पापकर्मे, त्याचे भोग आणि पाप
करणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग १)

अनुक्रमणिका

१. तीव्र पाप केल्याने मिळणारे फळ

२. स्वतःला अतीशहाणे समजणार्‍या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, सत्ताधारी, राजकारणी आणि अधिकारी यांना इशारा – निःस्वार्थ बुद्धीने आणि सज्जनतेने काम करा, अन्यथा सहस्रो वर्षांच्या नरकयातनेसारख्या शिक्षेचे अधिकारी व्हाल !

३. मृत्यूनंतर शिक्षा भोगून झाल्यावर पुढील प्रवास

४. पापकर्माचा प्रकार, त्याचे फळ आणि उपाय


 

मनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते, तर वाईट कर्माचे फळ पाप देते. एका उच्च कोटीच्या योगीने त्याच्या अनुयायांकडून होणार्‍या चुकांचे म्हणजे पापांचे मृत्यूनंतरचे अतिशय वाईट भोग दाखवण्यासाठी त्यांना सोदाहरण मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आणि अशा विविध पापांसाठीचे प्रायश्चित्त या लेखात आपण पाहूया.

 

१. ‘पाप केल्याने मिळणारे फळ – पूर्वकालीन
जुलमी सत्ताधारी इत्यादींचे लिंगदेह सहस्रो वर्षे यातना भोगत असणे

एकदा त्या योगी व्यक्तीने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्यान लावले होते. त्यांच्या गुरूंनी स्वतःच्या सूक्ष्म-देहासह त्यांच्या सूक्ष्म-देहालाही एका लोकात नेले. (योगी आणि अध्यात्मातील उन्नत यांना स्वतःच्या स्थूल देहातून बाहेर पडून सूक्ष्मदेहाने हव्या त्या ठिकाणी जाता येते.) त्या लोकात गडद अंधार होता. त्या लोकाच्या अधिपतीने त्यांना एक विशेष संरक्षककवच दिले. त्या कवचामुळे त्या लोकातील जिवांना ते दोघे दिसत नव्हते; पण ते मात्र ज्ञानचक्षूने सर्वकाही पाहू शकत होते. (तीव्र साधना किंवा गुरुकृपा यांनी उघडणार्‍या या ज्ञानचक्षूच्या साहाय्याने भूत-भविष्य-वर्तमान यांतील सर्वकाही पहाता येते.)

मनुष्यजन्मात विविध प्रकारे पाप करणार्‍या अनेक व्यक्तींचे लिंगदेह त्या अंधार्‍या लोकात सहस्रो वर्षांपासून यातना भोगत खितपत पडल्याचे त्यांना दिसले. त्यांतील काही आत्मे सहस्रो वर्षांपूर्वी काही भूभागांवर राज्य करत होते, काही राजघराण्यांतील सत्ताधारी होते, तर काही वाममार्गाने धनाढ्य बनलेले शेतधनी (जमीनदार), व्याजाने पैसे देऊन सर्वसामान्यांना लुबाडणारे सावकार आणि मजुरांना गुलाम बनवणारे अंमलदार आणि वतनदार होते. स्वार्थांध, लोभी, हत्यारा (खुनी), दहशतवादी कृत्ये करणारे इत्यादींचाही या शिक्षा भोगणार्‍यांत समावेश होता.

 

२. स्वतःला अतीशहाणे समजणार्‍या तथाकथित
बुद्धीप्रामाण्यवादी, सत्ताधारी, राजकारणी आणि अधिकारी यांना इशारा – निःस्वार्थ बुद्धीने
आणि सज्जनतेने काम करा, अन्यथा सहस्रो वर्षांच्या नरकयातनेसारख्या शिक्षेचे अधिकारी व्हाल !

त्या योगी व्यक्तीला गुरुदेवांनी वरील ध्यानातील दृश्य दाखवल्यानंतर त्यांना स्वार्थी अधिकारी, स्वतःला अतीशहाणे समजणारे तथाकथित सुशिक्षित, सत्ताधारी आणि राजकारणी यांची अत्यंत कीव वाटली. ईश्वराने आपल्यावर सोपवलेले कार्य निःस्वार्थ बुद्धीने आणि सज्जनपणे करून ईश्वराच्या कृपेस पात्र होण्याऐवजी गोरगरिबांचे शोषण करून, त्यांचे शाप घेऊन अन् सज्जनांना लुटून आपल्या पोटाची खळगी भरल्यामुळेच अशा जिवांना ईश्वराने सहस्रो वर्षे नरकात खितपत पडण्याची शिक्षा दिली.

काही व्यक्तींना सतत दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याची सवय असते. त्यांना इतरांच्या हातात सत्ता गेलेली मुळीच खपत नाही. येन-केन-प्रकारेण ते सत्ता आपल्या हातातच कशी येईल, यासाठी जिवाचा आटापिटा करतात. त्यासाठी दुसर्‍याचा बळी घ्यायलाही ते मागेपुढे पहात नाहीत. (घेण्याचे पाप करतात.) अशा प्रकारच्या मत्सरी आणि स्वार्थांध लोकांच्या हातात सत्ता असल्याचे सर्वत्र चित्र दिसते. असे पाप करणारे अधिकारी, पुढारी आणि सत्ताधारी यांना सुखात असल्याचे पाहून ‘त्यांना शिक्षा व्हावी’, असे सर्वसामान्य व्यक्तीला जरी वाटले, तरी ती काहीच करू शकत नाही. ‘ईश्वर अशांना शिक्षा का करत नाही ?’, असे सर्वसामान्य व्यक्तीला वाटते. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, अशा दुराचरणी लोकांना केवळ त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे या जन्मात सुख आणि सत्ता प्राप्त झालेली आहे. त्यांची ही पुण्याई आहे, तोपर्र्यंत त्यांना ईश्वरही काही करू शकत नाही. पूर्वपुण्याई असली, तरी त्यांची प्रवृत्ती विकारी असल्याने वाईट शक्ती त्यांचे मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवतात. त्यांच्यातील विकारांना प्रबळ बनवतात. परिणामी त्यांच्या हातून अधिक पापे घडतात. त्यामुळे त्यांचे पुण्य लवकर नष्ट होते. पुण्य नष्ट झाले की, वाईट शक्ती चोहोबाजूंनी त्यांना घेरतात, त्यांना स्वतःच्या नियंत्रणात घेऊन अनेक प्रकारच्या यातना देतात. मृत्यूनंतरही एवढे पाप केल्याने असे जीव अनेक वर्षे नरकात यातना भोगतात.

 

३. मृत्यूनंतर शिक्षा भोगून झाल्यावर पुढील प्रवास

‘नरकात पापाचरणी लोकांच्या यातना भोगून संपल्यानंतर अशांचे भोग संपतात का ?’, असा प्रश्न अनुयायांनी विचारल्यानंतर त्या योगी व्यक्तीने पुढील दोन प्रकारे अशा जिवांची वाटचाल होत असल्याचे सांगितले.

अ. पाप अल्प असल्यास

१. पापी जिवांची नरकातील शिक्षा भोगून संपल्यानंतर त्यांना रानात रहाणार्‍या आदिवासी कुटुंबात जन्म मिळतो. तेथे त्यांना आवश्यकता भागवण्याइतपतही अन्न आणि वस्त्र मिळत नाही. त्यामुळे त्यांना पुष्कळ हालअपेष्टा आणि यातना सहन कराव्या लागतात.

२. अनेक वर्षे हालअपेष्टा आणि दारिद्र्य भोगल्यानंतर त्या पापी जिवांच्या वृत्तीत पालट होऊ लागतो. त्यांच्या मनात गरिबांविषयी दया निर्माण होते. त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा पाझर फुटतो. अनेक जन्मांनंतर त्यांच्यातील स्वार्थ नाहीसा होऊन परोपकारी वृत्ती निर्माण होते. त्यामुळे असे जीव खर्‍या अर्थाने सज्जनता आणि मानवता या गुणांच्या साहाय्याने उन्नत होऊ लागतात.

आ. पाप जास्त असल्यास

मनुष्यजन्माचा दुरुपयोग करणार्‍या अत्यंत पापी असलेल्या (अन् अधिक पाप केलेल्या) जिवांना काही सहस्र वर्षे पुन्हा मनुष्यजन्म मिळत नाही. नरकातील शिक्षा भोगल्यावर काही लिंगदेहांना पुढील जन्म मिळतात.

१. वृक्ष आणि दगड यांमध्ये रहावे लागणे

२. किड्यांचा जन्म मिळणे

३. मासे, गिधाड, वटवाघूळ यांसारख्या योनीत जन्म मिळणे

४. ओझी वहाणार्‍या जनावरांचा जन्म मिळणे (पाप केल्याचे प्रमाण पुष्कळ जास्त असल्यास ३० ते ४० वेळा अशा जनावरांचे जन्म घ्यावे लागणे आणि नंतर दरिद्री अन् काबाडकष्ट करणार्‍या व्यक्तींच्या कुटुंबात जन्म मिळणे)

५. जन्मतःच कुरूप, अपंग किंवा रोगग्रस्त असणे

६. जन्मल्यानंतर महारोगासारखे असाध्य आणि दुर्धर रोग होणे

७. भिकारी होणे

तात्पर्य : मनुष्यजन्मात अधर्माचरण आणि पापाचरण करून मनुष्यजन्माचा दुरुपयोग करणे म्हणजे ईश्वरी नियमांच्या विरुद्ध वागणे.

ईश्वर प्रत्येक जिवाला त्याच्या कर्मानुसार न्याय देत असतो; म्हणून मानवाकडून होणार्‍या अपराधानुसार त्याला दंड मिळतोच आणि तो त्याला भोगूनच संपवावा लागतो.

 

४. पापकर्माचा प्रकार, त्याचे फळ आणि उपाय

पुढील सारणीमधील काही संज्ञांचे अर्थ येथे दिले आहेत.

१. मूत्रकृच्छ्र : लघवी करतांना जोर करावा लागणे आणि मूत्रमार्गात वेदना होणे, लघवी तुंबणे अन् लघवी थेंब थेंब होऊन गळणे.

२. सन्निपात : वात, कफ आणि पित्त या तीनही दोषांचा अकस्मात प्रकोप होणे

पापकर्माचा प्रकार

फळ

उपाय

१. स्वभावदोषांशी संबंधित पापकर्मे
अ. दुसर्‍याचे न्यून पहाणे अपस्मार (फेफरे) सवत्स कपिला गायीचे दान
आ. दुसर्‍यांचा द्वेष करणे १. अपस्मार (फेफरे)

२. १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग

सवत्स कपिला गायीचे दान

(टीप १)

इ. निंदा करणे नाडीव्रण ब्राह्मण पतीपत्नी (मेहूण) जेवू घालणे आणि गोदान करणे
ई. निरर्थक राग करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
उ. वाईट शब्द बोलणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
ऊ. अपराधाविना बंदीत ठेवणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
ए. दुसर्‍याची मानहानी करणे पंडुरोग किंवा कावीळ भूमीदान आणि साखरपाणीदान
ऐ. चूक नसतांना दंड करणे पंडुरोग किंवा कावीळ भूमीदान आणि साखरपाणीदान
ओ. विश्वासघात करणे १. १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग

२. उचकी, खोकला आणि श्वास लागणे

(टीप १)

(टीप २)

औ. दुसर्‍याला संकटात टाकणे उचकी, खोकला आणि श्वास लागणे (टीप २)
अं. दुसर्‍याला पीडा देणे उचकी, खोकला आणि श्वास लागणे (टीप २)
क. मोठे पातक करणे उचकी, खोकला आणि श्वास लागणे (टीप २)
ख. दुसर्‍यांस कठोर पीडा करणे सूज (शोफ) कुलदेवतेवर एक लक्ष जास्वंदीची फुले वाहणे
२. विशिष्ट गोष्टींशी संबंधित पापकर्मे
अ. स्त्रीशी संबंधित

१. दुसर्‍याच्या स्त्रीची निंदा करणे

२. परस्त्रीचे हरण करणे

नेत्ररोग

नेत्ररोग

चांद्रायण प्रायश्चित्त करणे

चांद्रायण प्रायश्चित्त करणे

आ. कन्या आणि सून यांच्याशी संबंधित

१. कन्येशी वाईट कर्म करणे

२. सुनेशी वाईट कर्म करणे

३. कुटुंबातील स्त्रियांचे हरण करणे

४. स्वकुलातील कन्या भोगणे

५. कन्या विकणे

 

मूतखडा होणे

मूतखडा होणे

खोकला

पंडुरोग किंवा कावीळ होणे

शरिरात नाना प्रकारचे वायू उत्पन्न होणे

 

तीर्थयात्रा करणे

तीर्थयात्रा करणे

दशदाने देणे

भूमीदान आणि साखरपाणीदान

गोप्रदान

इ. मालकिणीचे हरण करणे शूळ (वेदना) उत्पन्न होणे दशदाने देणे
ई. गुरुपत्नीचे हरण करणे मूत्रकृच्छ्र दशदाने देणे
उ. इतर व्यक्तींशी संबंधित

१. भोजनाच्या पंगतीस बसलेल्याने ‘फार खाल्ले’ म्हणून दुःख मानणे

२. भोजन करत असतांना एखाद्याला उठवणे

३. ‘तू चोर, तू जार’, असे दुसर्‍याला म्हणणे

अरुची (तोंडाला चव नसणे) आणि अपचन

पटकी (कॉलरा)

मूळव्याध आणि अतीसार

अन्न आणि उदक यांची दाने

दरिद्री लोकांना इच्छाभोजन घालणे

(टीप ३)

ऊ. प्राण्यांशी संबंधित

१. गायीला मारणे

२. गाय विकणे

३. प्राण्यांना उगाच मारणे

कुष्ठरोग

शरिरात नाना प्रकारचे वायू उत्पन्न होणे

२७ प्रकारचे शूळ उत्पन्न होणे

दशदाने देणे

गोप्रदान

(टीप ४)

ए. कूप आणि जलाशय यांचा नाश करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
३. निषिद्ध कर्मे करणे
अ. चोरी करणे

१. परद्रव्य हरण करणे

 

२. धनधान्य हरण करणे

 

३. सोने चोरणे

१. नेत्ररोग

२. पटकी

३. परमा (एक गुप्तरोग)

१. परमा आणि मूत्रकृच्छ्र हे रोग होणे

२. मूतखडा

पंडुरोग किंवा कावीळ

चांद्रायण प्रायश्चित्त करणे

दरिद्री लोकांना इच्छाभोजन घालणे

दशदाने देणे

सुवर्णदान

दशदाने देणे

भूमीदान, साखरपाणीदान

आ. हिंसा

१. दुसर्‍याचे कान, हात आणि पाय कापणे

२. दुसर्‍यास सुळावर चढवणे

३. दुसर्‍याचा जीव घेणे

२७ प्रकारचे शूळ उत्पन्न होणे

२७ प्रकारचे शूळ उत्पन्न होणे

१३ प्रकारचे सन्निपाताचे रोग

ब्राह्मण पतीपत्नी (मेहूण) जेवू घालणे आणि गोदान करणे

(टीप ४)

(टीप ४)

(टीप १)

इ. बालहत्या करणे

१. जादू करून किंवा औषध देऊन गर्भ पाडणे

गर्भपात होणे, मुले न वाचणे, संतती न होणे

जलोदर

देव आणि ब्राह्मण यांची नित्य पूजा करणे

वाटेवर पाणपोयी ठेवणे

४. राजाशी संबंधित पापकर्मे
अ. राजाला मारणे राजयक्ष्मा (क्षयरोग) होणे दशदाने देणे
५. धार्मिक गोष्टींच्या संदर्भातील पापकर्मे
अ. शास्त्राची निंदा करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
आ. होमाशी संबंधित

१. होमाची कुंडे आणि याग यांचा नाश करणे

१३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
इ. देवळाशी संबंधित

१. शिवालय मोडणे

परमा (एक गुप्तरोग) आणि मूत्रकृच्छ्र सुवर्णदान
ई. देवाशी संबंधित

१. भक्ती करूनही क्रोधयुक्त असणे

२. मूर्ती फोडणे

पोटात रोग उत्पन्न होणे

मूळव्याध आणि अतीसार

देवाचे चित्र असलेली सुवर्णाची प्रतिमा दान करणे

(टीप ३)

उ. ब्राह्मणाशी संबंधित

१. ब्राह्मणाची भक्ती करूनही क्रोधयुक्त असणे

२. ब्राह्मणास मारणे

पोटात रोग उत्पन्न होणे

 

१. पंडुरोग होणे

२. पुढील जन्मी क्षयरोग होणे

देवाचे चित्र असलेली सुवर्णाची प्रतिमा करून दान करणे दशदाने देणे

(टीप ५)

६. इतर पापकर्मे
अ. घरे मोडणे अतीसार दशदाने देणे
आ. अरण्याचा नाश करणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
इ. रसविक्रय करणे (दारूचा धंदा करणे) १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
ई. षड्रस (कडू, आम्ल, मधुर, लवण, तिखट आणि कषाय) विकणे शरिरात नाना प्रकारचे वायू उत्पन्न होणे गोप्रदान
उ. हरिकथा श्रवण न करणे कर्णमूळ रोग पंचगव्य प्राशन करणे
ऊ. विवाह मोडणे १३ प्रकारचे सन्निपाताचे रोग (टीप १)
ए. विहित वृत्तीला छेद देणे मूळव्याध आणि अतीसार (टीप ३)

टीप १ : सुवर्णतुला करणे, अश्वदान किंवा सार्वजनिक मंदिरे आणि विहिरी बांधणे अन् त्यांच्या सभोवती चिंच, बेल आणि आंबा यांचे वृक्ष लावणे

टीप २ : अश्वत्थ वृक्षास प्रदक्षिणा, ग्रहशांती करणे, प्रायश्चित्त घेणे, देव आणि गाय यांची पूजा करणे

टीप ३ : भूमीदान करणे, रस्त्याच्या कडेने बागा लावणे; देवळे, मठ आणि तळी बांधणे

टीप ४ : नाना प्रकारची फळे आणि रस यांचे दान करणे, जलाशय बांधणे, होम आणि जप करणे, ब्राह्मणभोजन घालणे

टीप ५ : मृत्युंजय अनुष्ठान, शिवपूजा, तुलादान (आपल्या ऐपतीप्रमाणे सुवर्ण, धान्य इत्यादींची तुला करून ते दान करणे), नित्य सुवर्णदान आणि शिवलीलामृताची ११ पारायणे (या आणि मागील जन्मीच्या ब्रह्महत्येच्या पातकावर उपाय)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पुण्य-पाप आणि पापाचे प्रायश्चित्त’

या लेखाच्या दुसर्‍या भागात आपण मनुस्मृति आणि याज्ञवल्क्य स्मृति यांनुसार महापाप्याला मिळणारा जन्म, देवता अन् ब्राह्मण यांच्या धनाचा दुरुपयोग केल्याने मिळणारे फळ, तसेच श्रीगुरुचरित्रात दिल्याप्रमाणे पापामुळे पुढील जन्मात किंवा नरकात भोगावयास लागणारे फळ यांविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. ती वाचण्यासाठी खालील लेखावर क्लिक करा –
पापकर्मे, त्याचे भोग आणि पाप करणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग २)

Leave a Comment