१. तिथी
‘हिंदु पंचांगानुसार, धूलिवंदन हा उत्सव फाल्गुन वद्य प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो.
२. समानार्थी शब्द
धूलिवंदन हा उत्सव धुळवड या नावानेही ओळखला जातो.
३. पूजन
या दिवशी होळीच्या राखेची किंवा धुळीची पूजा करायची असते. पूजा झाल्यावर पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात.
वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ।।
अर्थ : हे लक्ष्मी, तू इन्द्र, ब्रह्मा आणि महेश यांनी वंदित आहेस; म्हणून हे ऐश्वर्यवती देवी, तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर.’
४. धूलिवंदन आणि रंगपंचमी
संकलक : होळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात. फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशीही अनेक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर टाकून रंग खेळला जातो.
रंगपंचमी साजरी करण्याचा उद्देश काय ?
एक विद्वान :
अ. धूलिवंदन
होळीच्या दिवशी प्रदीप्त झालेल्या अग्नीने वायूमंडलातील रज-तम कणांचे विघटन झाल्याने ब्रह्मांडात त्या त्या देवतेचे रंगरूपी सगुण तत्त्व कार्यानुमये त्या त्या स्तरावर अवतरण्यास साहाय्य झाल्याने त्याचा आनंद हा एक प्रकारे रंगांची उधळण करून साजरा केला जातो. या दिवशी खेळली जाणारी रंगपंचमी हे विजयोत्सवाचे, म्हणजेच रज-तमाच्या विघटनातून झालेल्या वाईट शक्तींच्या उच्चाटनातील कार्याच्या समारोपाचे प्रतीक आहे. ही रंगपंचमी समारोपात्मक, म्हणजेच मारक कार्याचे निदर्शक आहे.
धूलिवंदन : रंगांची उधळण करणे
आ. रंगपंचमी
फाल्गुन वद्य पंचमीला खेळली जाणारी रंगपंचमी ही आवाहनात्मक असून तो एक सगुण आराधनेचा भाग आहे. ब्रह्मांडातील तेजोमय सगुण रंगांचा पंचमस्त्रोत कार्यरत करून देवतेच्या त्या त्या तत्त्वांची अनुभूती घेऊन त्या त्या रंगांकडे आकृष्ट झालेल्या देवतेच्या तत्त्वाच्या स्पर्शाची अनुभूती घेणे, हा रंगपंचमीमागील उद्देश आहे. रंगांचा पंचमस्त्रोत, म्हणजेच पंचतत्त्वांच्या साहाय्याने जिवाच्या भावाप्रमाणे त्या त्या स्तरावर ब्रह्मांडात प्रकट होणारा देवतेचा कार्यरत स्त्रोत. ही रंगपंचमी देवतेच्या तारक कार्याचे प्रतीक आहे. या दिवशी वायूमंडलात उधळल्या जाणार्या वेगवेगळ्या रंगांच्या रंगकणांकडे देवतेचे ते ते तत्त्व आकर्षिले जाऊन ब्रह्मांडात कार्यरत असणार्या आपतत्त्वात्मक कार्यलहरींच्या संयोगाने कार्य करून जिवाला देवतेच्या स्पर्शाची अनुभूती देऊन देवतेच्या तत्त्वाचा लाभ मिळवून देते.