सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मुखमंडल अत्यंत तेजस्वी आणि ब्रह्मरंध्रावर प्रकाश दिसण्याच्या संदर्भातील दिव्य अनुभूती !

अनुक्रमणिका

‘देवतांच्या किंवा संतांच्या चित्रात त्यांच्या मुखाभोवती प्रभावळ दाखवली जाते. देवतांच्या अवतरणाच्या संदर्भात ‘प्रथम दिव्य प्रकाश दिसला आणि भगवंत प्रकट झाला’, अशा प्रकारचे उल्लेख अनेक पौराणिक कथांमध्ये आढळतात. देवतांची स्तुतीपर स्तोत्रे तर त्यांच्या तेजस्वी रूपाचे वर्णन केल्याविना पूर्णच होत नाहीत. अशा प्रकारे तेजाचा दिव्यत्वाशी अतूट संबंध आहे. चित्रांमध्ये दाखवले जाणारे हे तेज शोभा म्हणून दाखवलेले नसते, तर दिव्यत्वाच्या ठायी ती अनुभूती प्रत्यक्षच येते ! ती प्रभावळ म्हणजे जिवातील देवत्व जागृत झाल्यामुळे देहातून होणारे तेजाचे प्रक्षेपण असते. व्यक्तीतील देवत्व जसजसे वृद्धींगत होते, तसतसे ते तेज मुखावर विलसू लागते. पुढे पुढे संपूर्ण कांतीच प्रकाशमान आणि दिव्य दिसते ! याची प्रचीती सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या दिव्य दर्शनाने येते. त्यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मुखावरही तेच दिव्य तेज विलसत आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील तेजतत्त्वाच्या संदर्भातील निवडक अनुभूती आणि सप्तर्षी अन् संत यांचे त्याविषयीचे गौरवोद्गार पाहूया.

 

१. तेजतत्त्वामुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा देह आणि वास्तू  यांत झालेले पालट !

१ अ. चेहरा अत्यंत प्रकाशमान दिसणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा चेहरा अत्यंत प्रकाशमान दिसतो. ‘जणू त्यांच्या चेहर्‍यातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे त्या वेळी जाणवते. त्या उपस्थितांमध्ये अत्यंत उठून दिसतात. त्या वेळी त्यांच्याइतकीच गोरी अंगकांती असलेले साधकही तेथे उपस्थित असतात आणि असे असूनही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची चर्या त्यांच्याहून प्रकाशमान दिसते. (छायाचित्र १ आणि २ पहावे.)

१ आ. सहस्रारचक्र तेजपुंज दिसणे

२३ फेब्रुवारी २०१९ या दिवशी एका यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी तेजपुंज प्रकाश दिसून आला. धार्मिक विधींच्या वेळी त्यांच्या ब्रह्मरंध्रावर असा प्रकाश काही वेळा दिसून येतो. (छायाचित्र ३ पहावे.)

१ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या खोलीतील ३ भिंतींवर सप्तरंगांची छटा दिसणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात, त्या कक्षाच्या ३ भिंतींवर सप्तरंगांची छटा दिसते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या खोलीतील भिंतींमध्ये तेजतत्त्व धारण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता आली आहे. त्यामुळे त्या खोलीच्या भिंतींवर दैवी प्रकाशाची आभा विविध रंगांच्या छटेप्रमाणे दिसून येते.

 

२. सप्तर्षी आणि नाथपंथीय संत यांनी काढलेले गौरवोद्गार !

२ अ. सप्तर्षी जीवनाडीपट्टी – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींच्या भोवती तेजोवलय असणे : ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींच्या भोवती नेहमी एक प्रकाशमय आध्यात्मिक वलय असते. ते वलय कोटी सूर्य प्रकाशासारखे तेजस्वी आहे. हे वलय सूक्ष्म असल्याने सर्वसामान्य लोकांना कळणे कठीण आहे. पुढे अनेक सात्त्विक लोक या दोघींना पाहून त्यांना शरण जातील.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९३ (२३.११.२०२१))

पू. (कै.) अशोक नेवासकर

२ आ. नगरचे पू. (कै.) अशोक नेवासकर – गुरूंच्या तत्त्वाशी
तादात्म्यता येऊ लागली की, गुरूंच्या देहाप्रमाणे साधकाला
स्वतःच्या देहातील तेज वाढत असल्याची अनुभूती येऊ लागणे

नगरचे नाथपंथीय संत पू. (कै.) अशोक नेवासकरकाकांनी सांगितले, ‘‘गुरूंच्या देहाशी तादात्म्यता येऊ लागली की, आपादमस्तक तेज वाढले आहे’, अशी अनुभूती येऊ लागते. याचाच अर्थ हा आहे की, गुरूंनी त्यांचे कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने त्यांची सर्व चैतन्यशक्ती प्रदान केली आहे, म्हणजेच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आध्यात्मिक उत्तराधिकारी बनवले आहे. गुरु आणि तुम्ही तत्त्वरूपाने एकरूप होत असल्याचेच हे निर्देशक आहे. पुढे तत्त्वरूपाने कार्य घडते, ते तेजावरच आधारित असते, याचीच ही अनुभूती आहे.’’

 

३. साधकांना आलेल्या अनुभूती

३ अ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेतील साधकांचा आढावा घेत असतांना
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी पांढरा प्रकाश जाणवणे

‘७.९.२०१५ या सायंकाळी ७.३० ते रात्री १० या वेळेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एका साधिकेला व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या ठिकाणी पूर्ण पांढरा प्रकाश दिसत होता. बैठक कक्षात मला चैतन्य जाणवत होते.’ – सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, गोवा. (७.९.२०१५)

कु. सायली डिंगरे

३ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासह
तेजाचा झोत आल्याचे जाणवणे आणि त्यांच्या तेजस्वी रूपाने साधक अवाक् होणे

‘१५.३.२०२२ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीमती मंगला पुराणिक आणि श्रीमती मंदाकिनी चौधरी या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याप्रीत्यर्थ त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आम्ही सर्व साधक बैठक कक्षात बसलो होतो. जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बैठक कक्षात आल्या, तेव्हा त्यांच्यासह तेजाचा मोठा झोत आल्याप्रमाणे जाणवले. त्यांचे ते रूप इतके तेजस्वी होते की, उपस्थित सर्व साधक अवाक होऊन त्यांच्याकडे पहातच राहिले.’ – कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), रामनाथी, गोवा. (१५.३.२०२२)

३ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या तोंडवळ्याच्या
ठिकाणी विजेचा दिवा लावला असल्याप्रमाणे प्रकाश प्रक्षेपित होणे

‘१७.४.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पार पडला. त्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आल्या असता, त्यांच्या मुखावर प्रचंड तेज जाणवत होते. त्यांच्या तोंडवळ्याच्या ठिकाणी एखादा विजेचा दिवा लावला असावा, इतके प्रकाशाचे प्रक्षेपण होत होते. सामान्य व्यक्ती समोर आल्यावर आपण तिच्याकडे सहजतेने पाहू शकतो, तसे मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडे सहजतेने पहाता येत नव्हते. अंधारातून प्रकाशाकडे पहातांना जसे डोळ्यांना थोडा वेळ लागतो, तसे त्यांच्या त्या तेजस्वी चर्येकडे पहाण्यासाठी मला प्रयत्न करावे लागले.’

– कु. पूजा नलावडे, फोंडा, गोवा. (१७.४.२०२२)

 

४. कृतज्ञता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे साधकांना साधनेमुळे जिवातील देवत्व कशा प्रकारे जागृत होते, याची अनुभूती घेता येत आहे. सप्तर्षींनी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या कलियुगात श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे गौरवले आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर दिसणार्‍या दैवी लक्षणांतून ते सप्रमाण सिद्ध होते. अशा दैवी गुरुपरंपरेचे कृपाछत्र दिल्याबद्दल सनातनचे साधक भगवंताच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहेत !’

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२२)

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखावर तेजस्वी प्रकाश दिसण्यामागे काय कारण आहे ?

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सेवेच्या कक्षात भिंतींवर सप्तरंग दिसण्यामागे काय कारण आहे ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. आशिष सावंत

ई-मेल : [email protected]

 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात
तेजतत्त्वाशी निगडित विविध दैवी पालट होण्यामागील कारण

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उत्तराधिकारी घोषित करून तेज अन् वायु तत्त्व प्रदान करणे

शिष्य गुरूंशी एकरूप होतांना गुरूंमधील पंचतत्त्वे शिष्यात येतात. समष्टी साधना करणार्‍या गुरूंमध्ये पंचतत्त्वे कार्यरत असतात. यामुळे अशा गुरूंकडून शिष्यांना समष्टी साधनेसाठी आवश्यक प्रमाणात त्यांच्यातील (गुरूंमधील) पंचतत्त्व, म्हणजे शक्ती दिली जाते. गुरूंनी अशा प्रकारे दिलेल्या आशीर्वादामुळे शिष्य स्वयंप्रकाशी होतो आणि त्याच्यातील पंचतत्त्वात पालट होऊन त्याच्या क्षमतेत वाढ होते. महर्षि भृगु यांच्या आज्ञेप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना तेज अन् वायु या तत्त्वांशी निगडित शक्ती प्रदान करून त्यांना आपले ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित केले आहे.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शक्तीमुळे
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अन्य संतांच्या तुलनेत १० टक्के अधिक असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या शक्तीमुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यात तेजतत्त्वाचे प्रमाण ३० टक्के, म्हणजे अन्य संत आणि सद्गुरु यांच्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. तेजतत्त्व ५० टक्के सगुण, तर ५० टक्के निर्गुण असते. यामुळे त्याच्याकडून कार्य होतांना त्याचे प्रकटीकरण स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही स्तरांवर होते.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘अंतरंग शिष्य’
असल्याने तेजतत्त्वाच्या विविध स्तरांशी निगडित दैवी पालट होणे

गुरूंनी दिलेल्या आशीर्वादाचा सर्वार्थाने उपयोग करतो, तो ‘अंतरंग शिष्य, म्हणजे अंतरातून गुरु करत असलेल्या मार्गदर्शनानुसार सर्वस्वाचा त्याग करणारा शिष्य’. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई याही अंतरंग शिष्य आहेत. यामुळे त्यांच्यात सगुण ते निर्गुण अशा सर्व स्तरांवर कार्य करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली तेजतत्त्वरूपी शक्ती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून ईश्वरेच्छा आणि कार्य यांच्या आवश्यकतेनुसार प्रकट होत आहे. यामुळे प्रकाश, आकृती, रंग आणि रूप असे तेजतत्त्वाचे निर्गुणातून सगुणाकडे होणारे प्रकटीकरण त्यांचा देह अन् वास्तू यांमध्ये होणार्‍या विविध दैवी साक्षींच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फाेंडा, गोवा. (४.९.२०१९)

 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या छायाचित्रांचे आध्यात्मिक विश्लेषण

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. छायाचित्रांमधील स्पंदनांचे प्रमाण

२. छायाचित्रांचे विश्लेषण

२ अ. आनंद आणि चैतन्य अधिक प्रमाणात प्रक्षेपित करणारे छायाचित्र ! (छायाचित्र १ पहावे.)

सनातनचे साधक श्री. मयुरेश कोनेकर यांची कन्या कु. मुक्ता (वय १ वर्ष) हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित करण्याचा कार्यक्रम रामनाथी आश्रमात झाला. त्या आनंदाच्या सोहळ्याच्या वेळी हे छायाचित्र काढले आहे. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होतात; पण त्याचे प्रमाण त्या ध्यानस्थ असतांना (छायाचित्र क्रमांक ३ पहावे.) त्यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या आनंदाच्या प्रमाणापेक्षा थोडेसे अल्प आहे. आनंदाच्या प्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडून चैतन्यही अधिक प्रमाणात प्रक्षेपित होते.

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील चैतन्यामुळे लक्ष वेधून घेणारे छायाचित्र ! (छायाचित्र २ पहावे.)

या छायाचित्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या इतरांपेक्षा अगदी स्पष्ट दिसतात. आपण त्या ४ जणींपैकी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडेच आकर्षित होतो. त्या प्रकाशमान दिसत असल्याने आपले लक्ष त्यांच्याकडे खेचले जाते. ‘त्यांच्याकडे एकटक बघत रहावे’, असे वाटते. त्यांच्याकडून थंडावा आणि हलकेपणाही प्रक्षेपित होतो. या छायाचित्रात त्यांच्या ब्रह्मरंध्रावर (डोक्यावर) प्रकाशही दिसत आहे. हे सर्व जाणवण्याचे कारण म्हणजे त्या कार्याच्या आवश्यकतेनुसार अधिकतम चैतन्याच्या स्तरावर कार्यरत आहेत. (येथे दिलेल्या सारणीमध्ये त्यांच्यातील चैतन्य ६५ टक्के असल्याचे जाणवले.) सर्वत्रच्या साधकांना साधनेसाठी मार्गदर्शन करत असल्याने त्या सतत चैतन्याच्या स्तरावर कार्यरत असतात. त्यामुळे प्रतिदिन केवळ ३ – ४ घंटे झोपत असूनही त्या सतत उत्साही दिसतात. त्या कधी दमलेल्या दिसत नाहीत; याचे कारण म्हणजे त्यांच्यातील चैतन्य ! श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणतात, ‘‘माझ्या मनाला सतत उत्साह जाणवत असतो. मला विश्रांती घ्यावीशी वाटत नाही; पण केवळ या देहाला थोडी विश्रांती मिळावी; म्हणून मी थोडा वेळ झोपते.’’

चैतन्य व्यक्तीला सतत ऊर्जा पुरवत असते. साधनेमुळे आपल्यातील चैतन्य वाढले की, आपण सतत कार्यरत राहू शकतो. या चैतन्याचा इतरांवर प्रभाव पडतो आणि त्यांनाही ऊर्जा प्राप्त होऊन ते साधनेमध्ये चांगले प्रयत्न करू शकतात किंवा ज्यांना मरगळ, निराशा आली आहे, त्यांना ऊर्जा मिळून ते पुन्हा साधनारत होऊ शकतात.

२ इ. मोरपिसाप्रमाणे दिसणारा आणि मनाला आनंद देणारा ब्रह्मरंध्रावरील प्रकाश ! (छायाचित्र ३ पहावे.)

या छायाचित्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ब्रह्मरंध्रावर दिसत असलेला प्रकाश आपले लक्ष वेधून घेतो. आपले लक्ष त्या प्रकाशाकडे एकाग्र होऊन आपल्याला अन्य काहीच दिसत नाही. तो प्रकाश मोरपिसासारखा दिसून त्याला पाहून पुष्कळ आनंद जाणवतो. ‘श्रीकृष्णाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या केसात मोरपीस खोवले आहे’, असे जाणवते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई जेव्हा ध्यानस्थ असतात, तेव्हा त्यांच्याकडून अधिक प्रमाणात(५० टक्के) आनंद प्रक्षेपित होतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी, गोवा. (१९.९.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment