क्षमता चांगली असते. त्यांना या स्रवलेल्या पित्ताचा काही त्रास होत नाही आणि ते सहजपणे ४ वेळा खाण्याची चुकीची सवय मोडून २ वेळा आहार घेण्याची चांगली सवय अंगी बाणवू शकतात. यामध्ये मनाची भूमिकाही महत्त्वाची असते. मनाचा ठाम निश्चय असेल, तर चुकीच्या सवयी मोडून चांगल्या सवयी लावणे सोपे जाते.

२ अ. वात, पित्त आणि कफ यांची ‘दुष्टी होणे (संतुलन बिघडणे)’ हेच सर्व रोगांचे कारण आहे

प्रातराशे त्वजीर्णेऽपि सायमाशो न दुष्यति ।
अजीर्णे सायमाशे तु प्रातराशो हि दुष्यति ।। – अष्टाङ्गसङ्ग्रह, सूत्रस्थान, अध्याय ११, श्लोक ५५

अर्थ : सकाळचे जेवण पचलेले नसतांना सायंकाळी जेवल्यास ते बहुधा दोषकारक (रोगकारक) ठरत नाही; परंतु सायंकाळचे (रात्रीचे) जेवण पचलेले नसतांना सकाळी खाल्ल्यास ‘दोष निश्चितपणे दुष्ट होतात (वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन निश्चितपणे बिघडते.)’
केवळ ‘भूक लागणे’ हे जेवण पचल्याचे लक्षण नव्हे’, हे लक्षात घेणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. सकाळी अल्पाहाराच्या वेळेस रात्रीचे जेवण पचलेले नसते; पण नेहमीच्या सवयीमुळे भूक लागते आणि आपण अल्पाहार करतो. महर्षि वाग्भटांच्या वरील सूत्रानुसार नेमके हेच वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडवण्यास आणि रोग निर्माण होण्यास कारण ठरते. ४ दिवस निश्चयपूर्वक सकाळी अल्पाहार न केल्यास सकाळी भूक लागण्याचे बंद होते आणि थेट दुपारी जेवणाच्या वेळी भूक लागू लागते.’

२ आ. ‘विशेषतः रात्रीचे अन्न पचलेले नसतांना सकाळी खाण्याने अनेक विकार होतात’, असे चरक महर्षींनीही सांगणे

‘चरकसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय १५, श्लोक ४६ ते ४९ यामध्ये असे दिले आहे की, ‘पहिले अन्न पूर्णपणे पचलेले नसतांना त्यावर दुसरे अन्न ग्रहण केल्याने महाभयंकर ‘अन्नविष’ बनते. ‘अन्नविष’ म्हणजे ‘अन्नच विषासमान बनणे’. वात, पित्त आणि कफ यांना आयुर्वेदामध्ये ‘दोष’ असे म्हणतात. हे अन्नविष वात, पित्त आणि कफ या दोषांशी संयोग पावते आणि शरिरामध्ये त्या त्या दोषांचे व्याधी निर्माण होतात. हे अन्नविष मूत्रमार्गामध्ये गेल्यास मुतखड्यासारखे मूत्रमार्गातील रोग निर्माण करते. किंवा आतड्यांमध्ये गेल्यास बद्धकोष्ठतेसारखे विकार होतात.’ एकूणच अन्नविषापासून होणार्‍या विकारांची सूची पुष्कळ मोठी आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच रोग या अन्नविषामुळे निर्माण होतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

बर्‍याच वेळा अन्नविष हे मंद विषाप्रमाणे (स्लो पॉयझनप्रमाणे) कार्य करते. त्यामुळे ‘ते रोगांचे कारण असू शकते’, अशी शंका येत नाही. आताच्या काळात आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे जीवनशैलीतील पालटांमुळे होणारे जे विकार दिसतात, ते काही एका रात्रीत निर्माण झालेले नसतात. पुष्कळ वर्षे आहार आणि विहार (शारीरिक कृती) यांच्या संदर्भातील चुका चालू रहातात, तेव्हा हे विकार निर्माण होतात. अन्नविष हे या विकारांचे कारण असू शकते. रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी अल्पाहार करणे हे अन्नविष निर्मितीचे पुष्कळ मोठे कारण आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी सर्व आयुर्वेद महर्षींनी ‘अजीर्णभोजन (एक अन्न (विशेषतः रात्रीचे अन्न) पचलेले नसतांना दुसरे अन्न ग्रहण करणे) करू नका’, असे वारंवार सांगितले आहे.

२ इ. ‘रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी लागणारी भूक’ ही ‘खोटी भूक’ असल्याचे सुश्रुत ऋषींनी सांगणे

स्वल्पं यदा दोषविबद्धम् आमं लीनं न तेजःपथम् आवृणोति ।
भवत्यजीर्णेऽपि तदा बुभुक्षा या मन्दबुद्धिं विषवत् निहन्ति ।। – सुश्रुतसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ४६, श्लोक ५१३

अर्थ : ‘जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जाठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते. मंदबुद्धी माणसाला ही भूक ‘खोटी भूक’ आहे, हे समजत नाही. तो भूक लागली, म्हणून खातो आणि हे त्याला विषाप्रमाणे मारक ठरते.

२ ई. हिंदु धर्मशास्त्रात अल्पाहार सांगितलेला नसून केवळ २ वेळा जेवण करण्यास सांगितलेले असणे

सायं प्रातर्मनुष्याणाम् अशनं वेदनिर्मितम् ।
नान्तरा भोजनं दृष्टम् उपवासी तथा भवेत् ।। – महाभारत, पर्व १२, अध्याय १९३, श्लोक १०

अर्थ : ‘वेदांमध्ये (धर्मशास्त्रामध्ये) ‘माणसाने सकाळी आणि सायंकाळी असा केवळ २ वेळा आहार करावा’, असे सांगितले आहे. यापेक्षा जास्त वेळा खाऊ नये. असे केल्यास उपवासाचे फळ प्राप्त होते.’

२ उ. शरिराला अन्नाची आवश्यकता नसतांनाही ‘वेळ झाली’ म्हणून भूक लागू शकणे

‘इवान पावलाव’ नावाच्या एका रशियन शास्त्रज्ञाने त्याच्या कुत्र्यावर एक प्रयोग केला. त्याने कुत्र्यावर शस्त्रकर्म करून ‘कुत्र्याच्या लाळग्रंथींमधून स्रवणारी लाळ एका ‘परीक्षण नळीमध्ये (टेस्टट्यूबमध्ये)’ एकत्र येऊन ती मोजता येईल’, अशी व्यवस्था केली. जेव्हा पावलाव त्या कुत्र्याच्या पुढ्यात प्रत्यक्ष अन्न घेऊन जाई, तेव्हा त्या कुत्र्याच्या लाळेचे प्रमाण वाढत असे. नंतर काही दिवसांनी त्याने कुत्र्याच्या पुढ्यात अन्न ठेवण्याच्या काही क्षण आधी एक घंटा वाजवण्यास आरंभ केला. ‘घंटा वाजवल्यावर अन्न मिळते’, याची कुत्र्याला सवय झाल्यावर त्याने काही दिवस घंटा वाजवल्यानंतर कुत्र्याला लगेच अन्न दिले नाही. आश्चर्य म्हणजे केवळ घंटा वाजवल्यावर समोर अन्न नसतांनासुद्धा कुत्र्याच्या लाळेचे प्रमाण वाढले होते.

वर्षानुवर्षे सकाळी उठल्यावर अल्पाहार करण्याची सवय झाल्याने आपल्या शरिराला अन्नाची आवश्यकता नसतांनाही केवळ सवय झाल्याने आपल्याला भूक लागते आणि आपण सकाळी अल्पाहार करतो.

 

३. थरथरायला होणे किंवा पोटात आग पडणे यामागील कारण

आधुनिक शास्त्रानुसार जेवणाच्या वेळेत जठरामध्ये आम्ल (हायड्रोक्लोरिक ॲसिड), तर आतड्याच्या पहिल्या भागामध्ये (‘ड्युओडीनम’मध्ये) पित्त (बाईल) आणि स्वादुपिंडाचे स्राव (पॅन्क्रिॲटिक ज्यूस) स्रवतात. जेव्हा आपण खातो, तेव्हा खाल्लेले अन्न या स्रावांमध्ये मिसळले जाते आणि त्या स्रावांची तीक्ष्णता (तीव्रता) न्यून होते. खाल्ले नाही, तर स्रावांची तीक्ष्णता न्यून होत नाही. काहींना ही तीक्ष्णता (तीव्रता) सहन होत नाही. त्यामुळे थरथरायला होते किंवा पोटात आग पडल्यासारखे होते.

 

४. तुपाच्या साहाय्याने ४ – ४ वेळा खाण्याची चुकीची सवय मोडणे सहज शक्य !

आरोग्य मिळवायचे असेल, तर ४ – ४ वेळा खाण्याची चुकीची सवय मोडून २ वेळा आहार घेण्याची चांगली सवय अंगी बाणवणे आवश्यक आहे. यासाठी वाढलेल्या पित्तावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ‘पित्तस्य सर्पिषः पानम् ।’ म्हणजे ‘पित्तावर ‘तूप पिणे’ हे सर्वश्रेष्ठ औषध आहे’, असे आयुर्वेदात (अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय १३, श्लोक ४ यात) सांगितले आहे. तुपाचा वापर करून आहाराच्या ४ वेळांवरून २ वेळांवर येणे अत्यंत सोपे आहे.

 

५. हे करा !

अ. आरंभी तुमच्या मनाला ‘२ वेळा आहार घेण्याची सवय लावल्याने आरोग्य मिळणार आहे आणि तुपाचा वापर केल्याने वाढलेल्या पित्ताचे शमन होऊन आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही’, हे समजावून सांगा. असे केल्याने तुमचे मन या मोहिमेमध्ये आनंदाने सहभागी होईल.

आ. आता दिवसातून २ वेळाच आहार घेणे चालू करा.

इ. आहारावर कोणतेही बंधन घालू नका. जे पचेल ते खा. आवडीचा कोणताही पदार्थ पचत असेल, तर तो खाता येऊ शकतो; मात्र असे पदार्थ केवळ जेवणाच्या वेळेतच खा.

ई. जेवणाच्या २ वेळा सोडून कधीही अवेळी भूक लागली, तर चमचाभर तूप चघळून खा. चघळल्याने शरिराच्या उष्णतेने तूप पातळ होते. निवळ तूप खाणे कठीण वाटत असेल, तर तुपात थोडी साखर किंवा गूळ घालून खाल्ले, तरी चालेल. (तूप मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरा. पातळ झालेले तूप १ चमचा प्रमाणात घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे तूप थिजलेले असल्यास त्या अनुमानाने घ्या.)

उ. तूप खाल्ल्यावर साधारण १५ मिनिटांनी भूक शमेल. ती शमली नाही, तर पुन्हा १ चमचा तूप खा. अशाप्रकारे भूक शमण्यासाठी किती तूप खावे लागते, याचे अनुमान घेऊन पुढील वेळेस थेट तेवढे तूप खाल्ले, तरी चालू शकते. सामान्यतः जास्तीतजास्त ४ चमचे तुपाने भूक शमते. शरिराच्या जडणघडणीनुसार हे प्रमाण न्यूनाधिक असू शकते.

ऊ. चुकून तुपाचे प्रमाण जास्त झाले आणि त्याचे अपचन होईल कि काय अशी शंका येत असेल, तर अर्धी वाटी गरम पाणी प्या.

ए. औषध घेण्यासाठी खावे लागत असेल, तर तुमच्या वैद्यकीय चिकित्सकाला तुम्ही ठरवलेल्या आहाराच्या वेळा सांगून ‘औषध कधी घ्यावे’, हे विचारून घ्या.

ऐ. घेतलेले तूप पचण्यासाठी प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करा.

 

६. तुपाचे लाभ

अवेळी भूक लागल्यावर तूप प्यायल्याने भूक शमते. थरथरायला होत नाही. पोटात आग पडल्यासारखे वाटत असेल, तर तेही तात्काळ न्यून होते. वाढलेल्या पित्ताचे योग्य रितीने शमन होते. (‘शमन होणे’ म्हणजे ‘शांत होणे’) तूप उत्तम शक्तीवर्धक आहे. त्यामुळे थकवाही दूर होतो. काही दिवसांनी शरिराला २ वेळाच आहार घेण्याची सवय लागते. मग अवेळी भूक लागणे बंद होते. त्या वेळी तूप खाण्याची आवश्यकता रहात नाही. मग जेवणातच २ – २ चमचे तूप घ्यावे. असे नियमित चालू ठेवल्यास जेवणाच्या २ वेळांत शरिराला आवश्यक त्या प्रमाणात भूक लागते आणि आवश्यक तेवढा आहार घेतला जातो. त्यामुळे कृश व्यक्तींनी २ वेळा आहार घेतल्यास त्यांचे वजन न्यून होईल, अशी भीती बाळगू नये. स्थूल व्यक्तींनी आहारावर नियंत्रण ठेवल्यास त्यांचे वजन न्यून होण्यास साहाय्य होते.

 

७. सारांश

याचा सारांश व्यावहारिक भाषेत असा समजून घेता येईल. ‘पित्त’ हा एक कर्मचारी आहे. त्याला त्याच्या ठिकाणी, म्हणजे पोटात काम मिळाले नाही, तर तो दुसर्‍या ठिकाणी, म्हणजे रक्त इत्यादी ठिकाणी उपद्व्याप निर्माण करील. हे उपद्व्याप म्हणजे थरथरायला होणे किंवा पोटात आग पडणे. त्या पित्तरूपी कर्मचार्‍याला तूप पचवण्याचे काम दिले की, तो कामांत गुंतून रहातो आणि इतरत्र त्रास देत नाही.

 

८. अल्पाहार न करता उशिरा जेवण होणार असल्यास खाण्याचे पदार्थ

‘सायंकाळचे जेवण ७ वाजता झाले असल्यास सकाळी अल्पाहार न करता सकाळी १०.३० ते दुपारी १ यामध्ये कधीही जेवून घ्यावे. दुपारी १ नंतर जेवण होणार असेल आणि भूक सहन करण्याची क्षमता असेल, तर जेवणापूर्वी काही खाण्याची आवश्यकता नसते; परंतु दुपारी १ नंतर जेवण होणार असेल आणि भूक सहन करण्याची क्षमता नसेल, तर सकाळी १०.३० वाजता पुढीलपैकी कोणताही एक आहार घ्यावा. आहार घेण्यापूर्वी न्यूनतम अर्धा घंटा व्यायाम आणि अंघोळ झालेली असावी. स्थूल व्यक्तींनी क्रमाने आधीच्या पदार्थांना, तर कृश व्यक्तींनी नंतरच्या पदार्थांना प्राधान्य द्यावे.

१. एखादा राजगिरा लाडू किंवा कणकेचा लाडू

२. पातळ भात किंवा मऊ भात (यात चवीसाठी तूप आणि मेतकूट घालू शकतो, तसेच चवीपुरते लोणचेही घेऊ शकतो.)

३. मुगाच्या डाळीचे कढण (मुगाची डाळ शिजवून त्यामध्ये गूळ घालून बनलेला पदार्थ)

४. २ चहाचे चमचे तूप (आवश्यकता वाटल्यास सोबत चमचाभर साखर किंवा गूळ)

५. २ चहाचे चमचे (१० मिलि) पातळ तूप घातलेले कपभर (१०० मिलि) गरम दूध’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२२)

 

एकदा जेवतो तो योगी. दोन वेळा जेवतो तो भोगी. तीन आणि त्याहून जास्त वेळा जेवतो तो रोगी.

Leave a Comment